' सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालण्याच्या “GoT” बद्दल काही अचंबित करणाऱ्या गोष्टी – InMarathi

सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालण्याच्या “GoT” बद्दल काही अचंबित करणाऱ्या गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

गेम ऑफ थ्रोन्स ह्या मालिकेने सर्व तरुणाईला आणि जगातल्या बहुतांश लोकांना जणू वेडच लावले आहे. ही मालिका अमेरिकन लेखक जॉर्ज आर.आर. मार्टिन ह्यांनी लिहिलेल्या अ सॉंग ऑफ आईस अँड फायर ह्या कादंबरीवर आधारित आहे.

ह्या कादंबरीचे आजवर पाच भाग प्रकाशित झाले अजून लेखक सध्या सहावा भाग द विंड्स ऑफ विंटर लिहीत आहेत.

ह्याच कादंबरीवर गेम ऑफ थ्रोन्स ही जगप्रसिद्ध मालिका तयार करण्यात आली आहे. गेम ऑफ थ्रोन्सच्या कथेत वेस्टेरॉस ह्या काल्पनिक खंडातील ७ राज्यांची व शेजारच्या एसोस ह्या खंडाची कथा आहे.

ह्या ७ राज्यातील अनेक मोठ्या खानदानांच्या व सत्ताभिलाषांच्या अधिपत्त्यासाठी चाललेल्या लढाईची ही कथा आहे. सत्तेचा म्हणजेच सिंहासनाचा खेळ असे थोडक्यात ह्या मालिकेचे वर्णन आपल्याला करता येईल.

 

got-inmarathi
gotwiki.com

ह्या मालिकेचा पहिला भाग १७ एप्रिल २०११ रोजी प्रसारित करण्यात आला.आजपर्यंत ह्या मालिकेचे सात सिझन आले होते आणि ते सगळे सिझन प्रचंड यशस्वी ठरले. १४ एप्रिल रोजी ह्या मालिकेच्या आठव्या आणि शेवटच्या सीझनचा पहिला भाग प्रसारित झाला.

लोक ह्या सिझनची अतिशय आतुरतेने वाट बघत होते. शेवटच्या सिझनला काय होईल? कथा कशी वळण घेईल ह्याबद्दल लोकांनी अगदी भरभरून चर्चा केली.

भर उन्हाळ्यात सुद्धा “विंटर इज कमिंग” म्हणत लोक GOT चा सिझन येणार म्हणून उत्साहात होते आणि अखेर हा सिझन सुरु झाला. ह्या आधीच्या प्रत्येक सिझनमध्ये दहा भाग होते. सातवा सिझन फक्त सातच भागांत संपवण्यात आला.

आता ह्या सिझनमध्ये फक्त सहा भाग असतील.

GOT चे दर्दी फॅन लोक सिझन तर बघतीलच त्यामुळे त्याबद्दल अधिक चर्चा न करता आपण आज GOT बद्दल काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया.

टायरियन लॅनिस्टर हे पात्र ह्या मालिकेत सगळ्यात जास्त भागांमध्ये दिसले आहे. मागच्या सिझनमध्ये प्रदर्शित झालेले भाग मिळून ६७ भागांपैकी ५८ पेक्षा जास्त भागांमध्ये टायरियन लॅनिस्टर दिसला आहे.

इवान ऱ्हेऑन ज्याने GOT मध्ये असंख्य प्रेक्षकांच्या आवडीचा रॅमसे बोल्टन उभा केला त्याची निवड आधी जॉन स्नो ह्या पात्रासाठी झाली होती.

मालिकाकर्त्यांनी इवान आणि किट हॅरिंग्टन ह्या दोघांची नावे जॉन स्नो साठी शॉर्टलिस्ट केली होती आणि नंतर आपल्यापुढे जॉन स्नो म्हणून किट हॅरिंग्टन उभा राहिला.

 

john snow inmarathi
Mashable

ह्या मालिकेचे सहनिर्माते डेव्हिड बेनी ऑफ ह्यांनी ह्या मालिकेचे थीम सॉंग म्हणून “द रेन्स ऑफ कॅस्टमेअर” ह्या गाण्याची निवड केली होती. पण डी .बी. वीस ह्या दुसऱ्या सहनिर्मात्यांनी मात्र डेव्हिड ह्यांच्याशी चर्चा करून त्यांचा निर्णय बदलला.

तरीही “द रेन्स ऑफ कॅस्टमेअर” हे गाणे अनेक वेळा ह्या मालिकेत अनेकदा आले आहे. द नॅशनल आणि आईसलॅंडीक रॉकर्स ह्यांचे ह्या गाण्याचे व्हर्जन्स GOT मध्ये दाखवण्यात आले आहेत.

आईसलँडिक रॉकर्स ह्यांनी ह्या मालिकेत “द रेन्स ऑफ कॅस्टमेअर”चे सादरीकरण केले आहे.

