सामान्यांच्या मनात विद्रोहाच्या मशाली पेटवणाऱ्या नामदेव ढसाळ ह्यांच्या कविता
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नामदेव ढसाळ ह्यांनी दलित साहित्यात परिवर्तन घडवणाऱ्या कविता रचल्या. त्यांची गोलपीठा ही साहित्यकृती अत्यंत प्रसिद्ध आहे.
ते बौद्ध- दलित चळवळीतील (दलित पॅन्थर) नेते होते. त्यांच्या कवितांचे विषय महानगरीय जीवन हे होते आणि त्यांच्या बोलीभाषांतील कवितांनी असंख्य वाचकांच्या मनाचा ठाव घेतला.
आपल्या साहित्यातून त्यांनी समाजात जनजागृती केली.
१५ जानेवारी २०१४ रोजी वयाच्या ६४व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले. मायस्थेनिया ग्रॅव्हीज ह्या दुर्धर आजाराने त्यांना ग्रासले होते तसेच त्यांना कॅन्सर सुद्धा झाला होता.
नामदेव ढसाळ ह्यांनी त्यांच्या साहित्यातून दलित बांधवांच्या वेदना आणि व्यथा मांडल्या. त्यांचे स्वतःचे बालपण सुद्धा अत्यंत कठीण परिस्थितीत गेले.
त्यांनी १९७२ साली त्यांच्या सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांच्या सहकार्याने दलित पॅन्थर ह्या आक्रमक संस्थेची स्थापना आलेली. त्यांच्या ह्या संघटनेवर अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थर ह्या चळवळीचा प्रभाव होता.
त्यांनी साहित्यातून दलित्यांच्या समस्यांचे चित्रण तर केलेच. शिवाय दलित बांधवांच्या अनेक समस्यांसाठी आंदोलने सुद्धा केली आणि तत्कालीन सरकारला दलित बांधवांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडले.
नामदेव ढसाळ ह्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ साली पुण्याच्या खेड तालुक्यातील पूर ह्या गावी झाला. हलाखीची परिस्थिती असल्याने ते वडिलांबरोबर लहानपणीच मुंबईत आले.
मुंबईतील गोलपिठा ह्या वेश्यावस्तीत असलेल्या झोपडपट्टीत त्यांचे बालपण गेले. त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी बाबासाहेबांचे विचार वृत्तपत्रांतील स्तंभांतून मांडले.
त्यांच्या विचारांची दखल जागतिक पातळीवर सुद्धा घेतली गेली.
१९७३ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह “गोलपिठा” हा प्रसिद्ध झाले. “मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले”,” प्रियदर्शिनी”, “खेळ”,”तुही इयत्ता कंची”, “या सत्तेत जीव रमत नाही” ,”मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे”, “मी भयंकराच्या दरवाज्यात उभा आहे” ,”निर्वाणा अगोदरची पीडा” हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.
तर “उजेडाची काळी दुनिया”, “निगेटिव्ह स्पेस” आणि “हाडकी हाडवळा” ह्या कादंबऱ्या सुद्धा त्यांनी लिहिल्या. त्यांचे “अंधार यात्रा” हे नाटक सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यांनी क्रांती करणाऱ्या कविता लिहून विद्रोहाच्या मशाली पेटवल्या होत्या.
त्यातल्या ह्या काही निवडक कविता –
मी मारले सूर्याचे रथाचे सात घोडे
वाल्मीकीची कार्बनकाॅपी व्हायचे नव्हते मला
प्रपंचाच्या रगाडयाने केले मला पापाचे धनी
बायकोला म्हणालो–‘घे यातले थोडेसे वाटून’
तिने कानांवर हात ठेवले!
मुलालाही हीच वाक्ये म्हणून दाखविली
त्याने तर अंगाला पान सुद्धा लावुन घेतले नाही
वाल्मीकीने पापाचे ओझे वाहत वाहत अजरामर
आर्षकाव्य तरी लिहिले.
आणि मी?
मी जगण्याचे ओझे येथपर्यंत वाहत आणले.
हे जगण्याच्या वास्तवा
आता तुच सांग मी काय लिहू?
नामदेव ढसाळांनी सत्य परिस्थितीवर आपल्या लेखणीतून आसूड ओढले आहेत. त्यांचे शब्द हे थेट हृदयात घाव घालतात.
त्यांची कविता म्हणजे वाऱ्याची हळुवार झुळूक नसून सोसाट्याचे वादळ आहे. वर्षानुवर्षे अन्याय सहन केलेल्या समाजाच्या मनात स्फुल्लिंग चेतवणारी आहे.
वडारी दगडांना स्वप्न देतात ..
