टीप टीप बरसा पानी… : रविना नामक पिवळ्या साडीत भिजलेल्या मेनकेची चिरतरूण आठवण…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
तुम्ही जर चित्रपटवेडे आणि नव्वदच्या दशकाचे फॅन असाल, तर या गोष्टी अजून प्रकर्षाने आठवतील. १९९४ चा काळ. मुकुल आनंदच्या अग्निपथ, हम, खुदा गवाह वगैरेचा अपवाद वगळता अमिताभ बच्चनची जादू तशी ओसरली होती.
एका बाजूला सनीचे मारधाडपट चालू झाले होते, तर गोविंदा-डेव्हिड धवन मंडळी धुमाकूळ घालण्यास सज्ज झालेली.
आमिर- सलमान खानचा उदय होऊन पाच-सहा वर्षे उलटून गेलेली, शाहरुखने त्यामानाने उशिरा पदार्पण करूनही दोन-तीन वर्षातच दिवाना, बाजीगर, अंजाम, राजू बन गया जंटलमेन, डर या चित्रपटात दोघांना तगडी टक्कर दिली होती.
या पार्श्वभूमीवर १९९४ साल उजाडलं.
या वर्षात ज्या चित्रपटाने सर्वात जास्त धुमाकूळ घातला होता तो होता ‘हम आपके हैं कौन’. जिकडे तिकडे त्याचे पोस्टर्स, थिएटर्सवर, घरातल्या बच्चेकंपनीपासून, आज्जी-आजोबापर्यंत अख्खा गोतावळा घेऊन जाण्याचे क्रेडिट या सिनेमाला मिळायला हवे.
त्यानंतर अशा सिनेमांची एक नकोनकोशी गर्दी झाली. इतकी की कंटाळा येऊ लागला, हा पुढचा भाग.
पण दुसरी बाजू आशीकी, ‘हम आपके हैं कौन’ च्या तडाख्यात बरेच चित्रपट कमी चालले, तरीही काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरून त्यातही बाजी मारली आणि तोडीस तोड मुकाबला करत तग धरून राहिले.
क्रांतिवीर, राजाबाबू, दिलवाले, सुहाग, लाडला, मैं खिलाडी तू अनाडी, ये दिल्लगी, विजय पथ ही काही नावे. याशिवायही एक नाव होतं, जे सर्वांना पुरून उरलं होतं आणि ‘हम आपके हैं कौन’ च्या खालोखाल आपली जागा पक्की करून उभं होतं –
ते नाव म्हणजे ‘मोहरा’.
मोहरा बऱ्याच अर्थाने लक्षात राहिला. एक मल्टिस्टार ब्लॉकबस्टर म्हणून. अक्षय कुमारचा खिलाडीनंतरचा एक दमदार कमबॅक म्हणून.
त्याच दरम्यान अक्षय आणि सुनिल शेट्टी यांची जोडी ‘वक्त हमारा हैं’ मधून उदयाला आलेली, त्यांचा बहुदा दुसरा चित्रपट म्हणून..!
नसिरुद्दीन शाहचा ट्विस्टेड निगेटिव्ह रोल म्हणून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे –
रविना टंडनच्या मादक ‘टीप टीप बरसा पाणी’ साठी.
एकंदर पाहिलं तर अभिनेत्रींमध्ये श्रीदेवी, माधुरी, जुही यांनी नव्वदच्या दशकाची जोरदार सुरुवात केली. मनीषा कोईराला, काजोल यांनीही आपले नशीब आजमवायला सुरुवात केलेली, त्यात रवीनाही तशी नवखीच.
पण या गाण्याने भर पावसात आग लावली होती, लोकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. नव्वदच्या दशकाबद्दल बोलायचे झाल्यास रवीनाचे हे गाणे कदापी विसरून चालणार नाही.
आत्ताच्या काळात जसे मुन्नी, शीला, लैला, रजिया, सुल्ताना, फलाना, ढीकाना, शेंगदाणा, फुटाना अश्या ललना आयटम डान्स करतात, त्यावेळी हे असले प्रकार कमी असायचे.
या सगळ्या बया आणि त्यांची ढीगभर गाणी एकीकडे, आणि या सगळ्या जणी झक मारतील अशी, त्या काळातील काही मोजकी सुमधुर गाणी एकीकडे.
