१९७१ ची टेस्ट सिरिज भारताने जिंकली….आणि त्या खेळाडूने कॅप्टनची शॅम्पेनच संपवली!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
प्रत्येकच खेळात संघात काही ना काही असे किस्से घडतात की जे वर्षानुवर्षे आठवणीत राहतात. क्रिकेटमध्ये सुद्धा मैदानावर आणि ड्रेसिंग रूम मध्ये असे भन्नाट किस्से घडलेले आहेत ज्यांची आठवण काढून आजही माजी क्रिकेटपटू मनसोक्त हसतात.
आज आपण एक असाच भन्नाट किस्सा जाणून घेणार आहोत. ज्यात परदेशात सामना जिंकल्यावर ह्या क्रिकेटपटूने असे काही सेलिब्रेशन केले की त्यामुळे संघाच्या कर्णधाराला वैताग आला.
खरं तर हा किस्सा जुना आहे. त्यामुळे जुन्या जाणत्या चाहत्यांना कदाचित माहित असेलही पण तरुण चाहत्यांसाठी हा किस्सा नवीन असेल.
तर हा किस्सा घडला ते साल होते १९७१!
तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर होते. वाडेकरांना कर्णधारपद देण्याचा निर्णय अगदी अचानक झाला होता.
जे वाडेकर टायगर पतौडी कर्णधार असताना त्यांना कायम संघनिवडीच्या वेळेला “आमचीही आठवण असू द्या” म्हणत असत त्या वाडेकरांनाच पतौडींच्या जागी कर्णधार म्हणून निवडण्यात आले. असे होईल ह्याची कल्पना कुणाच्याही डोक्यात सुद्धा आली नव्हती.
भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व एका उंची नवाबाकडून मुंबईच्या साध्या सरळ अभ्यासू व्यक्तीच्या हाती सोपवण्यात आले होते.
वाडेकरांच्या डोक्यात तेव्हा एकच विचार होता तो म्हणजे मुंबईच्या प्रतिष्ठित VJTI कॉलेजात प्रवेश मिळवून तिथे शिक्षण घेणे. कारण इंजिनियर होणे हे त्यांचे स्वप्न होते.
त्यांनी त्यांचे हे स्वप्न त्यांच्या संघसहकाऱ्यांना देखील सांगितले होते. त्यामुळे कर्णधारपदाचा विचार निदान त्यावेळी तरी त्यांच्या डोक्यात नव्हता.
अशातच वेस्ट इंडिजमध्ये मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. ओव्हलमध्येही भारतानेच विजय मिळवला होता.इंग्लंडला त्यांच्याच देशात हरवणे,ते ही ओव्हलमध्ये… ही बाब काही सहज शक्य होणारी नव्हती.
त्यामुळे ह्याची कुणाला अपेक्षा देखील नव्हती. मात्र चंद्रशेखर ह्यांनी ६ बळी घेऊन इंग्लंडच्या संघाला असे मोठे भगदाड पाडले की त्या पडझडीतून इंग्लंडचा संघ सावरूच शकला नाही.
चंद्रशेखर ह्यांनी ३८ धावा देऊन ६ बळी घेतले आणि इंग्लंडचा संपूर्ण संघ १०१ धावांवरच गारद झाला. जेव्हा भारताचे आबिद अली विजयी धाव घेत होते तेव्हा आपले कर्णधार महोदय मात्र सर्व चिंता विसरून ड्रेसिंग रूम मध्ये आरामात आरामखुर्चीत आराम फर्मावत होते.
आपण हा सामना निश्चितपणे जिंकणार हा विश्वास वाडेकरांना होता म्हणून ते चिंतामुक्त होऊन ड्रेसिंग रूममध्ये आरामात बसले आणि तिथे त्यांचा छान निवांत डोळा लागला.
इकडे आपल्या संघाच्या विजयाचा जल्लोष सुरु झाला तरी त्यांची झोप मोडली नाही. अखेर इंग्लंडच्या संघाचे टीम मॅनेजर केन बॅरिंग्टन आले आणि त्यांनी वाडेकरांना हलवून जागे केले व विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
सामना संपल्यानंतर एकीकडे सगळ्या औपचारिक गोष्टी सुरु होत्या आणि दुसरीकडे भारतीय संघाच्या विजयाच्या समारंभाची (सेलिब्रेशन)ची तयारी सुरु होती.
