“नमस्कार, मी मनोहर बोलतोय” : संरक्षण तज्ञांना आलेला एक फोन कॉल आणि…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
१७ मार्च २०१९ला काळाने सर्वांच्या आवडत्या नेत्याला आपल्यापासून हिरावून नेले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर जवळपास एक वर्ष स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी कडवी झुंज देत होते.
प्रकृती साथ देत नसतानाही ते मात्र शेवटपर्यंत त्यांचे कार्य करीत राहिले. शेवटच्या काही दिवसांत त्यांची प्रकृती फारच ढासळली.
इतके दिवस काळाला झुंझत ठेवणाऱ्या पर्रीकरांची प्रकृती अधिकच चिंताजनक होत गेली आणि अखेर ह्या लढाईत काळाची सरशी झाली.
काळाने हा सच्चा, प्रामाणिक आणि कर्तव्याप्रती संपूर्ण समर्पण करणाऱ्या ह्या नेत्याला आपल्यातून हिरावून नेले. मनोहर पर्रीकरांचे दुःखद निधन झाले आणि गोवेकरांबरोबरच संपूर्ण देशावरच दुःखाची छाया पसरली.
पर्रीकरांच्या विनम्र आणि साध्या स्वभावाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ह्याच स्वभावामुळे ते सामान्य माणसाला सुद्धा अगदी जवळचे वाटत असत.
त्यांनी कधीही आपल्या मंत्रिपदाचा बाऊ केला नाही की गैरवापर केला नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ब्रीद ते आयुष्यभर जगले. म्हणूनच त्यांनी अनेकांना आपलेसे करून घेतले होते.
पर्रीकर साहेबांची संरक्षण विश्लेषक नितीन गोखले ह्यांच्याशी अचानक भेट झाली आणि ह्या भेटीचे मैत्रीत रूपांतर झाले.
पर्रीकर साहेब संरक्षणमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी एकदा स्वतःच्या फोनवरून गोखले ह्यांना थेट फोन केला. आणि पीए वगैरेची काहीही भानगड मध्ये न आणता त्यांना थेट आपल्या रेस्ट हाऊसवर भेटण्यासाठी बोलावले.
त्यानंतरच्या दोन वर्षांत पर्रीकरांनी अनेकदा गोखलेंची भेट घेऊन त्यांच्याशी संरक्षण विषयातील अनेक बाबींची चर्चा केली. पर्रीकर साहेब व गोखले ह्यांची मैत्री अगदी अकृत्रिम होती.
नितीन गोखले हे दिल्लीस्थित आघाडीचे संरक्षण विश्लेषक व लेखक आहेत. ते एक शिक्षक, पत्रकार आणि युद्ध व संरक्षण अभ्यासक आहेत. त्यांनी तब्बल ३२ वर्ष पत्रकार म्हणून काम केले असल्याने त्यांचा माध्यमांचा दांडगा अनुभव आहे.
त्यांनी अनेक वर्षे ईशान्य भारतात पत्रकारिता केली आहे व नंतर ते दिल्लीला स्थायिक झाले. त्यांच्या ह्या प्रवासात त्यांनी चार पुस्तकांचे लेखन केले आहे व आजही ते पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना व डिफेन्स इन्सिट्यूटसमध्ये शिकवण्याचे कार्य करीत आहेत.
त्यांच्या जवळच्या मित्राचे निधन झाल्याने त्यांना तीव्र दुःख झाले. त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर पर्रीकर साहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. वाचूया त्यांच्या आठवणी त्यांच्याच शब्दांत!
===
लेखक – नितीन गोखले
===
“आमचा पहिला संवाद एका गैरसमजातून झाला. २०१५ च्या जानेवारी महिन्यात मी बडोद्यात असताना माझ्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला.
मला वाटले की माझ्या एका जुन्या मित्राने परदेशातून फोन केला आहे. हा मित्र काही नेहमी फोन करत नाही. त्यामुळे मी लगेच फोन उचलला आणि उत्साहात त्याच्याशी बोलणे सुरु केले.
