मानसिक विकारावर मात करत क्रीडाक्षेत्र गाजवणाऱ्या या खेळाडूंकडे बघून ‘जिद्द’ म्हणजे काय हे कळते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
जगातल्या कुठल्याही सर्वसामान्य घरात बाळाचा जन्म ही अतिशय आनंदाची घटना समजली जाते. त्या लहान जीवाचे स्वागत आनंदात केले जाते. आणि नंतर त्याच्या बाललीला बघत, त्याची प्रगती बघत अख्खे घर आनंदित होते. पण जर बाळाची प्रगती नॉर्मल नसेल तर आणि आई वडिलांना बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम जाणवत असेल तर वेळोवेळी डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेतले जाते.
काही बाळे पटापट माईलस्टोन्स गाठतात, तर काही बाळे हळूहळू एक एक पायरी चढतात.
काही मुले गर्दीला प्रचंड प्रमाणात घाबरतात, अनोळखी लोकांच्या समवेत त्यांना प्रचंड अस्वस्थ वाटते, ती आपल्याच जगात मग्न असतात आणि कसलाही प्रतिसाद देऊ शकत नाहीत.
अशावेळी आईवडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते आणि आपले मूल ऑटिस्टिक किंवा स्वमग्न आहे हे जेव्हा आईवडिलांना कळते तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते.
ऑटिझम किंवा स्वमग्नता हा आजार नसून ती एक मानसिक अवस्था आहे. ह्या अवस्थेचे पूर्ण नाव सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असे आहे. ही एक अतिशय गुंतागुंतीची मानसिक अवस्था आहे. प्रत्येक ऑस्टिस्टीक मूल हे सारखे नसते. आणि प्रत्येकामध्ये ऑटिझमचे प्रमाण कमी जास्त असू शकते.
स्वमग्नता किंवा ऑटिझम ही एक जन्मस्थ अवस्था आहे, हा कुठलाही मानसिक आजार नव्हे.
लिओ केनर ह्यांनी ह्याबद्दल १९४३ साली शोधून काढले. ऑस्टीटिक व्यक्ती आपल्याच विश्वात रममाण असतात. त्यांना संवेदनांचे अर्थ लावण्यात अडचण येते त्यामुळे त्या व्यक्तींना प्रतिक्रिया देताना त्रास होतो किंवा अडचणी येतात. अश्या व्यक्ती आपल्या नजरेला नजर देऊ शकत नाहीत. कधी कधी भाषेचा विकास खूप उशिराने होतो किंवा काही केसेसमध्ये अश्या व्यक्ती नॉन व्हर्बल असतात.
कधी कधी आपण जे बोलतो तेच ह्या व्यक्ती पुन्हा पुन्हा बोलतात. त्यांना दुसऱ्या व्यक्तींशी संवाद साधता येत नाही, त्यामुळे त्यांना मैत्री करण्यात अडचणी येतात.
ह्या व्यक्ती त्यांच्या नेहमीच्या परिस्थितीत बदल झाला तर खूप अस्वस्थ होतात. ह्या व्यक्ती प्रकाश, आवाज, वास, चव आणि स्पर्श ह्या बाबतीत खूप संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांना बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास त्रास होतो.
परिचित व्यक्तीनेही त्यांना स्पर्श केल्यास ह्या व्यक्तींना ते आवडत नाही आणि ते विरोध दर्शवतात. कधी कधी तीव्र ऑटिझम असल्यास त्यांना वेदना झाल्या तरी त्याबद्दल सांगता येत नाही,प्रतिसाद देता येत नाही.
काही ऑटिस्टिक मुले फिरत्या वस्तूंकडे एकटक बघत बसतात. डोळ्यांची, हातांची नकळत हालचाल करतात. ही सर्व लक्षणे एकाच व्यक्तीत असतीलच असे नाही, किंवा ह्यापैकी दोन तीन लक्षणे आढळल्यास ती व्यक्ती ऑटिस्टिक आहे असेही म्हणता येत नाही.
