गुगलमधील जबरदस्त नोकरी सोडून हा पठ्ठ्या लोकांना श्रीमंत होण्याच्या टिप्स देत सुटलाय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गुगल, ऍपल, मायक्रोसॉफ्ट ह्यासारख्या कंपन्यांमध्ये काम करायला मिळणं हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेऊन, अनेक स्पर्धा परीक्षा पार करून चांगल्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळवणे हे ध्येय अनेक तरुण ठेवतात.
त्यासाठी मेहनत घेतात. चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली की मोठ्या कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट मिळवणे ह्यासाठी जीवतोड मेहनत घेतात. पण काही आउट ऑफ द बॉक्स विचार करणारी माणसं मात्र जगाच्या दृष्टीने वेडी ठरतात.
आता कोणी गुगलसारख्या कंपनीत मिळालेला चांगला जॉब सोडून एखाद्या स्टार्टअपच्या मागे लागत असेल तर त्याला लोक काय म्हणतील?
पण ऍडम नॉर नावाच्या व्यक्तीने मात्र ही करामत करून दाखवली आहे. गुगलमधील जबरदस्त नोकरी सोडून हा माणूस एका ऍपद्वारे लोकांना श्रीमंत होण्याच्या टिप्स देत सुटलाय.
ऍडम म्हणतो की ,
“मी गुगलमध्ये चांगल्या पोस्टची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या अनेक मित्रांना वाटले की मला वेड लागलेय. ही नोकरी मी सोडली कारण मला लहान मुले व त्यांच्या पालकांना पैश्यांच्या प्लॅनिंगविषयी जागरुक करायचे होते.
कदाचित माझ्या मित्रांचे म्हणणे योग्यही असेल. हा जॉब सोडणे हा वेडेपणा असू शकेलही. पण लहान मुलांना आर्थिकदृष्टया साक्षर बनवेल असे एक सर्जनशील आणि आकर्षक ऍप तयार करणे कठीण आहे पण ते तितकेच अतिशय आवश्यक व महत्वाचे आहे.
अजूनही बऱ्याच शाळांमध्ये मुलांना पर्सनल फायनान्सविषयी काहीच शिकवले जात नाही. म्हणूनच लहान मुलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करणे हे माझे ध्येय मी ठरवले. ”
ऍडमने “पेनीबॉक्स” ची स्थापना करताना एक साधे परंतु धाडसी ध्येय ठेवले होते. ते म्हणजे लहान मुलांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या जागरूक करणे. ऍडम सांगतो की,
“ह्या ऍपसाठी कोडिंग करण्याआधी मी शेकडो पालकांना भेटलो आणि त्यांना विचारले की, तुम्ही तुमच्या मुलांना आर्थिक ज्ञान देता का? आणि जर तुम्ही त्यांच्यात त्याविषयी जागृती निर्माण करत असाल तर त्याचा काही परिणाम बघायला मिळतो का?”
ह्याबद्दल ऍडमला अतिशय धक्कादायक उत्तर मिळाले की,
सर्वच पालकांना वाटते की आपल्या मुलांच्या भल्यासाठी त्यांना आर्थिक शिक्षण देणे आवश्यक आहे. परंतु फार थोडे पालक आर्थिक नियोजनाविषयी घरात, मुलांसमोर किंवा त्यांच्याबरोबर चर्चा करतात. अनेक पालकांना मुलांना ह्याविषयीचे काय व कसे ज्ञान द्यावे हा प्रश्न पडतो.
ऍडम सांगतो की त्याच्या आई वडिलांनी त्याला लहानपणापासूनच आर्थिक शिक्षण दिले. जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याच्या पालकांनी त्याला एक पुस्तक दिले ज्यात पैसे कमावण्याचे व वाचवण्याचे रंजक मार्ग दिले होते.
ऍडमने ते पुस्तक वाचले. पैसे वाचवण्याचे व योग्य प्रकारे खर्च करण्याचे महत्व त्याला तेव्हापासून पटले. ऍडम म्हणतो की ,
“मी लकी होतो कारण माझ्या आईवडिलांनी वेळात वेळ काढून माझ्यासाठी ते पुस्तक आणले. तसेच मी ते पुस्तक वाचावे आणि मला ते समजावे ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच त्या पुस्तकातील गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी मला विविध प्रकारे प्रोत्साहन दिले. ह्याला “लर्निंग बाय डुईंग” असे म्हणतात.”
ऍडमचे आईवडील त्याला लहान सहान मदत केल्याबद्दल, घरातील काही कामे केल्याबद्दल बक्षीस म्हणून थोडेफार पैसे देत असत. त्यामुळे त्याला प्रोत्साहन मिळत असे.
जे त्याने त्या पुस्तकात वाचले ते त्याला प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवायला मिळाले. ह्याने त्याला आयुष्यातील महत्वाच्या बाबींचे म्हणजेच बजेट व सेविंगचे सखोल ज्ञान मिळाले.
ज्या मुलांना हे सगळे आर्थिक व्यवहार घरात शिकता येत नाही त्यांना ते सगळे शाळेत शिकवले गेले पाहिजे असे ऍडमचे मत आहे. परंतु सहसा असे घडत नाही. फार थोड्या शाळांमध्ये मुलांना आर्थिक व्यवहारांचे तसेच बचतीचे ज्ञान मिळते.