मला अपेक्षा होती माझा मित्र सुद्धा माझ्याशी असाच उत्साहाने बोलेल, पण पलीकडची व्यक्ती म्हणाली ,’मी मनोहर बोलतोय.’
मला सुरुवातीला काही कळलेच नाही म्हणून मी विचारले, ‘कोण मनोहर?’ तर पलीकडून उत्तर आले, ‘पर्रीकर.. तेव्हा माझ्या ध्यानात आले की पलीकडील व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून प्रत्यक्ष संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर होते. त्यांनी स्वतः मला फोन केला होता, तेही त्यांच्या स्वतःच्या फोनवरून.
ना पीए, ना कुठले एक्सचेन्ज, कुणीही लाईन होल्ड करून ठेवणारे नाही, तर स्वतः संरक्षणमंत्री थेट स्वतःच्या फोनवरून माझ्याशी बोलत होते.
ते शांतपणे म्हणाले, ‘मला तुमची भेट घ्यायची आहे.’ मी त्यांची माझ्या आधीच्या उद्धट बोलण्याबद्दल आणि त्यांना न ओळखल्याबद्दल माफी मागितली पण ते म्हणाले,
‘तुम्ही माफी मागू नका. आपण ह्या आधी कधीही बोललो नव्हतो, आणि माझा नंबर सुद्धा फोनवर फ्लॅश होत नाही, त्यामुळे पलीकडून कोण बोलतंय हे तुम्हाला कसे लक्षात येणार?’
पर्रीकरांनी हे बोलून माझ्या मनावरचे ओझेच उतरवून टाकले. मी त्यांना सांगितले की मी बाहेरगावी आहे आणि दोन दिवसांनंतर दिल्लीत परतणार आहे. त्यावर ते म्हणाले, ‘चालेल, रविवारी आपण दुपारी एकत्र जेवूया. मी कोटा हाऊसला थांबलोय. तुम्ही तिथे दुपारी साडेबारापर्यंत या.’
मी त्यांना विचारले की ‘ह्या संदर्भात मी कुणाला संपर्क करू?’ त्यावर ते म्हणाले, ‘इतर कुणालाही संपर्क करण्याची गरज नाही. माझा नंबर सेव्ह करून घ्या. तुम्ही मला थेट फोन करा.’ आणि अशा प्रकारे माझ्या व पर्रीकर साहेबांच्या अविस्मरणीय मैत्रीला सुरुवात झाली.
===
हे ही वाचा – राज्याच्या नव्या गृहमंत्र्यांनी खुद्द शरद पवार यांना शिस्तीचे धडे दिले होते
===
भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी मला भेटायला बोलावले ह्यामुळे माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले पण मला खूप आनंद सुद्धा झाला होता. त्यांना भेटण्यास मी खूप उत्सुक होतो कारण त्यावेळी डिसेंबर २०१४ मध्ये मी नुकतेच एनडीटीव्ही सोडले होते.
तेव्हा मी कुठल्या मोठ्या मीडिया हाऊस चा महत्वाचा संपादक नव्हतो, की कुठलाही प्रभावशाली पत्रकार सुद्धा नव्हतो. तरीही त्यांना माझी भेट घ्यायची होती.
पुढचे दोन दिवस ‘त्यांना माझ्याशी काय काम असू शकेल’ असा मी सतत विचार करत होतो कारण फोनवर बोलताना पर्रीकर साहेबांनी मीटिंगचा विषय किंवा अजेंडा ह्याबद्दल काहीच सांगितले नव्हते.
कोटा हाऊसला जाण्याच्या आधी मी एका पानावर पर्रीकर साहेब संरक्षण मंत्रालयासंदर्भात माझ्याशी कुठल्या विषयांवर चर्चा करू शकतील असे महत्वाचे असलेले काही मुद्दे लिहून ठेवले. त्यावेळी पर्रीकर साहेबांना ल्युटन झोन बंगला अधिकृतरित्या ताब्यात मिळाला नसल्याने ते नेव्हीच्या कोटा हाऊसमध्ये वास्तव्यास होते.
