असंख्य जखमा झेलून, शत्रूला संपवण्यासाठी एका सैनिकाने दिलेली झुंज…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
युद्धस्य कथा रम्या’ हे वचन नवे नाही. पण त्यासाठी सैनिक जो पराक्रम गाजवतात, आपले रक्त सांडतात, प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देतात ते पाहून या रम्य कथा आपल्याला अंतर्मुख करून जातात.
त्या शूरवीर सैनिकांचा त्याग पाहून प्रेरणा मिळते आणि पुन्हा नवे वीर लढण्यासाठी सज्ज होतात.
अशाच एका पराक्रम गाजवणाऱ्या कॅप्टन मनोज कुमार पांडे यांची ही गाथा अंगावर शहारे आणणारीच आहे. कॅप्टन मनोज कुमार पांडे यांना त्यांच्या साहसासाठी व नेतृत्व गुणांसाठी मरणोत्तर परमवीर चक्र म्हणजेच सेनेतील सर्वोच्च शौर्य पदक देण्यात आले.
१९९९ मधील कारगिल युद्धात बटालिक सेक्टर येथे असलेल्या खालुबर टेकडी मधील जुबर शिखर येथे झालेल्या चकमकीत पाकिस्तानी सैन्याविरुद्ध लढतांना त्यांना वीरमरण आले.
मनोज कुमार पांडे ह्यांचा जन्म २५ जून, १९७५ रोजी उत्तरप्रदेश मधील सितापूर येथे झाला. मनोज हे त्यांच्या चार भावंडांपैकी सर्वात मोठे होते. त्यांचे वडील लखनौमध्ये छोटा व्यवसाय करीत असत.
मनोज ह्यांचे शिक्षण लखनौ येथील सैनिकी प्रशालेत झाले. मुष्टियुद्धात असलेला कमालीचा रस आणि अभ्यासात असलेली गती यामुळे लवकरच ते एक चांगले विद्यार्थी म्हणून गणले जाऊ लागले. मनोज कुमार एनडीए म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून पदवीधर झाले.
भारतीय सेनेच्या परीक्षेच्या मुलाखतीत त्यांना विचारले गेले होते -“तुम्हाला सेनेत का यायचे आहे?”
तेव्हा मनोज कुमार पांडे यांनी ठासून उत्तर दिले होते की –
“मला परमवीर चक्र पदक मिळवायचे आहे.” ते कसं मिळतं माहीत आहे का? असं विचारल्यावर मनोज कुमार म्हणाले, हो माहीत आहे, “अनेकदा मरणोत्तरच मिळतं मात्र मला संधी द्या मी मिळवून दाखवेल”. त्यांना परमवीर चक्र मिळालं देखील मात्र मरणोत्तर.
त्यांची सेनाअधिकारी म्हणून निवड झाली. सुरुवातीपासूनच त्यांनी १/११ गुरखा रायफल्स मध्ये जाण्याचे निश्चित केले होते.
प्रशिक्षणादरम्यान देखील त्यांनी आपल्या गुणांची चुणूक दाखवली होती. दसऱ्याच्या निमित्ताने बकरीचा बळी देण्याची प्रथा होती. त्यांना ते करण्यास सांगितले. शाकाहारी असलेले मनोज कुमार यांनी आपल्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्याकडे पाहिले आणि बळी दिला.
जीव घेणं सोपं नसतं मात्र तेच त्यांना अंगात भिनवावं लागणार होतं. लेफ्टनंट मनोज कुमार पांडे सेनेत दाखल झाले. कारगिल युद्ध सुरु होण्याआधी १ महिना ते सतत कोणत्या न कोणत्या आव्हानाला सामोरे जातच होते.
या काळात त्यांनी ४ यशस्वी कारवाया पार पाडल्या होत्या. कारगिल पूर्वी ते सियाचीन येथे तैनातीहून परत आले होते.
तात्काळ त्यांना पुढील कारवाई साठी तयार होण्याचे आदेश आले. लेफ्टनंट मनोज कुमार पांडे तयारच होते. फक्त एक जबाबदारी मात्र वाढली होती.
लेफ्टनंट मनोज कुमार आता कॅप्टन मनोज कुमार पांडे म्हणून या तुकडीचे नेतृत्व करणार होते. त्यांना जिथे कारवाई करायची होती ती जागा रणनीतीच्या दृष्टीने महत्वाची होते. हा भाग पाकिस्तानी सैन्याने बळकावला होता.
एकतर उंच जागी बसून भारतीय सैन्यावर मारा करणे सोपे होते आणि दुसरे म्हणजे जवळच पाकव्याप्त काश्मीर असल्याने रसद मिळवणे सोपे होते.