पण ऑटिस्टिक व्यक्तीत ह्यापैकी अनेक लक्षणे आढळू शकतात. आपले मूल ऑटिस्टिक आहे की नाही ह्याचे निदान केवळ मनोविकार तज्ज्ञ किंवा बालरोग तज्ज्ञ करू शकतात.
ऑटिझम विषयी वेळीच लक्षात आले तर ह्या मुलांसाठी उपचार आणि त्या अनुषंगाने शिक्षण पद्धतींचा वापर करून त्यांना शिकवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करावे लागतात. पण दुर्दैवाने आपले मूल ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहे हे कधी कधी पालकांच्या लक्षात येण्यास वेळ लागतो. कारण ह्या मानसिक अवस्थेत शारीरिकदृष्ट्या काहीच वैगुण्य नसते.
असे मूल कमी बोलते, एकटे राहणे पसंत करते, अनोळखी लोकांत मिसळण्याची त्यांना इच्छा नसते किंवा अनोळखी लोकांना ते घाबरतात. त्यांना फार मऊ आणि खडबडीत स्पर्श सहन होत नाही. अशी मुले शून्यात नजर लावून एकटक बघत बसतात. चिडचिड करतात. उगीच रडतात.
पण अशी लक्षणे असली तर आईवडिलांना आपले मूल हट्टी आहे, मूडी आहे असे वाटते. ह्या मानसिक अवस्थेत कुठलीही विशिष्ट शारीरिक लक्षणे न दिसल्यामुळे आजाराची लक्षणे आपल्या मुलांच्या वागण्यातूनच ओळखून वेळीच पावले उचलावी लागतात.
अजूनही बऱ्याच लोकांना स्वमग्नता म्हणजे काय ह्याबद्दल माहिती नाही.
स्वमग्न व्यक्तींना भाषा संप्रेषण आणि वैचारिक देवाणघेवाणीची समस्या असते. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद देताना गोंधळ उडतो. म्हणूनच ही मुले भोवतालच्या जगाशी काहीही संपर्क नसल्यासारखे वागतात.
आपले बोलणे त्यांच्या कानांवर पडून देखील ते नजरेला नजर देऊ शकत नाहीत. शाब्दिक प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्यावर मतिमंदत्वाचा शिक्का बसतो. पण अनेक ऑटिस्टिक मुले हे मतिमंद नसतात.
ऑटिझममध्येही स्टीरिओटाईप ,कंपल्सिव्ह, रिच्युअलिस्टीक व रिस्ट्रीक्टेड असे प्रकार आहेत. ह्याविषयी जनजागृती होणे अतिशय आवश्यक आहे म्हणूनच २ एप्रिल हा दिवस वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो तर एप्रिल महिना हा ऑटिझम अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो. स्वमग्न मुलांना शिकवण्यासाठी विविध पद्धतींचा संयुक्तपणे वापर करावा लागतो.
आपले मूल स्वमग्न आहे हे पालकांना स्वीकारणे कठीण जाते. पण ते स्वीकारून त्या मुलांचे आयुष्य शक्य तितके सुकर करण्यासाठी प्रयत्न हे पालकांनाच करावे लागतात.
ह्या मुलांचे आयुष्य सुकर करण्यासाठी प्रचंड पेशन्स ठेवून त्यांना प्रेमाने समजून घेण्याची आवश्यकता असते. आपले मूल ऑटिस्टिक आहे म्हणजे सगळे संपले असे मानू नये. कित्येक ऑटिस्टिक मुले उत्तम कलाकार असतात. त्यांच्या भावना ते विविध कलेतून व्यक्त करतात. मोठ-मोठी आकडेमोड काही सेकंदात करतात.