निर्धारित वेळेला कोटा हाऊसला पोहोचल्यानंतर मला थेट पर्रीकर साहेबांच्या सूटमध्ये जाण्याची परवानगी मिळाली आणि मी थेट तेथे गेलो. तेथे पर्रीकर साहेबांनी माझे हसून प्रेमाने स्वागत केले. माझ्या मनावरचे दडपण दूर केले.
ते त्यांच्या नेहमीच्या बुश शर्ट आणि ट्राऊझर्स ह्या पेहेराव्यात होते.
पर्रीकर साहेबांच्या साधेपणाविषयी आणि दिलखुलास वागण्याविषयीचे किस्से मी ऐकून होतो. तेजस मेहता हा माझा मित्र तेव्हा एनडीटीव्हीचा ब्युरो चीफ होता. त्याने मला नोव्हेंबर २०१४ मध्येच संरक्षणमंत्री म्हणून जबाबदारी घेतलेल्या पर्रीकरांची आवर्जून भेट घेण्याचे सुचवले होते.
त्याने असेही सांगितले होते की पर्रीकर साहेब भेटण्यास आढेवेढे घेत नाहीत. ते लोकांची अगदी सहजपणे भेट घेतात.
पण त्याच वेळी मी पूर्ण वेळ करत असलेली पत्रकारिता सोडली होती त्यामुळे पर्रीकरांची भेट घेण्याचे कुठलेही कारण तेव्हा माझ्याकडे नव्हते. पण तेव्हा पर्रीकरांची भेट घेताना हे सगळे माझ्या डोळ्यांपुढे तरळून गेले.
त्यांनी मला बसण्यास सांगितले आणि मला काय बोलायचे हे सुचत नसल्याने मी थोड्यावेळ शांत बसलो. आणि नंतर मी त्यांना मी लिहून काढलेल्या मुद्द्यांचा कागद दिला. त्यांनी दोन तीन मिनिटांत मी लिहिलेले मुद्दे वाचून काढले. वाचून झाल्यावर ते म्हणाले,
“ह्या सर्व सूचना अगदी चांगल्या आहेत आणि त्यातील काही बाबींवर मी काम करतो आहे पण मला सांगा, संरक्षण मंत्रालय हे अविश्वासाच्या सिद्धांतांवर का चालते?”
मला त्यांचे हे बोलणे कळले नाही म्हणून मी त्यांना ह्याबाबतीत अधिक उलडगून सांगण्याची विनंती केली.
‘गेले दोन तीन महिने मी येथे काम करतोय, ह्या काळात माझ्या लक्षात आलेली सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की येथे संशयाने सर्व वातावरण व्यापलेले आहे.
येथे प्रत्येक व्यक्ती आता काहीतरी भयंकर घडणार ह्या दडपणाखाली वावरत आहे. येथे समन्वयाची प्रचंड उणीव आहे आणि पहिल्यांदा सगळ्याच गोष्टीला नकार देण्याची जबरदस्त नकारात्मक वृत्ती दिसून येते’, असे पर्रीकरांनी मला समजावून सांगितले. ते चिंतेत असलेले स्पष्ट दिसत होते.
पर्रीकरांची निरीक्षणशक्ती बघून मी अचंबित झालो. त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा अनुभव नसतानाही त्यांनी थोड्याच काळात साऊथ ब्लॉकमधल्या वर्क कल्चरचे अगदी योग्य निरीक्षण नोंदवले होते. त्यांच्या बोलण्यावर मी पुढे उत्तर दिले की, ‘गेली अनेक दशके इथे असेच सुरु आहे’.
‘मग ह्या पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी काय करणे आवश्यक आहे?’ पर्रीकरांनी पुढचा प्रश्न विचारला. ह्यावर ‘खरे तर ह्यावर कुठलाही रेडिमेड उपाय नाहीये’ असे मी उत्तर दिले.
‘ह्यावर काही ना काही उपाय तर असायलाच हवा. मला असे वाटते की येथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने थोडे थांबून नव्या दृष्टिकोनाने नवी सुरुवात केल्यास नक्कीच सुधारणा घडू शकेल.
