मतमोजणी करताना इंडोनेशियात २७० कर्मचाऱ्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाला होता!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
निवडणूका जाहीर झाल्या की शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या तसेच शिक्षकांच्या पोटात गोळा येतो. कारण प्रत्येकालाच भीती वाटत असते ती इलेक्शन ड्यूटीची! इलेक्शन ड्युटी सामान्य माणसाला वाटते तितकी सोपी नाही.
हे प्रचंड जबाबदारीचे व जिकिरीचे तसेच कष्टाचेही काम आहे. हे काम करताना त्या ठिकाणी असलेला प्राथमिक सुविधांचा अभाव आणि कामाचा ताण ह्यामुळे ही ड्युटी करणे सर्वांनाच कठीण जाते.
सध्या आपल्याकडे निवडणूका आणि मतदान सुरु आहे. सगळे सुरळीत पार पडावे ह्यासाठी पोलीस, सुरक्षा अधिकारी आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी व इलेक्शन ड्युटी करत असलेले कर्मचारी ह्यांचा कस लागतो आहे.
इलेक्शन ड्युटी करताना प्रकृती बिघडून कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढवल्याच्याही बातम्या आपण दर निवडणुकीत ऐकतो.
ही ड्युटी फक्त भारतातच नव्हे तर इतर देशांत सुद्धा कठीणच असावी कारण इंडोनेशियात काही काळापूर्वी निवडणूका झाल्या.
ह्या एकदिवसीय निवडणुकीत तब्बल २७२ कर्मचाऱ्यांचा निवडणुकीच्या अतिश्रमामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
दहा दिवसांपूर्वी इंडोनेशियामध्ये एकदिवसीय निवडणूक घेण्यात आली. ही जगातली सर्वात मोठी एकदिवसीय निवडणूक होती. ह्या निवडणुकीच्या अतिकामामुळे २७२ निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
निवडणुकी दरम्यान झालेल्या अतिश्रमामुळे आजारी पडून ह्या लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असे तेथील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने जाहीर केले आहे.
मतदान झाल्यावर मतमोजणी करायची जबाबदारी ह्या लोकांना देण्यात आली होती.
लाखो मते अक्षरश: हातांनी मोजताना त्यांना खूप वेळ आणि श्रम लागले.
१७ एप्रिल रोजी ही निवडणूक घेण्यात आली. राष्ट्रपतीपद तसेच राष्ट्रीय व स्थानिक पदांसाठी सुद्धा एकदमच ही निवडणूक घेण्यात आली . निवडणुकीचा खर्च कमी करण्यासाठी ह्या सगळ्या पदांसाठी मिळून एकदमच एकच निवडणूक एकाच दिवशी घेण्यात आली.
मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले आणि १९३ दशलक्ष जनतेपैकी ८० टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.
प्रत्येक मतदाराने वेगवेगळ्या पदांसाठी पाच मते दिली. ८,००,००० मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडले. निवडणूक अधिकाऱ्यांना ह्या सर्वांची मते हाताने मोजावी लागली.
ह्यामुळेच शनिवार रात्रीपर्यंत जवळजवळ २७२ निवडणूक कर्मचाऱ्यांचा अतिश्रमामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.
तसेच १८७८ निवडणूक कर्मचारी ह्या प्रचंड कामामुळे आणि श्रमामुळे आजारी पडले आहेत असे जनरल इलेक्शन कमिशन (KPU )चे प्रवक्ते अरिफ प्रियो सुसांतो ह्यांनी रविवारी राऊटर्स ह्या न्यूज एजन्सीशी बोलताना सांगितले.
ते पुढे असेही म्हणाले की इंडोनेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने २३ एप्रिल रोजी एक परिपत्रक जाहीर केले आहे.त्यात असे नमूद करण्यात आले आहे की आजारी पडलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी त्यांना आरोग्य सुविधा देण्यात येतील.
तसेच अर्थ मंत्रालयाकडून मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम देण्यात येणार आहे.
इतक्या प्रचंड प्रमाणात असलेल्या मतांची मोजणी हाताने करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आणि ते काम करतांना निवडणूक कर्मचाऱ्यांना झालेले अतिश्रम व त्यामुळे आजारपण व मृत्यू ह्यामुळे KPU वर सगळ्या स्तरांवर टीका होत आहे.
“KPUला कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे व्यवस्थापनच नीट जमलेले नाही.” अशी टीका असे विरोधी पक्षाचे उमेदवार प्रबो सुबिआंतो ह्यांच्या प्रचारसभेचे उपाध्यक्ष अहमद मुजानी ह्यांनी केली. त्यांचे हे वक्तव्य kumparan.com ह्या न्यूज वेबसाईटने प्रसारित केले.
ह्या निवडणुकीचा निकाल २३ मे २०१९ रोजी जाहीर केला जाईल.
२६० दशलक्ष लोकसंख्या असलेल्या ह्या देशात इतक्या प्रचंड प्रमाणात मतमोजणी करणे ते ही हाताने, म्हणजे खरं तर निवडणूक कर्मचाऱ्यांचीच परीक्षा आहे. निवडणूक कर्मचारी ही हाडामांसाची सामान्य माणसे आहेत.
सतत न थकता काम करायला ती काही यंत्रे नाहीत. पण सामान्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा इतका विचार करायला सरकारी यंत्रणेकडे ना वेळ असतो ना इच्छा असते.
माणूस गेल्यावर तुम्ही कितीही नुकसान भरपाई द्या, त्या पैश्यांनी त्या गेलेल्या माणसाला परत आणता येणे शक्य असते का? पण आपल्याकडच्या सारखीच इंडोनेशियामध्येही माणसाच्या जीवाची किंमत फारच कमी आहे असे ह्या घटनेतून दिसून येते.
आपल्याकडेही निवडणूक आणि मतदान सुरु आहे. सगळं सुरळीत पार पडावे म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांपासून ते सुरक्षा यंत्रणांपर्यंत सगळेच झटून काम करीत आहेत.
लोकशाही सुरळीत राहावी म्हणून हे सगळे कामाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. त्यांच्या बाबतीत असे काही घडू नये म्हणून आधीच काळजी घेणे आवश्यक आहे.
ह्या वर्षी भयंकर उन्हाळा आहे.
त्या उन्हाळ्याचा विचार करून निवडणुकांच्या कामासाठी तैनात असलेल्या प्रत्येकालाच प्राथमिक सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्याकडून अतिरेकी श्रम करून घेतले जाऊ नयेत हीच सरकार आणि निवडणूक आयोगाला नम्र विनंती आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.