' झार बॉम्ब : जाणून घ्या रशियाच्या सर्वात मोठ्या आणि विध्वंसक अणुबॉम्बविषयी! – InMarathi

झार बॉम्ब : जाणून घ्या रशियाच्या सर्वात मोठ्या आणि विध्वंसक अणुबॉम्बविषयी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

६ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी सव्वा आठ वाजता “लिटल बॉय” आकाशातून हिरोशिमाच्या अंगावर झेपावला आणि हिरोशिमा सकट पूर्ण जगाला हादरा बसला!

पाठोपाठ ९ ऑगस्ट रोजी “फॅट मॅन”ने जपानचं कंबरडं मोडून ठेवलं. आजवरच्या इतिहासात, युद्धात अणू बॉम्ब वापरले गेले ते सुदैवाने हे दोनच. काय असतो हो हा अणू बॉम्ब?! मोठ्ठा स्फोट होतो. म्हणजे नेमका किती मोठ्ठा?! त्याचा आवाका काय?

प्रत्येक मूलद्रव्याच्या अणू केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे २ घटक असतात. त्यांची संख्या समान असेल तर तो अणू! तात्पर्याने ते मूलद्रव्य “स्टेबल” म्हटले जाते आणि जर ही संख्या समान नसेल तर ते मूलद्रव्य अस्थिर समजलं जातं. पर्यायाने किरणोत्सर्गी!

 

atomic-bomb-marathipizza

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा जपानवर दोनदा आलं आकाशातून संकट – ज्यातून हा एकटाच पठ्ठ्या बचावला!

उदाहरणार्थ युरेनियम किंवा प्लुटोनिअम. ही दोन मूलद्रव्ये अणूऊर्जा बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. अत्यंत कमी वस्तुमान उपयोगात आणून प्रचंड ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते.

युरेनियमच्या एका अणू केंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा केल्यास त्यातले न्यूट्रॉन फुटून वेगळे होतात आणि ते फुटलेले न्यूट्रॉन इतर अणू केंद्रकांवर जाऊन आदळतात.

ही चेन रीऍक्षन काही नॅनो-सेकंदात होऊन प्रचंड ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. ह्या प्रक्रियेला न्यूक्लीअर फिशन म्हणतात. ढोबळ मानाने हे अणूबॉम्बचं तत्व!

 

zar-bomba-InMarathi

 

१२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी(कसं ते) सांगू शकेल की कुठलंही अस्थिर मूलद्रव्य न्यूट्रॉनच्या स्वरूपात किरणोत्सर्ग होत असल्याने काळानुरूप स्थिर होत जातं. त्यामुळे आण्विक उपयोगासाठी युरेनियम किंवा प्लुटोनिअम मिळवणे अवघड असते.

१६ जुलै १९४५ रोजी अमेरिकेने प्रोजेक्ट मॅनहॅटन अंतर्गत न्यू मेक्सिकोच्या जॉर्नादा डेल म्युएर्टोच्या वाळवंटात “ट्रिनिटी”चं परीक्षण केलं. मानवी इतिहासातली ही पहिली अणू चाचणी!

 

trinity-test-maratrhipizza

 

पाठोपाठ ऑगस्टमध्ये जपानवर २ दणके घातले आणि रशिया पेटून उठला!! दुसरे महायुद्ध आटोपल्यावर अमेरिका आणि रशिया दरम्यान महासत्ता होण्याची शर्यत लागली आणि आपण कसे वरचढ आहोत हे दाखवण्यामध्ये दुर्दैवाने ‘कोणाच्या बॉम्ब मध्ये किती दम’ हा क्राईटेरिया सामील झाला.

कुठल्या बॉम्बची शक्ती किती हे मोजण्याची पद्धत म्हणजे, झालेला स्फोट घडवण्याकरता किती TNT(बारूद) उडवावे लागेल ही! ट्रिनिटी टेस्ट २० किलो टन शक्तीची होती.

म्हणजेच २० हजार टन बारूद जाळल्याने जो स्फोट होईल तितकी. हिरोशिमाचा मुडदा पाडणारा “लिटल बॉय” होता १५ किलोटनचा आणि नागासाकीचा खूनी “फॅटमॅन” होता २१ किलोटनचा! एका सुतळी बॉम्बमध्ये २-३ ग्राम बारूद असते..!

यानंतर रशियाने देखील अणूचाचण्या करायला सुरुवात केली. अमेरिकी आणि रशियन अणू स्पर्धा शिगेला पोचली असताना शेवटचा घाव रशियाने घातला.

३० ऑक्टोबर १९६१ रोजी मित्युशीखा बेटांवर रशियाने लिटल बॉय आणि फॅट मॅनच्या बापाला जन्माला घातलं. बापाचं नाव ठेवलं ‘झार बॉम्बा’… अर्थात ‘राजा बॉम्ब’.