माझ्या डोक्यात जे आहे त्यावर चर्चा करण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा फोन करेन. पण सध्या जेवण आपली वाट बघत आहे’ असे म्हणून त्यांनी मला जेवणासाठी बोलावले.
तेव्हाच मला लक्षात आले की पर्रीकर साहेबांना मासे अत्यंत प्रिय होते. त्यांना मासे आवडतात हे मी आधीही ऐकून होतो.
आमचे जेवण झाल्यानंतर मला असेही लक्षात आले की ते त्यांच्या खाजगी मदतनीसांबरोबर सुद्धा अगदी सहजतेने वागत असत. त्यांच्या खाजगी स्टाफ पैकी उपेंद्र जोशी आणि मयुरेश खानवटे हे त्यांचे सर्वात विश्वासार्ह मदतनीस होते.
ते सुद्धा आमच्याबरोबर जेवायला होते. पर्रीकर साहेबांनी त्यांनाही आमच्याच बरोबर त्याच टेबलवर जेवायला बसवले होते. असे का,हे मला नंतर कळले.
पर्रीकर साहेब एखाद्यावर विश्वास टाकताना संपूर्ण विश्वास टाकत असत. त्याला संपूर्ण आपलेसे करून घेत असत.
त्यानंतरच्या अनेक आठवड्यांत आम्ही अनेकदा भेटलो. ते जेव्हा भेटायला बोलवत तेव्हा तेव्हा मी जात असे. मी त्यांना सांगितले होते की, ‘तुम्ही म्हणाल तेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन.’ हळूहळू ते मला जवळजवळ रोजच फोन करून माझ्याशी चर्चा करीत असत.
त्यांना रोज माहिती जाणून घेण्याची, नवा दृष्टिकोन जाणून घेण्याची ओढ होती. मी माझ्या मर्यादित ज्ञानाचा वापर करून त्यांना मला आहे ती माहिती देत असे.
एक दिवस ते मला म्हणाले की त्यांना संरक्षण खरेदी प्रक्रियेत काही सुधारणा घडवून आणण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी मला ह्या बाबतीत तज्ज्ञ मंडळींची नावे सुचविण्यास सांगितले जे ह्या प्रक्रियेत सुधारणा घडवून आणू शकतील, ती प्रक्रिया नव्याने लिहू शकतील आणि ही प्रक्रिया अधिक सोपी करू शकतील.
त्याप्रमाणे मी त्यांना सहा सात तज्ज्ञांची नावे सांगितली. त्यांनी त्यातील चार लोकांची कमिटीसाठी निवड केली. ह्या कमिटीनेच नंतर DPP २०१६ लिहिले.
ह्या DPP २०१६ मध्ये अनेक क्रांतिकारी कल्पनांचा समावेश होता आणि त्यांवर पर्रीकरांचा ठसा स्पष्टपणे दिसून येत होता.
त्यांनी अंतर्गत विरोध मोडून काढत संरक्षण मंत्रालयात खरेदीसाठी IDDM ह्या नव्या विभागाची निर्मिती केली. ह्यात स्वदेशी डिझाइन केलेले, विकसित आणि निर्मित – उत्पादनांना अधिग्रहणांत अग्रक्रम देण्यात आला.
हे सर्व बघितल्यानंतर मी नक्कीच म्हणू शकतो की ह्यामुळे संरक्षण मंत्रालयात पारदर्शकता आली.
संरक्षण दलांतील आणि मंत्रालयातील प्रमुख अधिकाऱ्यांनी एकमेकांना भेटून एकत्रितपणे काम करण्याची इच्छा हा पर्रीकरांनी साऊथ ब्लॉकमध्ये ठेवलेला मोठा स्थायी वारसा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
काही महिन्यांनंतर त्यांनी मला त्यांच्या १०, अकबर रोड स्थित घरीच बोलावणे सुरु केले. कधी कधी तर ते मला भल्या सकाळी सात वाजताच बोलावत असत किंवा अनेकदा रात्री दहानंतर, त्यांचे काम संपवल्यानंतर बोलावत असत.
