बस्स एकच संकल्पना आणि देशाचे वाचले तब्बल ९०,००० कोटी रुपये!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
सरत्या वर्षांचा आढावा घेतला तर भारतात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगता येतील, ज्यांचा दूरगामी परिणाम घडून येईल. यापैकी एक महत्त्वाची बाब म्हणजे आधार!
आधार संवैधानिक असल्याचा एक महत्त्वाचा निर्णय या वर्षात आला. तसेच येत्या जानेवारी महिन्यात आधार लॉन्च होऊन दहा वर्षे पूर्ण होतील. त्यामुळे आधार हे जनमानसात आता चांगलंच रुळले आहे हे तर नक्की.

त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, लोकांची माहिती गोळा करून त्या माहितीचा दुरुपयोग आधार मुळे होत नाही ना? यासारख्या अनेक प्रश्नांना उत्तर मिळाले आहेत.
आज भारतात १२३ कोटी लोकांकडे आधार क्रमांक आहेत. गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात लोकं आधार क्रमांकाशी जोडली गेली हे एक प्रकारचे यश आहे.
आधार क्रमांक संवैधानिक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र त्याचबरोबर सरसकट आधार क्रमांकाची सक्ती करता येणार नाही असे सांगत त्याच्या अतिवापराला चाप देखील लावला आहे.
कुठ्ल्याही खासगी संस्थेला आधारशी असलेली संलग्न माहिती साठवता येणार नाही. यामुळे लोकांच्या माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी हे पाऊल महत्वाचे आहे.
आधार सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मात्र आवश्यक असेल. सिम कार्ड असेल अथवा बँक खाती या ठिकाणी आधार सक्ती नसेल.
या निर्णयामुळे आधार मुळे होणारे लाभ आणि सक्ती मुळे होणारी सामान्य लोकांची अडचण लक्षात घेऊन एक संतुलन निर्माण झाले आहे.

आधारचा सर्वात मोठा म्हणजे सरकारी योजनांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालणे शक्य झाले आहे.
युआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार लागू केल्याने ९०,००० कोटी रुपयांची बचत झाली आहे.
आधारद्वारे थेट बँकांशी जोडल्याने लाभार्थ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात त्यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. सरकारचे वाचलेले ९०,००० कोटी रुपये हे आधारचेच फलित आहे.
शिवाय याचा दुसरा अर्थ असा देखील आहे की, यामुळे सरकारी योजनांची व्याप्ती अधिक वाढून शेवटच्या गरिबांपर्यंत लाभ पोहचवणे शक्य झालेआहे. डायरेक्ट टू बँक ट्रान्सफर योजना ही अनेक अर्थाने यशस्वी योजना आहे.
सर्वांगीण विकासात भ्रष्टाचार हा नेहमीच मोठा अडथळा ठरला आहे. आधार असेल वा त्याजोडीला असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा लाभ थेट जनतेला पोहचून अंत्योदय हे आपले लक्ष्य साधण्यात भारत एक पाऊल पुढे सरकला आहे.
१९९९ मध्ये कारगिल युद्ध झाल्यानंतर सुरक्षायंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील त्यासाठी एका समितीने सीमेवरील लोकांना ओळखपत्र देण्याची शिफारस केली होती.
याच योजनेची व्याप्ती वाढवून पुढे “आधार” ची संकल्पना मांडण्यात आली.

आधार पॅन कार्डशी जोडणे अनिवार्य केल्याने कारचोरी, बेनामी खाती, शेल कंपन्या आणि पैशांची होणारी अफरातफर मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
त्यामुळे सरकारच्या करसंकलनात वाढ होत आहे, हे आधारचे अजून एक फलित सांगता येईल.
इतकेच नव्हे तर सुरक्षा यंत्रणांना देखील आधार अत्यंत उपयोगी साधन ठरत आहे. गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यासाठी बायोमेट्रिकचा वाढता वापर हे त्याचेच निदर्शक आहे.
–
- “आधार” लिंक्ड बँक खातं आणि गॅस सबसिडी : सरकारी यंत्रणेचा “असाही” मनस्ताप
- तुमच्या नकळत “आधार फोन नंबर” मोबाईलमध्ये सेव्ह झालाय? हे असू शकतं पडद्यामागचं कारण
–
लहान मुलांचे आधार क्रमांक असणे हे केवळ त्यांना सरकारी योजानांशी जोडण्यासाठी नव्हे तर सुरक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहे.
लहान मुले गर्दीच्या ठिकाणी हरवल्यावर किंवा काही कारणाने आई -वडिलांपासून दूर होतात. पोलीस अशावेळी सापडलेल्या बालकाची बायोमेट्रिक घेऊन आधारद्वारे ओळख पटवत आहे.
त्यामुळे मुलाला बोलता येत नसेल, त्याची भाषा समजण्यात अडचण असेल तेव्हा जर त्या मुलाचे हाताचे ठसे घेऊन आधार द्वारे त्याची ओळख पटवून, त्या बालकांना सुरक्षित त्यांच्या आई वडिलांपर्यंत पोहचवणे शक्य होते.
या सर्व प्रक्रियेस लागणारा वेळ कमी झाला आहे. थोडक्यात आधार साध्या साध्या गोष्टीतही कामी येत आहे.
आधारचा पासपोर्टसाठी उपयोग केल्याने सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे. त्याचबरोबर आणखी एक फायदा म्हणजे पासपोर्ट काढण्यासाठी लागणारा वेळ देखील कमी झाला आहे.
निवृत्तीवेतन असो किंवा भविष्य निर्वाह योजना हे देखील आधारने संलग्न केल्याने याचा फायदा लाभार्थ्याना होतो आहे.
निवृत्तेवेतन मिळवताना हयातीचा दाखला दरवर्षी द्यावा लागतो, आधार तिथेही उपयोगी आहे. यामुळे वृद्धांचा त्रास कमी झाला आहे.
आधारवरून गेल्या दहा वर्षात अनेक वादळे उठली. पण आता आधार कसे उपयोगी आहे हे सिद्ध झाले आहे. भ्रष्ट लोकांची साखळी यामुळे तुटली आहे. तेव्हा आधारला अनेकदा विरोध होतांना देखील दिसतो.
आधारला विरोध करणारा प्रत्येक जण भ्रष्ट आहे असे नाही, पण या विरोधाचा आवाज बळकट करण्यासाठी हितसंबंध दुखावलेले लोक पुढाकार घेत असतात.
आताही गूगलने परस्पर आधार हेल्पलाईन क्रमांक मोबाइल धारकांना उपलब्ध करून दिला होता, त्यावरूनही बरीच चर्चा झाली, वाद झाले. पण गूगलला त्यासाठी माफी मागावी लागली.
एकंदरीत “आधार” वर चर्चा झाली, वाद झाले पण जनतेने आधार स्वीकारले आहे.

रेशनचे धान्य असेल किंवा अन्य सरकारी योजना त्यांना लागलेली भ्रष्टाचाराची कीड जर आधारमुळे दूर झाली तर हा बारा आकडी क्रमांक सामान्य भारतीयांच्या आयुष्यात नवी क्रांती आणेल.
–
- “आधार” डेटा हॅक होण्यामागचं वास्तव आणि ट्राय प्रमुखांची ट्विटर ट्रोलिंग
- तुमचं आधार कार्ड चुकीच्या कारणांसाठी वापरलं जातंय का? “असं” तपासून बघू शकता
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.