काहींची स्मरणशक्ती अगदी चमत्कारिक असते. कित्येक जागतिक दर्जाचे यशस्वी खेळाडू सुद्धा ऑटिस्टिक स्पेक्ट्रममध्ये आहेत.
कधी कधी ऑटिझम स्पेक्ट्रममध्ये असलेल्या मुलांना ADHD म्हणजेच अटेन्शन डिफिसिट / हायपरऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असू शकतात. ह्या दोन्हींची लक्षणे एकमेकांच्या जवळ जाणारी आहेत. बरेचसे खेळाडू हे ADHD वर मात करून आज यशस्वी झालेले आहेत.
क्ले मार्झो -सर्फर
जसे अनेक ऑटिस्टिक व्यक्तींबद्दल लोकांचे गैरसमज होतात, तसाच गैरसमज क्ले मार्झो ह्याच्याबाबतीत सुद्धा झाला. तो मोठा होताना त्याला डिस्लेक्सिया, ADD , मतिमंद अशी अनेक चुकीची विशेषणे लावली गेली. त्याला सामाजिक जीवनात वावरताना अनेक अडचणी होत्या. पण त्याच्या सर्फबोर्डवर मात्र तो समुद्राचा राजा होता.
तो अठरा वर्षांचा झाला तेव्हा त्याला ऍस्पर्जर्स सिंड्रोम असल्याचे निदान झाले. पण तुम्हाला जर असे वाटत असेल की ऍस्पर्जर्स सिंड्रोमचा त्याच्या सर्फिंगवर काही परिणाम झाला असेल तर तसे नाही.
तो अठरा वर्षांचा होण्याच्या आतच त्याने एक उत्तम सर्फर म्हणून ख्याती मिळवली होती. त्याच्या आयुष्यावर “जस्ट ऍड वॉटर” नावाचा चित्रपट सुद्धा येऊन गेला. त्याच्या ह्या विजयामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली.
पण क्लेला ना पैश्यांमध्ये रस आहे, ना प्रसिद्धीत! त्याला सर्फिंग करणे का आवडते हे विचारल्यावर तो सांगतो की समुद्राच्या लाटा म्हणजे मला माझे घर वाटते.
त्याला संवाद साधण्यात अडचण येते, पण त्याला समजून घेतले की त्याच्याशी संवाद साधणे अवघड नाही. दैनंदिन जीवनात मात्र त्याला संघर्षाला सामोरे जावे लागते हे ही तितकेच खरे.
टॉमी डीस ब्रीसे -धावपटू
टॉमी पाच वर्षांचा असताना डॉक्टरांनी त्याच्या आईवडिलांना सांगितले होते की टॉमी कधीही बोलू शकणार नाही. पौगंडावस्थेत त्याच्यावर अनेक औषधांचे प्रयोग झाले,आणि अत्यंत संघर्षमय आयुष्य तो जगला. औषधांमुळे त्याच्या वजनावर परिणाम होऊन त्याचे वजन खूप वाढले. पण त्याचे आईवडील मात्र ठाम होते.
आपला मुलगा यशस्वी होणारच हा त्यांच्या मनात विश्वास होता. टॉमीचे वडील पीटर हे स्वतः एक उत्तम धावपटू होते. त्यांनी टॉमीला धावण्यात रस घेण्यास मदत केली.
आपल्या वडिलांबरोबर जॉगिंग करणे टॉमीला आवडत होते. तिथेच त्याला धावण्यात रस निर्माण झाला. त्याने धावण्याचा सराव करायला सुरुवात केल्यावर पहिल्याच वर्षात त्याने झपाट्याने वजन कमी केले आणि विविध स्पर्धांमध्ये भाग घेणे सुरु केले. आणि हळूहळू त्याला बक्षिसे सुद्धा मिळू लागली.
