‘मिस्टर क्लीन’ ते ‘बोफोर्स’ घोटाळा : राजीव गांधींची प्रतिमा – पत्रकार शेखर गुप्तांच्या लेखणीतून
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
राजीव गांधी भारतातील सर्वाधिक जनमत घेऊन आलेले पंतप्रधान होते. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात राजीव गांधींना मिळालेल्या ४१५ जागांच्या बहुमताच्या आकड्यापर्यंत देखील कोणाला पोहोचता आलेल नाहीं.
राजीव गांधी यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द ५ वर्षांची होती, परंतु ह्या पाच वर्षांच्या काळात राजीव गांधीना मिळालेल्या बहुमताचा सन्मान करता आला नाही, त्यांच्या हातून घडलेल्या काही अक्षम्य चुकांमुळे त्यांच्या पक्षाचे अपरिमित नुकसान झाले – असे मत शेखर गुप्तांनी व्यक्त केले आहे.
राजीव गांधींच्या चुकांमुळेच भारतात काँग्रेसला प्रबळ पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाचा उदय झाला, अश्याप्रकारे तीव्र भावना व्यक्त करत राजीव गांधीच्या पंतप्रधान काळातील आठवणींना उजाळा देणारा लेख जेष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी लिहला आहे.
आज जेव्हा लोकसभेच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधीवर केलेल्या टिके नंतर हा लेख महत्वाचा ठरतो.
शेखर गुप्ता आपल्या ह्या लेखाची सुरुवात मायवतीनी राजीव गांधीवर केलेल्या टीकेचा संदर्भ देऊन करतात. मायावतींनी राजीव यांच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर शेखर गुप्ता म्हणतात कि मायावती आणि कांशीराम ह्यांच्या बहुजन समाज पक्षाच्या उभारणीत खरा वाटा राजीव गांधींचा राहिला आहे.
जर राजीव गांधींच्या कृत्यांमुळे कॉंग्रेसची पत खालावली नसती, जर त्यांनी मुस्लीम तृष्टीकरणाचे राजकारण करून आपली हक्काची मध्यमवर्गीयांची व्होट बँक गमावली नसती, तर कदाचित बसपाला उद्याची संधीच मिळाली नसती. यानंतर पत्रकार म्हणून आपल्या राजीव गांधींसोबतच्या आठवणीची उजळणी करत त्यांच्याशी निगडीत एक एक पैलू उलगडला आहे.
राजीव गांधी – एक शांतीदूत
राजीव गांधींच्या आठवणीना उजाळा देताना शेखर गुप्ता म्हणतात कि अनेक फुटीरतावादी तसेच अशांत्तता पसरवणाऱ्या गटांसोबत शांतता प्रस्थापित करण्यात ते यशस्वी झालेले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे पंजाब मधील हरचंदसिंह लोंगेवाल, असाम मधील प्रफुल्ल महंतो आणि भिग्रू फुकन आणि मिझोरम मधील लालडेंगा या फुटीरतावादि नेत्यांसोबत शांतता चर्चा यशस्वी झाली. ज्यामुळे ह्या प्रदेशात शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली.
राजीव गांधीनी १९८८ साली राबवलेल्या ब्लॅक थंडर ह्या ऑपरेशनमुळे पंजाबमधील खलिस्तानि नेत्यांनी पळ काढला आणि कॅनडामध्ये खलिस्तानी चळवळ चालू केली. पण मूळ भूमीवरील तिची तीव्रता कमी झाली. राजीव गांधींच्या प्रयत्नामुळे मिजोरम आणि असाममधील बंड चिरडण्यात आलं होतं.
ह्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यात राजीव गांधी यशस्वी झाले होते.
शेखर गुप्ता आपली एक आठवण सांगताना म्हणतात की राजीव गांधीच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या धोरणामुळे असाममध्ये जनतेत त्यांची चांगली प्रतिमा निर्माण झाली होती. आसाममधील जनतेने त्यांचे मुक्तपणे स्वागत केले होते, त्यांचा जयजयकार केला होता.
