इंग्रजी चित्रपटांमध्ये भारतीयांबद्दल दाखवलं जाणारं चित्र चीड आणणारं आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारत देश आणि भारतीय यांना हॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये सातत्याने एका विशिष्ट पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर केले जात आहे.
ज्यावेळेस आपण एखादा इंग्रजी चित्रपट बघतो आणि त्यात एखादे भारतीय पात्र अथवा भारतातील दृश्य आले की साहजिकच आपण त्याच्याशी जोडले जातो.
पण ते सर्व अशा काही पद्धतीने रंगवलेले असते की आपल्याला त्याबद्दल चीड निर्माण होईल.
चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. जेव्हा चित्रपटाद्वारे एखादी गोष्ट प्रेक्षकांसमोर येते तेव्हा ती त्यांच्या मनावर ठसते.
अशावेळेस जर भारत आणि भारतीयांचे सातत्याने एकाच पद्धतीने चित्रण केले जात असेल तर, इतका मोठा प्रेक्षक वर्ग भारताचे चित्र मागासलेला देश म्हणूनच रंगवणार. त्यात नवल काय !
हे केवळ भारतावर मुद्दाम आकस ठेवूनच चित्र रंगवले जाते असे अजिबात नाही. पण त्यातून जे चित्र निर्माण होते ते अमेरिकेसारखी महासत्ता तिसऱ्या जगाकडे कशा नजरेने पाहते हेच दाखवणारे आहे.
हीच बाब भारतीय उपखंडातील इतर देश तसेच आफ्रिकन देशांना लागू होते.
आज अमेरिकेसारख्या देशात भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. तरीही जेव्हा भारत देश आणि भारतीय यांच्याबद्दल काही दाखवायचे असते तेव्हा ते अगदी साचेबद्ध पद्धतीने सादर केले जाते.
मुळात भारतीय प्रमुख भूमिकेत आहेत असे चित्रपट कमी बनतात. या चित्रपटांच्या कथा पाश्चात्य लोक केंद्रस्थानी असतील या बाजाच्या असतात. उदाहरणार्थ एखाद्या चित्रपटात भारताचे वर्णन दाखवायचे असेल तर ते दृश्य आणि पात्र याद्वारे प्रेक्षकांसमोर येते.
इंग्रजी चित्रपटांमध्ये भारत कसा सादर केला जातो तर शहरं ही झोपड्पट्टीने भरलेली असतात. कोलकाता हे शहर या चित्रपटांमध्ये जास्त दाखवले जाते. (द अव्हेंजर्स- २०१२)
या दृश्यांमध्ये गर्दीने भरलेले रस्ते, गोंगाट, प्रदूषण, अस्वच्छ पाणी, खराब अन्न हमखास आढळेल. या रस्त्यांवर कोण असेल तर भिकारी, प्राण्यांचे खेळ, मदारी, गारुडी, डोंबारी, भविष्य सांगणारा पोपट.
हीच गोष्ट सार्वजनिक वाहनांची ज्यात अजूनही हातरिक्षा, पालखी, बैलगाडी हे असतातच. रेल्वे असेल तर ती सुद्धा कोळशावर चालणारी. यात भारत दाखवायचा असेल तर सर्वात जास्त दृश्ये ही बाजार म्हणजे रस्त्यावर असलेली दुकाने आणि तिथे असलेली गर्दी यांचीच असतात.
गरिबी दाखवायची असेल तर भारत दाखवा इतके हे समीकरण घट्ट आहे. आणि हो, त्या गरिबांना मदत करणारे, त्यांना शोषण होण्यापासून वाचवणारे पाश्चात्य सद्गृहस्थ (मिशनरी?) तिथे अवतरतात.
अधिकाधिक चित्रपटांमध्ये भारतात राहणारे पात्र एक तर झोपडीत राहणारे असते नाहीतर कुठल्या घाणेरड्या वस्तीत.
अर्थात श्रीमंत पात्र थेट महाल, मोठमोठाले बंगले इथे राहतात. त्यांनी भरपूर दागिने घातलेले असतात. पण हे वास्तविक चित्र आहे का?
याशिवाय मंदिरांमध्ये बळी दिला जाणे, भारतात विवाह कसे आई-वडीलच ठरवतात हे विचित्र पद्धतीने दाखवले जाते. सती प्रथा, बालविवाह, बालकामगार या गोष्टीही असतातच.
–
- स्टीव्हन स्पीलबर्गने सत्यजित रे यांची कथा चोरून तयार केला होता हा जगप्रसिद्ध चित्रपट!