कधी कधी ते त्यांच्या आवडीची बीरा (बिअर) माझ्याशी शेअर करत असत. माझ्याशी अनेक विषयांवर चर्चा करत असत, मनन करत असत आणि कधी कधी सिस्टीम मध्ये त्यांना येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्यांना येणाऱ्या वैतागाबद्दल बोलत असत.
त्यांची आणि माझी चांगली मैत्री झाली होती. जेव्हा मी सप्टेंबर ऑक्टोबर २०१५ मध्ये हॉनोलुलु येथे एशिया पॅसिफिक सेंटर फॉर सिक्युरिटी स्टडीज येथे चाळीस दिवसांच्या ऍडव्हान्स्ड सिक्युरिटी कोऑपरेशन कोर्ससाठी गेलो असताना ते कधी कधी मला त्यांच्या सहकाऱ्यांच्या व्हॉट्सऍप नंबर वरून फोन करून माझ्याशी बोलत असत.
२०१५ च्या मध्यापर्यंत त्यांना कळून चुकले होते की ह्या संरक्षण मंत्रालयाच्या दलदलीत काय घडणे शक्य आहे आणि काय होऊ शकत नाही.
त्यांना दिल्लीची दांभिक संस्कृती कधीच आवडली नाही. फिक्सर्स आणि इन्फ्ल्यूएनसर्स सोडल्यास त्यांच्या घराचा दरवाजा सर्वांसाठी कायम उघडा होता.
त्यामुळे त्यांच्या घरी माझे नेहमीचे येणे जाणे कुणाच्या डोळ्यात येऊ नये ह्याबाबतीत मला डोळ्यात तेल घालून काळजी घेणे भाग होते.
जेव्हा पर्रीकर दिल्लीत होते त्या काळात मी किमान १४- १५ नंबर ब्लॉक केले होते. कारण संशयास्पद वागणूक असलेले लोक माझ्या ओळखीचा वापर करून त्यांच्यापर्यंत पोहोचू पाहत होते.
मी कुणाकुणाला ब्लॉक केले हे पर्रीकरांना सांगत असे तेव्हा ते फक्त एक स्मितहास्य देऊन ‘गुड!’ अशी प्रतिक्रिया देत असत.
नोव्हेंबर २०१५ मध्ये मी भारतशक्ती.इन लाँच केले. खरे तर मला संरक्षणमंत्र्यांच्या मुलाखतीनेच सुरुवात करण्याची इच्छा होती.
पण तेव्हा ते इतक्या व्यस्त वेळापत्रकात अडकले होते की तासभर बसून मुलाखत देण्याइतका वेळ त्यांच्याकडे नव्हता. डेडलाईन जवळ आल्यामुळे जेव्हा मी त्यांच्याकडे मुलाखतीसाठी खूपच आग्रह धरला तेव्हा तेव्हा ते मला म्हणाले ‘गोव्यात ये. आपण येताना एकत्र परत येऊ. तेव्हा आपल्याला किमान दोन तास तरी व्यत्यय येणार नाही आणि तुझ्या मुलाखतीचे काम पूर्ण होईल.’
तर एक दिवस डॅबोलिम एयरपोर्टवरून आम्ही त्यांच्या अधिकृत विमानात बसलो आणि पुढचे दोन तास त्यांनी मला अगदी दिलखुलास मुलाखत दिली. त्यांची ही अगदी तपशीलवार असलेली मुलाखत येथे प्रकाशित करण्यात आली.
===
हे ही वाचा – इंदिरा गांधींना कोर्टापासून निवडणुकीपर्यंत हरवत नेणारा “राजकारणातील विदूषक”
===
त्यांच्या ह्या तपशीलवार मुलाखतीतूनच पुढे अनेक पॉलिसीज निर्माण झाल्या. ह्या गोवा ते दिल्ली ह्या दोन तासांच्या प्रवासादरम्यान त्यांनी मला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एकदाही एकही कागद संदर्भसाठी वापरला नाही. त्यांना सगळ्या गोष्टी अगदी तपशीलवार माहिती होत्या व त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात होत्या.
