सरकार भाव देत नाही म्हणून हताश झालेल्या सगळ्या पत्रकारांनी एक नवाच उद्योग उभा केलाय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
जसजशी लोकसभा निवडणुकीची तारीख जवळ येऊ लागली आहे, तसे सर्व राजकीय पक्ष विविध क्लुप्त्या वापरून सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माध्यमं आणि राजकारण यांचा नेहमीच जवळचा संबंध राहिला आहे.
म्हणूनच की काय राजकीय नेत्यांना आपले वृत्तपत्र असावे, वृत्तवाहिनी असावी असे वाटू लागले आहे.
हा ट्रेंड काही नवा नाही. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. परंतु दिवसेंदिवस राजकीय नेते एखाद्या वृत्तवाहिनीचे प्रोमोटर्स असण्याचे प्रमाण वाढतच आहे. सर्वच पक्षांचे अनेक नेते वृत्तवाहिन्यांचे प्रोमोटर्स असल्याचे अनेक जण जाणून आहेत.
आता येत्या २६ जानेवारी पासून काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या मालकीची नवीन वृत्तवाहिनी सुरु होणार असल्याची माहिती आहे. “हार्वेस्ट टीव्ही” असे त्या इंग्रजी वृत्तवाहिनीचे नाव आहे.
शिवाय पुढे हिंदीमध्ये देखील ही वाहिनी सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे.
हे व्हिकॉन मीडियाचे मालकीचे आहे ज्यांच्याकडे आधीपासूनच इंग्रजी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषा चॅनेलसाठी परवाने आहेत. मागील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातच या माध्यम समूहाला परवाने देण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार हिंदी वाहिनी इंग्रजी वाहिनीचे अनुसरण करेल.
वृत्तवाहिनी चालविण्यासाठी तुमच्याकडे अजून एक महत्वाची बाब असावी लागते तो म्हणजे लोकप्रिय चेहरा. कारण माध्यमांमध्ये चालणारी गळेकापू स्पर्धा पाहता जर तुमच्याकडे लोकप्रिय असा चेहरा नसेल तर तुम्ही आपोआपच स्पर्धेत मागे पडता.
परंतु “हार्वेस्ट टीव्ही” ने त्यासाठी योग्य काळजी घेतली आहे. बरखा दत्त आणि करण थापर हे पत्रकारितेतील दोन मोठे चेहरे या वाहिनीकडे असतील अशी अटकळ आहे.
याबाबत बरखा दत्त यांनी अजून आपला खुलासा केलेला नाही. तर करण थापर यांनी याबाबत वृत्तवाहिनीशी बोलण्याचा सल्ला दिला आहे.
सीमी पाशा (एक्स-इंडिया टुडे) आणि विनीत मल्होत्रा (एक्स-टाइम्स नाऊ) यांच्या सारखे इतर प्रमुख सूत्रसंचालक देखील या वाहिनीचा एक भाग असल्याची अपेक्षा आहे.
बरखा दत्त यांचा नेहमीच भाजप आणि संघ परिवार विरोधी पवित्रा राहिला आहे. तर करण थापर यांचे कुटुंब आणि नेहरु-गांधी परिवाराशी घनिष्ठ संबंध आहेत.
ते गेल्या दशकभरापासून गांधी घराण्याच्या सत्तावर्तुळाचा एक भाग आहेत. ते संजय गांधी यांचे जवळचे सहकारी आणि सहाध्यायी होते.
कपिल सिब्बल मालक म्हणून तर बरखा दत्त आणि करण थापर हे समीकरण बरंच काही सांगून जाणारं आहे. काँग्रेस कडे सत्ता आणि डाव्या विचारसरणीचे आजूबाजूला असणारे लोकं हे “ल्यूटन्स दिल्ली” चे चित्र या वाहिनीत बघायला मिळेल.
तेव्हा या वाहिनीचे ‘धोरण’ नक्की काय असेल हे सांगायला कुठल्या तज्ज्ञाची आवश्यकता नाही.
मात्र या वृत्तवाहिनीच्या मते “आमच्या वाहिनीचे वचन आहे की, ही वाहिनी म्हणजे असे व्यासपीठ असेल की जिथे ‘सत्य सत्याला किंमत असेल’, योग्य प्रश्न विचारले जातील आणि जनतेला सत्य बातम्या दिल्या जातील.
