देशाला ४० हुतात्मा माहितीयेत, पण त्यांच्या फोर्सबद्दल कुणालाही ठाऊक नसलेला हा इतिहास नक्की वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात एका भीषण आत्मघाती हल्ल्यात ४४ सैनिक हुतात्मा झाले. हे सगळे जवान सीआरपीएफ म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे होते. केंद्रीय राखीव सुरक्षा दल हे भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी सर्वात मोठे पोलीस दल आहे.
हे भारताच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते. सीआरपीएफची प्राथमिक जबाबदारी म्हणजे पॉलिसी कारवाईत राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांची मदत करणे,कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणे आणि दहशतवादाविरुद्ध लढा देणे ही आहे.
क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस ह्या संस्थेच्या रूपात २७जुलै १९३९ रोजी सीआरपीएफची स्थापना झाली.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २८ डिसेंबर १९४९ रोजी ही संस्था सीआरपीएफ ऍक्ट खाली केंद्रीय राखीव सुरक्षा दल झाली.
सीआरपीएफचे प्रमुख हे भारतीय पोलीस दलातील अधिकारी असतात. सीआरपीएफ मध्ये दहा प्रशासकीय विभाग असतात आणि प्रत्येक विभागाचे प्रमुख हे ईन्स्पेक्टर जनरल असतात.
प्रत्येक विभागात एक किंवा अधिक ऑपरेशनल रेंज असतात आणि ह्याचे प्रमुख डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल असतात. सीआरपीएफ फोर्स एक मुख्यालय व ईशान्य विभाग, दक्षिण विभाग, मध्य विभाग व जम्मू आणि काश्मीर विभाग ह्या चार झोन्स मध्ये विभागलेले आहे.
प्रत्येकी झोनचे प्रमुख हे ऍडिशनल डायरेक्टर जनरल किंवा स्पेशल डायरेक्टर जनरल असतात.
प्रत्येक झोनचे विविध सेक्टर्स मध्ये विभाजन केले आहे व इन्स्पेक्टर जनरल हे ह्या सेक्टर्सचे प्रमुख असतात.
आज सीआरपीएफला ८० वर्षे पूर्ण झाली आहेत.सीआरपीएफ मध्ये आज एकूण २४६ बटालियन्स आहेत. त्यातील २०८ बटालियन्स पुरुष सैनिकांची तर ६ महिला बटालियन्स आहेत.
ह्याशिवाय १५ आर ए एफ बटालियन्स , १० कोब्रा बटालियन्स, ५ सिग्नल बटालियन्स, १ स्पेशल ड्युटी ग्रुप आणि १ पार्लमेंट ड्युटी ग्रुप आहेत आणि प्रत्येक बटालियनमध्ये साधारणपणे १२०० कॉन्स्टेबल असतात.
ह्या सगळ्या बटालियन्स (पॅरा मिलिटरी) देशाची अंतर्गत सुरक्षाव्यवस्था सांभाळतात.
व्ही जी कानेटकर हे सीआरपीएफचे पहिले डायरेक्टर जनरल होते. त्यांनी ३ ऑगस्ट १९६८ ते १५ सप्टेंबर १९६९ इतके काळ सीआरपीएफचे नेतृत्व केले. राजीव राय भटनागर हे सीआरपीएफचे सध्याचे प्रमुख आहेत. त्यांनी २७ एप्रिल २०१७ पासून हा कार्यभार सांभाळला आहे.
युद्धाच्या प्रसंगी सीआरपीएफचे जवान आपल्या सेनेसह खांद्याला खांदा लावून आपले रक्षण करतात. १९६२ च्या युद्धात तसेच १९६५ व १९७१ च्या युद्धात सीआरपीएफने देशाच्या सुरक्षेत आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
१९६५ पर्यंत सीआरपीएफने आपल्या सीमेचे रक्षण सुद्धा केले. नंतर ह्या कामासाठी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तैनात करण्यात आली.
सत्तरच्या दशकात कट्टरपंथीयांनी त्रिपुरा आणि मणिपूर मधील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणली होती तेव्हाही ह्या भागात मोठ्या प्रमाणावर सीआरपीएफच्या जवानांची नियुक्ती करण्यात आली होती. ह्याच वेळेला ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात सुद्धा अशांतता पसरली होती.
तेव्हा ह्या भागात सुद्धा सीआरपीएफने मोठ्या प्रमाणावर जवान नियुक्त करून शांतता प्रस्थापित केली आणि संवादाची साधने व्यत्ययमुक्त ठेवण्याचे मोठे काम केले.
आजही नक्षलप्रवण भागात, अतिसंवेदनशील भागात सीआरपीएफचे जवान तैनात असतात. २००१ साली जेव्हा राजधानी नवी दिल्लीत संसदेवर हल्ला झाला तेव्हा सीआरपीएफच्या जवानांनी संसदेचे रक्षण करीत पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.
तसेच ५ जुलै २००५ साली जेव्हा पाच सशस्त्र दहशतवादी अयोध्येत राम जन्मभूमीच्या स्थळी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सीआरपीएफच्या पाच सैनिकांनी शौर्य दाखवत अतिरेक्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.
त्यासाठी त्या सैनिकांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. जम्मू आणि काश्मीर, ईशान्येची राज्ये आणि बिहार ह्या ठिकाणी कायम दहशतवादी, नक्षलवादी आणि समाजकंटक समाजविघातक कृत्ये करीत असतात.
तिथेच सीआरपीएफचे जवान अगदी निष्ठेने आणि धैर्याने आपले कर्तव्य बजावत लोकांचे रक्षण करण्यात गुंतलेले असतात. प्रसंगी आपले कर्तव्य बजावताना त्यांना वीरमरणाला सामोरे जावे लागते.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफच्या अनेक जवानांना वीरमरण आले आहे. तसेच दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुद्धा अनेक जवान हुतात्मा झाले आहेत. तरीही अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा हे जवान आपले कर्तव्य अगदी निष्ठेने पाळतात.
बऱ्याचदा त्यांची राहण्याची -जेवणाची व्यवस्था चांगली नसते. त्यांच्या कामाच्या वेळा अनिश्चित असतात.
कितीही वेळ त्यांना ड्युटी करावी लागते आणि त्या मानाने त्यांना जे मानधन मिळते ते पुरेसे नाही. त्यांना फार सवलतींचा लाभ सुद्धा नसतो. तरीही ते आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पडतात.
“सेवा आणि निष्ठा” हे आपले ब्रीद जपत सीआरपीएफचे जवान “जिथे कमी तिथे आम्ही” असे म्हणत येईल ती जबाबदारी उचलतात.
कुठे दंगल उसळली असो, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात असो किंवा कुठल्या नैसर्गिक आपत्तीने थैमान घातले असो की निवडणूक असो हे सीआरपीएफचे जवान डोळ्यात तेल घालून तासंतास आपली ड्युटी करत असतात.
प्रसंगी संयुक्त राष्ट्रसंघाच्या एखाद्या मिशनसाठी सुद्धा त्यांना काम करावे लागते. अश्या ह्या आपल्या जवानांचा असीम त्याग आणि निष्ठा कायम लक्षात ठेवून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगली पाहिजे.
भारताच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी अगदी प्राणपणाने जपणाऱ्या भारतमातेच्या ह्या शूर सुपुत्रांना एक कडक सॅल्यूट!
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.