निवडलेली भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकू शकेल? वाचा एक अभ्यासपूर्ण विश्लेषण
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लेखक : विद्याधर जोशी
===
यंदा होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला. हा संघ सर्वसाधारणपणे अपेक्षित असाच आहे.
अपेक्षित म्हणजे निवडसमिती ज्या खेळाडूंना घेऊन गेल्या काही एकदिवसीय सामन्यात विविध शक्यता आजमावत होती त्या भूमिकेशी एकदम फारकत घेऊन कुणाचीही निवड झालेली नाही.
हा संघ योग्य आहे का? उपलब्ध असलेले पर्याय पाहता, हो.
हा संघ विश्वचषक जिंकायच्या दर्जाचा वाटतो का? संघातल्या अननुभवी खेळाडूंनी विश्वचषकाचा दबाव न घेता मोकळेपणाने खेळ केला तर अशक्य नाही.
सलामीसाठी रोहित शर्मा, शिखर धवन आणि के.एल.राहुल (हा सलामीसाठी हे गृहीत धरलंय). यापैकी रोहित शर्माचा दर्जा खूप वरचा. प्रश्न फक्त त्याच्या सातत्याचा. इंग्लंडमध्ये तर अधिकच.
धवन आणि राहुल इंग्लंडमधील वातावरणाशी किती जुळवून घेतील ते पहायला हवं. पण पर्यायही फारसे बरे नव्हते सलामीसाठी.
तीन नंबरला विराट कोहली असेल. संघ फलंदाजीसाठी त्याच्यावर खूप जास्त अवलंबून आहे. त्याच्यानंतर चार आणि पाच नंबरसाठी पर्याय केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि विजयशंकर.
यापैकी केदार जाधव आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखा आहे. संघाला हवं ते तो प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो.
दिनेश कार्तिक गुणवान आहे पण सातत्याचा अभाव. विजयशंकर मला १९८३ च्या विजेत्या संघामधील कीर्ती आझाद सारखा वाटतो. म्हणजे सगळ्यात थोडा थोडा. पण त्याच्याकडे गुणवत्ता आहे, विशेषतः फलंदाजीत.
इंग्लंडमधल्या वातावरणात एखादा तंत्रशुध्द फलंदाज अगदी एकदिवसीय सामन्यातही उपयोगी पडला असता. पण अजिंक्य रहाणे वारंवार निराशा करतोय आणि चेतेश्वर पुजाराला आपण कसोटी वगळता इतर क्रिकेटमधून बादच केलंय.
त्यामुळे आपली फलंदाजी चार नंबरपासून आपल्यालाच धोकादायक वाटेल अशी आहे.
सहाला धोनी (याच्या फलंदाजीचा क्रम बदलू शकतो आणि गरजेनुसार तो चार किंवा पाचला खेळू शकतो) ज्याला पर्याय नाही. त्याचं यष्टीरक्षण उच्च दर्जाचं. Proxy कर्णधार तर तो आहेच आणि मनापासून कोहलीला सहकार्य करतो.
शिवाय आपल्यासाठी तो मैदानावरचा तिसरा अंपायर आहे. त्याची फलंदाजी थोडी मंदावली आहे. पण उपलब्ध पर्यायांपैकी सर्वोत्तम तोच आहे त्याचं इतर योगदान बघता.
सातसाठी बहुदा हार्दिक पंड्या असेल. तो गोलंदाजीला आला की मलाच भीती वाटायला लागते. तर फलंदाजापेक्षा कोहलीला किती वाटेल? पण थोडा डोक्याचा वापर केला तर इंग्लंडमध्ये तो चालून जाईल.
त्याची फलंदाजी वेस्ट इंडियन जातकुळीची. म्हणजे डोक्याविना हातोडे.
(काल IPL सामन्यात त्याने संघाला जिंकून दिल्यानंतर तो मुलाखतीला आला तेव्हा तो काय बोलेल या भीतीने मी टीव्ही बंद केला लगेच)
आता उरतात चार निव्वळ गोलंदाज.
फिरकी गोलंदाजीसाठी तीन पर्याय कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल आणि रविंद्र जडेजा (याला अष्टपैलू म्हणूया). यापैकी जडेजा संघात असेल तर फलंदाजी थोडी मजबूत होते.
याचा अर्थ कुलदीप आणि चहल पेक्षा बरी आहे ती इतकाच. परिस्थितीनुसार यातले कुणीतरी दोघे संघात असतील.
वेगवान गोलंदाजांचं त्रिकुट म्हणजे सर्वोत्तम जसप्रीत बुमराह, सध्या भन्नाट गोलंदाजी करत असलेला मोहम्मद शमी आणि इंग्लंडमध्ये प्रभावी ठरू शकेल असा भुवनेश्वरकुमार.
यापैकी भुवनेश्वरची अचूकता सध्या थोडी कमी झालेली वाटते. निव्वळ वेगवान गोलंदाज म्हणून या तिघांना back up ठेवलेला नाही म्हणजे विजयशंकर आणि हार्दिककडून संघाला अपेक्षा आहेत. मला ही परिस्थिती धोकादायक वाटते.
अर्थात ह्या संघाच्या फलंदाजीपेक्षा गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण जास्त विश्वासार्ह आहे.
विराट कोहली हा Leading by example प्रकारात मोडणारा कर्णधार आहे. पण मला तो कधीच कल्पक कर्णधार वाटलेला नाही. अर्थात यावेळी तरी याची फारशी चिंता नाही कारण धोनी आहे ना.
निवड न झालेले फलंदाज रायडू, रहाणे आणि पंत. यापैकी पंतला अजून बरंच शिकायचंय. फलंदाजीतला त्याचा उतावीळपणा कमी होणं आणि यष्टीरक्षणात खूप जास्त सुधारणा होणं आवश्यक. यष्टींपाठी तो गोलकीपर अधिक वाटतो. त्यामुळे त्याला न निवडणं उत्तम.
उरलेल्या दोघांची निवड न होणं हे स्वकर्तृत्व. निवड न झालेला प्रमुख गोलंदाज उमेश यादव ज्याचं दुःख त्याला आणि जगभरातल्या फलंदाजांना झालं असेल. आपल्याला व्हायचं कारण नाही.
भारतीय संघाला शुभेच्छा देऊया. धोनीचा शेवटचा विश्वचषक संस्मरणीय करण्यासाठी सर्व खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील अशी अपेक्षा करूया.
टीप : परवा IPL च्या एका सामन्यात संघाला विजय मिळाल्याच्या आनंदापेक्षा स्वतःचं शतक हुकल्याचं दुःख शिखर धवनच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
नव्वदीत दिमाखात दाखल झाल्यावर बहुमूल्य चेंडू फुकट घालवून शंभरपर्यंत सरपटत जायचं हे मर्यादित षटकांच्या सामन्यात परवडत नाही. ही खास भारतीय वृत्ती ठेचायचं कुणीतरी मनावर घेवो आणि संघ सर्वप्रथम ही भावना सर्वांमध्ये रुजवो ही अपेक्षा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.