' “नेपोलियन” सारखा शूर योद्धा इतका हळवा, रोमँटिक असेल यावर विश्वास बसेल का? – InMarathi

“नेपोलियन” सारखा शूर योद्धा इतका हळवा, रोमँटिक असेल यावर विश्वास बसेल का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

नेपोलियन बोनापार्ट ह्या फ्रान्सच्या शूर सम्राटाला कोण ओळखत नाही? इतिहासात त्याचे नाव अजरामर झाले आहे. त्याचा जन्म १५ ऑगस्ट १७६९ रोजी कोर्सिका येथे झाला होता. त्याचे पूर्वज इटालियन होते असे म्हटले जाते. कोर्सिकामध्ये बोनापार्ट हे घराणे श्रीमंत व प्रतिष्ठित समजले जात असे.

त्याचाच फायदा घेऊन त्याने १७८४ साली फ्रांसमध्ये लष्करी शाळेत प्रवेश घेतला. तो जन्माने फ्रेंच नसला तरी आपल्या शौर्याच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर तो फ्रांसचा सम्राट झाला.

नेपोलियनचे गणित व भूगोल हे विषय अगदी पक्के होते. तसेच ऐतिहासिक लष्करी मोहिमांचा त्याचा प्रचंड अभ्यास होता.

फ्रेंच सैन्यात केवळ एक सामान्य अधिकारी म्हणून त्याने सुरुवात केली होती. लवकरच त्याने ऑस्ट्रिया, इटली व इतर मोहिमांमध्ये त्याचे कर्तृत्व दाखवण्यास सुरुवात केली आणि तो सरसेनापतीपदापर्यंत पोहोचला. फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंत तो सरसेनापती झाला होता.

१८ व्या शतकाच्या शेवटी शेवटी त्याने फ्रान्सवर आक्रमण करू पाहणाऱ्या अनेकांना त्याने पराजित करून परत पाठवले. १८०४ मध्ये तो फ्रान्सचा सम्राट झाला आणि युरोपमधील जवळजवळ सर्वच देशांशी त्याने युद्ध पुकारले.

 

Napoleon_Bonaparte_inmarathi

 

त्याच्या काळात तो युरोपातील सर्वात शक्तिशाली पुरुष म्हणून ओळखला जात असे. अर्थात तो इतका शूर आणि महत्वाकांक्षी असला तरी तो एक सामान्य मनुष्यच होता. त्याला सुद्धा मन होते, हृदय होते आणि भावना सुद्धा होत्या. म्हणूनच तो इतरजनांसारखा प्रेमात देखील पडला. त्यानेही एका मुलीवर वेड्यासारखे प्रेम केले.

नेपोलियनची सर्वात प्रसिद्ध प्रेयसी त्याच्याहून सहा वर्षांनी मोठी एक महिला होती. नेपोलियन जेव्हा १७९५ साली तिला भेटला तेव्हा तो २६ वर्षांचा होता तर ती स्त्री ३२ वर्षांची होती.

तिला पहिल्यांदा भेटताच नेपोलियन तिच्या प्रेमातच पडला आणि लवकरच ते दोघे प्रेमाच्या नात्यात बांधले गेले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जोसेफिन डी ब्यूहर्नेस असे त्या स्त्रीचे नाव होते. तिचे लग्न झाले होते पण नंतर ती नेपोलियनच्या प्रेमात पडली. जोसेफिनचा कॅरिबियनच्या फ़्रेंच वसाहत असलेल्या मार्टिनिक ह्या बेटावर जन्म झाला.

नेपोलियनने जोसेफिनला जी पत्रे लिहिली त्यावरून तो तिच्यावर करत असलेल्या निस्सीम प्रेमाची कल्पना आपल्याला येऊ शकते.त्याच्या जोसेफिनाप्रतीच्या भावना अगदी उत्कट होत्या. पण जोसेफिनच्या नेपोलियनसाठीच्या भावना मात्र तितक्या तीव्रतेच्या नव्हत्या असे म्हटले जाते.

१७९५ साली डिसेम्बर महिन्यात नेपोलियनने जोसेफिनला एक पत्र लिहिले. त्यात त्याने लिहिले की,

“जोसेफिन,तू किती गोड आणि अद्वितीय आहेस! माझ्या हृदयावर तू किती आश्चर्यकारक रीतीने जादू केली आहेस!”

