McDonald’s ला भारतात तब्बल २२ वर्षांनंतर पहिल्यांदा नफा झाला, कारणं वाचनीय आहेत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
मॅकडोनाल्ड्स या जगप्रसिद्ध कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात २०१७-१८ या वर्षात त्यांना ६५.२० लाख रुपयांचा नफा झाला आहे. त्याच्या मागील वर्षी म्हणजेच २०१६-१७ मध्ये भारतात कंपनीला ३०५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
मात्र ही बातमी तेवढ्यापुरतीच महत्त्वाची नाही. तर मॅकडॉनल्ड्स भारतात येऊन तब्बल २२ वर्षे झाली आहेत आणि या २२ वर्षात प्रथमच त्यांनी नफा कमावला आहे.
१९९६ मध्ये क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मॅकडोनाल्ड्स ने भारतात पदार्पण केले होते.
मॅकडोनाल्ड्स भारतात भागीदारी तत्वानुसार काम करते. भारतात मॅकडॉनल्ड्सचे दोन भागीदार असून उत्तर आणि पूर्व भारतात सी पी आर एल (कॅनॉट प्लाजा रेस्टॉरंट लिमिटेड) तसेच दक्षिण आणि पश्चिम भारतात वेस्टलाइफ डेव्हलपमेंट हे त्यांचे भागीदार आहेत.
पदार्पण केल्यापासून आजवर एकीं ४२१ कोटी रुपयांचा तोटा सोसून प्रथमच मॅकडोनाल्ड्स फायद्यात आले आहे. यात त्यांनी स्वामित्व हक्कामधून अधिक पैसा मिळवला आहे.
याचबरोबर नवीन विकसित झालेल्या शहरांमध्ये वाढते अस्तित्व आणि मॉलमध्ये सूट देऊन ग्राहकांना आकर्षित केले गेल्यामुळे ग्राहकसंख्या वाढली, यातून व्यवसाय वाढल्याचे निरीक्षण आहे.
मॅकडॉनल्ड्सच्या या प्रवासात अनेक चढ-उतार आले. सी पी आर एल या त्यांच्या भागीदारांसोबत चाललेली न्यायालयीन लढाई हा यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे.
यामुळे मॅकडॉनल्ड्स ला मोठे नुकसान सोसावे लागले. काही काळ हा वाद इतका टोकाला गेला होता की मॅकडॉनल्ड्स हे नाव वापरायला सी पी आर एल ला बंदी होती. म्हणून उत्तर आणि पूर्व भारतात हे नाव काढले गेले.
पण न्यायालयाच्या निर्णयानंतर सी पी आर एल आणि मॅकडॉनल्ड्स हे अजून भागीदार आहेत. मात्र न्यायालयात लढाई अजून चालू आहे. भारतात क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट या श्रेणीत प्रथम क्रमांकावर असलेले मॅकडोनाल्ड्स आज चौथ्या क्रमांकावर आहे.
डॉमिनोज ने यात बाजी मारली असून ते प्रथम क्रमांकावर आहेत. केएफसी देखील आता भारतात चांगलाच स्थिरावला आहे.
जागतिकीकरणाची एक प्रतीक म्हणून मॅकडॉनल्ड्स कडे पाहिले जाते. १९९१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात आपले बस्तान बसवले.
रेस्टॉरंट क्षेत्रात मात्र ही वाढ संथगतीने सुरू होती. रेस्टॉरंट क्षेत्रात केएफसी १९९५ मध्ये प्रथम भारतात आली. मात्र एक वर्षाच्या आतच कंपनीला झालेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर आपला गाशा गुंडाळावा लागला.
१९९६ मध्ये मॅकडोनाल्डचे आगमन झाले. शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारात त्यांनी खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले होते.
मॅकडोनाल्ड्सला तब्बल २२ वर्षानंतर नफा झाला ही जशी आश्चर्याची गोष्ट आहे त्याच प्रमाणे भारतात स्थिरावण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न देखील तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. भारतात खाद्यपदार्थात आढळणारे वैविध्य हा त्यातील एक महत्त्वाचा भाग.
