भारतातल्या या १० प्रसिध्द व्यक्तींच्या मृत्यचे गूढ अजूनही उलगडलेले नाही
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतात सिनेस्टार, क्रिकेटपटू आणि राजकीय व्यक्ती नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत असतात. सामान्य व्यक्तींना यांच्याविषयी नेहमीच औत्सुक्य असते. त्यामुळेच की काय नाक्या-नाक्यापासून ते आजच्या समाजमाध्यमांपर्यंत अखंड चर्चा झडतांना दिसतात.
असाच त्यापैकी एक विषय म्हणजे लोकप्रिय व्यक्तींचे मृत्यू आणि त्यामागे काही खऱ्या तर बराचश्या काल्पनिक कथा!
राजकीय नेत्यांचे मृत्यू आणि कट कारस्थान यांचं तर समीकरण अतूट आहे. या लेखात अशाच काही राजकीय व्यक्तींच्या मृत्यूला असलेली गूढतेची किनार दिसून येते.
या राजकीय व्यक्तींमध्ये अगदी स्वातंत्र्य तोंडावर असतांना विमान अपघातात मृत्यू पावलेले सुभाषचंद्र बोस आहेत त्याचप्रमाणे स्वातंत्र्य मिळवल्यानंतर विरोधी पक्षात असलेले श्यामाप्रसाद मुखर्जी ते फुटीरतावादी नेता अब्दुल घणी लोन अशा अनेक प्रवाहातील नेत्यांचा समावेश आहे.
या नेत्यांचे मृत्यू जनतेला स्वीकारणे कधी जड गेले तर कधी ते नाकारले गेले. अशाच काही राजकीय नेत्यांच्या गूढ मृत्यूंबद्दल….
१. सुभाषचंद्र बोस
मृत्यू : १८ ऑगस्ट १९४५
भारत स्वतंत्र होण्यात दुसऱ्या महायुद्धाने देखील महत्वाची भूमिका बजावली होती. या काळातच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने जनतेच्या शोकाला अंत राहिला नाही. अनेकांनी तो स्वीकारालाच नाही.
तत्कालीन ब्रिटिश सरकारने नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा तेपई येथे विमान अपघातात मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
त्यांच्या मृत्यूच्या अनेक वेगवेगळ्या कथा समोर येत होत्या. त्यात कुठेच साम्य नव्हते. जनतेला देखील कुठेतरी आशा होती की नेताजी जिवंत आहेत.
ते नक्की अपघातात वारले की त्यामागे काही घातपात होता इथपासून ते त्यावेळी रशियन सरकारच्या ताब्यात होते असे अनेक निष्कर्ष काढले गेले.
भारतात मौनी बाबा या नावाने असलेले एक संन्यासी हेच नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत अशीही एक वदंता होती. पुढे १९५६ मध्ये नेताजींच्या मृत्यूबद्दल सत्य शोधण्यासाठी शाह नवाज समिती स्थापन करण्यात आली.
अंतिम निष्कर्ष काही निघाला नाही त्यानंतर अनेक समिती नेमण्यात आल्या. आजही नेताजींच्या मृत्यूबद्दल गूढ कायम आहे.
–
हे ही वाचा – बेपत्ता महिलेचे गूढ उकलले ५५ वर्षांनी.. घराच्या मागच्या अंगणातच सापडले शरीराचे अवशेष!
–
२. श्यामा प्रसाद मुखर्जी
मृत्यू : २३ जून १९५३
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेले श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा मृत्यूचे गूढ उकलले गेले नाही.
काश्मीरच्या मुद्द्यावरून पंडित नेहरुंसोबत मतभेद झाल्याने त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि भारतीय जनसंघाची स्थापना केली. काश्मीरचे कलम ३७०, वेगळे संविधान आणि ध्वज यांवरून त्यांनी मतभेद दर्शवले.
“एक देश में दो निशाण, दो विधान, दो प्रधान नही चलेगा, नही चलेगा” अशी त्यांची घोषणा होती.
आपला विरोध दाखविण्यासाठी त्यांनी १९५३ मध्ये काशमीर खोऱ्यात प्रवेश केला आणि त्यांना लगेच अटक करण्यात आली. कोठडीत असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.
वर्तमानपत्रात मृत्यू हृदयविकाराने झाला असे सांगण्यात आले पण त्याला काही आधार नव्हता. त्यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन देखील करण्यात आले नाही.
