' सैन्यात रुजू होणाऱ्या ‘कॅप्टन’च्या माऊलीच्या अश्रूंमागचं कारण अंगावर रोमांच उभं करेल! – InMarathi

सैन्यात रुजू होणाऱ्या ‘कॅप्टन’च्या माऊलीच्या अश्रूंमागचं कारण अंगावर रोमांच उभं करेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका : प्रचिती कुलकर्णी

===

सीमा सुरक्षा दलातील आपल्या शहिद झालेल्या पतीच्या पाउलांवरती पाऊल ठेवून आज आपल्या लेकराने यशाचे तेच शिखर गाठलेले पाहण्याचे भाग्य याची देही याची डोळा लाभणं म्हणजे संयमाची, तपश्चर्येची सीमा यशस्वीरीत्या गाठणे होय.

हे अहोभाग्य आहे जयपूर मधील एका विरांगनेचं!

श्रीमती बबिता सुभाष शर्मा या तपस्विनीचं..

१६ एप्रिल, १९९६ रोजी राजस्थानमधील कोटा येथे राहत असलेल्या सौ. बबिता यांच्या नुकत्याच बहरलेल्या संसारात मिठाचा खडा पडला जेंव्हा त्यांना त्यांच्या पतीच्या म्हणजेच सुभाष शर्मा यांच्या शहिद होण्याची वार्ता समजली.

आपल्या पतीची जम्मू काश्मीरमध्ये काही अतिरेक्यांकडून हत्त्या झाली आहे हे ऐकून पायाखालची जमीन क्षणार्धात सरकली असणार.

नऊ महिन्याच्या आपल्या तान्ह्या लेकराला घेऊन कोणत्या देवाच्या उंबरठ्यावर जाऊन “आम्हीच का?” असा प्रश्न विचारावा वाटला असेल?

धरणीमाता दुभंगून त्यात लुप्त होण्याची मुभा जर प्रत्येक जानकीला असती तर आज कदाचित त्या मायेच्या कुशीत सुरक्षित राहण्याची संधी यांनीही दवडली नसती.

 

major-inmarathi

 

पण ती वीरांगना आहे. सैनिक पतीसमवेत लग्न लागताना त्याच्या बंदुकीसोबतही त्यांनी एकनिष्ठतेची शपथ घेतलेली असावी. सैनिक पती किंवा सैनिक पत्नी हे एकले तो मार्ग चालत नसून त्यांचे कुटुंब देखील स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेते.

कारण कोणताही प्रचंड आर्थिक फायदा नसताना आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहण्यासाठी एक अतिशय प्रबळ इच्छाशक्ती आणि निष्ठा असावी लागते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

जी यांचे कुटुंबीय कदाचित अलिबाबाच्या गुहेतून आणत असावेत; इतकं मौल्यवान तिथूनच लुटता येत म्हणे.

अशा शक्यतांचा अंदाज त्यांना असतोच पण असा तोफेचा गोळा झेलताना आपले दुर्ग देखील थोडेबहुत डगमगत असत. तिथे यांच्या कणखर आवरण असलेल्या हळुवार मनाचं काय गणित?

१९९७ मध्ये पुढे या शहिद जवानाला बहादुरीसाठी राष्ट्रपती पदक (मरणोत्तर) प्राप्त झाले तेव्हा देशाचे पहिले नागरिक म्हणून पूर्ण देशाच्या वतीने के. आर. नारायणन यांच्या हस्ते ते साभार बहाल होताना आणि ते स्वीकारताना त्या वीरपत्नीच्या मनात काय खळबळ चालू असेल.

याची कल्पना देखील करवत नाही.

आता सगळ्यांनाच हे विचार येतही नसणार.. देशातील शंभर करोड लोकसंख्येतील एखादा हुतात्मा होतो तर त्याची झळ अशी कितींना बसणार म्हणा.

army-inmarathi

 

‘त्याचं कामच होतं, ते सैनिक होता तो’ ‘मग कशाला जायचा सैनिकी खात्यात’ ‘मिळतं हो सगळं मिळतं त्यांना आता, इतकं विचार करू नका’……..अहो, तोच माणूस पण मिळतो का परत? सर सलामत तो पगडी पचास..

आपलं पोर पाठवा बरं सैन्यात? जमेल का? जिगर चाहिये होता है बॉस!

नुसत्या विचारानेच हातातली वाळू निसटल्याचा भास झाला ना?

आणि त्या माउलीने नवऱ्याच्या वियोगाने फोडलेला हंबरडा विरायच्या आतच कोणताही विचार न करता त्याची देशसेवा अखंड चालू ठेवायची प्रतिज्ञा केली.

जे स्वप्न त्यांच्या पतीकडून अर्धवट रेखाटले गेले होते तोच कागद तिने मुलाच्या समोर धरला आणि तोच तो भारतभूमी च्या संरक्षणाचा वसा आपल्या पोटच्या गोळ्याला दिला.

ते पिल्लू देखील आपल्या पित्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून तेच शिखर सर करायला निघालं.. आणि मिळतील ते सर्व सुंदर रंग त्या स्वप्नांत भरू लागलं.

