‘आयपीएल’मधले हे अचाट रेकॉर्ड्स पाहून क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं याची खात्री पटते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतात क्रिकेट हा फक्त खेळ नसून एक धर्म झाला आहे आणि क्रिकेटवेडे लोक पूजा जितकी भक्तिभावाने करत नसतील तितक्या भक्तिभावाने क्रिकेट बघतात. आणि त्यांच्या आवडीचे खेळाडू हेच त्यांचे देव असतात. त्यात जर का आंतरराष्ट्रीय सामना असेल तर अट्टल क्रिकेटवेडे लोक आपली सगळी कामे बाजूला ठेवून क्रिकेट बघतात.
जर भारत पाकिस्तान सामना असेल तर कर्फ्यू लागल्याप्रमाणे रस्ते सामसूम असतात. अशी क्रिकेटची जादू भारतीयांच्या मनावर झालेली आहे.
लोक अतिशय भक्तिभावाने क्रिकेट बघत असल्यामुळे ते आपल्या आवडीच्या टीममध्ये प्रचंड भावनिक गुंतवणूक करतात. आणि चुकून जर का त्यांच्या आवडीची टीम तो सामना हरली तर चक्क टीव्ही फोडून टाकण्यापर्यन्त अतिरेकी प्रकार हे कट्टर फॅन्स करतात.
आयपीएल आल्यापासून मात्र फेथफुल फॅन्सची गोची झाली आहे. नेमक्या कुठल्या टीमला सपोर्ट करायचा हे ठरवणे कठीण जाते. कारण आपल्या आवडीच्या टीममध्ये आपले आवडीचे खेळाडू दर वर्षी असतीलच असे नाही.
लिलावात निकाल जसा लागेल त्याप्रमाणे टीम्स तयार होतात. त्यामुळे अनेकांना आयपीएल हा फक्त एक बाजार आणि पैश्याचा खेळ वाटतो. त्यात चिअरगर्ल्स नाचताना बघून तर अनेक “फक्त क्रिकेट आवडणारे” फॅन्स चिडतात.
तरीही करोडो लोक आवडीने आयपीएल बघतात आणि आयपीएलवर दर वर्षी करोडो रुपयांचा सट्टा सुद्धा लावला जातो.
आयपीएल ही निर्विवादपणे जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. दरवर्षी ह्या क्रिकेट लीगमध्ये पाण्यासारखा पैसा ओतला जातो. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सुद्धा भरपूर जाहिरातबाजी आणि गाजावाजा होऊन आयपीएलचे रणशिंग फुंकले गेले आहे.
आयपीएलचे हे तेरावे वर्ष आहे. इतक्या वर्षांत आयपीएलमध्ये अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. चला तर आज आपण आयपीएलमधल्या काही रेकॉर्डसची माहिती घेऊया तसेच आयपीएलबद्दल काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया.
१. मागील वर्षी आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क स्टार इंडिया नेटवर्कने १६३४७.५ कोटी रुपये खर्चून विकत घेतले. म्हणजेच तुम्ही जी बॉल टू बॉल मॅच बघता, त्यापैकी प्रत्येक बॉल दाखवण्याचा खर्च सुमारे २१ लाख रुपये इतका होतो.
२. आतापर्यंत आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंची खरेदी विक्री झाली. ज्या टीमने लिलावात जास्तीत जास्त पैसे खर्च केले त्यांच्याकडून खेळाडूंना खेळावे लागते. त्यामुळे प्रत्येक वर्षी टीममधील खेळाडू बदलत असतात.
पण विराट कोहली हा एकमेव असा खेळाडू आहे जो सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कडून खेळतो आहे.
२००८ला रॉयल चॅलेंजर्सने विराटला आपल्या संघात घेतले होते. यंदा तेराव्या सिझन मध्ये सुद्धा तो याच टीमकडून खेळतो आहे, त्याने त्याची टीम आजपर्यंत एकदाही बदलली नाही.
हाच विक्रम धोनीच्या नावेही झाला असता. मात्र मध्यंतरी २ वर्षांसाठी चेन्नईच्या संघावर बंदी आली आणि त्याची ही संधी हुकली.
३. आयपीएलमध्ये मागच्या हंगामापर्यंत सर्वात जास्त डॉट बॉल टाकण्याचा विक्रम फिरकीपटू हरभजन सिंगच्या नावावर आहे. आयपीएलच्या १६० सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत १२४९ डॉट बॉल्स टाकले आहेत.