पर्रीकर हे अगदी गाढे वाचक होते. त्यांचे प्रचंड वाचन होते. एकदा बहुतेक ते अमेरिकेच्या दौऱ्याहून परत आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे एक पुस्तक दिले व ते म्हणाले, ‘जर तू आधी वाचले नसशील तर हे पुस्तक आवर्जून वाच!’
त्या पुस्तकाचे नाव होते व्हीक्ट्री ऑन द पोटोमॅक, हे पुस्तक पेंटॅगॉनच्या एका अधिकाऱ्याने लिहिले होते. ह्यात गोल्डवॉटर-निकोलस ऍक्ट घोषित होण्यापूर्वी अमेरिकेने ज्या काही लढाया जिंकल्या व हरल्या त्या युद्धांचे तपशीलवार वर्णन केलेले होते.
‘ह्यातून आपण भारतासाठी काय घेऊ शकतो ह्यावर तुझं मत मला सांग’ असे ते मला म्हणाले. भारताच्या तीनही संरक्षण दलांचे संयुक्तिकरण व एकीकरण करण्याकडे त्यांचा रोख होता.
एके दिवशी त्यांनी रॉबर्ट ग्रीनचे ‘थर्टी थ्री स्ट्रॅटेजीज ऑफ वॉर’ हे पुस्तक आणले व ते म्हणाले, ‘ह्यातील काही टिप्स माझ्या स्वतःच्या राजकीय प्रवासात मला उपयोगी पडतील. तू सुद्धा हे वाचायला हवे.’
त्यांनी दिलेली ही दोन्ही पुस्तके आजही माझ्याकडे आहेत. ज्या दिवशी त्यांनी त्यांचे दिल्लीतील घर रिकामे केले त्या दिवशी त्यांनी त्यांची सगळी पुस्तके गोवा सदनला नेली आणि तीन आठवड्यानंतर मला ते म्हणाले की ‘ह्यातील तुला हवी ती पुस्तके घेऊन जा.’
मी त्यातील जवळजवळ साथ ते पासष्ट पुस्तके घेऊन आलो. आता ह्या पुस्तकांतूनच ते मला भेटतात. जेव्हाही मी त्यातील एखादे पुस्तक वाचण्यासाठी हातात घेईन तेव्हा ती पुस्तके मला पर्रीकर साहेबांची आठवण करून देतील.
मला त्यांच्या आयआयटी बॉम्बे ते राजकारण ह्या प्रवासाविषयी कायम उत्सुकता वाटत आली आहे. त्यांनी मला एकदा ह्या प्रवासाविषयी अगदी तपशीलवार सगळे सांगितले होते. जेव्हा त्यांनी ह्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ते ह्यात प्रवीण असल्याचे सिद्ध झाले.
त्यांना विविध प्रकारच्या लोकांकडून उत्तम काम कसे करवून घ्यायचे हे त्यांना चांगलेच ज्ञात होते. गोवेकरांनी प्रेम केले, त्यांचा आदर केला आणि अगदी डोळे झाकून त्यांच्यावर दोन दशके विश्वास ठेवत त्यांच्याकडे कार्यभार सोपवला. त्यांनीही ह्याचे चीज करून दाखवले.
अर्थात त्यांच्यातही काही उणीवा होत्या. त्यांना विकेंद्रीकरण आवडत नसे. ते स्वतः परफेक्शनिस्ट असल्याने त्यांना बरीचशी कामे स्वतःच करणे आवडत असे.
म्हणूनच कदाचित त्यांनी गोव्यासाठी दुसरे नेतृत्व तयार केले नाही. ते अतिशय स्पष्टवक्ते होते. एखादी गोष्ट नाही पटली तर ते सरळ सांगून मोकळे होत असत.
त्यांच्याकडे काम करण्याचा प्रचंड उत्साह होता. म्हणूनच ते गोव्यातील लाडके नेते बनले पण संरक्षण मंत्रालयातील काम अतिशय जास्त होते. त्यामुळेच ते पहाटे चार वाजता उठत असत आणि रात्री अकरापर्यंत झोपत नसत.
