जगातील सर्वात प्रसिद्ध शर्यतीच्या घोड्याचे अपहरण – थरारकथा…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
पैसे , मौल्यवान वस्तू, गाड्या ह्या सगळ्यांची चोरी होणे हे अगदी स्वाभाविक आहे , हिंदी चित्रपटवाल्यांमुळे हृदयाची चोरी होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे, राजकारणात एकमेकांचे आमदार खासदार चोरी होतात.
पण आज आपण जो चोरीचा प्रकार वाचणार आहोत तो सगळ्यात वेगळा आणि विचित्र आहे. ही आहे एका घोडयाची चोरी !
शेरगर हा ७५ ते ८० च्या काळातील युरोपमधील सगळ्यात प्रसिद्ध घोडा होता. युरोपात होणाऱ्या घोड्यांच्या रेसमध्ये त्याचे निर्विवाद वर्चस्व होते.
नंतर नंतर तर त्याची स्पर्धा फक्त स्वतःशीच असायची, आपल्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तो नेहमी १०-१५ फुट पुढे असायचा. आज पर्यंतचे डर्बीमधील सगळ्यात चांगले रेकॉर्ड शेरगरचे आहे.
शेरगरचा जन्म १९७८ साली आयर्लंडमध्ये झाला. त्याचे मालक आगाखान (चतुर्थ ) हे होते जे निझारी मुस्लिमांचे नेते आणि एक श्रीमंत व्यक्तिमत्व होते.
शेरगर २ वर्षांचा असताना त्याच्या ट्रेनरने एकदा त्याच्यावर बसून रेस केल्यावर मालक आगाखान ह्यांना सांगितल होत की “ज्या घोड्याची तुम्ही वाट बघत होता तो हाच आहे ”.
त्याचे हे शब्द येणाऱ्या २ वर्षात पूर्णपणे खरे ठरले. शेरगर ३ वर्षांचा असताना त्याने इंग्लंडची सगळ्यात प्रसिद्ध एम्पायर डर्बी ही रेस जिंकली आणि ह्या रेसमध्ये शेरगर ज्या फरकाने जिंकला ते आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड आहे.
ह्या नंतर त्याने विजयांचा सपाटाच लावला ज्यामध्ये आयरिश डर्बी, किंग जॉर्ज (६), क्वीन एलिझाबेथ ह्या प्रसिद्ध शर्यतींचा समावेश होता.
रेसिंग जगतातील अभ्यासकांनी त्याला सर्वोत्कृष्ट घोड्याची पदवी दिली. त्याच्या ह्या यशाचा फायदा घेण्यासाठी त्याचे मालक आगाखान ह्यांनी त्याचे ४० शेयर २५०००० पौंड प्रती शेयर ह्या दराने विकले. त्याच्यासोबत एका ब्रीडिंगसाठी ४०००० पौंड चार्ज घेतला जायचा.
पुढचे वर्ष आपल्या गटातल्या सगळ्या शर्यती गाजवून शेरगर प्रत्येक घोड्याप्रमाणे रिटायर होऊन स्टड झाला. आता त्याचे काम होते वेगवेगळ्या घोडींशी संग करून आपल्यासारखेच उत्कृष्ट जातीचे घोडे जन्माला घालणे.
त्याने ह्या काळात ३५ वेगवेगळ्या घोडींशी संग केला आणि त्यातून त्याला एकूण १७ घोडे आणि १९ घोड्या झाल्या. त्यातल्या काहींनी थोडेफार यश मिळवले मात्र त्याच्या मुलांपैकी कुणीच त्याच्या यशाच्या जवळपास सुद्धा पोहोचू शकले नाही.
याच दरम्यान आयर्लंडमध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ झाली.१९८० मध्ये प्रोटेस्टंट नॉर्दन आर्मी आणि कॅथलिक रिपब्लिक ऑफ आयर्लंड ह्यांच्यात भांडणे सुरु झाली आणि ह्यातूनच आयरिश रिपब्लिकन आर्मी मजबूत झाली.
ह्या सगळ्यात बिचारा शेरगर नकळत ओढला जाणार होता.
८ फेब्रुवारी १९८३ च्या संध्याकाळी शेरगरच्या केयरटेकरच्या दारावर थाप पडली , त्याने दार उघडले तर बाहेर मास्क घातलेली बंदुकधारी माणसे उभी होती.
त्यांनी बंदुकीच्या धाकाने केयरटेकरला शेरगरला ठेवलेल्या तबेल्यात आणले. त्यांनी शेरगरचे आणि त्याच्या केयरटेकरचे एका ट्रकमधून अपहरण केले.
