साप आणि मगरीसारख्या जनावरांना लळा लावणाऱ्या एका अवलियाची कहाणी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
मोठे मोठे अजगर, मगरी ह्यांच्याकडे बघून सामान्य माणसाला भीती वाटते, पण हा माणूस खरंच “वेडा” होता. वेडा म्हणजे लौकिक अर्थाने वेडा नव्हे.
त्याचं प्राण्यांवर नितांत प्रेम होतं आणि प्राण्यांना वाचवण्यासाठी त्याने त्याच्या उण्यापुऱ्या ४४ वर्षांच्या आयुष्यात खूप प्रयत्न केले.
माणसांपेक्षा हा प्राणीवेडा प्राण्यांबरोबरच जास्त वेळ घालवायचा. मोठमोठ्या मगरींना हातात घेऊन “इजन्ट शी गॉर्जस?”
म्हणत असलेल्या स्टीव्ह इर्विनला आपण त्याच्या क्रोकोडाईल हंटर ह्या कार्यक्रमात डिस्कव्हरी चॅनेल किंवा ऍनिमल प्लॅनेटवर अनेकदा बघितले आहे.
मोठं मोठ्या मगरी, अजगर, विषारी साप ह्यांच्याबरोबर तर तो सहज खेळत असे. वन्यजीवांचे संरक्षण ह्या मोहिमेला त्याने वाहून घेतले होते. आयुष्यभर त्याने वन्यजीवांच्या संरक्षणाचा व त्यांच्या अभ्यासाचा ध्यास घेतला होता.
स्टीफन रॉबर्ट इर्विन उर्फ द क्रोकोडाईल हंटर ह्याचा जन्म २२ फेब्रुवारी १९६२ साली ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील एका गावात झाला.
त्याचे वडील आयरिश होते. त्याचा जन्म त्याच्या आईच्याच वाढदिवशी झाला. लीन आणि बॉब इर्विन हे त्याचे आईवडील होते.
त्याचे वडील स्वतः वाईल्डलाईफ एक्स्पर्ट असल्याने लहानपणापासूनच त्याला प्राण्यांविषयी प्रेम आणि आकर्षण होते.
स्टीव्ह लहान असतानाच त्याचे वडील क्वीन्सलँडला स्थायिक झाले. तेथेच त्याचे शालेय शिक्षण झाले. स्टीव्हचे आईवडील दोघेही वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणारे होते.
त्याचे वडील वाईल्डलाईफ एक्स्पर्ट होते, पण त्यांचा विशेष रस हर्पेटॉलॉजी मध्ये होता.
हर्पेटॉलॉजी म्हणजे प्राणिशास्त्रातील एक शाखा होय. ह्या शाखेत उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास केला जातो. त्याची आई वन्यजीवांचे पुनर्वसन करणारी होती.
म्हणजेच स्टीव्हच्या रक्तातच वन्यजीवांचे वेड आणि त्यांच्या संरक्षणाचा ध्यास होता. स्टीव्ह आठ वर्षांचा असताना त्याचे वडील क्वीन्सलँडला स्थायिक झाले आणि तिथे त्यांनी एक लहानसे “रेप्टाइल्स अँड फॉना पार्क” सुरु केले.
स्टीव्हचे सगळे बालपणच मगरी आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबर गेले. तो त्यांच्याबरोबर खेळतच मोठा झाला.
लहानपणापासूनच तो आईवडिलांना त्या पार्कमध्ये प्राण्यांना अन्न देणे, पार्कमधील लहान मोठी कामे करणे अशी मदत करत असे.
त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या सहाव्या वाढदिवसाला १२ फुटाचा स्क्रब पायथॉन (बिनविषारी अजगर) पेट म्हणून भेट दिला होता.
वयाच्या नवव्या वर्षांपासून त्याच्या वडिलांनी त्याला मगरी हाताळण्याचे प्रशिक्षण दिले आणि तो लवकरच मगरींना उत्तमप्रकारे हाताळू लागला.
त्याने लहान वयातच क्वीन्सलँडच्या ईस्ट कोस्ट क्रोकोडाईल मॅनेजमेंट प्रोग्रॅममध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले आणि १०० पेक्षा जास्त मगरींना पकडण्याचे काम केले.
त्यापैकी काही मगरींना त्यांच्या नैसर्गिक स्थानी सोडून देण्यात आले तर इतर मगरीचे स्टीव्हच्या वडिलांच्या पार्कमध्ये पुनर्वसन करण्यात आले.
१९९१ सालापासून त्याने त्या पार्कची पूर्ण जबाबदारी सांभाळणे सुरु केले आणि त्या पार्कचे नाव “ऑस्ट्रेलिया झू” असे केले.
१९९१ साली स्टीव्हची भेट टेरी राईन्सशी झाली. टेरी ही एक अमेरिकन नॅचरॅलिस्ट म्हणून काम करीत होती आणि तेव्हा ऑस्ट्रेलियातील प्राण्यांची पुनर्वसन केंद्रे बघण्यासाठी आली होती. तेव्हा तिने स्टीव्हच्या प्राणिसंग्रहालयाला देखील भेट दिली.
