शिवकाशीतल्या वास्तव्याने मला स्वतःचा फटाक्यांचा धंदा बंद करायला भाग पाडलं…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक
===
सातवीत असतांना मी फटाक्याचा उद्योग सुरू केला. एवढासा मुलगा आणि एकदम लिस्ट वगैरे बनवून श्री इंडस्ट्रीज या नावाने एकदम प्रोफेशनल पध्दतीने फटाक्यांचा व्यवसाय करतोय म्हटल्यावर ओळखी ओळखीच्या लोकांनी माझ्याकडून फटाके घेऊन मला या व्यवसायात घट्ट उभं केलं.
आज या फेसबूकवरही हे जाणणारे व मला मदत करणारे उपस्थित आहेत. माझा वैयक्तिक पातळीवरील हा पहिला “उद्योग-व्यवसाय”. याच व्यवसायाने मला खरतंर उद्योजक बनवलं.
सन १९९२ ते सन २००४ असं एक तप मी हा व्यवसाय केला. फटाक्याच्या या व्यवसायात पहिल्या वर्षी मला १८९२/- रूपये निव्वळ फायदा व उरलेले फटाके असा भरपूर फायदा झाला होता. सन २००४ साली शेवटच्या वर्षी याच धंद्यात मी ९,२०,०००/- रूपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा –
- या देशात चुकून लागला फटाक्यांचा शोध! फटाक्याच्या जन्माची रंजक कथा!
- सेलिब्रेशनसाठी आपण जे फटाके फोडते त्यामागचं ‘विज्ञान’ आणि प्रक्रिया समजून घ्या!
झटपट फायदा मिळवून देणारा हा सिझनल धंदा खुप भारी वाटायचा. घरातील आर्थिक परिस्थिती मजबूत असल्यामुळे या फायद्यातील एकही रूपया कधीही आईबाबांनी घेतला नाही. करतोय धंदा तर करू दे फक्त हा विचार त्यांचा असायचा. त्यामुळे फटाका व्यवसाय याबाबत सर्व अधिकार माझेच होते.
सुरवातीला डंकन रोड (मुंबई), उल्हासनगर व शहापूर (ठाणे जिल्हा) येथील होलसेल दुकानातून फटाके घेता घेता सन २००४ सालापर्यंत मी फटाक्यांची पंढरी असलेल्या शिवकाशीहून (तामिळनाडू राज्य) थेट आयात करू लागलो होतो.
वय वर्षे बारा ते वय वर्षे चोवीस या बारा वर्षात या धंद्यात इतकी भलीमोठी प्रगती झाली होती. असे असतानाही मी सन २००४ साली हा धंदा कायमस्वरूपी बंद केला.
गल्ली ते थेट तामिळनाडू राज्य असा प्रवास करत असताना व इतका फायदेशीर धंदा बंद करण्यामागचं कारण काय असावं?? काय घडलं असेल असं? सर्वांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे.
फटाका इंडस्ट्री – दक्षिणेत गृह उद्योग ते मोठ्या कार्पोरेट लेव्हलवर फटाक्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आपल्याकडे जसे स्त्रिया दोन पैसे मिळवण्यासाठी पापड लाटतात त्याच धर्तीवर तिथे फटाके वळले जातात.
आपल्या येथील स्त्रियांच्या सुदैवाने पापड व्यवसायात कोणताही ज्वालाग्रही – केमिकल वा विषारी धोका नाही. फटाक्यांच्या व्यवसायात नेमकं उलट आहे.
तांबे, कॅडीनियम, शिसे, मॅग्नेशियम, जस्त, सोडीयम, सल्फर असे सर्वच विषारी घटक या उद्योगातील संबधित व्यक्तीला उघड्या हातांनी हाताळावे लागतात. त्याचे फार मोठे दुष्परिणाम होतात.
सगळ्यात भयानक बाब म्हणजे या उद्योगात चाईल्ड ट्रॅफिकींग या गुन्हेगारी पध्दतीने देशभरातून लहान मुलं पळवून आणून जुंपली जातात. त्यांच्यावर काम करण्यासाठी अनन्वीत अत्याचार केले जातात.
बहुतांश वेळा यातील मुली मोठ्या झाल्या की त्यांना वेश्याव्यवसायात विकले जाते. एकुणच फार मोठ्या प्रमाणावर चिमुकल्या जीवांचे आयुष्य बरबाद केले जाते. हे झालं एक कारण.
