' मॉडर्न मारूतीराया आणि टोकाच्या धार्मिक अस्मिता – InMarathi

मॉडर्न मारूतीराया आणि टोकाच्या धार्मिक अस्मिता

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मूड इंडिगो अर्थात मूड आय या आयआयटी पवई च्या फेस्टिव्हलच्या निमित्ताने काही वॉल पेंटिंग्स काढली गेली आणि त्यातल्या एका चित्राने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असा दावा करत एका राजकीय पक्षाने ते चित्र झाकायला लावलं आणि आयोजकांना माफी मागावी लागली.

hanuman-wall-painting-covered-mood-indigo-marathipizza

पण खरोखर धार्मिक भावना दुखावल्या जाव्यात असं काय आहे त्यात?

मला स्वतःला तरी या चित्रात भावना दुखावणारं असं काही वाटत नाहीये. आपल्या गणपती बाप्पाला सुद्धा आपण वेगवेगळ्या रुपात दाखवतोच की…!

मूळ चित्रकाराची कल्पना किंवा हेतू काय होता ते मला माहित नाही, पण मला तरी ते सिम्बॉल्स जास्त पटले.

हा नवीन युगातला हनुमान आहे आणि त्याप्रमाणे कालसुसंगत असे बदल झालेले आहेत –

hanuman-painting-mood-indigo-marathipizza

गदेऐवजी पेन – मारुतीरायाने जसा गदेचा उपयोग करत दुष्ट, राक्षसांचा नाश केला त्याचप्रमाणे लेखणी (ज्ञान) वापरून आधुनिक काळात अज्ञान, खोटा प्रपोगंडा ह्यांचा तो विनाश करेल…!

वेषभूषा –

फॉर्मल शर्ट आणि टाय:-

आजच्या शहरी, शिक्षित तरुण पिढीतल्या एका मोठ्या वर्गाचं हे प्रातिनिधिक चित्र. हेडफोन्स देखील आजच्या तरुणांचं एक सिम्बॉल वाटतं. एका पायातली स्लीपर आणि साधा पॅन्ट हे lower class मधल्या व्यक्तीचं प्रतीक वाटतं. त्याचबरोबर खाली जॉगिंगचे शॉर्ट्स आणि सोबत एलबो, निकॅप्स म्हणजेच फिटनेस, आरोग्य ह्यांचं महत्व दर्शवतात. दंडाला लावलेलं गॅझेट तो टेक सॅव्ही असल्याचं दर्शवतात. एकंदरीत समाजातल्या बहुतांश वर्गाचं तो प्रतिनिधित्व करतो.

घड्याळं :-

इतकी सारी घड्याळं तो वेगवेगळ्या टाइमझोन्स मध्येदेखील काम करत असल्याचं, किंवा थोडी आपली कल्पनाशक्ती आणखी ताणल्यास तो कालत्रयातीत असल्याचं देखील अनुमान काढता येतं.

संजीवनी पर्वत :-

ह्या पर्वतावर एक मंदिर आहे नि सोबतच एक पवनचक्कीसुद्धा – जी Clean Energy चं एक सिम्बॉल आहे. ज्याप्रमाणे संजीवनी बुटीमुळे (आधीच मूर्च्छित असणाऱ्या) लक्ष्मणाचे प्राण वाचले, तसेच ह्या क्लीन एनर्जीमुळे प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसुन कित्येक लोकांचे प्राण वाचवता येतील अशी ह्यामागे कल्पना असावी असं मला वाटतं.

शेपूट :-

इथे शेपटीऐवजी जी ट्रेन दाखवली आहे ती विकासाचं प्रतीक वाटते. नीट बघितलं तर त्यावर आपल्याला सोलर पॅनेल्स दिसतात जी आज काळाची गरज आहे. मारुतीच्या शेपटीप्रमाणे रेल्वे अर्थात दळणवळण वाढतच राहणार आहे आणि ते तसं वाढत राहणं प्रगतीसाठी आवश्यक आहेच. फक्त ते वाढत असताना त्याचे दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट्स कमीत कमी व्हावेत ही काळजी घ्यायला हवी आणि सोलर पॅनेल्स दाखवण्यामागे तेसुद्धा एक कारण असावं असं मला वाटतं.

आता ह्या मुख्य पेंटिंगची पार्श्वभूमी बघितली तर आपल्याला काय दिसतं?

खाली जगात युद्ध, झाडांची कत्तल, पिळवणूक असं दिसतंय (जे डार्क शेड्स मध्ये दाखवलंय) आणि ह्या नव्या मारुतीच्या आगमनाबरोबर एक सूर्य दिसतोय.

hanuman-wall-painting-mood-indigo-marathipizza

आता इतकं सगळं असताना, इतका सकारात्मक संदेश असताना ह्यात मारुतीचा किंवा आपल्या धार्मिक भावनांचा अपमान आपल्याला कसा काय वाटु शकतो? मला तरी तसा वाटलेला नाही.

केवळ हिंदूंनाच टार्गेट केलं जाऊ नये ह्याच्याशी जरी मी पूर्णपणे सहमत असलो तरी आपल्या भावना इतक्यादेखील नाजुक नकोत असं मला वाटतं. कशानेही आपल्या भावना जर दुखावल्या जायला लागल्या तर मग ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी परिस्थिती व्हायला जास्त वेळ लागणार नाही.

अर्थात, हे माझं वैयक्तिक मत असून प्रत्येकाला पटायलाच हवं असं काही नाही.

इमेज स्रोत

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?