मी फुलबाजा पेटवतो …
बापाच्या आयुष्यात उतरू नये म्हणतात …
उतरतो … कानाकोपरा खाजवतो …
वडारी दगडांना फुलं देतात …
मी बेंडबाजा वाजवतो …
चार स्त्रियांच्या कमानी देहातून ….
कातळलेला उभा पारशी ओलांडतो …
बापाचा रक्ताळलेला पुठ्ठा पाहतो ….
अंधाराच्या गोन्दणीत ओठ भाजेपर्यंत सिगार ओढतो, उसमडतो …
वडारी दगडांना गरोदर ठेवतात …
मी थकलेले घोडे मोजतो …
स्वतःला टांग्याला जुंपून बापाचे प्रेत हाताळतो, जळतो ….
वडारी दगडांना रक्तात मिसळतात
मी दगड वाहतो …
वडारी दगडाचं घर करतात …
मी दगड डोक्यात घालतो …. मी दगड डोक्यात घालतो …
मुंबई व नामदेव ढसाळ ह्यांच्यात एक खास नातं होतं. मुंबईत टॅक्सी चालवताना नामदेव ढसाळांनी जे बघितलं ते अनुभवलं ते ह्या कवितेत त्यांनी उतरवलं!
मुंबईच्या शापित विश्वाचे वर्णन ह्या कवितेत त्यांनी केले आहे.
मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे
मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे
ये व माझा स्वीकार कर
सात घटकेचा मुहूर्त
आधीव्याधीनंतर
सर्वांगसुंदर प्रतिमासृष्टी
अश्विनीरुप ऋतुस्नात कामातूर लक्ष्मी
सर्पस्वरुप विष्णू उर्ध्वरेत स्खलित
सूर्याचे अनुष्ठान
हे शेष सूर्याच्या चेहऱ्या
हे कामेच्छेच्या माते
हे आदिती
माझ्या प्रियेचा दगड
मला अधिकच प्रिय आहे
४ वेद १८ पुराणं ६ शास्त्र
मी मारतो लंडावर
६ राग ३६ रागिण्या मी खेळवतो उरावर
छान, या सुभगवेळी
तू संभोगेच्छा प्रदर्शित करतेस?
स्त्रीची कामेच्छा पुरी न करणं
कवी असल्यामुळे मी समजतो पाप
मी तुला खेळवून जाईन
पानंफुलं झिम्माफुगडी खेळतायत
कोकीळा गातायत राजहंस गातायत
खरंच गं, तुझ्या अरण्यानं नवीन रंग धारण केलाय
द्वैत भावातल्या शुभाशुभाची सावली
जिथे नजर टाकतो तिथे अथांग शृंगार
अस्तित्वाच्या दर्पणात तुझा कैफ उभा
विस्ताराचे संदर्भ, नश्वर अनवरत जलधार
अराजकता, निरर्थकता
सरळ सोप्या प्रतिमांतून रुप घेणारं तुझं लावण्य
सत्याच्या अंतहीन रेषेला स्पर्श करणारा
आकाशानंतरचा विलुप्त स्वर्ग
अप्राप्य प्रेमाच्या गोष्टीअगोदरचा क्षुद्र दैनिक मृत्यू
ध्वनी वळणानंतर होत जातो पुष्कळ
नेपथ्याच्या जागी फेकलं जातं द्रवरुप
तीन वृक्षांच्या तीन तऱ्हा
कालोदयाबरोबरची चकोर वाढ
चंद्रकिरणांचं नृत्य
चंद्रकोरीवरली धूळ चोच मारुन एक चिमणी झटकते आहे
हिरवळीच्या चादरीत दवबिंदूंचा चेहरा लपलेला
सहस्त्रमुखांनी
हे सर्व पूर्वसमुद्राला मिळण्यापूर्वी
या नि:शेष साम्राज्यात मला माझ्या
अभिशप्त एकांतापर्यंत जाऊ दे
मी भ्रमणयात्री
या शहरातलं हे हवेचं तळं
तळ्यामधल्या न्हात्याधुत्या पोरी
खडतराची तुळई आणि उशी
गवत ढग आणि पाण्याचा विभ्रम
हिरवा आशीर्वाद घेऊन माझा आत्मा निघाला आहे भ्रमणाला दुपारी
जनावरांसारखं रवंथ करणं कदाचित नसावं त्याच्या अंगवळणी
तुझी मर्जी ठेव उजेडावर
उजेड म्हंजे ज्याला मी म्हणतात
नाहीतर कोसळून जातील विद्यापीठातले बुद्धीजन्य वारस
आता काहीच हरवण्यासारखं उरलं नाही
आता काहीच मिळण्यासारखं राहिलं नाही
‘मारा’चा पाऊस सहन करणारी नुसती एक सशक्त पोकळी
आणि कुणाचीही भिंत चोरुन अंगावर चालत येणारा ज्ञानेश्वर
कल्पनेचा महारोग
बेंबी / मेंदू / फुफ्फुस यांतून
या सर्व रोगलागणीनंतरही
ही ज्ञानपीठं आनुवांशिक, त्यांच्या अंतरंगातून
झुलती घरं इच्छांची
ही बैठकीच्या जागेतली शापितं आणि गुपितं
भाषेचं वस्त्र भाषेचा साज भाषेचा रोग आणि
भाषेचा हातमाग
आठवणी बालपणाच्या आणि परिपक्वतेच्या
चालतो परंतु अंतर कापलं जात नाही
ही खोड जडतरातली
बिछान्याचं पातं
त्यांच्या त्या काळी लिहिलेल्या कवितेतील मुंबई आजही तशीच आहे जी रोज संघर्ष करणाऱ्या माणसाला उध्वस्तपणाची जाणीव करून देते.