दोघेही भेटले तेव्हा टेरी स्टीव्हच्या प्रेमातच पडली. स्टीव्हला देखील टेरी आवडली. त्यांनी फार वेळ न दवडता ४ जून १९९२ रोजी लग्न केले.
आणि वन्यजीव संरक्षणाचा प्रवास एकत्र करण्याचे ठरवले. ह्या दाम्पत्याला बिंडी स्यू इर्विन (२४ जुलै १९९८) आणि रॉबर्ट क्लॅरेन्स उर्फ बॉब (१ डिसेम्बर २००३) ही दोन मुले झाली.
बिंडीचे नाव स्टीव्हने त्याच्या आवडत्या मगरीवरून आणि स्यू ह्या त्याच्या आवडत्या पाळीव कुत्र्याच्या नावावरून ठेवले होते.
स्टीव्हचे जितके प्राण्यांवर प्रेम होते तितकेच त्याच्या कुटुंबावर देखील प्रेम होते. बिन्डी तर त्याची विशेष लाडकी होती. तो म्हणायचा की ,”माझ्या जगण्याचे कारण फक्त बिंडी आहे.”
स्टीव्ह आणि टेरी जेव्हा लग्नानंतर हनिमूनला गेले तेव्हा त्यांनी त्यांचा वेळ तिकडे मगरी पकडण्यात घालवला.
हे सगळे फुटेज स्टीव्हचा जिवलग मित्र जॉन स्टेन्टन ह्याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केले आणि हाच “द क्रोकोडाईल हंटर”चा पहिला एपिसोड होता.
द क्रोकोडाईल हंटर ही सिरीज पहिल्यांदा १९९६ साली ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजनवर सुरु झाली.
आणि लगेच १९९७ साली ही सिरीज उत्तर अमेरिकेतील देशांमध्ये सुद्धा दाखवण्यास सुरुवात झाली. ही सिरीज सगळीकडेच प्रचंड लोकप्रिय झाली. जगभरात १३० देशांमध्ये ही सिरीज दाखवण्यात आली आणि लोकांना प्रचंड आवडली.
स्टीव्ह व टेरी दोघे मिळून हा शो करीत असत. स्टीव्हचे बोलणे, त्याची मनोरंजक सादरीकरणाची पद्धत आणि त्याची “क्राईकी!” म्हणण्याची पद्धत लोकांना फारच आवडली.
त्याच्यामुळे अनेक लोक वन्यजीव संरक्षणात रस घेऊ लागले. ऍनिमल प्लॅनेटने ह्या सिरीजचा शेवटचा भाग “स्टीव्हज लास्ट ऍडव्हेंचर” ह्या नावाने दाखवला.
ह्या तीन तासांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये स्टीव्हचे जगभरातील ऍडव्हेंचर्स दाखवण्यात आले. त्यानंतर स्टीव्हने ऍनिमल प्लॅनेटच्या अनेक डॉक्युमेंट्रीजमध्ये काम केले. त्यातील क्रॉक फाईल्स, द क्रोकोडाईल हंटर डायरीज, न्यू ब्रीड व्हेट्स ह्या त्यातील काही प्रसिद्ध डॉक्युमेंट्रीज आहेत.
त्याने १९९८ साली दिग्दर्शक मार्क स्ट्रिक्सनबरोबर “द टेन डेडलीयेस्ट स्नेक्स इन द वर्ल्ड” मध्येही काम केले.
त्याने द स्टीव्ह इर्विन कॉन्झर्वेशन फाउंडेशन सुरु केले ज्याचे नंतर वाईल्डलाईफ वॉरियर्स असे नामांतर करण्यात आले. तसेच त्याने इंटरनॅशनल क्रोकोडाईल रेस्क्यूचे सुद्धा नेतृत्व केले.
२००३ च्या नोव्हेम्बरमध्ये तो मेक्सिकोमधील बॅजा कॅलिफोर्निया द्वीपाजवळ सी लायन्सवर डॉक्युमेंटरी करत होता तेव्हा त्याने त्याच्या बोट मधील रेडियोवर ऐकले की दोन स्कुबा डायव्हर्स बेपत्ता आहेत. तेव्हा स्टीव्ह व त्याच्या संपूर्ण टीमने त्या डॉक्युमेंट्रीचे चित्रीकरण रद्द करीत त्या डायव्हर्सचा शोध घेणे सुरु केले.
त्याच्या टीम मधील डायव्हर्सने मदतकार्यासाठी आलेल्या डायव्हर्सची मदत केली आणि इर्विन त्याच्या बोटीतून डायव्हर्सच्या शोधार्थ निघाला.
त्याने त्याचे सॅटेलाईट कम्युनिकेश वापरून मदतकार्यासाठी विमान सुद्धा मागावले. शोधकार्याच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्ह व त्याच्या टीमला एक डायव्हर एका ठिकाणी अडकलेला सापडला.