लसिथ मलिंगा याने या यादीत यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने ११५५ डॉट बॉल्स टाकले आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार तिसऱ्या क्रमांकावर आहे.
यंदा भज्जी आणि मलिंगा या दोघांनीही स्पर्धेतून माघार घेतलेली असल्याने, हा विक्रम आपल्या नावावर करण्याची मोठी संधी भुवनेश्वरला आहे.
४. चेन्नई सुपर किंग्स म्हणजे धोनी असेच समीकरण झाले आहे. आणि धोनीचा संघ सहसा खराब कामगिरी करत नाही. बंदी घातल्याची दोन वर्षे वगळता आतापर्यंत सगळ्याच हंगामात चेन्नई सुपर किंग्स हा संघ प्ले ऑफसाठी पात्रता फेरीपर्यंत पोहोचला आहे.
५. आयपीएलच्या आजपर्यंतच्या इतिहासात पियुष चावला हा असा एकमेव गोलंदाज आहे ज्याने बऱ्याच काळापर्यंत एकही नो बॉल टाकला नव्हता. त्याने हा रेकॉर्ड तब्बल ३८६ षटकानंतर मोडला. इतकी षटके टाकून एकही नो बॉल न टाकण्याची किमया इतर कुणालाही जमलेली नाही.
६. आयपीएलमध्ये अगदी लहान वयाचे खेळाडू सुद्धा खेळतात. पण तुम्हाला माहितेय का ब्रॅड हॉगच्या नावावर आयपीएल मधील सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून खेळल्याचा विक्रम आहे.
२०१६ साली तो कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलचा शेवटचा सामना खेळला तेव्हा त्याचे वय ४५ वर्ष इतके होते.
यंदा हा विक्रम मोडण्याची संधी ४८ वर्षीय प्रवीण तांबे याला मिळू शकली असती. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची परवानगी न घेता कॅरेबियन प्रीमियर लीग खेळल्यामुळे त्याला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
७. २०१९ च्या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेल्या सर्वात लहान खेळाडूचे वय अवघे १६ वर्षे आहे. त्याचे नाव प्रयास राय बर्मन असे असून तो रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर ह्या संघाकडून त्याने सामना खेळला आहे. आयपीएलमधील सर्वांत कमी वयाचा खेळाडू ठरला होता.
८. आयपीएलमध्ये आजवर सर्वात जास्त आणि सर्वात कमी स्कोअर करण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ह्या टीमच्या नावावर आहे.
२०१३ साली त्यांनी पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध खेळताना २६३/५ इतका स्कोअर केला होता तर २०१७ साली कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना ह्याच संघाने सर्वात कमी स्कोअर करण्याची कामगिरी सुद्धा करून दाखवली.
ह्या सामन्यात अख्खा संघ केवळ ४९ धावांवर गारद झाला होता.
९. मुंबई इंडियन्स हा संघ दरवर्षीच सुरुवातीच्या टप्प्यात आयपीएलमध्ये चाचपडत असला तरी ह्याच संघाने एक छान रेकॉर्ड करून दाखवला आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने विजयी सामन्यांचे शतक केले आहे.
गतवर्षी कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सना हरवून त्यांनी शंभरावा विजय मिळवला होता.
आयपीएलमध्ये १०० सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे.
१०. आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त धावा करण्याचा विक्रम बराच काळ सुरेश रैनाच्या नावे होता. मात्र विराट कोहली २०२० आयपीएलच्या सुरुवातीला ५४१२ धाव करून या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
११. क्रिस गेल ह्याने आयपीएलमध्ये सर्वात जास्त शतके ठोकली आहेत. त्याने आजवर ६ शतके व २५ अर्धशतके काढली आहेत. तर त्याच्याखालोखाल विराट कोहलीने ४ शतके व ३८ अर्धशतके काढली आहेत.
गम्मत म्हणजे विराटने ही चारही शतके एकाच आयपीएल स्पर्धेत झळकावली आहेत.
सर्वात जलद शतक काढण्याचा विक्रम सुद्धा क्रिस गेलच्याच नावावर आहे.
२३ एप्रिल २०१३ रोजी पुणे वॉरियर्स इंडियाच्या गोलंदाजांना अक्षरश: झोडपून काढत केवळ ३० चेंडूंत शतक झळकावले होते. त्याने या खेळीत तब्बल १७५ धावा काढण्याचा विक्रम केला आहे.
तर लोकेश राहुलच्या नावावर सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. त्याने केवळ १४ चेंडूंत ५१ धावा केल्या आहेत.
तर असे हे आयपीएलचे विक्रम आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.