आपली दिवाळी एका बिनडोक अंधश्रद्धेमुळे थेट घुबडांच्या मुळावर उठलीय! कशी? वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
दिवाळीचा सण आपण सर्व जण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. दैनंदिन जीवनातील चिंता, दुःख दूर सारून यंदाही हा सण आपण साजरा करत आहोत. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव! वाईटावरील चांगल्याचा विजय होतो त्यासाठी हा विजयोत्सव साजरा केला जातो.
माणसे एकत्र येतात म्हणून उत्सव हे मनाचे आरोग्य राखण्यास मदत करत असतात.
प्रत्येक व्यक्ती या उत्सवात सहभागी होऊन आपापल्या परीने रंग भरत असतात. वसुबारस, धन्वंतरीपूजन, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या प्रत्येक दिवसाचे महत्व आहे.
लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला काही ना काही देणारा हा पाच दिवसांचा उत्सव प्रत्येकाने आपल्या परंपरा, रीती रिवाजानुसार साजरा केला.
पण आपण दिवाळीसण साजरा करतो तसेच या सणाची वाट पाहणारे अजून काही लोक आहेत, ते म्हणजे तांत्रिक ! काळ्या जादूवर विश्वास ठेवणारे हे लोक एका वेगळ्याच पद्धतीने दिवाळी साजरी करतात.
यातील एक पद्धत ज्याला ते ‘विधी’ असंही म्हणतात ते म्हणजे, दिवाळीत घुबडाची हत्या करणे.
हे लोक घुबडाचा बळी का देतात तर त्यांना वाटतं की यामुळे आपले नशीब फळफळेल आणि आपल्याला वैभव मिळेल आणि ते टिकून राहील.
ही अंधश्रद्धा घुबडांच्या मात्र जीवावर उठली आहे. यासाठी घुबडांची तस्करी केली जाते. या प्रकारचा व्यापार आता वाढतो आहे.
घुबड हा शिकारी पक्षी वर्गातील प्रमुख पक्षी आहे. घुबडे बहुधा एकाकी आणि निशाचर असतात, हे आपण जाणतोच. घुबडे प्रामुख्याने सस्तन प्राणी, कीटक आणि पक्षी यांची शिकार करतात तरी काही प्रजाती मासे मारण्यात देखील तरबेज आहेत.
अन्नसाखळीतील वरच्या स्तरावर असलेला हा पक्षी भक्ष्य आणि भक्षक यांच्यात संतुलन राखण्यात मोठी भूमिका बजावत असतो.
घुबडाचा संचार पृथ्वीवर अंटार्क्टिका, बहुतांश ग्रीनलँड आणि काही दूरस्थ बेटे वगळता सर्वत्र दिसून येतो. जगात घुबडाच्या जवळजवळ २०० प्रजाती आहेत.
भारतात मात्र यापैकी ३२ प्रजाती आढळतात. यापैकी अनेक घुबडं ही स्थानिक भाषेतील नावाने ओळखली जातात. २७० डिग्री मान फिरवू शकतो, शिवाय आवाज न करता उडणे ही घुबडाची आणखी एक खासियत आहे. घुबडं अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतात.
वेगवेगळ्या संस्कृतीत घुबडाचे स्थान वेगळे आहे. भारतात आढळणारी घुबडाची एक प्रजाती म्हणजे गव्हाणी घुबड किंवा कोठीचे घुबड. भारतीय संस्कृतीत हे अपशकुनी मानले गेले आहेत परंतु इंग्लंडमध्ये मात्र गव्हाणी घुबड विद्वत्तेचे प्रतीक मानले गेले आहे.
असा हा घुबड पक्षी भारतात मात्र अंधश्रद्धेचा बळी ठरतो आहे. भारतात ज्या ३२ प्रजाती आहेत त्यापैकी १३ प्रजातींची तस्करी केली जाते.
स्पॉटेड ओवलेट (पिंगळा), ब्राउन फिश, रॉक ईगल, डस्की ईगल (हुमा घुबड) या प्रजातींना मोठी मागणी असते. घुबडांची होणारी तस्करी भारताच्या केवळ काही भागापुरता मर्यादित नाही.
ही कीड सर्वत्रच लागलेली दिसून येते. ३०० रुपयांपासून ते थेट ५० हजारांपर्यंत या घुबडांच्या तस्करीसाठी घेतले जातात.
अब्रार अहमद हे पक्षांच्या तस्करी बाबत म्हणतात, तांत्रिक पूजेत पक्षी बळी म्हणून वापरले जातात. आज वर्तमानपत्र पाहिले तर त्यात अनेक तांत्रिकांच्या जाहिराती दिसतात.
जे लोक यांच्यापर्यंत पोहचतात त्यापैकी अनेक जण बळी म्हणून निष्पाप पाखरांचा जीव घेतात. इथेच तस्करीला सुरुवात होते, आणि मग मागणीनुसार पुरवठा होतो. चेटूक, काळी जादू करणारे हे सर्व याला जबाबदार आहेत.
घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन मानले जाते.
जर ते आपल्या घर किंवा कार्यालय याठिकाणी मारून जमिनीत पुरले तर देवी लक्ष्मीला तिथून जाण्यासाठी वाहन उपलब्ध असणार नाही परिणामी बळी दिला त्या जागे भोवतीच लक्ष्मी देवीचा कायम निवास असेल, आणि ज्याठिकाणी लक्ष्मी माता असेल तिथे वैभव कायमस्वरूपी टिकून असेल, अशी बिनडोक धारणा यामागे आहे.
या घुबडांची तस्करी यासाठीच होत नाही, तर घुबड मारून त्यांची बुबुळे खाल्ली जातात, यामागे तर्क काय तर यामुळे रात्री दिसण्याची शक्ती प्राप्त होते. घुबडांचे मारेकरी जसे तांत्रिक / काळी जादू करणारे आहेत त्याचप्रमाणे ढोंगी वैद्य देखील आहेत.
काही रोग नष्ट करण्यासाठी घुबडाचा काही भाग खाण्याचा सल्ला या महाभागांकडून दिला जातो. हे अमानुष तर आहेच पण याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही.
आज उपलब्ध असलेले तंत्रज्ञान हे या अंधश्रद्धांच्या प्रसाराला कारण ठरत आहेत. हवी असलेली वस्तू सहजगत्या प्राप्त करता येते. यामुळे तस्करीची साखळी सुसूत्रपणे कार्यरत आहे.
घुबडांची तस्करी रोखण्यासाठी जी काही कारवाई करण्यात आली त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, हरियाणा येथे मोठी तस्करी होत असल्याचे दिसून येते.
तसेच मागील काही वर्षात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी तस्करीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
आज जगभरात प्राणी/ पक्षी यांच्या तस्करीत वाढ होत आहे. एका अंदाजानुसार हे तस्करीचे जाळे किती मोठे आहे तर जगाचा विचार करता या क्षेत्रात ७ ते २३ बिलियन डॉलर्सची वार्षिक उलाढाल असते.
यासाठी निष्पाप जंगली प्राणी/ पक्षी निष्कारण बळी पडत असतात. भारतापुरता विचार करायचा झाल्यास पक्ष्याच्या १३०० प्रजातींपैकी ४५० प्रजातींची तस्करी केली जाते.
अर्थात या तस्करीमागे निरनिराळी कारणे आहेत पण दिवाळी अशा विचित्रपणे साजरी केली जाण्याच्या पद्धतीचा निषेध केलाच पाहिजे. इतकेच नाही तर अशा क्रूर घटनांना आळा कसा घालता येईल याबाबतीत उपाययोजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवल्या गेल्या पाहिजे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.