ह्या मालिकेत फार मोठ्या प्रमाणात हिंसा दाखवली गेली आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये कुणाचा ना कुणाचा मृत्यू होतोच असा प्रेक्षकांचा अनुभव आहे. ह्या मालिकेत मागच्या सिझनपर्यंत असे केवळ पाचच भाग आहेत ज्यात पडद्यावर कुणाचा मृत्यू झालेला दाखवलेला नाही.

त्यातील तिसऱ्या सिझनमधील “द बेअर अँड द मेडन फेअर” आणि सहाव्या सीझनमधील “ब्लड ऑफ माय ब्लड” ह्या दोन भागांत कथानकात पडद्यावर किंवा पडद्यामागे कुणाचाही मृत्यू झालेला दाखवलेला नाही.

द बेअर अँड द मेडन फेअर ह्या भागात तर ब्रायन ऑफ टार्थ ही अस्वलाशी लढताना दाखवलेली आहे, तरीही ह्यात कुणाचाच मृत्यू वगैरे दाखवलेला नाही.

जॉफ्री बॅराथीऑन हा वेस्टरॉस राज्याची राणी सेर्सी लॅनिस्टर हीचा सर्वात मोठा मुलगा आहे. त्याचे पात्र एक विकृत असल्यासारखे दाखवले आहे. दुसऱ्याच्या दुःखात सुख असलेला हा मुलगा पाहून अनेकांना रोमन सम्राट कॅलिग्युलाची आठवण झाली.

त्याचा पुतळा आणि जॉफ्री ह्यांच्या चेहेऱ्यात आणि वागणुकीत सुद्धा साम्य आहे.

 

jofrey baratheon inmarathi
ign.com

कॅलिग्युला हा एक क्रूर, दुष्ट आणि विध्वसंक राजा होता. त्याच्या वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या जनतेपैकी एकाने त्याचा वध करून त्याचे शासन संपुष्टात आणले.

गेम ऑफ थ्रोन्स ही अतिशय भव्यदिव्य मालिका आहे. ह्यात अनेक स्पेशल इफेक्टस आहेत. त्यामुळे ह्या मालिकेचा खर्च प्रचंड आहे.

पहिल्या सिझनच्या निर्मितीसाठी तब्बल ५० ते ६० मिलियन डॉलर्स इतका खर्च आला होता. म्हणजेच प्रत्येक एपिसोडचा खर्च हा साधारणपणे ५ मिलियन डॉलर्स होता.

एखाद्या टीव्ही मालिकेसाठी इतका खर्च सहसा कुणी करत नाही. पण HBO ने मात्र ह्या मालिकेसाठी “होऊ दे खर्च, GOT आहे घरचं” हे धोरण ठेवून ह्या मालिकेसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे.

सहाव्या सिझनसाठी तर १०० मिलियन डॉलर्स इतका खर्च आला होता. पण हा पैसा वाया गेला नाही हे तर नक्कीच! एक एक एपिसोड करताना किती मेहनत घेतली आहे हे पाहिल्यानंतर कळतेच.

GOT च्या अस्सल प्रेक्षकांना पहिल्या सिझनमधील डेनेरीजचा तो सीन आठवत असेलच जेव्हा तिने चक्क घोड्याचे हृदय खाल्ले होते..

हे बघून अनेकांना किळस आली असणार! खरं तर ते खोटे रक्त होते आणि ते कॉर्न सिरपपासून तयार केले जाते. पण हा सीन करताना एमिलीया क्लार्कला सुद्धा प्रचंड किळस आली होती.

हा सीन करताना जे खोटे रक्त वापरले होते त्याने तिला इतका त्रास झाला की तिला बराच वेळ बाथरूममध्ये घालवावा लागला.

 

denarys inmarathi
youtube.com

डेनेरीचे जेव्हा खल ड्रोगोशी लग्न झाले तेव्हा तिला इलियरीओ मोपॅटिसने ड्रॅगनची तीन प्राचीन अंडी दिली. डेनेरी त्या ड्रॅगन्सची आई झाली. आज आपण ह्या मालिकेत जे ड्रॅगन्स बघतो ते ह्याच अंड्यांतून बाहेर आलेले आहेत.

मालिकेसाठी ही अंडी ज्यांनी तयार केली त्यांनी ती अंडी लेखक जॉर्ज आर आर मार्टिन ह्यांना भेट म्हणून देऊन टाकली.

ह्या मालिकेत काही काही पात्रे एकमेकांचा इतका द्वेष करतात की ती कधीही एकमेकांच्या जीवावर उठतील अशी परिस्थिती आहे. ह्यापैकीच एक जोडी आहे सीर्सी आणि टीरियन ह्यांची! मालिकेत ह्यांच्यातून विस्तव जात नाही अशी परिस्थिती आहे.

अर्थात टीरियन सिर्सीचा इतका द्वेष करत नाही, जितका ती करते (समझनेवाले को इशारा काफी है!)… पण खऱ्या आयुष्यात मात्र ही पात्र ज्यांनी रंगवली आहेत ते पीटर डिंक्लेज आणि लीना हेडी हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.

