' गुप्तहेर संस्था “रॉ”च्या प्रमुखांचा हा प्रवास सगळ्यांना माहित असायलाच हवा! – InMarathi

गुप्तहेर संस्था “रॉ”च्या प्रमुखांचा हा प्रवास सगळ्यांना माहित असायलाच हवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

सर्वांनाच माहिती आहे की भारताचा संशोधन आणि विश्लेषण विभाग म्हणजे रिसर्च अँड अनॅलिटीकल विंग ही आपली प्राथमिक गुप्तचर संस्था आहे.

ह्या संस्थेचे काम म्हणजे दहशतवाद आटोक्यात आणणे, देशाच्या सुरक्षेसंदर्भात गुप्तपणे काम पाहणे, देशावर येणाऱ्या संकटांबद्दल माहिती ठेवणे आणि वेळोवेळी ही माहिती सुरक्षा दलांना देणे.

 

RAW-Logo-inmarathi

याशिवाय सरकारला विदेशी धोरण ठरवण्यास मदत करणे, अण्वस्त्र संरक्षणाची जबाबदारी सांभाळणे ही व इतर अनेक महत्वाची कार्ये रॉ ही संस्था पार पाडते.

सध्या ह्या संस्थेचे प्रमुख अनिल धस्माना आहेत. सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या अनिल धस्माना ह्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल सर्वांनीच जाणून घेतले पाहिजे.

उत्तराखंडमधील सर्वसामान्य कुटुंबात अनिल धस्माना ह्यांचा २ ऑक्टोबर १९५७ रोजी जन्म झाला. त्यांचे लहानपण शहरातील गजबजाटापासून लांब एका छोट्याश्या गावात निसर्गाच्या सानिध्यात गेले.

ह्या छोट्याश्या गावातून आलेल्या अनिल धस्माना ह्यांच्या ह्या यशामुळे त्यांच्या गावातील सर्वांचा अभिमानाने उर भरून आला. रॉ चे प्रमुख म्हणून अनिल धस्माना ह्यांचे नाव जाहीर झाले तेव्हा संपूर्ण उत्तराखंडमध्येच आनंदाची लहर पसरली.

ऋषीकेशपासून ७० किमी लांब भागीरथी व अलकनंदा ह्या दोन नद्यांचा जिथे संगम होतो त्या देवप्रयागपासून जवळ धस्माना ह्यांचे तोली हे गाव ५० किमी लांब आहे.

anil-dhasmana_3 inmarathi

धस्माना ह्यांच्या काकू व त्यांचे इतर नातलग आजही ह्याच गावात राहतात. धस्माना ह्यांचे रॉ चे प्रमुख म्हणून नाव जाहीर झाल्यापासून गावातील त्यांच्या घरी अभिनंदन करण्यासाठी लोकांची रीघ लागली.

गावात जन्मलेल्या ह्या सुपुत्राच्या कामगिरीमुळे सर्वांना त्यांचा अभिमान वाटतो आहे.

त्यांच्या काकू भानुमती तर ह्या यशामुळे अत्यानंदित झाल्या आहेत. त्या सांगतात की,

त्यांचा अनिल लहान असताना त्यांच्याबरोबर पाणी भरायला व गवत आणायला येत असे. तसेच घरातील सगळ्या कामात त्यांच्या आजीची ते मदत करत असत. अनिल धस्माना ह्यांचे बालपण अतिशय कष्टात गेले.

 

AnilDhasmana inmarathi

त्यांना चार भाऊ व ३ बहिणी आहेत. ते घरातील सर्वात ज्येष्ठ सुपुत्र आहेत. काटकसर व कष्ट करतच अनिल ह्यांचे बालपण गेले. मेहनतीच्या जोरावरच ते उत्तरोत्तर प्रगती करत गेले.

गावातल्या आपल्या लहानश्या घरातल्या लहानश्या खोलीत त्यांनी अभ्यास केला. कधी घरात अभ्यास होत नसेल तर ते लोदी पार्कमधील लॅम्प पोस्ट खाली अभ्यास करायला बसत असत.

त्यांनी एम कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस दलात काम करण्यासाठी परीक्षा दिली. ह्याच ठिकाणी त्यांनी परीक्षेची तयारी केली आणि त्यांच्या मेहनतीला फळ आले .

१९८१ साली त्यांची आयपीएससाठी निवड झाली. त्यानंतर त्यांनी मध्यप्रदेश पोलीस दलात अनेक पदे भूषविली आणि नंतर रॉ मध्ये समाविष्ट झाले.

त्यांचाच आदर्श पुढे ठेवून आज त्यांच्या त्याच घरात त्यांच्या घरातील लहान मुले कष्ट करीत आहेत, अभ्यास करीत आहेत. कामाच्या निमित्ताने ते दुसऱ्या गावी स्थायिक झाले असले तरी आज त्यांच्या आठवणी त्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात वसलेल्या आहेत.