–
- कवी शैलेंद्र : ज्याची गाणी आजही लोकांना आठवतात, तो मात्र कोणालाच आठवत नाही!
- एक गवळ्याचा पोर ‘महाकवी कालिदास’ म्हणून नावारूपाला आलं
–
मुंबई म्हणजे केवळ चकाकणारं झगमगती दुनिया असलेलं शहर नाही. इथे हातावर पोट असलेली, रोज संघर्ष वाट्याला आलेली लाखो माणसं जगतात.
मुंबईचं खरं रूप ढसाळ आपल्या विद्रोही कवितेतून मांडतात.
तिच्यासाठी (गोलपिठा)
नरकात तिला ऋतू आला
तिच्या ओटीपोटी लखलखीत बीजपण–
आभाळ मनातल्या मनात
कुढणा-या माणसागत होत गेलं
फ़िक्कट पिवळसर
देणंघेणं नसताना
ती रस्त्यातुन पैंजणत जाताना
जंतूंच्या समस्त जमातीनं
सहस्त्राक्ष गुढ्या उभारल्या
असोशी वाहणा-या गटारांनी
थम घेऊन–तिच्यासाठी
प्रार्थना भाकली–दुवा मागितला
गोलपिठातून नामदेव ढसाळांनी शोषित,पीडित स्त्रियांची व्यथा जगापुढे मांडली. जिथे सभ्य , व्हाईट कॉलरवाली माणसे दिवसाढवळ्या जायला धजावत नाहीत.
त्या जगात जुगार, दारू आणि शरीराचा व्यवसाय दिवसाढवळ्या होतो. तिथल्या स्त्रियांच्या नरकयातना, त्यांचे आयुष्य, त्यांचा संघर्ष ढसाळांनी कवितेतून मांडला.
हा भाकरीचा जाहीरनामा
हा संसदेचा रंडीखाना
ही देश नावाची आई
राजरोस निजते कुबेराच्या सोबत
ढसाळांची कविता ही संघर्षातून नैराश्य आलेल्यांची कविता आहे. ती गुडी गुडी बाता मारत नाही तर सत्य तुमच्या तोंडावर फेकते. प्रत्येकालाच त्यांचे विखारी शब्द, त्यांची आक्रमक शैली झेपेलच असे नाही.
सामान्य माणसाला काहीही किंमत नाही आणि विद्रोह केल्याशिवाय ती मिळणारही नाही हे त्यांच्या कवितेतून पदोपदी जाणवत राहते.