ह्या महत्वाच्या विषयाबद्दल भावी पिढीत अज्ञान राहिल्यामुळे त्याची किंमत समाजाला चुकवावी लागते. आताच्या हायटेक युगात ही समस्या सोडवणे काही कठीण नाही कारण आपल्या मदतीला आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे.
पेनीबॉक्स ह्या ऍपद्वारे ऍडम लहान मुले तसेच मोठ्यांनाही काही टिप्स देणार आहे. त्या म्हणजे
१. काम करताना त्याचा खरा मोबदला मिळवा
ऍडम सांगतो की, “जेव्हा मी हाय स्कुल मध्ये होतो तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी जॉब केला. मला साफसफाई करण्याची जबाबदारी देण्यात आली होती आणि त्याबदल्यात मला थोडेफार पैसे मिळत असत. प्रत्येक तासाप्रमाणे पैसे मिळत होते. तेव्हाच मला पैश्यांची किंमत कळली.
जितके जास्त तास काम तितका जास्त मोबदला असे गणित मला कळले. मी रोज अंदाजे २५ डॉलर्स कमवत असे. तो जॉब केल्यानंतर मी वस्तूंची मग ते खाद्यपदार्थ, कपडे, प्रवासाचे भाडे आणि शिक्षणाचा खर्च ह्यांची किंमत बघायला शिकलो.
पैश्यांबाबतीत माझा एक वेगळाच दृष्टिकोन तयार झाला. त्या खर्चाचा मी केवळ पैश्यांच्या बाबतीतच नाही तर वेळेच्या संदर्भातही हिशोब करायला शिकलो. असा विचार पैसे कमावण्याआधी मी कधीच केला नव्हता. स्वत: मेहनत करून, काम करून पैसे कमवायला लागल्यानंतरच मला पैश्यांची किंमत कळली.”
–
- “खरकटे मौल्यवान आहे” हे शिकवणारा वेगळ्या वाटेवरचा इंजिनियर
- खिशात पैसे टिकत नाहीत? या “हमखास” यशस्वी होणाऱ्या टिप्स वापरून स्मार्ट बचत करा
–
२. बचत करा
शीतयुद्धाच्या काळात रशियाचे माजी नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांना सोव्हिएत अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यांनी “चांगली आहे” असे संक्षिप्त उत्तर दिले. जेव्हा त्यांना हे उत्तर अधिक स्पष्ट करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी “फारशी चांगली नाही” असे उत्तर दिले.
पैश्यांची बचत करणे हे महत्वाचे आहे का असा प्रश्न जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा त्याचे उत्तर सगळे लोक “होय” असेच देतात. परंतु प्रत्यक्षात किती लोक बचतीला महत्व देऊन खरंच बचत करतात? आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी पैश्यांची बचत करणे अतिशय आवश्यक आहे.
३. गुंतवणूक
पैसे नुसते वाचवून चालत नाही तर त्यांची योग्य प्रकारे गुंतवणूक करणे सुद्धा आवश्यक आहे. साठलेला पैसा हा वाढला पाहिजे. गुंतवणूक ह्यासाठी उत्तम मार्ग आहे.
४. विचारपूर्वक खर्च करणे
पैसे मिळाले की आधी ते वाचवणे, मग त्यांची गुंतवणूक करणे आणि शेवटी उरलेला पैसा योग्य प्रकारे खर्च करायला शिकले पाहिजे. तुम्हाला काय हवे आहे ह्यापेक्षा तुम्हाला कशाची आवश्यकता आहे हे बघून मगच त्यावर खर्च करायला हवा.
इच्छा व गरज ह्या दोन गोष्टींत फरक ओळखून त्याप्रमाणे खर्च करणे ज्याला जमते तो वायफळ खर्च कधीच करत नाही व त्याला बचत करणे सोपे जाते. खर्च करताना पूर्ण विचार करून मगच करावा.
५. दान करणे
आपल्या संस्कृतीत सत्पात्री दानाला फार महत्व आहे. दान हे पुण्याचे काम समजले जाते. लहान वयातच मुलांना घरातूनच सत्पात्री दानाचे महत्व कळले तर पुढे जाऊन त्यांनाही समाजाचे ऋण फेडण्याचे भान राहते. दानाचे महत्व लहान वयातच कळणे आवश्यक आहे.
पेनीबॉक्सच्या माध्यमातून ऍडम नॉर लहान मुलांमध्ये पैसे कमवणे, बचत , गुंतवणूक, पैसे योग्य प्रकारे खर्च करणे व काही प्रमाणात पैसे दान करणे ह्याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे.
“लहान आहे तो, त्याला पैश्यांचं काय कळतं ?” हा दृष्टिकोन सोडून देऊन “लहान आहे तो, त्याला आतापासूनच आर्थिक व्यवहारांबद्दल शिकवायला हवं” असा दृष्टिकोन बाळगणे ही आता बदलत्या काळाची गरज आहे.
–
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.