अनावश्यक बाबी टाळून जनतेच्या हातांना प्राधान्य देणारा आशय आम्ही देऊ” या नव्या वृत्तवाहिनीत पक्षपाताला कुठेही थारा नसेल असे व्हिकॉन मीडिया चे दीपक चौधरी यांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे.
माध्यमातील लोकांच्या माहितीनुसार या नवीन वृत्तवाहिनीच्या प्रक्षेपणाची पूर्वतयारी झाली असून आता प्रोमो चित्रित करणे चालू आहे.या वाहिनीचे आगमन जोरदार असेल यासाठी कसून तयारी केली जात आहे.
केवळ इंग्रजीच नाही तर हिंदी वृत्तवाहिनी देखील लवकरच सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हिंदी वाहिनीसाठी “पुण्य प्रसून वाजपेयी” यांचे नाव चर्चेत आहे.
याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. मात्र ते म्हणाले की ते नवीन वृत्तवाहिनी मध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे पण त्याबाबत बोलणी चालू असतानाच त्याविषयी अधिक बोलणे योग्य होणार नाही. एबीपी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनी मधून पुण्य प्रसून वाजपेयी काही महिन्यांपूर्वीच बाहेर पडले होते.
ज्या प्रकारे ते बाहेर पडले होते आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष जबाबदार असल्याची जी चर्चा झाली होती ती पाहता “हार्वेस्ट टीव्ही” त्यांना नक्कीच आपलंसं करून घेईल.
कर्नाटकचे डी के शिवकुमार आणि नवीन जिंदाल यांना देखील यात सहभागी करण्याची अपेक्षा आहे. हे देखील काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिब्बल यांच्या पुढाकाराने ही वाहिनी सुरु होत असून भाजप आणि संघ परिवाराविरुद्ध लढण्यासाठी आपल्या विचारसरणीचे एक प्रभावी माध्यम आपल्या हाती असावे या विचारातून ही वृत्तवाहिनी सुरु करण्याचा निर्णय झाला. माध्यम क्षेत्रामध्ये कपिल सिब्बल यांचा हा काही पहिला डाव नाही.
तरुण तेजपाल यांच्या तहलका नियतकालिकाच्या पहिल्या दात्यांपैकी काँग्रेस नेते कपिल सिब्बल हे एक होते. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यास हे नियतकालिक अग्रेसर असल्याचे सर्वज्ञात आहे.
वृत्तवाहिनी हे एक प्रभावी माध्यम आहे. जनतेवर त्याचा मोठा प्रभाव असतो तेव्हा आपले म्हणणे थेट जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अशाप्रकारे माध्यम हातात असणे केव्हाही सोयीस्कर आहे.
तेव्हा एक इंग्रजी वाहिनी आणि एक हिंदी वाहिनी असेल तर खूप मोठ्या जनतेपर्यंत पोहोचणे शक्य असल्याच्या जाणीवेने अनेक पक्ष आता या मार्गाचा अवलंब करीत आहेत.
हिंदी वाहिन्यांचे परीक्षण करणाऱ्या ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) यांनी अंदाजे ७० हिंदी न्यूज चॅनलचे विश्लेषण केले असता, २०१६-१८ कालावधीत दर्शकांच्या संख्येत २८ टक्के वाढ झाली आहे.
हे सर्व डोळ्यापुढे ठेऊन अनेक पक्ष हरतऱ्हेने माध्यमांमध्ये आपल्यासाठी जागा निर्माण करतांना दिसत आहेत. या शर्यतीत न्युज पोर्टल्स देखील मागे नाहीत. अनेक नेत्यांना त्यात पैसे गुंतविण्याची अनिवार इच्छा आहे.
ऑनलाईन माध्यमांचा वाढता प्रसार त्यांना चांगलीच भुरळ घालतो आहे. पण अजूनही वृत्तवाहिन्यांचा प्रभाव अबाधित आहे. त्यामुळेच “हार्वेस्ट टीव्ही” च्या आगमनाची बातमी राजकारण आणि माध्यमांच्या संबंधांना उधाण आणतांना दिसत आहे.
भारतीय जनता पक्ष माध्यमांमध्ये ज्या आत्मविश्वासाने वावरतो त्याला प्रतिवाद करण्यासाठी काँग्रेसने उचललेले हे पाऊल किती यशस्वी होईल हे येत्या काही दिवसात समोर येईलच.
थोडक्यात आता निष्पक्ष असं काही असण्यापेक्षा प्रो – अँटी या पद्धतीने माध्यमं ओळखली जातील.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.