त्यांनी त्या डायव्हरची सुटका केली. त्याने सुरुवातीला स्टीव्हला ओळखलेच नाही. दुर्दैवाने दुसरा डायव्हर मात्र सापडला तेव्हा मात्र खूप उशीर झाला होता. त्याने प्राण सोडले होते.
स्टीव्हने वन्यजीव संरक्षण करता करता समुद्री कासवाची एक नवीन प्रजाती १९९७ साली शोधून काढली. तेव्हा तो त्याच्या वडिलांसह क्वीन्सलँडच्या किनाऱ्यावर होता.
त्या कासवाच्या प्रजातीला इर्विनच्या सन्मानार्थ इर्विन्स टर्टल असे नाव देण्यात आले. त्याच्या ह्या कार्यासाठी त्याला २००१ साली ऑस्ट्रेलियन सरकारने सेंटनरी मेडल देऊन त्याचा गौरव केला.
एक गमतीची गोष्ट म्हणजे इतकी भयंकर जनावरे लीलया हाताळणाऱ्या इर्विनला अनेकदा त्या जनावरांनी चावून किंवा नखांनी जखमी केले होते.
तरीही त्याला त्या प्राण्यांची कधीही भीती वाटली नाही. विषारी साप, अजस्त्र मगरी, मोठे अजगर ह्यांना लीलया हाताळणारा स्टीव्ह मात्र पोपटाचे नाव काढले की अस्वस्थ व्हायचा. त्याला पोपटांची भीती वाटते असे तो एकदा म्हणाला होता. अर्थात त्याने ही भीती घालवण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले.
एका खास दुर्मिळ प्रजातीच्या गोगलगायीला crikey steveirwini. असे स्टीव्हचे नाव देऊन स्टीव्हचा मरणोत्तर गौरव केला गेला.
२००९ साली डोक्टर जॉन स्टेनसिक ह्यांनी ह्या प्रजातीचा शोध लावला आणि हा शोध स्टीव्हला समर्पित करत त्याचेच नाव ह्या प्रजातीला दिले.
४ सप्टेंबर २००६ रोजी स्टीव्ह बॅट रीफ,पोर्ट डग्लस , क्वीन्सलँड येथे ओशन्स डेडलीएस्ट ह्या डॉक्युमेंट्रीवर काम करीत होता.
शूटिंग करत असताना तिथले वातावरण खराब झाले आणि शूटिंगमध्ये व्यत्यय आला.
पण आपल्या मुलीच्या टीव्ही प्रोग्रॅम साठी फुटेज मिळवण्यासाठी स्टीव्हने उथळ पाण्यात स्नॉर्केलिंग करण्याचा निर्णय घेतला.
छातीच्या उंचीच्या पाण्यात पोहत असताना अचानक एक स्टिंग्रे मासा स्टीव्हजवळ आला आणि त्याने अचानक आपल्या शेपटीने स्टीव्हच्या छातीत भोसकणे सुरु केला.
काही सेकंदातच त्याने शंभर वेळा तरी स्टीव्हच्या छातीत भोसकले असेल. त्यामुळे स्टीव्हची फुफ्फुसे पंक्चर झाली आणि त्याच्या हृदयाला देखील जखम झाली.
सुरुवातीला स्टीव्हला वाटले की त्याची फक्त फुफ्फुसे पंक्चर झाली आहेत.
इर्विनच्या टीमने लगेच हालचाल करीत त्याच्यावर सीपीआर केले पण खूप रक्तस्त्राव झाला होता आणि त्याच्या हृदयाला सुद्धा जखम झाली होती.
त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करेपर्यंत खूप उशीर झाला होता, आणि ह्या एकमेव दुर्मिळ घटनेत मोठमोठे अजस्त्र भयंकर विषारी प्राणी हाताळणाऱ्या स्टीव्ह इर्विनचा एका स्टिंग्रे माश्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.
स्टीव्हचा अचानक झालेला मृत्यू जगातील सर्वांसाठीच धक्कादायक होता. त्याचा मुलगा तेव्हा फक्त तीन वर्षांचा होता. आज त्याची दोन्ही मुले त्यांच्या आई टेरी सह आपल्या वडिलांचे कार्य पुढे चालवीत आहेत.
ते सुद्धा स्टीव्हप्रमाणेच वन्यजीव संरक्षण व त्यांच्याबद्दल जनजागृतीचे काम करीत आहेत. आपल्या वडिलांप्रमाणेच बिंडी व बॉब दोघेही वन्यप्राण्यांवर आधारित टीव्ही शो करीत आहेत.
आज स्टीव्ह आपल्यात नाही, तरीही त्याचा उत्साहाने परिपूर्ण असलेला “द क्रोकोडाईल हंटर” हा शो जवळजवळ प्रत्येकाच्या लक्षात आहे. अशी माणसे आपल्यात नसली तरी त्यांच्या कार्याने ती अमर असतात.
स्टीव्ह! द क्रोकोडाईल हंटर, वी मीस यू !
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.