पीटरने एकदा सांगितले होते की,

“सीन दरम्यान आम्ही शक्यतोवर एकमेकांकडे बघणेच टाळतो जेणे करून काही गंभीर डायलॉग बोलता बोलता मध्येच आम्हाला हसायला येऊ नये.”

सर ग्लेगोर क्लेगाने उर्फ द माउंटन हे पात्र रंगवणारे कलाकार दोन वेळा बदलले आहेत. पहिल्या सीझनमध्ये कॉनन स्टीव्हन्स ह्यांनी द माउंटनची भूमिका केली होती तर दुसऱ्या सिझनमध्ये इयन व्हाईट ह्यांनी द माउंटन साकारला होता.

सध्या ही भूमिका Hafþór Júlíus Björnsson साकारत आहेत तर इयन व्हाईट ह्यांच्या वाट्याला वून वून द जायंट ही भूमिका आली आहे.

 

giant inmarathi
aminoapps.com

गेम ऑफ थ्रोन्स तयार होण्याच्या आधीच लेखक मार्टिन ह्यांनी टीरियन लॅनिस्टरच्या भूमिकेसाठी पीटर डिंक्लेजचीच कल्पना केली होती. आणि जेव्हा ह्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी कास्टिंग केले तेव्हा पीटर डिंक्लेज सोडून इतर कुणाचाही ह्या भूमिकेसाठी विचार केला गेला नाही.

गेम ऑफ थ्रोन्समध्ये हॅरी पॉटरच्या चित्रपटांतील अनेक कलाकार आहेत. हॅरी पॉटर मध्ये निंफिडोरा टॉंक्स साकारणारी नटालिया तेना गेम ऑफ थ्रोन्समध्ये ओशाच्या भूमिकेत आहे.

तर हॅरी पॉटरमध्ये मिस्टर फील्चची भूमिका करणारे डेव्हिड ब्रॅडली GOT मध्ये लॉर्ड वॉल्डर फ्रे साकारत आहेत. हॅरी पॉटर अँड द चेम्बर ऑफ सिक्रेट्समध्ये ऍरॅगॉगला आवाज देणारे ज्युलियन ग्लोव्हर DOT मध्ये Grand Maester Pycelle आहेत.

ह्याचप्रमाणे हॅरी पॉटरमध्ये हर्मायनीच्या आईची भूमिका करणाऱ्या मिशेल फेअरली ह्या GOT मध्ये कॅटलीन स्टार्कच्या भूमिकेत आहेत.

तसेच ऍबफोर्थ डम्बलडोर म्हणून दिसणारे कियरन हाईंड्स GOT मध्ये मान्स रायडर म्हणून दिसतात. हॅरी पॉटरमध्ये प्रोफेसर हॉरस स्लगहॉर्न म्हणून ओळखले जाणारे जिम ब्रॉडबेन्ट हे GOT मध्ये Archmaester Marwyn आहेत.

इतर आणखी पाच सहा कलाकार आहेत ज्यांनी हॅरी पॉटर मध्येही लहानमोठ्या भूमिका केल्या आहेत आणि ते GOT मध्ये देखील आहेत.

हॅरी पॉटर प्रमाणेच स्टार वॉर्स ह्या सिनेमातील आठ कलाकार सुद्धा GOT मध्ये आहेत. तसेच BBC च्या रिपर स्ट्रीट ह्या कार्यक्रमातील ११ कलाकार GOT मध्ये लहानमोठ्या भूमिका बजावत आहेत.

 

walder freay inmarathi
screenertv.com

ह्या मालिकेमध्ये आजवर अनेक गायक/संगीतकार एक्स्ट्रा म्हणून दिसले आहेत. “द रेन्स ऑफ कॅस्टमेअर” ह्या गाण्यात कोल्डप्लेचा ड्रमर विल चॅम्पियन दिसला तर हार्डहोम मध्ये हेवी मेटल बँड Mastodon दिसला ज्यांना व्हाईट वॉकर्सने मारले आणि नंतर ते वाईट्स म्हणून परत जिवंत होतात.

तसेच सातव्या सीझनमध्येएड शीरीन सुद्धा लॅनिस्टर सैनिक म्हणून दिसला आहे.

GOT मधील युद्धाची दृश्य चित्रित करताना त्यांची प्रेरणा खऱ्याखुऱ्या युद्धप्रसंगांतून घेतली आहे.

बॅटल ऑफ द बास्टर्ड्स मध्ये बोल्टन सैन्याने जी युद्धनीती वापरली ती कार्थाजिनियन जनरल हॅनिबल ह्यांनी दुसरी प्यूनिक युद्धाच्या वेळी रोमविरुद्ध वापरली होती.

तर अश्या ह्या GOT बद्दल पडद्यामागच्या काही मनोरंजक गोष्टी आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?