त्यांचे प्रेत सरळ कोलकाता येथे पाठवण्यात आले. हा सगळाच प्रकार संशयास्पद असाच आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली, श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या आईने वारंवार विनंती करून देखील पंडित नेहरू यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.
अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील पंडित नेहरूंच्या दुर्लक्षामुळे अशी दुर्दैवी घटना घडल्याचे आरोप केले. हा मृत्यू म्हणजे एक गूढ आहे की सत्य दिसत असूनही त्याकडे हितसंबंध राखण्यासाठी कानाडोळा करण्यात आला हा प्रश्न कायम आहे.
३. लाल बहादूर शास्त्री
मृत्यू : ११ जानेवारी १९६६
पंतप्रधान असतांना लाल बहादूर शास्त्री यांचा ताश्कंद येथे मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयक्रिया बंद झाल्याने झाला असल्याचं सांगण्यात आलं. मात्र त्यांच्यावर विषप्रयोग झाला असा कयास लावण्यात येत होता.
शास्त्रीचें ताश्कंद ला तसेच दिल्ली ला शवविच्छेदन न झाल्याने विषप्रयोगाच्या आरोपाला बळ मिळालं.
त्यांचे शरीर निळे पडले होते मात्र मृतदेह ताश्कंदहून भारतात आणतांना कुजू नये म्हणून प्रक्रिया केली असल्याचे सांगण्यात आले होते.
२००९ मध्ये माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता सरकारनं लोकहिताच्या दृष्टिकोनातून माहिती देणं नाकारलं.
४. एल. एन. मिश्रा
मृत्यू : ३ जानेवारी १९७५
–
हे ही वाचा – सुशांतने पाहिलेल्या “त्या” गूढ चित्रामागचं रहस्य नेमकं आहे तरी काय?
–
इंदिरा गांधींचे पाठीराखे असलेले एल. एन. मिश्रा हे बिहारमधील मोठे राजकीय प्रस्थ होते. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात ते रेल्वे मंत्री म्हणून कार्यरत होते.
समस्तीपूर – मुजफ्फरपूर ब्रॉड गेज रेल्वे लाईनच्या उद्घाटनासाठी ते त्याठिकाणी गेले असता कार्यक्रमाच्या मंचावरच बॉम्बस्फोट करण्यात आला.
जखमी अवस्थेतही त्यांनी आपल्याला रेल्वेच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याचे निर्देश दिले. मात्र दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तपासादरम्यान संशयाची सुई “आनंदमार्गी” या गटाकडे होती. मात्र हा कट व्यापक होता त्यात अजूनही दुसरे कोणी असण्याची शक्यता होती. सीआयए कडे देखील बोट दाखवण्यात येत होते. एल. एन. मिश्रा यांच्या कुटुंबियांनी देखील ही राजकीय हत्या असल्याचे सांगितले.
५. संजय गांधी
मृत्यू : २३ जून १९८०
१९७९ मध्ये जनता पक्षाला हरवून इंदिरा गांधींनी सत्तेत पुनरागमन केलं होतं. त्यांचा मुलगा आणि सत्तेच्या वर्तुळातील मोठं नाव म्हणजे संजय गांधी यांनी देखील अमेठी मधून विजय प्राप्त केला होता. गांधी घराण्याने पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली होती.
मात्र अशातच २३ जून ला संजय गांधी विमान अपघातात मृत्यू पावले. ते स्वतः विमान उडवत होते आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या प्रशिक्षकाचा देखील यात मृत्यू झाला.
आश्चर्य म्हणजे या विमानाचा अपघात झाल्यानंतर त्या विमानाने पेट घेतला नाही जसे इतर अपघातांच्या वेळी होते. अपघाताच्या ठिकाणी त्यांचे घड्याळ आणि अंगठी देखील सापडले नाही.
त्यामुळेच संशयाला जागा निर्माण झाली आणि आजही तो संशय घेतला जातो.
संजय गांधी सत्तेच्या अशा स्थानी होते की त्यांना शत्रू असणे अपरिहार्य होते. त्यांचा स्वभावही बेधडक होता. तेव्हा त्यांचा मृत्यू जसा मनाला चटका लावणारा होता तसा गूढही होता.
६. सरदार बेअंत सिंह
मृत्यू : ३१ ऑगस्ट १९९५
खलिस्तान या दहशतवादी चळवळीचा पंजाब मधून अंत करण्यात ज्यांनी मोठे योगदान दिले, असे पंजाबचे माजी मुख्यमंत्री सरदार बेअंत सिंह यांची हत्या ही राजकीय हत्या होती. मंत्रालयाच्या बाहेर बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला.