नेपोलियनने हे पत्र जोसेफिनला पहिल्यांदा भेटल्यानंतर काही महिन्यानंतर लिहिले होते. त्यानंतर काही महिन्यांत त्यांनी एकमेकांशी लग्न केले.

 

bonaparte inmarathi

ह्याच पत्रात तो पुढे लिहितो की,

“You start at midday: in three hours I shall see you again. Till then, a thousand kisses, mio dolce amor! But give me none back for they set my blood on fire.”

Mio dolce amor! म्हणजे माय स्वीट लव्ह! आता नेपोलियनसारखा शूर योद्धा इतका हळवा आणि रोमँटिक असेल ह्यावर विश्वास बसत नाही ना? अशी अनेक पत्रे त्याने जोसेफिनला लिहिली आहेत.

ही अशी पत्रे आहेत की जी फक्त ज्याची त्यानेच वाचावीत. कारण ह्या पत्रांत त्याने फारच खाजगी गोष्टी लिहिल्या आहेत ज्या फक्त प्रेमी युगुले एकमेकांशी बोलू शकतात. (सूज्ञांस सांगणे न लगे!अर्थात ही पत्रे आता प्रसिद्ध झाली म्हणून आपण वाचू शकतो. तेव्हा नेपोलियनला ह्याची कल्पनाही नसेल.)

मॉडर्न युगात प्रेमी युगुले जशी चॅटिंग करतात तश्याच प्रकारची पत्रे नेपोलियनने त्याच्या प्रेयसीला लिहिली. १७९६ मध्ये त्याने लिहिलेले पत्र तुम्ही वाचलेत तर तुमचा विश्वासच बसणार नाही की हाच का तो महान योद्धा नेपोलियन बोनापार्ट!

नेपोलियन कायम प्रवासातच असायचा.सतत ही मोहीम नाहीतर ती मोहीम असा त्याचा प्रवास कायम सुरूच असायचा. त्याची लष्करातील ड्युटी आणि मोहीमा करता करता तो नेहेमी जोसफीनला पत्रे पाठवत असे. पण जोसेफिन मात्र त्याच्या पत्रांना फार उत्तरे देत नसे.

अश्याच एका पत्रात नेपोलियन लिहितो की,

“जेव्हापासून तुला सोडून मी लांब आलो आहे आहे, माझे मन फार दुखी आहे. जेव्हा मी तुझ्याबरोबर असतो फक्त तेव्हाच मी आनंदी असतो. अविरतपणे तुझी आठवण मला येते. तुझे किसेस, तुझे अश्रू, तुझी मोहक ईर्ष्या आणि जोसेफिन तुझी अद्वितीय जादू माझ्या हृदयात, माझ्या मनात सतत प्रेमाची ज्योत तेवत ठेवतात.

जेव्हा मी ह्या सगळ्या कामातून, चिंतेतून मोकळा होईन,तेव्हा मी माझा सगळं वेळ तुझ्याच बरोबर घालवेन. तेव्हा तुझ्यावर फक्त प्रेम करण्याव्यतिरिक्त मी दुसरे काहीही करणार नाही.”

 

letter-inmarathi

 

हे पत्र वाचल्यावर खात्रीच पटते की नेपोलियन हा एक उत्कट ,भावनाप्रधान प्रियकर होता. जोसेफिनवर त्याने वेड्यासारखे प्रेम केले. तिच्याशी लग्न झाल्यानंतर तो इटलीला गेला.

त्याने जोसेफिनला वारंवार त्याच्याबरोबर येण्याची विनंती केली पण जोसेफिनने न येण्याची अनेक कारणे दिली व ती त्याच्याबरोबर गेली नाही.

भावी राजा असलेल्या नेपोलियनने जोसेफिनचा हा अलिप्तपणा बघून, वैतागून १७९६ साली तिला एक पत्र लिहिले. त्यात तो लिहितो,

“माझ्याकडे तुझी १६ व २१ची पत्रे आहेत. तू अनेक अनेक दिवस पत्र पाठवीत नाहीस. नेमके करतेस काय तू तेव्हा? मी ईर्ष्या करत नाहीये प्रिये, पण मला कधीकधी तुझी काळजी वाटते. कृपा करून लवकर ये.