- थॅनॉस ठरणार मैलाचा “स्टोन”? : इन्फिनिटी वॉरच्या कमाईचे डोळे दिपवणारे आकडे
–
हवामानविषयक परिस्थिती अनियंत्रित म्हणून चित्रित केली जाऊन इथे प्रचंड ऊन असते आणि त्यापासून आपला बचाव करण्यासाठी सातत्याने काळजी घेण्याची गरज आहे या पद्धतीने सूचित केले जाते.
हीच बाब पात्र म्हणून कुणी भारतीय असेल तर त्याची सुद्धा असते. भारतीय हे साधारणतः आधी बेरोजगार, टॅक्सी ड्राइवर, रस्त्यावर हॉटेल चालवणारे, चोर, जादूगार आणि वेश्या असेच असतात.
बऱ्याच चित्रपटांत भारतीय नोकर असतात जे साफसफाई करणे, बागेत काम करणे, डोक्यावर सामान आणणे, सलाम करणे, वाढपी यांसारखी कामे करतांना दिसतात.
वर नमूद केले ते भारतीय कुठल्या व्यवसायात दाखवले जातात. त्याचप्रमाणे अजून एक म्हणजे भारतीय स्त्री एक पीडित महिला म्हणून सुद्धा अनेक चित्रपटांमधून समोर येत असते.
याशिवाय लहान मुले/मुली ही निरागस आणि पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण असणारी आहेत हे चित्रही तुम्हाला वारंवार नजरेस येईल. मुळात महिला पात्र पुरुष पात्रांच्या तुलनेत संख्येने आणि भूमिकेच्या लांबीने कमीच असतात.
याशिवाय तुटक इंग्रजी बोलणारे, आत्मविश्वासाचा अभाव असणारे, असुरक्षित असे पात्र रंगवलेले दिसतील.
नवीन सहस्त्रकात भारतीय अभियंते मोठ्या प्रमाणात अमेरिकेत स्थिरस्थावर झाले. अनेक इतर चांगल्या व्यवसायातही भारतीयांचे चांगले बस्तान बसले आहे. तेव्हा सतत तेच तेच चित्र का रंगवले जाते हे अनाकलनीय आहे.
द १०० फूट जर्नी, स्लमडॉग मिलियनेयर, लाइफ ऑफ पाय आणि द मिस्ट्रेस ऑफ स्पाईसेस सारखे चित्रपट पाहण्यास चांगले होते.
परंतु तरीही भारतीयांबद्दल असणारा एक पारंपारिक दृष्टीकोन त्यात आढळतोच. जसे करी, गरिबी, जादूटोणा, तंत्र इत्यादी.
अमेरिकन/ इंग्रजी चित्रपटात १९३० सालानंतर बाहेरच्या देशातील विषय हाताळण्यास सुरुवात झाली. असे पक्षपाती चित्रण काही एका चित्रपटापुरते मर्यादित नाही तर याची नेहमीच पुनरावृत्ती होतांना दिसते.
तेव्हा हे काही फक्त चित्रपटाच्या निर्मितीतला एक दृष्टीकोन तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. तर तिथल्या समाजात भारतीयांबद्दल असणारे समज चित्रपटातून उमटत आहे असेच म्हणावे लागेल.
याचा अजून एक अर्थ असा देखील आहे की इतरांना, इतरांच्या संस्कृतीला कमी लेखून आपले सांस्कृतिक वर्चस्व आणि स्वप्रतिमा बळकट करण्याचे प्रयत्न यातून होतांना दिसता आहेत.
इंग्रजी चित्रपटात दाखवले जाणारे दृश्य भारतात नाहीच आहे असा दावा कोणी करणार नाही. भारतात अनेक समस्या आहेत.
पण भारत म्हणजे हेच! हे दाखवणे तितकेच अयोग्य आहे.
एखाद्या कथेची मागणी म्हणून असे चित्रण येऊ शकते. पण जर सातत्याने हे चित्रण केले जात असेल तर यातून इंग्रजी चित्रपटांनी लवकर बाहेर पडावे ही अपेक्षा करणे चूक होणार नाही.
–
- या १२ भारतीय चित्रपटांनी भारतातच नव्हे तर चीनमध्येही बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातलाय!
- चित्रपटांमधले अॅक्शन, कराटे, मार्शलआर्ट सीन्स अत्यंत फसवी आणि घातक माहिती पेरत असतात!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.