विविध पक्वान्ने तयार करण्यात आली होती. त्यांची मांडामांड जेवण्याच्या टेबलवर सुरु होती. तसेच शौकिनांसाठी शॅम्पेनच्या बाटल्या सुद्धा होत्या. वाडेकरांना शॅम्पेन अतिशय प्रिय होती.
त्यांनी झोपाळलेल्या डोळ्यांनीच त्या शॅम्पेनच्या बाटल्यांकडे एकदा बघितले आणि नंतर ते प्रेस कॉन्फरन्ससाठी गेले. प्रेस कॉन्फरन्स संपली आणि ते ड्रेसिंग रूममध्ये परत आले.
आता जरा आपल्या आवडीच्या शॅम्पेनचा आस्वाद घेऊ असे म्हणत त्यांनी शॅम्पेनची एक बाटली उचलली तर ती पूर्ण रिकामी होती.
ती ठेवून त्यांनी दुसरी बाटली उचलली तर ती ही रिकामीच निघाली. असे करता करता त्यांनी तिथे असलेल्या सर्व शॅम्पेनच्या बाटल्या बघितल्या तर त्या सर्व बाटल्या रिकाम्याच होत्या.
सर्व शॅम्पेन कुणी संपवून टाकली ह्याबाबत त्यांनी सहकाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की फारुख इंजिनियर ह्यांनी सगळ्या बाटल्या संपवून टाकल्या.
त्यांना इतरांनी असे करू नका, थोडी शॅम्पेन आपल्या वाडेकरांसाठी देखील ठेवा असे सांगून देखील इंजिनियर साहेबांनी मजेमजेत तिथे असलेल्या सगळ्याच बाटल्या संपवून टाकल्या. त्यामुळे वाडेकरांना त्यांना आवडत नसलेली बिअर आणून प्यावी लागली. ह्यामुळे त्यांची चिडचिड झाली.
अर्थात पुढे काय झाले , वाडेकरांनी इंजिनियर साहेबांना बोलणी सुनावली की त्यांनी राग बिअर बरोबर गिळून टाकला ह्याबाबतीत माहिती मिळालेली नाही. तो किस्सा ड्रेसिंग रूमच्या बाहेर काही आला नाही.
फारुख इंजिनिअर हे आपल्या संघातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक होते. त्यांना स्वॅशबकलर म्हटले जात होते. भारतीय संघाच्या आक्रमक फलंदाजीचा त्यांनी पाया रचला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. के श्रीकांत, सेहवाग, गांगुली त्यांचाच आदर्श ठेवून होते.
त्यांना बिलक्रीम बॉय असे देखील म्हटले जात असे. ते देशातील पहिले क्रिकेटपटू होते ज्यांच्याबरोबर बिलक्रीमने करार केला होता. ह्या आधी फक्त इंग्लंडचे डेनिस कॉम्प्टन ह्यांच्याशी ह्या कंपनीने करार केला होता.
फारुख इंजिनिअर ह्यांचा वेस्ट इंडिज विरुद्धचा खेळ चाहते आजही विसरलेले नाहीत. ते ओपनर म्हणून मैदानात उतरले आणि त्यांनी वेस्ट इंडिजच्या तोफ्याच्या माऱ्याला उत्तर देत शतक ठोकले होते.
वेस्ट इंडिजचे वेस हॉल आणि चार्ली ग्रिफिथ हे फलंदाजांवर जणू तोफ्याचा मारा करत असत.त्यांना कडक प्रत्युत्तर देत इंजिनियर साहेबांनी हे धमाकेदार शतक ठोकले होते. भारताकडून खेळणारे ते शेवटचे पारसी खेळाडू होते.
संघात अनेक ठिकाणची, अनेक स्वभावाची मंडळी असतात त्यामुळे ते सर्व एखाद्या कुटुंबाप्रमाणेच एकमेकांना सांभाळून घेऊन राहत असतात.
त्यामुळे अश्या गमतीजमती चालायच्याच असा विचार करून आणि कुटुंबप्रमुख म्हणून वाडेकरांनी इंजिनियर साहेबांवर बहुतेक फार राग काढला नसावा नाहीतर त्याची बातमी ड्रेसिंग रूमच्या बाहेर आलीच असती.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.