मी तुला सांगून ठेवतो, तू लवकर आली नाहीस तर मी आजारी पडलेलो तुला दिसेन. तुझा विरह आणि थकवा आता मला सहन होत नाही. तुझी पत्रे हाच काय तो आनंद मला मिळतो पण तो आनंद सुद्धा मला फार कमी वेळेला मिळतो.”

काळाच्या ओघात नेपोलियन आणि जोसेफिन वेगवेगळ्या लोकांच्या प्रेमात पडले. ह्याचा त्यांच्या नात्यावर परिणाम झाला. एकदा तर नेपोलियनने त्याचे लग्न मोडण्याचा निर्णय देखील घेतला होता.पण त्याने तसे केले नाही.

परंतु जोसेफिनमुळे त्याला प्रचंड त्रास झाला. त्याच्या अनेक पत्रांतून हे जाणवते. अश्याच एका पत्रात तो लिहितो की, “माझ्या प्रिये,मला माफ कर. माझ्या मनात अतिशय द्वंद्व माजले आहे. माझे हृदय तुझ्यासाठी झुरते आहे. मला खूप त्रास होतोय. तुझे नाव न घेता आल्यामुळे मी खूप दुःखी आहे. मी आता तुझ्याच उत्तराची वाट बघतोय.”

 

josephine inmarathi

 

ह्याच पत्रात तो पुढे लिहितो ,”मी तुझा निरोप घेतो. तू माझ्यावर कधी प्रेम केलेच नाही असे मला वाटते. जर असे असेल तर हे खरंच दुःखदायक आहे.”

त्याच्या पत्रांतून दिसते की तो तिच्यावर प्रेम करत होता पण त्याला तिच्याबद्दल शंकादेखील वाटत होती. एका पत्रात तो लोहितो की ,”मला तुझा एक कण सुद्धा आवडत नाही. उलट मी तुझा तिरस्कार करतो.”

ह्या पत्रात तो तिला असभ्य देखील म्हणाला आहे. हा सगळा त्याचा राग आणि त्याचे नैराश्य आहे. त्यांचे नाते असे वाईट अवस्थेत असले तरी १८०४ मध्ये नेपोलियन हा फ्रान्सचा सम्राट बनला व जोसेफिनने त्याच्या शेजारी सम्राज्ञी म्हणून मिरवून घेतले. ह्या दोघांचे नाते अखेर टिकले नाहीच. १८०९ साली दोघे वेगळे झाले.

जेव्हा ह्या नात्याचे ओझे असह्य होऊन नेपोलियनने वेगळे होण्याविषयीची त्याची इच्छा जाहीर केली तेव्हा जोसेफिनने आरडाओरडा सुरु केला व ती कोसळली.

नेपोलियनच्या घटस्फोटाचे एक कारण असेही सांगितले जाते की जोसेफिनला मूल होऊ शकत नव्हते पण नेपोलियनला तर त्याच्या साम्राज्यासाठी वारस असण्याची गरज होती.

 

Napoleon-and-Josephine Inmarathi

हा घटस्फोट फ्रांसच्या हितासाठी झाला आहे असे नेपोलियनने एका जाहीर सभेत सांगितले होते. जोसेफिनपासून वेगळे झाल्यानंतर त्याने ऑस्ट्रियाच्या सम्राटाच्या मुलीशी मारी लुईसशी विवाह केला. व त्यानंतर अखेर त्याला वारस मिळाला.

जरी तो जोसेफिनपासून वेगळा झाला तरी त्याचे तिच्यावर अखेरपर्यंत प्रेम होते. शेवटपर्यंत ती त्याची “dolce amore” राहिली. त्याने तिच्यासाठी प्रचंड खर्च करून Château de Malmaison हा महाल बांधला.

ह्याच महालात ती अखेरपर्यंत राहिली. १८१४ साली न्यूमोनियाने पन्नासाव्या वर्षी तिचा मृत्यू झाला.

तिच्या मृत्यूची बातमी ऐकून भूमिगत असलेला नेपोलियन प्रचंड दुःखी झाला. त्याचे सहकारी सांगतात की त्याला इतके दुःख ह्यापूर्वी कधीही झाले नव्हते. तो तिला कधीही विसरू शकला नाही.

१८२१ साली सेंट हेलेना येथे मरताना देखील तो जोसेफिनचेच नाव घेत होता. त्याचे शेवटचे शब्द होते ““France, l’armée, tête d’armée…Joséphine.” म्हणजेच “France, the army, head of the army…Joséphine”.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?