ही जागा भारतीय सैन्याला ताब्यात घेणे आवश्यकच होते. पण हे आव्हान इतके सोपे नव्हतेच. समोरून जावे तर पाकिस्तानी सैन्याचा मारा एकदम सहज अंगावर येण्यासारखा होता. तर वळसा घालून जावे तर चढाई कठीण होती. जवळजवळ उभी चढण होती.
मनोज ह्यांना शत्रूची स्थिती कळण्यासाठी चढाई करण्यास सांगितले व लवकरात लवकर प्रतिहल्ला करण्यास सांगितले. कारण दिवसाच्या प्रकाशात मनोज ह्यांचा समूह दिसू शकला असता. परिस्थिती लक्षात घेत मनोज यांनी आपल्या सैनिकांच्या समूहाला एका अरुंद लांबट उंचवट्यावर नेले.
त्यामुळे त्यांना शत्रूच्या जागा समजून आल्या. २ जुलै १९९९ च्या मध्यरात्री खालुबर पलटणची चढाई अंतिम टप्प्यात असताना शत्रूकडून हल्ला झाला.
त्यांनी त्यांच्या बरोबरील सैनिकांचे नेतृत्व करीत जुबर शिखरावर ताबा मिळवला. हे शिखर ताब्यात येणे त्यावेळी संघर्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.
मात्र आता शत्रूलाही भारतीय सैन्य कोठे आहे याचा अंदाज आला होता. लढाईत वरच्या बाजूला असल्याचा फायदा आणि भरपूर शस्त्रसाठा या जोरावर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरु केला. मोठे साहस दाखवून मनोज ह्यांनी गोळीबाराला तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले.
खांद्यावर व पायावर गोळी लागूनसुद्धा मनोज यांनी हार मानली नाही व पाकिस्तानी बंकरांपर्यंत जाऊन तेथे दोन सैनिकांना मारून पहिले बंकर ताब्यात घेतले.
हेच या लढाईतले महत्त्वाचे वळण होते. आपल्या नेत्याच्या साहसाने प्रेरित होऊन बाकीच्या सैनिकांनीसुद्धा आपल्या शत्रूवर हल्ला चढवला. यावेळी लढाई नुसती शस्त्रांची नव्हती तर शत्रू अगदी जवळ होता.
गुरखा पलटणच पारंपारिक हत्यार “कुकरी” हातात घेऊन अंगावर जखमा असतांनाही ते त्वेषाने लढत होते. आपल्या जखमांकडे दुर्लक्ष करत मनोज ह्यांनी प्रत्येक बंकरामधील शत्रूच्या सैनिकांना मारायला सुरुवात केली.
तिसर्या ठिकाणी हल्ला करताना त्यांना छातीवर व पायांवर जखमा झाल्या. तरीही न घाबरता त्यांच्या जखमांची काळजी न करता त्यांनी त्यांच्या गटाचे नेतृत्व केले व चौथ्या ठिकाणी हातगोळा टाकून ते ठिकाण उद्ध्वस्त केले.
त्या वेळी त्यांना कपाळावर गंभीर जखम झाली. शेवटी खूप जखमा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
अशा प्रकारे कॅप्टन मनोज कुमार पांडे यांनी वीरता, साहस, कुशल नेतृत्व आणि कर्तव्याप्रती असणारे समर्पण दाखविले आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदान दिले.
कॅप्टन मनोज यांना जाणून घ्यायचे असेल तर या दोन गोष्टी समजल्या तरी हे अचाट कर्तृत्व त्यांनी कसे गाजवले ते लक्षात येईल. एक म्हणजे त्यांचे शेवटचे शब्द होते ‘ना छोडनु’ (नेपाळी भाषेत) (‘त्यांना सोडू नका’).
अंगावर इतक्या जखमा असतांना, मृत्यू सामोर असतांना देखील त्यांच्या समोर एकाच लक्ष्य होतं, ते म्हणजे शत्रूला संपवणे.
दुसरी बाब म्हणजे, मनोज ह्यांची एक दैनंदिनी होती. त्यात त्यांनी एक वाक्य लिहून ठेवले होते, “काही लक्ष्ये इतकी चांगली असतात की ती हरणे सुद्धा यश देणारे असते!”
मनोज कुमार पांडे यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा भारतीय सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी दिलेले बलिदान भारतीय नक्कीच लक्षात ठेवतील.
त्यांच्या कुटुंबाने त्यांची प्रत्येक वस्तू, पत्र आणि आठवणी जपल्या आहेत.
२००३ साली प्रदर्शित झालेला एलओसी कारगिल या चित्रपटात अजय देवगन या अभिनेत्याने कॅप्टन मनोज कुमार पांडे यांची भूमिका साकारलेली आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.