चॅपेलने आपल्या भावाला सरपटी बॉल टाकायला सांगितला, तेव्हापासून बंदी आहे सरपटी बॉलिंगवर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
क्रिकेट हा जंटलमेन्स गेम मानला जातो. म्हणजेच हा खेळ संघभावनेने व खिलाडूवृत्तीने खेळायचा खेळ आहे. भारतात तर क्रिकेट हा एक धर्मच आहे कारण करोडो लोक क्रिकेट आणि क्रिकेटप्लेयर्सची अक्षरश: भक्ती करतात.
परंतु ह्या भावनेला काळिमा फासणारेही काही खेळाडू होऊन गेले व आजही आहेत ज्यांनी मॅच फिक्सिंग करून, मैदानावर नियम मोडून, असभ्य वर्तन करून क्रिकेटच्या चाहत्यांचे मन दुखावले आहे.
क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत. ह्यापैकींच एक प्रसंग आहे तो अंडरआर्म बॉलिंगचा! असे नेमके काय घडले की क्रिकेटमध्ये अंडरआर्म बॉलिंगवर बंदी घातली गेली?
हा प्रसंग जुन्या जाणत्या क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात असेलच, नव्या चाहत्यांना सुद्धा ह्या प्रसंगाबद्दल कदाचित माहिती असेल. तर आज ह्याच घटनेवर प्रकाश टाकूया.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आणि भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल ही एक अशी व्यक्ती आहे की तो जिथे जाईल तिथे काहीतरी विवादास्पद घडेल. खेळणे असो की कोचिंग, ग्रेग चॅपेल कायम चुकीच्या कारणांसाठी प्रकाशझोतात येत राहीला आहे.
भारतीय संघ आणि ग्रेग चॅपेल ह्यांचे नातेही फारसे चांगले नाही. भारतीय संघ व्हर्सेस ग्रेग चॅपेल ह्यांच्यात वादाचे प्रसंग अनेक वेळा उभे राहिले आहे.
सौरव गांगुलीचे अख्खे करियर ग्रेग चॅपेल मुळे धोक्यात सापडले होते. ह्याच ग्रेग चॅपेलच्या स्पॉईल स्पोर्ट वृत्तीमुळे अंडरआर्म बॉलिंगवर कायमची बंदी घातली गेली.
१ फेब्रुवारी १९८१ रोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर बेन्सन हेजेस सिरीजचा तिसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड असा सुरु होता.
पहिला सामना न्यूझीलंडने ७८ धावांनी जिंकला होता तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय मिळवला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व ग्रेग चॅपेल कडे होते.
त्या सामन्यात ग्रेग चॅपेलने ९० धावांची सणसणीत खेळी करून आपल्या संघाची बाजू मजबूत केली होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करून न्यूझीलंड संघापुढे २३६ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला चोख उत्तर देत किवी ओपनर ब्रूस एडगरने दणदणीत खेळी करत शतक केले आणि एकट्यानेच संघाला विजयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचवले.
आपल्याला विजय मिळवणे कठीण आहे असं लक्षात येताच ग्रेग चॅपेलचा संयम संपला आणि त्याने एक असा निर्णय घेतला ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर एक कायमचा काळा डाग लागला.
ग्रेग चॅपेलच्या ह्या एका निर्णयामुळे ह्या सामन्यात त्याच्याकडे खलनायक म्हणून बघितले गेले.ऑस्ट्रेलियाच्या संघात ग्रेग चॅपेलचा भाऊ ट्रेवर चॅपेल सुद्धा खेळत होता.
ह्या सामन्यात ग्रेग चॅपेलने १० ओव्हर्समध्ये तीन बळी घेतले होते आणि सामन्यातील अंतिम ओव्हर टाकण्याची जबाबदारी ट्रेव्हर चॅपेलवर टाकण्यात आली. सामना अगदी उत्कंठावर्धक क्षणाला पोचला होता.
सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडला एक बॉल मध्ये सात धावा काढायच्या होत्या. तेव्हा ग्रेगने ट्रेव्हरला अंडरआर्म बॉल टाकण्याचा सल्ला दिला. तेव्हा अंडरआर्म बॉल टाकणे क्रिकेटच्या नियमाच्या विरुद्ध नव्हते.
आपल्या मोठ्या भावाचे ऐकून ट्रेव्हरने अंडरआर्म बॉल टाकला. त्याने असा बॉल टाकलेला बघून न्यूझीलंडचा फलंदाज ब्रायन मॅकेनी आश्चर्यचकित झाला आणि सरळ खेळत त्याने मैदानावरच बॅट रागाने जमिनीवर आपटून ट्रेव्हरच्या ह्या कृतीविषयी रोष व्यक्त केला.
ट्रेव्हरचे हे खेळणे स्पोर्ट्समन स्पिरिटच्या विरुद्ध आहे असे त्याने म्हटले.
खरे तर त्या बॉल वर एक षटकार मारून सामना बरोबरीत आणण्याची संधी न्यूझीलंडकडे होती पण ट्रेव्हरच्या ह्या अंडरआर्म बॉल मुळे न्यूझीलंडला ती संधी मिळू शकली नाही.
तो सामना ऑस्ट्रेलियाने सहा धावांच्या फरकाने जिंकला. व त्यानंतरचा चौथा सामना सुद्धा जिंकून सिरीज ऑस्ट्रेलियाच्या नावे केली.
ऑस्ट्रेलियन कर्णधार ग्रेग चॅपेलला “मॅन ऑफ द सिरीज” पुरस्कार मिळाला. परंतु त्या सामन्यानंतर ग्रेग व ट्रेव्हर चॅपेल ह्या दोन्ही खेळाडूंवर संपूर्ण क्रिकेट जगताने टीका केली. क्रिकेट चाहते त्याच्यावर नाराज झाले, चिडले.
गंमत म्हणजे असा अंडरआर्म बॉल टाकण्यात येणार आहे हे दोन्ही अम्पायर्सना सांगण्यात आले होते. तेव्हा ग्रेग, ट्रेव्हरचा मोठा भाऊ इयन चॅपेल (ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार) ह्या सामन्याचे समालोचन करीत होता.
असा बॉल टाकल्यानंतर त्याचीही तत्काळ प्रतिक्रिया होती की “No, Greg, no, you can’t do that!”
ह्या कृतीविषयी वर्तमानपत्रात लिहिताना इयन चॅपेलने सुद्धा आपल्या भावाच्या ह्या कृत्यावर जाहीर टीका केली होती.
सामना हरल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू उद्वेगाने मैदानाच्या बाहेर गेले पण न्यूझीलंडचा कर्णधार जॉफ हॉवर्थने मैदानात धाव घेऊन अम्पायर्सशी चर्चा केली. त्याच्या मते इंग्लिश टुर्नामेंट्सप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा अंडरआर्म बॉल टाकणे नियमाच्या विरुद्ध आहे.
पण तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा नियम नव्हता. परंतु ह्या घटनेनंतर आयसीसीने खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध असल्याचे कारण देत अंडरआर्म बॉल टाकण्यावर बंदी घातली.
चॅपेलची ही कृती क्रिकेटच्या इतिहासात एक लाजिरवाणी घटना म्हणून ओळखली जाते. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या तत्कालीन पंतप्रधानांनी सुद्धा ह्या घटनेवर टीका करत हे वर्तन स्पोर्ट्समन स्पिरिटच्या विरुद्ध आहे अशी भावना व्यक्त केली.
हे सगळे झाल्यानंतर चॅपेल बंधूंनी आपल्या कृत्याची सार्वजनिक रित्या माफीही मागितली.
परंतु दोघांच्याही कारकिर्दीवर जो डाग लागला तो आजतागायत पुसला गेला नाही व अंडरआर्म बॉलिंगचा जेव्हा विषय निघतो तेव्हा ग्रेग चॅपेलचे हे कृत्य आजही क्रिकेट चाहत्यांना लख्ख आठवते. कुणालाही ह्याचा विसर पडलेला नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.