हा भारतीय वंशाचा शास्त्रज्ञ ‘नासा’च्या ऐतिहासिक मोहिमेचे नेतृत्व करतोय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
अमेरिकेची अंतराळ संस्था “नासा” ने सूर्यमालेच्या बाहेरील अवकाशात असणाऱ्या खडकाचे स्पष्ट छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.
याला “अल्टिमा थुली”(अल्टिमा थुले असाही उच्चार केला जातो) विज्ञान जगतातील ही घडामोड अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे.
नासाची एक महत्वपूर्ण अंतराळ मोहीम काय आहे? आणि नासा च्या या ऐतिहासिक मोहिमेत एका भारतीयाचे योगदान आहे त्याविषयी या लेखातून जाणून घेणार आहोत.
न्यू होरायझन्स
प्लूटो हा आपल्या सौरमंडळातील सर्वात दूरचा ग्रह आहे. या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी अंतराळ मोहीम नासाने आखली होती. ही मोहीम अनेक अर्थाने लक्षणीय आहे. १९८९ मध्ये नेपच्यून ग्रहांपर्यंत अमेरिकेची अंतराळ मोहीम यशस्वी झाली होती.
१९९१ मध्ये अमेरिकेच्या डाक विभागाने एक डाक तिकीट प्रकाशित केले होते. ज्यावर प्लूटो ग्रहाचे छायाचित्र होते आणि खाली लिहिले होते “प्लूटो नॉट येट एक्सप्लोरड”.
अमेरिकेच्या अवकाश वैज्ञानिकांनी हे आव्हान स्वीकारले आणि नवीन मोहिमेची आखणी सुरु झाली. त्यास मूर्त रूप येऊन अखेर न्यू होरायझन्स हे नासाचे अंतराळ यान १९ जानेवारी २००६ मध्ये पृथ्वीवरून पाठवण्यात आले.
ही फ्लायबाय मोहीम आहे. म्हणजे त्या ग्रहावर न जाता त्याच्या जवळ जाऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास केला जातो.
३.५ अब्ज मैल प्रवास केल्यानंतर हे यान प्लूटो ग्रहाजवळ पोहोचले. इथवर पोहोचायला या यानाला तब्बल ९ वर्षे लागली. १५ जानेवारी २०१५ मध्ये प्लूटो ग्रहाजवळ जात न्यू होरायझन्स यानाने छायाचित्र पाठवायला सुरुवात केली.
हे कार्य २५ ऑक्टोबर २०१६ पर्यंत सुरु होते. या मोहिमेचे उद्दिष्ट प्लूटो ग्रहाचा अभ्यास करणे, तसेच प्लूटो चे उपग्रह, वायूमंडळ,तसेच पृष्ठभाग आणि पर्यावरणीय स्थिती यांचा अभ्यास करणे इत्यादी उद्दिष्टांचा या मोहिमेत समावेश होता.
प्लूटो ग्रहांसंबंधी ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर अमेरीका हा सर्व ग्रहांवर अंतराळ मोहीम करणारा पहिला देश ठरला आहे.
अल्टिमा थुले
न्यू होरिझन्स नंतर क्यूपर बेल्ट ऑब्जेक्टच्या फ्लायबाय साठी सज्ज झाले. हा या मोहिमेचा पुढचा टप्पा होता. यांत तसेच क्युपर (म्हणजे सौरमंडळाचा सर्वात शेवटचा भाग!) सौर प्रणालीच्या बाहेरील भागावर “हायड्रोजन भिंतीच्या” अस्तित्त्वाची पुष्टी करण्यासाठी या मोहिमेचा उपयोग करण्यात आला.
या “भिंती” बद्दल प्रथम १९९२ मध्ये व्हॉयजर या अमेरिकेच्या अंतराळ यानाने माहिती दिले होती. प्रारंभीच्या सूर्यमंडळाच्या रूपांतरणाचा अभ्यास करणे असे या मोहिमेचे स्वरूप आहे.
१ जानेवारी २०१९ रोजी नासा ने सूर्यमालेच्या बाहेरील अवकाशात असणाऱ्या खडकाचे स्पष्ट छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.
यांस “अल्टिमा थुले” या नावाने संबोधण्यात येते. हा एक ग्रीक भाषेतील शब्दप्रयोग असून त्याचा अर्थ ज्ञात जगाच्या सीमेपलीकडे असा होतो.
४.६ अब्ज वर्षांपूर्वी सौरमंडळ नसतांना विश्व कसे होते हे समजून घेण्यासाठी “अल्टिमा थुले” चा अभ्यास होईल. अल्टिमा थुले हा सर्वात दूरचा ऑब्जेक्ट पृथ्वीपासून ६.५ बिलियन किलोमीटर दूर आहे.
आता या मोहिमेत “अल्टिमा थुले” कसे तयार झाले आणि विकसित झाले हे जाणून घेण्यासाठी पृष्ठभागाची भूगर्भशास्त्रचा नकाशा तयार करणे, पृष्ठभागाचे तापमान मोजणे, कोणत्याही उपग्रह किंवा रिंगचा शोध घेणे आणि अभ्यास करणे असे या मोहिमेचे स्वरूप आहे.
हे अंतराळयान आता इतके दूर गेले आहे की पृथ्वी पर्यंत माहिती पाठविण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो.
साधारण माहिती पाठविण्याचा वेग हा प्रति सेकंद १-२ किलोबिट डेटा दराने असून पुढे २० महिन्यांचा कालावधी माहिती पाठविण्यासाठी लागणार आहे.
न्यू होरिझन्स आणि भारतीय शास्त्रज्ञ
या मोहिमेत श्याम भास्करन यांचा देखील सहभाग आहे. ते नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी मध्ये कार्यरत असून या अंतराळयानाच्या दिशा निर्देशनात महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांचा जन्म १९६३ मध्ये मुंबई येथे झाला.
भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहत असणाऱ्या पेडर रोड इथे त्यांचे वास्तव्य होते. वयाच्या ५ व्या वर्षी ते कुटुंबासह अमेरिकेत गेले आणि नंतर तिथेच स्थायिक झाले.
मुंबई शहरात त्यांचे नातेवाईक आहेत. मात्र १९८१ नंतर ते मुंबईला आलेले नाहीत. लवकरच मुंबईला भेट देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या मोहिमेबद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की, प्लूटो ग्रहाभोवती यान फिरत असतांना ही मोहीम अधिक कठीण होती. सध्या अल्टिमा थुले भोवती काही ऑब्जेक्ट नसल्याने तूर्त काम सोपे आहे.
“पण हे कार्य आव्हानांशिवाय नव्हते कारण आम्ही अज्ञात, लहान आणि गडद असलेल्या एखाद्या वस्तूशी अशा प्रकारे सामना कधीच झाला नाही. असे ऑब्जेक्ट शोधणे अवघड आहे.”
एक भारतीय वंशाचा शास्त्रज्ञ अशा प्रकारच्या महत्वाकांक्षी मोहिमेत सह्भागी असणे नक्कीच अभिमानाचे आहे.
यापूर्वीही अशा मोहिमांमध्ये भारतीय शास्त्रज्ञ आघाडीवर राहिले आहेत. कुणी म्हणेल की ही अमेरिकेची मोहीम आहे, पण यातून उलगडणारे शोध हे अवघ्या मानवसृष्टीसाठी उपयोगी असतात.
भारतीय अवकाशसंस्थेने देखील आजवर मोठी झेप घेतली आहे पण आपल्याला किती पुढे जायचे आहे हे पण नासाच्या सध्याचा मोहिमेतून लक्षात येईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.