अडीच-अडीच वर्षांची कारकीर्द असलेला पंतप्रधान
शेखर गुप्ता राजीव गांधींच्या कारकिर्दीला “दोन अडीच वर्षांच्या कारकीर्द” म्हणतात. ह्यातला अर्धांश कारकिर्दीचा भाग त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम कालखंड होता. ह्यावेळी जेष्ठ पत्रकार अरुण शौरीसोबतची एक आठवण सांगतांना म्हणतात कि अरुण शौरी नेहमी राजीव गांधीवर टीका करायचे त्यावेळी एकदा शौरींची आई त्यांना म्हणाली कि तू उगीचच एवढ्या सुंदर माणसावर टीका करतोस. तेव्हा अरुण शौरी म्हणाले होते की “ती व्यक्ती पंतप्रधान आहे या घरची जावाई नाही.”…!
पंतप्रधानपदाच्या सुरुवातीचा काळ वगळता इतरवेळी राजीव गांधींची कारकीर्द हि वादग्रस्त राहिली होती. १९८५ – १९८८ चा काळ तर अधिक वाईट होता. या काळात राजीव गांधीनी घेतलेल्या निर्णयामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला होता.
मुस्लीम मौलवींच्या दाबबावाखाली येऊन शहाबानो खटल्यातील सुधारणावादी निर्णय बदलल्याने त्यांना हिंदू जनमताचा मोठा रोष ओढवून घ्यावा लागला होता.
१९८५ च्या मंडल कमिशनच्या रिपोर्टला थंड बस्त्यात टाकल्याने नाराज लालू आणि मुलायम या नेत्यांनी इतर मागासवर्गीयांचे नेतृत्व स्वीकारून आपली स्वतची व्होटबँक तयार केली. कांशीराम यांनी एकीकडे बसपाची स्थापना करून दलित व्होटबँक निर्माण केली.
राजीव गांधीच्या चुकीच्या निर्णयामुळे जनमत विभागलं गेलं. १९८९ साली आडवाणीनि रामजन्मभूमीची हाक दिली, यामुळे प्रचंड बहुमत मिळवून सत्तेत आलेल्या कॉंग्रेसला पुढच्या निवडणुकीत आघाडी करायची नामुष्की ओढवली होती.
“एक स्वच्छ प्रतिमेचा नेता ते बोफोर्सचा चोर”
शेखर गुप्ता कमलापती त्रिपाठी ह्या एकेकाळच्या राजीव गांधींच्या विश्वासू व्यक्तीचे उद्गार मांडतात. त्यांच्या नुसार राजीव गांधीच्या लोकप्रतिमेचा प्रवास हा भारताला स्थानिक महाशक्तीचा किताब मिळवून देण्यापासून श्रीलंका युद्धात विनाकारण उडी घेऊन लज्जास्पद माघारीची वेळ आणणाऱ्या नेत्यापर्यंत, एक स्वच्छ प्रतिमेचा नेता ते बोफोर्सचा चोर, एक परिवर्तनवादी राजकारणी ते एक राजकीय घराणेशाहिची उत्पत्ती असा राहिला आहे.
व्हीपी सिंग ह्यांनी संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजीव गांधींची प्रतिमा अजून खराब झाली. पुढे १८ महिन्यांनी झालेल्या इलेक्शनच्यावेळी शेखर गुप्ता हे त्यांच्या निवडणूक काळातील पत्रकारितेच्या आठवणी जागवतात.
सोबत गुप्ता आपल्या दुसऱ्या एका लेखांकाचा हवाला देत राजीव गांधीनी सैन्याच्या आधुनिकतेत दिलेल्या योगदानाची उजळणी करतात. पत्रकार म्हणून राजीव गांधीना बघताना त्यांचा संरक्षण क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीबद्दलचे अनुभव शेखर गुप्तांनी मांडले आहेत.
आयएनएस विराट सारखी युद्धनौका त्यांच्या काळात निर्माण झाली. संरक्षण खात्यातील गुंतवणुकीत प्रचंड वाढ झाली. भारताचा संरक्षण क्षेत्रातील जीडीपी ने ४.१ % चा आकडा ओलांडला होता.