 

zaar-bomb-marathipizza

८ मीटर लांब आणि २.१ मीटरचा परीघ असणाऱ्या ह्या राक्षसाचं वजन होतं २७ हजार किलो! एका खास बनवलेल्या विमानातून ह्या बॉम्बला मित्युशीखाला नेण्यात आलं आणि ८०० किलो वजनाचे पॅराशूटबांधून सोडण्यात आलं. का?

बॉम्ब खाली पडायला वेळ लागावा आणि विमानाला सुरक्षित अंतरावर जायला काही सेकंद मिळावेत म्हणून! बॉम्ब सोडल्याबरोबर विमान गिरकी घेऊन जिवाच्या अकांताने पूर्ण वेगाने दूर उडालं.

पॅराशूटच्या सहाय्याने तरंगत “झार” जमिनीवरून २ किलोमीटर उंचीवर आला आणि कहर झाला! भयाण, अतर्क्य मोठा स्फोट घडून आला! ४ मैल रुंद आगीचा गोळा झळाळला जो २००० किलोमीटर दूरवरून बघता येऊ शकत होता!

१०० किलोमीटर परिघातल्या सगळ्या सिमेंटच्या इमारती आणि इतर गोष्टी भुईसपाट झाल्या.

शेकडो किलोमीटर दूर असलेल्या लाकडी इमारती नष्ट झाल्या. दगडी बांधकामांचे दरवाजे खिडक्या उडाले. २७० किलोमीटर दूर बसलेल्या निरीक्षकांना खास गॉगल घालून देखील आंधळं व्हायची वेळ आली.

१०० किलोमीटर दूर असणाऱ्या माणसाना थर्ड डिग्रीचे चटके जाणवले. तिकडे ९०० किलोमीटर लांब फिनलंड आणि नॉर्वे मधल्या घरांच्या काचा तडकल्या!! ७०० किलोमीटर पर्यंत “शॉक वेव्ह” नोंदवली गेली.

 

zaar-bomb-effect-marathipizza

 

बॉम्बमुळे तयार झालेल्या “मशरूम क्लाऊड” ची उंची होती ६४ किलोमीटर. माउंट एव्हरेस्टच्या ८ पट आणि रुंदी होती ९५ किलोमीटर….! झारची क्षमता होती ५० मेगा टन… ५००००किलोटन!

अमेरिकेने चाचणी घेतलेला सर्वात मोठा अणू बॉम्ब “कॅसल ब्रावो” १५ मेगाटनचा होता. लिटल बॉय १५ किलोटनचा होता ज्यात ६७ किलो युरेनियम वापरलं गेलं होतं. पैकी १ किलो पेक्षा कमी युरेनियमचं फिशन झालं आणि काही ग्राम युरेनियमचं ऊर्जेत रूपांतर झालं. अंदाज बांधा!

जगाच्या इतिहासात घडवून आणला गेलेला हा सर्वात मोठा आणि विध्वंसक विस्फोट! किती मोठा?! लिटल बॉय आणि फॅटमॅनच्या एकत्रित ऊर्जेच्या १५७० पट जास्त ऊर्जा निर्माण झाली.

दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या सगळ्या मिळून विस्फोटकांच्या दहापट जास्त ऊर्जा! आजवर जगात जितके अणुस्फोट झाले त्याच्या एक दशांश ऊर्जा…!

ही गोष्ट १९६१ सालची आहे. ५५ वर्ष लोटलीत! आज काय तंत्रज्ञान आहे?! एखादा झार दिल्लीसारख्या शहरावर पडला तर भारताची, १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाची २ टक्के लोकसंख्या क्षणात गायब होईल. २ टक्के!!!

पुढची शेकडो वर्षे गवताचं पातं उगणार नाही ते वेगळंच! मुंग्या देखील मरत नसतील इतकी माणसे मरतील. मुंबई सोबत नाशिक-पुणे फुकटात भुईसपाट! दिल्लीसह गुरगाव-आग्रा-फरिदाबाद-सोनीपतचा देखील धुव्वा!

हे ही वाचा वाजपेयी आणि कलाम यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत “अण्वस्त्रसज्ज” होऊ शकला!

atom-bomb-effects-marathipizza

 

ह्या सगळ्याचा उद्देश हाच की कशाची कल्पना नसणारे लोक जेंव्हा पाकिस्तानवर एक बॉम्ब हाणा किंवा २ आपल्यावर पडू द्या हरकत नाही वगैरे बोलतात तेंव्हा धडकी भरते!!

अरे तेंव्हाचा परीघ हजार किलोमीटर होता… आताचा? आणि हो, मुळात “झार”ला १०० मेगाटन शक्ती देण्याचे ठरले होते, त्याची घडण १०० मेगाटनची होती…!!

पृथ्वीवरचा माणसाने घडवून आणलेला हा सर्वात शक्तिशाली, विध्वंसक आणि भयंकर विस्फोट असा रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड म्हणणं जीवावर येतं कारण रेकॉर्ड तुटण्यासाठी असतात!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?