माणसाने पहिल्याप्रथम स्वतःला
पूर्ण अंशाने उध्वस्त करुन घ्यावे
बिनधास डिंगडांग धतींग करावी
चरस गांजा ओढावा
अफीन लालपरी खावी
मुबलक कंट्री प्यावी – ऐपत नसेल तर
स्वस्तातला पाचपैसा पावशेर डाल्डा झोकावा
दिवसरात्र रात्रंदिवस तर्रर रहावे
याला त्याला कुणालाही आयभयणीवरून
गाली द्यावी धरुन पिदवावे…
माण्साने जवळ रामपुरी बाळगावा
गुपची फरशी तलवार शिंगा हॉकी बांबू
ऍसिडबल्ब इत्यादि इत्यादि हाताशी ठेवावे
मागेपुढे न पाहता कुणाचेही डेहाळे बाहेर काढावे
मर्डर करावा झोपलेल्यांची कत्तल करावी
माण्साला गुलाम बनवावे त्याच्या गांडीवर हंटरचे फटके मारावे
त्याच्या रक्ताळ कुल्ल्यांवर आपल्या घुगर्या शिजवून घ्याव्या
शेजार्याला लुटावे पाजार्याला लुटावे बँका फोडाव्यात
शेठसावकाराची आय झवून टाकावी नात्यागोत्याचा
केसाने गळा कापावा जेवणातून विष घालावे मूठ मारावी
माण्साने कुणाच्याही आयभयणीवर केव्हाही कुठेही चढावे
पोरीबाळींशी सइंद्रिय चाळे करावे म्हातारी म्हणू नये
तरणी म्हणू नये कवळी म्हणू नयी सर्वांना पासले पाडावे
व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडवून आणावे
रांडवाडे वाढवावेत : भाडखाव व्हावे : स्त्रियांची नाकं थानं
कापून मुड्या गाढवावर बसवून जाहीर धिंडवडे करावेत
माण्साने रस्ते उखनावेत ब्रीज उखडावेत
दिव्याचे खांब कलथावेत
पोलिसस्टेशने रेल्वेस्टेशने तोडावीत
बसेस ट्रेन कार गाड्या जाळाव्यात
साहित्यसंघ शाळा कॉलेजं हॉस्पिटलं विमानअड्डे
राजधान्या इमले झोपड्या वखवखलेल्या भुकाळ वस्त्या
यावर हातबाँब टाकावेत
माण्साने प्लेटो आइन्स्टाइन आर्किमिडीस सॉक्रेटीस
मार्क्स अशोक हिटलर कामू सार्त्र काफ्का
बोदलेअर रेम्बो इझरा पाउंड हापकिन्स गटे
दोस्तोव्स्की मायकोव्हस्की मॅक्झीम गॉर्की
एडिसन मिडिसन कालिदास तुकाराम व्यास शेक्सपीअर
ज्ञानेश्वर वगैरे वगैरेंना त्यांच्या शब्दांसकट गटाराचे
मेनहोल उघडून त्यात सलंग सडत ठेवावे
येसूच्या पैगंबराच्या बुद्धाच्या विष्णूच्या वंशजांना फाशी द्यावे
देवळे चर्च मशिदी शिल्पे म्युझियम्स कुस्करुन टाकावे
पंड्यांना बंड्यांना तोफेच्या तोंडी द्यावे त्यांच्या रक्ताने
भिजलेले रुमाल शिलालेखावर कोरून ठेवावेत
माण्साने जगातील सर्व धर्मग्रंथांची पाने
फाडून हागायचे झाल्यावर त्यांनी बोचे साफ करावेत
कुणाच्याही कुंपणाच्या काठ्या काढाव्यात आता हागावे मुतावे गाभडावे
मासिक पाळी व्हावे शेंबूड शिंकरावे
घाणेंद्रिये जास्त घाण करतील असे शेवटून घ्यावे
जिकडे तिकडे वरखाली खालीवर मध्ये नरकच नरक
उभारावेत….. अश्लील अत्याचारी व्हावे माण्सांचेच
रक्त प्यावे डल्ली सल्लीबोटी खावी चर्बी वितळवून प्यावी
टिकाकारांचे गुडसे ठोकावेत हमनदस्ती पाट्यावर
वर्गयुद्धे . जातियुद्धे . पक्षयुद्धे . धर्मयुद्धे . महायुद्धे
घडवून आणावी पूर्ण रानटी हिंस्त्र आदिम बनावे
बेलाशक अराजक व्हावे
अन्न न पिकवण्याची मोहिम काढावी अन्नावाचून पाण्यावाचून याला त्याला
स्वतःलाही मारावे रोगराई वाढवावी वृक्ष निष्पर्ण करावेत कुठलेही
पाखरू न गाईल याची दक्षता घ्यावी माण्साने विव्हळत किंकाळत
लवकरात लवकर मरण्याचे योजाने
हे सारे सारे विश्वव्यापू गळूप्रमाणे फुगू द्यावे
अनामवेळी फुटू द्यावे रिचू द्यावे
नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये लुटू नये
काळागोरा म्हणू नये तू ब्राम्हण तू क्षत्रिय तू वैश्य तू शुद्र असे हिणवू नये
कुठलाही पक्ष काढू नये घरदार बांधू नये नाती न मानण्याचा
आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करू नये
आभाळाला बाप आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत
गुण्यागोविंदाने आनंदाने रहावे
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी करंडून खावा माण्सावरच सूक्त रचावे
माणसाचेच गाणे गावे माणसाने
ढसाळांची कविता फक्त एका समाजापुरती नाही. त्यांची कविता जगातील संपूर्ण शोषित, पीडित, गांजलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करते.
त्यांची कविता निर्लज्ज भोगपिपासू सत्तेविरुद्द एल्गार करते आणि माणसाला माणसाशी माणसाप्रमाणे वागायचं संदेश देते.
–
- उदाहरणार्थ नेमाडे – मराठीतला पहिला वहिला ‘डॉक्यू-फिक्शन चित्रपट’
- “या ११ कारणांमुळे मला महात्मा फुले सर्वात जास्त भावतात”
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.