मग ते आपण अगदीच हाफ पॅन्ट घालून फिरायचो तेव्हाचे ‘मिस्टर इंडिया’ तले ‘काटे नही कटते ये दिन ये रात..’ असो, दिल धडकन, प्रेम वगैरे गोष्टी हळू हळू कळायला लागलेल्या तेव्हाचे ‘बेटा’ मधले ‘धक धक करने लगा’ असो किंवा नेमक्या वयात आग लावणारे ‘मोहरा’ मधले ‘टीप टीप बरसा पानी..’ असो, या गाण्यांचे पद अढळ आहे.
अस्मानी निळ्या साडीतली श्रीदेवी, हृदयाचे ठोके चुकवणारी माधुरी आणि पिवळ्या साडीतली रविना, या तिघींशिवाय नाइंटीजचा उल्लेख करणं म्हणजे मिठाशिवाय पंचपक्वानांचं कौतुक करण्यासारखं आहे.
अजून एक जमेची बाजू म्हणजे इथे कुठेही बटबटीतपणा नाही, अंगप्रदर्शन नाही. उत्तेजक वाटत असलं तरी अश्लील नाही.
हे सगळं जमून येण्याचं अजून एक कारण म्हणजे, पडदयावर दिसणारी दोघांमधली अप्रतिम केमिस्ट्री.
नाही म्हटले तरी, अनिल-श्रीदेवी, अनिल-माधुरी आणि अक्षय-रविना यांच्या अफेयरच्या चर्चा रंगलेल्या आहेतच. म्हणून या जोड्या पडद्यावर सहज सुंदर वाटत राहतात, खऱ्याखुऱ्या वाटत राहतात.
तसे पाहिले तर, श्रीदेवी आणि माधुरीला डान्स, अदा, एक्सप्रेशन्स आणि एलेगन्सच्या बाबतीत कुणी टक्कर देऊ शकत नाही.
तरीही आमच्या पिढीच्या मनातलं ‘टीप टीप बरसा पाणी’ तल्या पिवळ्या साडीतल्या रविनाचं स्थान या दोघींच्याही वरचं आहे.
याचं कारण म्हणजे, त्या काळात श्रीदेवी आणि माधुरी दोघींचीही चलती होती, शिवाय दोघींनीही आपली पात्रता सिद्ध केली होती.
स्वतःच्या केवळ असण्याने साधारणसे गाणेही विशेष बनवून टाकण्याची कला दोघींना अवगत होती.
रविनाचे मात्र असे काही नव्हते.
‘टीप टीप’ येईपर्यंत रविनाचा कुठलाही ब्लॉकबस्टर सिनेमा आला नव्हता, तिचं कुठलंही फॅन फॉलोईंग नव्हतं. एकंदर ‘टीप टीप’ तिच्या नावावर चालावं अशी कुठलीही परिस्थिती नव्हती. तरीही त्या गाण्याने त्या वेळेस धुमाकूळ घातलेला.
दुर्दैवाने, एक दोन अपवाद वगळता रवीनाचे लक्षात राहतील असे चित्रपट त्याच्या नंतरही आले नाहीत.
रवीनाचे अख्खे करियर एका बाजूला आणि ‘टीप टीप बरसा’ हे गाणे दुसऱ्या बाजूला, ही एक अर्थी तिच्या कामाची दादच म्हणायला हवी.
घरच्यांसोबत ‘हम आपके हैं कौन’ पहायला जाऊन संस्काराचे धडे गिरवायला लावणाऱ्या आमच्या पिढीला जर विश्वामित्राची उपमा दिली तर, पावसात भिजणाऱ्या पिवळ्या साडीतली रवीना ही मेनका होती. प्रत्येकाला हवीहवीशी, स्वप्नवत वाटणारी. आणि त्या मेनकेची जादू आजही तसूभर कमी झालेली नाहीये, हेही तितकेच खरे.
आजही ते गाणं पाहताना प्रत्येक जण छत्री घेऊन उभा असणाऱ्या अक्षय कुमारच्या जागी स्वतःला पाहत असणार.
आपल्याला आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातली एखादी आठवण, क्षण, प्रसंग परत एकदा मागे जाऊन रिविझिट करावा, असं वाटतं पण हे शक्य नसतं.
याबाबतीत आपण खरंच सुदैवी आहोत.
जुने आवडते चित्रपट, अशी प्रिय गाणी लुपवर टाकून कधीही पाहू शकतो आणि नॉस्टॅलजीक होऊ शकतो.
या गाण्याचा उल्लेख झाल्या झाल्या, सुरुवातीला वाजणारी सिग्नेचर ट्यून आपसूक मनात वाजली नाही, तर तुम्ही नाइन्टीज फॅन नाही, असेच म्हणावे लागेल.
त्यामुळे, हे गाणे परत पाहून नॉस्टॅलजीक होना तो बनता हैं बॉस.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.