दूध पोळलं तर ताक फुंकून पिणाऱ्या मानसिकतेत येणारे आपण, यात ती माऊलीहि येतच असावी पण पती शहिद झालेत.

म्हणून मुलाला पदराआड दडवून आपला वृद्धापकाळातील आधार आपल्याच अंगणात रोवू पाहण्याचा कमकुवत मानस तिने फाट्यावर मारला व मुलांच्याही हातात तेच शस्त्र देऊन त्याला सीमेवर धाडण्याचा निर्धार केला.

“मी स्वतःला कधीच विधवा समजत नाही, माझे पती शाहिद झाले आहेत म्हणजेच ते अमर आहेत. म्हणूनच त्यांचा वारसा चालू ठेवण्यासाठी मी माझ्या मुलालादेखील भारतीय सैन्य दलात पाठविते आहे”

किती ती दानत.. किती तो अभिमान.. कुठे वाच्यता नाही कुठे कंजुषी नाही. जे उरले आहे ते पण देण्याचीच तयारी..

 

major-inmarathi

 

आणि इथे आपण अश्या समाजात वावरतोय जिथे शिबिरात २ बाटल्या रक्त दिल्यावर बॅनरवर फोटो आला नाही म्हणून पोरं गाड्या फोडतात. इतका मोठेपणा मिळवून जायचंय कुठे हो?

इथे मुकेपणाने आयुष्य पणाला लावूनही दिमाखात हसत जगणारे हिरे जेव्हा निखळून पडतात तेव्हा आपोआपच भारतमातेच्या मुकुटाची चमक नाहीशी होऊन तो हिरा अधिक चमकू लागतो. तीच खरी प्रसिद्धी आणि तीच खरी योग्यता.

२ दिवसाने पायदळी येणाऱ्या बॅनरवर दात दाखवून नाही मिळवता यायची ती.

कोटामधील सेंट पौल शाळेत शिकणारा क्षितिज शाळेतल्या बास्केटबॉल संघाचा कप्तान होता. राष्ट्रीय संरक्षण अकादमीची (NDA) पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होत त्याने देशातून १३वा क्रमांक पटकाविला.

पाच लाख इच्छुक विद्यार्थ्यांमधून फक्त २०० जागा भरल्या जातात आणि त्यात १३वा क्रमांक पटकावून क्षितिजने कमाल केली.

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये दाखल झाल्यानंतर क्षितिजने मागे वळून पहिलेच नाही. त्याची घोडदौड चालूच राहिली. २२ वर्षीय क्षितिज एनडीए येथे कॅडेट सर्जेंट मेजर (सीएसएम) देखील बनला.

 

indian-army-inmarathi

NDA मधून उत्तीर्ण झाल्यानंतर क्षितिज IMA मध्ये दाखल झाला आणि १ वर्षाचे शिक्षण झाल्यानंतर डेहराडून मध्ये झालेल्या IMA च्या पास परेड मध्ये तो लेफ्टनंट बनला.

आधी त्याच्या गुडघ्याला हानी पोहोचविण्याच्या भीतीमुळे सैन्य ड्रिल (परेड) मध्ये भाग घेण्यास तयार नव्हता पण श्रीमती बबिताजीनी सहमती देऊन प्रोत्साहन दिल्यानंतर तो त्यात सहभागी झाला आणि त्यांच्या कंपनी चार्लीने ती स्पर्धादेखील जिंकली.

मिस्टर IMA बनलेला क्षितिज वरिष्ठ अधिकारा-याचा प्रशासकीय सहाय्यक असण्याबरोबरच, IMA च्या बास्केटबॉल संघाचा कर्णधार देखील होता.

क्षितिज म्हणतो की,

“आजोबांकडून माझ्या वडिलांच्या शौर्याच्या आणि इतर शुरांच्या कथा ऐकून मी भारतीय संरक्षण दलात सामील होण्याचे निर्णय घेतला. आमच्या या स्वप्नासाठी आईचे समर्पण खूप मोठे आहे.”

क्षत्राणीच्या पोटी क्षत्रियच निपजतो हेच क्षितिजने सिद्ध करून दाखविले.. आईने दाखविलेल्या वाटेवर मात्यापित्याचा स्वप्नांची कावड घेऊन न थांबता धावणारा हा श्रावणबाळ आज आपल्या भारतभूमीच्या संरक्षणासाठी दोन्ही पाय घट्ट रोवून उभा आहे.

 

major-inmarathi

 

लवकरच तो त्याच्या पहिल्या पोस्टिंग (1 Armed Signal Battalion) साठी पंजाब मधील पटियाला येथे जाईल.

येथे शक्यता अशक्यतांच्या पुढे जाऊन मनात भीतीचा लवलेशही न ठेवता देशाला सर्वकाही समर्पित करणाऱ्या आणि बाकीच्यांसाठी आदर्श ठरलेल्या त्या मातेला आणि शूर पुत्राला आमचा सलाम!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?