या स्फोटात इतर १४ लोकांना देखील जीव गमवावे लागले. यांत ३ सुरक्षा रक्षकांचा देखील समावेश होता.
पंजाब मध्ये शांतता नांदत असतांना अशी दुर्दैवी घटना घडली. नंतर या कटात सामील असलेले आरोपी पकडण्यात आले.
७. चंद्रशेखर प्रसाद
मृत्यू : ३१ मार्च १९९७
आपले जेएनयू मधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिहारमधील सिवान येथे कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) चा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून चंद्रशेखर प्रसाद दाखल झाला होता.
सिवान मधील एका सभेला संबोधित करत असतांना थेट गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.
त्यावेळेस बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत होता. त्याच पक्षातील बाहुबली नेते मोहम्मद सोहराबुददीन यांच्या सांगण्यावरूनच ही हत्या घडवण्यात आली असा आरोप झाला.
याविरुद्ध डाव्या संघटनांच्या विद्यार्थी चळवळीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले तेव्हा सुद्धा साधू यादव यांच्याकडून गोळीबार करण्यात आला. ही राजकीय हत्या राजकारण ढवळून काढणारी होती.
८. फूलनदेवी
मृत्यू : २५ जुलै २००१
चंबळची दरोडेखोर म्हणून आपला मोठा दबदबा निर्माण करणारी फूलनदेवी राजकीय जीवनात सक्रिय झाली होती. तिला समाजवादी पक्षाकडून खासदारकीची उमेदवारी मिळाली होती.
मिर्झापूर या मतदारसंघातून तिने निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा. १९८१ मध्ये ठाकूर जातीच्या २१ लोकांची हत्या करून तिने आपल्या क्रूरतेची साक्ष दिली होती.
तिच्यावर ४८ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते. अखेरीस तिने शरणागती पत्करली आणि ११ वर्षे तुरुंगात काढली. पुढे तुरुंगातील चांगल्या वागणुकीवरून तिला मुक्त करण्यात आले.
आता राजकीय प्रवास सुरु झाला होता. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर दिल्लीतील बंगल्याबाहेर शेर सिंह राणा, धीरज राणा आणि राजबीर यांनी तिची गोळी घालून हत्या केली.
पुढे या सर्व आरोपीना अटक झाली. मात्र यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे यावर मात्र कोणाकडे उत्तर नाही.
९. अब्दुल घनी लोण
मृत्यू : २१ मे २००२
काश्मिरी फुटीरतावादी नेता अब्दुल घनी लोण हा पेशाने वकील होता. मोठ्या जमावासमोर आणि पुरेशी सुरक्षा उपलब्ध असतांना त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
यावेळी पाकिस्तानी बाजूने घोषणाही देण्यात आल्या. तो स्वतंत्र काशमीरच्या बाजूने होता.
याआधीही एका हल्ल्यातून हा काश्मिरी नेता वाचला होता. या हत्येमागे भारत आणि पाकिस्तान दोन्ही असल्याचा आरोप त्याचा मुलगा सज्जाद लोण याने केला.
१०. हरेन पंड्या
मृत्यू : २६ मार्च २००३
गुजरात चे गृहमंत्री हरेन पंड्या हे सकाळी बाहेर फिरण्यासाठी गेले असता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांचा मृतदेह कार मध्ये आढळून आला.
ही राजकीय हत्याच आहे असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आणि त्यासाठी मोठा लढा त्यांनी दिला.
यामागे राजकीय नेते आणि वरिष्ठ नोकरशाही आहे असा आरोप मोठ्या प्रमाणावर झाला. त्याच्या जीविताला धोका असल्याचा आधीच खुलासा संजीव भट या त्यांच्या विश्वासातील पोलीस अधिकाऱ्याने केला होता.
गुजरातमधील २००२ साली उसळलेल्या दंगलींनंतर ही हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.
भारतात लोकशाही असून त्यासाठी पूरक वातावरण निर्माण करण्यात या राजकीय हत्या मोठा अडथळा निर्माण करतात. या घटना दुर्दैवी आहेत.
यात सहभागी असलेले अनेक नावं उजेडात येत नाहीत हे अधिक धोकादायक आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून लोकशाही मूल्ये अधिक प्रमाणात प्रबळ होणे गरजेचे आहे.
===
हे ही वाचा – ‘संभोग से समाधी तक’ असं अध्यात्म शिकवणाऱ्या ओशोचा गूढ जीवनप्रवास…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.