धावण्यात यशस्वी झाल्यानंतर त्याने कायाकिंग आणि क्रॉस कंट्री स्किंग रेस मध्ये भाग घेऊन तिथेही यश मिळवले. पण त्याचे पहिले प्रेम धावणे हेच आहे. धावण्यामुळे त्याच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडले. त्याची अस्वस्थता कमी झाली, काही प्रमाणात तो लोकांमध्ये वावरू शकतो आणि त्याचे औषधांवर अवलंबून राहणे कमी झाले.
आपल्याला समस्या असल्या तरी त्यावर मत करून यश मिळवता येते हे त्याने करून दाखवले आणि त्यातुन अनेक लोक प्रेरणा घेत आहेत.
जेसिका जेन-ऍप्पलगेट – जलतरणपटू
पॅरालीम्पिकमध्ये २४ सुवर्णपदकांची कमाई करणारी ब्रिटिश जलतरणपटू जेसिका जेन -ऍप्पलगेट हिच्या नावावर ११ ब्रिटिश विक्रम आहेत तसेच १०० मीटर बटरफ्लायचा विश्वविक्रम आहे. तिला ऍस्पर्जर्स सिंड्रोम आहे. ती लहान असतानाच तिला ऍस्पर्जर्स सिंड्रोम असल्याचे निदान झाले होते.
पण तिने व तिच्या पालकांनी ह्यापुढे हार मानली नाही. वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत तिने जलतरणात अनेक विक्रम केले होते.
काही वर्षानंतर तिची युके स्पोर्टींग टॅलेंट प्रोग्रॅमसाठी निवड झाली आणि तिने २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा विश्वविक्रम नोंदवला. २०१२ च्या पॅरालिंपिक्समध्ये इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड श्रेणीत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली ब्रिटिश खेळाडू होती.
त्यानंतर तिने अनेक विक्रम मोडले आणि २०१३ साली जलतरण ह्या खेळात अप्रतिम प्रदर्शन केल्यामुळे ती द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरची सदस्या झाली. तिच्या आयुष्यात असलेल्या ह्या अवस्थेमुळे ती थांबली नाही. तिने प्रयत्न करून जे इतरांना साध्य नाही ते साध्य करून दाखवले.
असेच ऑस्ट्रेलियन जलतरणपटू मायकल फेल्प्स, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन, अमेरिकन खेळाडू ब्रूस जेनर, मॅजिक जॉन्सन,जॅकी स्टीवर्ट, टेरी ब्रॅडशॉ , ब्रूस जेनर, जेसन कीड, चार्ली हसल (पीट रोझ) ,द रायन एक्सप्रेस म्हणजेच नॉलन रायन, स्कॉट एयर अश्या अनेक खेळाडूंमध्ये ADHD चे निदान झाले आहे.
तरीही त्यांनी प्रचंड संघर्ष करीत आपल्या मानसिक अवस्थेवर मात करीत आपापल्या खेळात प्राविण्य मिळवून यश संपादन करत अनेकांना प्रेरणा दिली.
ऑस्टीटिक मुलांच्या आईवडिलांनी असे खचून न जाता आपल्या अपत्याचा रस कशात आहे हे शोधून काढून आपल्या पाल्याला संधी आणि योग्य ते प्रशिक्षण मिळवून दिले तर ही मुले नक्कीच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात खूप पुढे जाऊ शकतात. त्यांच्यात ती क्षमता नक्कीच असते.
अश्या स्पेशल मुलांसाठी आपण समाज म्हणून त्यांना कमी न लेखता त्यांच्यातल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे, त्यांना समजून घेऊन त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण दिले पाहिजे. त्यांची हेटाळणी न करता, त्यांची खिल्ली न उडवता त्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे.
आणि हे करण्यासाठी समाजात ऑटिझम आणि त्या अवस्थेशी निगडित समस्यांबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. एप्रिल महिना हा ऑटिझम अवेअरनेस मन्थ आहे, त्या अनुषंगाने ऑटिझमबद्दल थोडी माहिती देण्याचा हा लेखप्रपंच!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.