अरुण सिंह ह्या त्यांच्या मित्राच्या सहकार्याने त्यांनी संरक्षणक्षेत्रात क्रांती घडवली होती असं गुप्ता म्हणतात. आज भारतीय सैन्य वापरत असलेल्या आधुनिक शस्त्रास्त्रापैकी बहुतांश राजीव गांधीच्या अद्वितीय कार्यामुळे प्राप्त होऊ शकली आहेत, असं देखील गुप्तांचं मत आहे.
श्रीलंकेतील कारवाई
श्रीलंकेतील कारवाई ही राजीव गांधींची चूक नव्हती असं शेखर गुप्ता म्हणतात पुढे या विधानाला आधार देण्यासाठी ते लिहितात कि लिट्टेच्या अतिरेक्यांनी राजीव गांधींची हत्या घडवून आणली कारण त्यांना भीती होती जर राजीव गांधी पुन्हा पंतप्रधान झाले असते तर कदाचीत त्यांनी श्रीलंकेतून लिट्टे संपवली असती.
राजीव गांधीच्या हत्येमुळे तमिळनाडूतील जनतेच्या मनातील लिट्टेविषयची सहानुभूती नष्ट झाली आणि स्वतंत्र द्रविड राष्ट्राच्या मागणीला ही सुरुंग लागला. ती कायमची संपुष्टात आली. यासाठी एस गुरुमूर्ती रा स्व संघाच्या जेष्ठ विचारवंताचा हवाला शेखर गुप्ता देतात.
राजीव गांधीनी भारताच्या आण्विक मोहिमेत बजावलेल्या भुमिकेवरून आणि NSG, SPG सारख्या सुरक्षाबलांच्या निर्मितीत त्यांच्या असलेल्या योगदानावरून त्यांचं कौतुक गुप्ता करतात.
राजीव यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी विडंबना
राजीव गांधींच्या आयुष्यातील सर्वात मोठी विडंबना म्हणजे त्यांच्या अवतीभवतीचा त्यांचा मित्र परिवार, असं शेखर गुप्ता म्हणतात. आणि पुढे अरुण सिंह ह्या त्यांच्या मित्राचा उल्लेख करतात. राजीव गांधीना देशाच्या संरक्षण क्षेत्रात घडवायच्या बदलांसाठी त्यांनी बोफोर्सची डील केली, यासाठी त्यांनी त्यांच्या मित्रांवर विश्वास टाकला. पण अखेरीस ती डील त्यांच्या आयुष्याला गालबोट लावून गेली.
या राजीव गांधींच्या आठवणी ताज्या करणाऱ्या लेखाची सांगता करताना श्री शेखर गुप्ता प्रतिपादीत करतात कि राजीव गांधी आणि त्यांची शेवटची भेट १९९१ साली झाली होती. तेव्हा ते बिहारच्या गंगा किनाऱ्यावर असलेल्या गावकऱ्याशी संवाद साधत होते.
गुप्ता पुढे म्हणतात कि राजीव गांधी हे एक देशभक्त होते, एका अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाची जबाबदारी सांभाळली होती. स्वतःच्या घरातील अपरिमित दुखाला बाजूला ठेवून, आपल्या आईच्या झालेल्या अमानुष हत्येनंतर देखील राजीव यांनी देशाची धुरा यशस्वी रित्या सांभाळली होती. आणि सातच वर्षांनी ते इतिहासातील पहिल्या मानवी बॉम्बचे बळी ठरले.
मोदींच्या विधानाच्या अनुषंगाने राजीव गांधी संदर्भात सुरु असलेल्या वादात हा शेखर गुप्ता यांचा लेख स्वर्गीय राजीव गांधी यांच्या अज्ञात पैलूंची ओळख करून देतो. अभ्यासू वाचकांनी आवर्जून वाचावा असा हा दीर्घ लेख आहे.
लेखाची लिंक : How Rajiv Gandhi, ‘such a nice man’, won and ruined India’s biggest mandate
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.