अनिल ह्यांचे वडील महेशानंद धस्माना सिव्हिल एव्हिएशन विभागात कार्यरत होते. अनिल ह्यांनी आठव्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण गावाच्या जवळच दुधारखाल येथे घेतले.

त्यानंतर त्यांचे वडील आपल्या कुटुंबासह दिल्लीत स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी कष्ट करून, मेहनत करून आपले करियर घडवले. ते आयपीएस झाले.

त्यांच्या बरोबर शाळा शिकलेले त्यांचे बंधू महेश धस्माना सांगतात की, लहानपणापासूनच अनिल अत्यंत कष्टाळू व अभ्यासू होते. त्यांनी कायम शिक्षणावरच लक्ष केंद्रित केले व आपले लक्ष्य ठरवून त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

 

anil dhasmaniya 1 inmarathi

त्यांच्या ह्या गुणांचा त्यांच्या सर्व भावंडांनी कायम आदर्श ठेवला तसेच संपूर्ण गाव त्यांचे कौतुक करत असे. ते अतिशय शांत स्वभावाचे, सरळमार्गी आहेत.

त्यांचा स्वभाव अतिशय नम्र असल्याने ते प्रत्येकाशी कायम मिळूनमिसळून वागतात. गावात कुणाचेही लग्न कार्य असो, ते त्यात भाग घेतात आणि नेहेमी होणाऱ्या कुलदेवतेच्या पूजेला ते कायम उपस्थित असतात.

आठव्या इयत्तेनंतर दिल्लीला स्थायिक होऊन सुद्धा अनिल ह्यांचे त्यांच्या गावाबद्दलचे प्रेम कधीच कमी झाले नाही.

anil dhasmaniya 2 inmarathi

ते वेळ मिळेल तेव्हा आजही आपल्या गावाला आणि नातलगांना भेट देण्यासाठी येतात. त्यांचे चुलत बंधू राजेंद्र धस्माना ह्यांनी सांगितले की श्रीताड़केश्वर धामला तर ते दर वर्षी येतात.

इतक्या मोठ्या पदावर पोचल्यानंतर सुद्धा ते त्यांच्या गावात आले की सर्वांना मोकळेपणाने भेटतात.

त्यांचे शिक्षक शशिधर धस्माना आज ८२ वर्षांचे आहेत आणि आपल्या विद्यार्थ्याच्या यशाने त्यांचे मन भरून येते. त्यांनी अनिल ह्यांना पाचव्या इयत्तेपर्यंत शिकवले.

ते सांगतात की,

लहानपणापासूनच अनिल अतिशय हुषार व मेहनती विद्यार्थी होते. केवळ तिसऱ्या इयत्तेत असताना त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यापुढे सुंदर भाषण दिले. त्यासाठी त्यांना ३०० रुपयांचे बक्षीस मिळाले होते.

आपल्या उत्तम विद्यार्थ्याच्या आठवणीत रमलेल्या ह्या शिक्षकांचा त्याच्या यशाची बातमी ऐकल्यापासून उर दाटून येतो आणि डोळे भरून येतात.

उत्तराखंडातील सुपुत्र कायमच देशासाठी अभिमानास्पद कार्य करीत आहेत. ह्या आधीही अजित डोभाल, डीजीएमओ अनिल कुमार भट्ट आणि जनरल बिपीन रावत ह्या सुपुत्रांनी राष्ट्रीय सुरक्षा दलात महत्वाची पदे भूषविली आहेत.

Rawat- inmarathi

तोली ह्या गावाने अनेक रत्ने देशाला दिली आहेत. प्रसिद्ध योगी स्वामी राम उर्फ धस्माना ब्रिज किशोर धस्माना, समाजसेवी प्रयागदत्त धस्माना, स्वामी हरिहरानंद तसेच अनेक सैन्य अधिकारी आणि उत्तम शिक्षक ह्या गावात जन्माला आले.

अनिल धस्माना हे रॉ मध्ये काम करताना बलुचिस्तान, आतंकवाद आणि इस्लामिक अफेअर्स हाताळण्यात कुशल मानले जातात. तसेच पाकिस्तान व अफगाणिस्तान बाबतीत सुद्धा त्यांचा अनुभव मोठा आहे.

त्यांनी ह्या पूर्वी लंडन, फ्रँकफर्ट ह्या शहरांसह अनेक देशांच्या राजधान्यांमध्ये काम केले आहे. ह्याशिवाय सार्क आणि युरोप डेस्क सुद्धा हाताळण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

ह्या आधी नवी दिल्लीतील कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव म्हणून काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.

थोडक्यात काय तर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी उचलण्यासाठी ते सर्वतोपरी योग्य आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?