मॅकडोनाल्ड्स आज जगभर पसरली आहे. त्यामुळे त्या त्या देशातील चवीनुसार पदार्थांमध्ये काही बदल हे केले जातात.
जगभरात बदल करण्याचे प्रमाण ३ टक्के आहे. अशिया पुरता विचार केल्यास हे प्रमाण ३३ टक्के आहे. पण भारतात भारतीय चवीनुसार बदल करण्यात आलेले प्रमाण ७५ टक्के इतके जास्त आहे.
यावरूनच भारतीय बाजारपेठेत असलेली गुंतागुंत आणि मॅकडॉनल्ड्स स्थिरावण्यासाठी केलेले प्रयत्न दिसून येतात.
टिक्की बर्गर ही बर्गरची भारतीय आवृत्ती भारतात मॅकडॉनल्ड्स जे पदार्थ विकते त्यात सर्वात जास्त विकला जाणारा पदार्थ आहे. आता तर तो विदेशातही लोकप्रिय होतो आहे.
इतकेच नव्हे १९९६ मध्ये जेव्हा त्यांनी भारतात आपल्या व्यवसायाला सुरुवात केली, तेव्हा खाद्यपदार्थांचे दर हे पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या पेक्षा कमी होते, अमेरिकेच्या प्रमाणात हे दर निम्म्यावर होते.
याचे कारण त्यावेळेस त्यांना अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी असे करणे भाग होते.
हे सर्व पाहता तब्बल बावीस वर्षांनी मॅकडॉनल्ड्स नफा झाला याची कारणे समजून घेता येतील. पण त्याचबरोबर मॅकडॉनल्ड्स भारतात चांगली स्थिर झाली आहे, हे म्हणजे आपण जागतिकीकरण कसे स्वीकारले आहे याचेही उदाहरण आहे.
मॅकडॉनल्ड्स सुरुवातीच्या काळात “मॅकडॉनल्ड्स में हैं कुछ बात” ही टॅगलाईन घेऊन ग्राहकांना आवाहन करत होती.
नंतरच्या टप्प्यात एकप्रकारे ग्राहक मॅकडॉनल्ड्स ला सरावले होते तेव्हा “तो आज मॅकडॉनल्ड्स हो जाये” ही टॅगलाईन घेऊन त्यांनी आपला विस्तार केला.
आता मॅकडॉनल्ड्सची जगात वापरली जाणारी “आय एम लविंग इट” हीच टॅगलाईन वापरली जाते.
भारताची लोकसंख्या पाहता खाद्यपदार्थांची बाजारपेठ विशाल आहे. मात्र असंघटित स्वरूपातील व्यावसायिकांचे यांत प्राबल्य आहे. आता बहुराष्ट्रीय फास्ट फूड कंपन्या देखील चांगल्या स्थिरावू लागले आहे.
भारतातील क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट या श्रेणीतील पहिल्या दहा नावांमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीच्या रेस्टॉरंट्सचा चांगलाच दबदबा आहे.
जगातल्या पहिल्या १०० क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट मध्ये केवळ एकाच भारतीय ब्रँड आहे. भारतीय लोकांच्या नाश्त्यात पोहे, उपमा, इडली अशा भारतीय पदार्थांचा समावेश होता.
आता मॅकडॉनल्ड्स आणि इतर कंपनी पाश्चात्य पदार्थ विकून मोठा व्यवसाय करतांना दिसत आहेत.
एकप्रकारे आपल्या खाण्याच्या सवयी देखील बदलत आहेत. तेव्हा खाद्यपदार्थांची इतकी मोठी बाजारपेठ असतांना भारतीय ब्रॅण्ड्स पण मोठे झाले पाहिजे. त्यासाठी मॅकडॉनल्ड्सचा भारतातील प्रवास त्यांना खूप काही शिकवणारा आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.