दुसरं कारण म्हणजे या आधीच ज्वलनशील असलेल्या उद्योगाला मानवी हयगयीने व नैसर्गिक उष्णतेमुळे वारंवार लागत असलेल्या आगी व त्यात होरपळून मरणारे आपलेच निष्पाप बांधव. कोणत्याही प्रकारची अॅन्टी फायर सिस्टम संबधित उद्योगात वापरली जात नाही.
मोठे उद्योग केवळ शो म्हणून व कायद्यास दाखविण्यासाठी फायर इक्विमेंट ठेवतात. एखादा उद्योजक वगळता सर्वत्र ही सत्य परिस्थिती आहे. दरवर्षी या फटाक्यांच्या कंपन्यांना लागलेल्या आगीत अनेक जीव जातात. काही होरपळून निघतात.
हे झालं दृष्य.. अर्थात दिसणारं.. तर न दिसणारं म्हणजे वर उल्लेख केलेल्या विषारी धातू व केमिकल्स नी हजारोंना विविध भयंकर आजार जडले आहेत. दुर्दैवाने यात महिला व मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याची अधिकृत आकडेवारी कधीही उपलब्ध होत नाही.
हे ही वाचा –
- दिवाळी साजरी करण्यासाठी फटाके फोडण्याची खरंच गरज असते का? वाचाच…
- दिवाळीत फटाके उडवावेत की नाही याचं उत्तर तुम्हाला या गावांत मिळेल..!
सगळा प्रकार सर्वसामान्य फटाक्यांचे समर्थन करणारा विचारही करू शकत नाही इतके भयानक आहे. दोष समर्थन करणारे यांचा नाही. कारण ही भयानक वस्तुस्थिती त्यांना ज्ञातच नाही. ज्या दिवशी ही बाब फटाके समर्थक प्रत्यक्षात पहातील, समजून घेतील त्या दिवशी ते फटाक्यांचे समर्थन बंद करतील हे निश्चित.
कोणताही हिंदू कधीही मेलेल्याच्या वा मरणार्याच्या टाळूवरील लोणी गोड असतं असं म्हणू शकत नाही.
सन २००४ सालातील डिसेंबरात मी पुढील वर्षाची ऑर्डर देण्यासाठी शिवकाशीस गेलो होतो. तोपर्यंत पत्रकारीता करू लागल्याने दुनियादारी समजायला लागली होती. आतापर्यंत समोर असूनही न दिसणारे सामाजिक प्रश्न समोर दिसायला, कळायला लागले होते.
शिवकाशीतल्या त्या चार दिवसांनी फटाका इंडस्ट्रीच्या काळ्या बाजू बद्दल खुप काही दाखवलं – शिकवलं. सर्वच सहनशक्तीच्या पलिकडचं होतं.
“जे आपल्या मनाला पटत नाही ते कधीही करायचं नाही.. मग काय वाट्टेल ते होऊ दे” हे धोरण माझं पहिल्यापासून फिक्स आहे.” कायद्याचं काय हो ठरवलं तर अनेक मार्ग कायदा न मोडता अगदी कायदेशीररित्या काढता येतात.” पण करायचाच नाही हा प्रकार.. शक्यच नाही ते.. तर विचारच का करा?
हा सर्व फटाक्यांचा फाटका प्रकार पाहिल्यावर खरंतर ताबडतोब हा सर्व प्रकार बंद करावा असे वाटले. वय लहान होतं तितकी समज नव्हती. काहीतरी करायला हवं याने भडकलो होतो. दोन चार लोकांना हे बंद करा वगैरे उपदेश – धमकी – बिमकी देऊन अखेर ऑर्डर न देताच घरी परतलो.
घरी बाबांनी मला समजावल्यावर मग आपल्या पुरता मी निर्णय घेतला आणि फटाक्यांचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद केला. एकटा काय करू शकतो हा विचार न करता आपण वैयक्तिक दृष्ट्या खुप काही करू शकतो हेच खरं. तेच मी ही केलं.
जोवर सर्वकष फटाक्यांच्या उत्पादनावर बंदी येत नाही तोवर हे असेच चालणार. दिवाळी हा आनंदाचा मोठा सण आहे हे निश्चित परंतु तो आनंद कोणाच्या जीवावर उठणारा नसावा इतकेच..
फटाकाबंदीला केवळ ध्वनी वा वायू प्रदूषण या बाबीवर नक्कीच समर्थन नाही. कारण असे प्रदूषण करणारे इतरही अनेक उद्योग व प्रकार आहेत. फटाकाबंदीचं स्वागत आहे ते केवळ निष्पाप लहानमोठ्या जीवांच्या अकाली कोमजणार्या आयुष्यासाठी..
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.