त्यांचे वेळापत्रक अतिशय व्यस्त होते. ते आठवड्याचे सातही दिवस काम करीत असत. पाच दिवस दिल्लीत आणि दोन दिवस गोव्यात असे त्यांचे काम असे. ते एकही दिवस आराम करत नसत की सुट्टी घेत नसत.
ह्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला. एकाच वेळी ते संरक्षण मंत्रालय आणि गोवा ह्या दोन्ही आघाड्यांवर लढत होते.
दिल्लीत असताना त्यांना त्यांचे गोव्याचे साधे राहणीमान आठवत असत. दिल्लीत त्यांना संरक्षणमंत्री सतत फॉर्मल वागावे लागत असे. पण जेव्हा जेव्हा पर्रीकरांना थोडा निवांतपणा हवा असे, ते “तू दिल्लीत आहेस का आणि तुला वेळ आहे का’ असे मला फोन करून विचारत असत.
मी हो म्हणालो तर ते माझ्या पत्नीला साधी घरची फिश-करी व भात बनवण्यास सांगत असत आणि मला बीअर घरातल्या फ्रिजमध्ये गार करण्यासाठी ठेवायला सांगत असत.
ते घरी आल्यानंतरचा तास दीड तास मग ते त्यांच्या खांद्यावर असलेला मोठा भार काही काळ बाजूला ठेवून माझ्याशी आणि माझ्या कुटुंबाशी छान घरच्यासारखेच खाजगी गप्पा मारत असत, त्यांच्या काही आठवणी सांगत असत. माझ्या कुटुंबाचेही त्यांच्याबरोबर असे भावनिक नाते जुळले होते की आम्हाला ते कधी पाहुणे न वाटता आमच्या घरचेच वाटत असत.
आम्हाला हे माहितीच होते की अचानक केव्हाही पर्रीकर साहेब आपल्या घरचा पाहुणचार घ्यायला आणि आपल्याशी गप्पा मारायला येऊ शकतील.
आता जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा माझ्या लक्षात येते की ते इतक्या वेळा घरी येऊन देखील आम्ही एकत्र असा एकही फोटो काढला नाही. त्यांचे व माझे काही सार्वजनिक कार्यक्रमांत अनेक फोटो आहेत पण आमच्या घरी एकही फोटो काढायचे आमच्या लक्षातच आले नाही.
आज मी हे सगळे लिहितोय आणि माझे डोळे भरून आले आहेत. डोळ्यांत पाण्याचा व मनात भावनांचा पूर आला आहे. आत्ता माझ्या मनात भावनांचा गोंधळ माजला आहे.
पण आणखी काही महिन्यांनी देखील मी मागे वळून पाहिले तर मला खात्री आहे की पर्रीकर भाईंबद्दल मला हेच वाटेल जे की ह्या क्षणी सगळ्या गोवेकरांना वाटते आहे.
पर्रीकर माझ्यासाठी एका मोठ्या भावाप्रमाणे होते. दिल्लीतील त्या दोन वर्षांत जेव्हा आमचे नाते इतके घट्ट झाले ,मी त्यांना अगदी जवळून बघितले. त्यांची कमतरता मला कायम जाणवत राहणारच आहे पण भारताचे एक राष्ट्र म्हणून आज खूप मोठे नुकसान झाले आहे.
===
हे ही वाचा – देशाच्या राजकारणातला खरा चाणक्य कोण? : इतिहासात डोकावून केलेला धांडोळा
===
मनोहर पर्रीकर,तुम्ही फारच लवकर आम्हाला सोडून गेलात. भाई, तुमचा पुढचा प्रवास सुखाचा होवो. तुम्ही कायम माझ्या आयुष्यात प्रेरणा म्हणून राहाल. आयुष्यात कितीही मोठ्या उंचीवर पोहोचलो तरी कायम विनम्र राहणे हा सर्वात मोठा धडा मी तुमच्याकडून शिकलो आहे.”
नितीन गोखलेंचा मूळ लेख येथे वाचा.
पर्रीकर साहेब, तुम्ही खरंच खूप लवकर गेलात. तुमची आठवण सतत आमच्या मनात राहील. पर्रीकर साहेबांना विनम्र अभिवादन!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.