बरेच अंतर गेल्यावर त्यांनी केयरटेकरला रस्त्यात निर्जन ठिकाणी उतरवले आणि चालत आपल्या घरी जायला लावले. लवकरच त्यांनी शेरगरच्या सुटकेसाठी प्रचंड पैशाची मागणी केली.
शेरगरचे मालक आगाखान हे श्रीमंत असामी असल्यामुळे ते सुटकेसाठी मागेल तेवढी किंमत देतील अशी अपहरणकर्त्यांची कल्पना होती आणि त्यासाठीच त्यांनी एका घोड्याचे अपहरण केले होते.
मात्र आता परिस्थिती फार वेगळी होती. आगाखान ह्यांनी पैसे कमावण्यासाठी शेरगरचे शेयर्स विकल्यामुळे शेरगरचे ३५ मालक होते.
अपहरणकर्त्यांनी मागितलेली रक्कम द्यायला जरी आगाखान तयार झाले असेले तरी इतर मालकांत ह्याबाबत एकमत होत नव्हते. ह्या प्रकरणाला प्रसिद्धी माध्यमांनी प्रचंड प्रसिद्धी दिली मात्र ह्याचा काही उपयोग झाला नाही शेरगरची सुटका शेवटपर्यंत होऊच शकली नाही.
आयरिश सरकारने सुद्धा ह्या प्रकरणाचा छडा लावण्याचा फार प्रयत्न केला, अनेक ठिकाणी छापे मारले मात्र त्याच्या हाताला सुद्धा काहीच लागले नाही.
ह्या प्रकरणाचा तपास करणारे अधिकाऱ्यांना सेलेब्रिटीसारखी प्रसिद्धी मिळाली मात्र बिचाऱ्या शेरगरचा मात्र तपास लागू शकला नाही.
त्याच्या सुटकेसाठी पैशाची मागणी करणाऱ्या शेवटच्या फोनवर त्याला गोळी घालून मारण्याची धमकी देण्यात आली होती.
त्यानंतर खूप वर्षांनी म्हणजे १९९९ मध्ये आयरिश रिपब्लिकन आर्मीच्या एका जुन्या खबऱ्याने शेरगरबद्दल माहिती दिली की त्याचे अपहरण केल्यानंतर आयरिश रिपब्लिकन आर्मीने त्याचे संगोपन आणि देखभाल करण्यासाठी एका पशुवैद्याला पाचारण केले होते.
पैसे मिळेपर्यंत ते शेरगरची नीट काळजी घेऊन नंतर पैसे मिळाल्यावर त्याला सोडणार होते. मात्र नियतीला हे सगळे मान्य नव्हते. ऐनवेळी पशुवैद्याने ह्या प्रकरणात असलेला धोका बघून ह्या जबाबदारीतून अंग काढून घेतले.
एवढ्या मोठ्या घोड्याचे संगोपन करणे आता रिपब्लिकन आर्मीच्या लोकांना शक्य नव्हते.
त्यांनी सुटकेसाठीची रक्कम कमी करून काही शेवटचे प्रयत्न करून पाहिले मात्र त्यांना त्यात यश आले नाही आणि त्यामुळे त्यांना नाईलाजाने शेरगरला मारण्याचा निर्णय घ्यावा लागला.
पण हे सुद्धा एवढ सोपं नव्हतं… घोड्याला मारण्यासाठी डोक्यावर एका अचूक जागी गोळी घालावी लागते आणि हे जर माहित नसेल तर घोड्याचा मृत्यू फार तडफडून होऊ शकतो.
रिपब्लिकन आर्मीच्या लोकांना हे माहित नसल्यामुळे शेरगरचा मृत्यू त्याला फार त्रास होऊन, तडफडून झाला असेल असा अंदाज आहे.
त्याच्या टीम मधली माणसे त्याच्या मृत्यूने फार दु:खी झाली होती. त्यांनीसुद्धा शेरगरचा शोध घेण्याचे प्रयत्न केले.
त्याच्या मृत्युच्या शक्यतेने त्यांनी शेरगरचे शव शोधण्याचे सुद्धा प्रयत्न केले मात्र शेरगरचे शव कुणाच्याही कधीच दृष्टीस पडले नाही.
त्याला आयरिश सीमेजवळच कुठेतरी पुरण्यात आले होते असा अंदाज आहे.
अशा ह्या सेलिब्रिटी घोड्याची मिसिंग केस आज सुद्धा उघडी आहे आणि अजूनही त्याचे खरे चाहते त्याची आठवण काढतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved