अपघातात पाय गमावूनदेखील “सैराट” नाचणारा जावेद, तुमच्यातील लढवैय्या जागा करतो
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कधी कधी अशी फेज येते की आपण जे करू त्यात आपल्याला अपयश येते. काहीही मनासारखे होत नाही. सर्व प्रयत्नांना खीळ बसते. आयुष्याला काही अर्थच उरला नाही अशी नकारात्मक भावना मनात डोकावू लागते. ह्या अतिशय कठीण अश्या बॅड पॅच मधून जाताना काही वेळा असे वाटते की कशाला काही अर्थच नाही.
सगळे सोडून ह्या सगळ्यापासून कुठेतरी लांब निघून जावे, किंवा टोकाचे नैराश्य आल्यास आयुष्य संपवण्याचाही विचार डोक्यात येतो.
अशा वेळी मनाला उभारी आणण्यास खूप प्रयत्न करावे लागतात. शून्यातून सर्व उभे करण्याची प्रेरणा मिळणे आवश्यक असते.
लहान सहान कारणांसाठी देवाने दिलेले सुंदर धडधाकट शरीर त्यागून जीव देण्याचा विचार करण्याऱ्यांनी पुण्यातील एका तरुणांकडून प्रेरणा घेऊन आयुष्य नव्याने सुरु करायला हवे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका तरुणाचा एकाच पायावर झिंगाट ह्या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जावेद चौधरी असे ह्या तरुणाचे नाव असून जावेद पुण्याचा रहिवासी आहे.
जावेदला सर्व व्यवहार करताना एकाच पायावर सर्व मॅनेज करावे लागते कारण त्याला दुसरा पाय नाही. एका अपघातात त्याला एक पाय गमवावा लागला. मनातील आंतरिक इच्छा तीव्र असली तर आपल्याला मार्गही मिळवता येतो हे जावेदने सिद्ध करून दाखवले आहे. त्याच्या आयुष्यातून अनेकांना प्रेरणा मिळू शकेल.
नुकतेच जावेदने एका मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन केवळ एका पायावर १० किलोमीटरचे अंतर पूर्ण करून दाखवले. ही हाफ मॅरेथॉन पुण्यात आयोजित करण्यात आली होती.
ह्या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन जावेदने हे अंतर केवळ एका पायावर यशस्वीरित्या पूर्ण केले आणि त्या आनंदात नंतर झिंगाट गाण्यावर एका पायावरच उत्स्फूर्तपणे नाचून हा आनंद साजरा केला. ह्याच नाचाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे.
२४ वर्षीय जावेद चौधरी हा मूळचा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणारचा आहे. त्याचे वडील हे शेतकरी व दूध उत्पादन व विक्रीचा व्यवसाय करतात.
त्याची आई गृहिणी आहे. एकत्र कुटुंबातून आलेल्या जावेदने विज्ञान शाखेचे शिक्षण घेतले आहे. तो सोडल्यास त्याच्या कुटुंबातील इतर कुणीही विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेले नाही. तो शिक्षणासाठी औरंगाबादला आला. आणि तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ साली कृषीविज्ञान पदवीचा अभ्यास करत असताना एका दुर्घटनेत त्याला एक पाय गमवावा लागला.
तीन वर्षांपूर्वीची ईद जावेदसाठी आनंद नाही तर दु:ख घेऊन आली. रमझानमाच्या महिन्यात सणासाठी घरी गेला असताना तो व त्याचा मित्र एका कामासाठी बाईक वरून जात असताना त्याचा व त्याच्या मित्राचा दुर्दैवी अपघात झाला.
अपघात झाल्यानंतर त्याला जवळ मोठे चांगले हॉस्पिटल नसल्याने त्याच्यावर वेळेत आवश्यक ते उपचार न झाल्याने त्याचा पाय डॉक्टरांना कापावा लागला.
परंतु इतकी कठीण परिस्थिती ओढवली असून सुद्धा तो नकारात्मक विचारांच्या आहारी गेला नाही. त्याने डिप्रेशन स्वतःजवळ फिरकू दिले नाही. ह्या भयानक अनुभवामुळे तो डगमगला नाही उलट मनात आशेची ज्योत कायम ठेवून त्याने शिक्षण पूर्ण केले. सहा महिन्यातच त्याने आपले आयुष्य पुन्हा नव्याने सुरु केले.
हैद्राबादला एका कॅम्पसाठी गेला असताना तिथे त्याला स्पायनल कॉर्ड इंज्युरी झालेले अनेक लोक भेटले ज्यांना अपंगत्व येऊन अनेक वर्ष लोटली होती.
जावेदचा “जिंदा दिल” ऍटिट्यूड बघून त्यांनी जावेदला विचारले की त्याचा अपघात होऊन किती काळ लोटला आहे? तेव्हा जावेदने उत्तर दिले की,
“मी ह्या क्षेत्रात तुमच्यापेक्षा नवीन आहे!”
तेव्हा त्याला त्या लोकांनी विचारले की,
“मग तू इतका खुश कसा राहतोस? तुला दु:ख होत नाही का?”
जावेदने सांगितले की ती माणसे अपघातानंतर दहा दहा वर्षे घरातून बाहेरच पडली नाहीत. मग त्यांना आश्चर्य वाटले की जावेद केवळ सहाच महिन्यात कसा ह्यातून बाहेर पडला? त्यावर जावेदने उत्तर दिले की,
“खुश राहण्यासाठी कुठली विशिष्ट वेळ लागते का? मी असाच आहे. मी स्वतःला आहे तसे स्वीकारले आहे. हे आयुष्य मी एन्जॉय करतो आहे. आता जर मी दोन पायांवर नाचलो असतो तर कुणी माझ्याकडे लक्ष दिले असते का? मी काहीतरी वेगळे केले म्हणूनच लोकांनी माझ्याकडे बघितले. मी हे ऍडव्हान्टेज समजतो. डीसऍडव्हान्टेज नाही. “
केवळ एका पायाच्या जोरावर तो बाईक स्टंट तसेच रॅपलिंग सुद्धा शिकला. जावेदला संगीतात रस आहे. तो उत्तम गिटार वाजवतो. तसेच त्याला पूर्वीपासूनच नृत्यात रस असल्याने त्याने नृत्याचे प्रशिक्षण देणारी संस्था सुद्धा सुरु केली. तसेच इतर कामे सांभाळून त्याने चेअर बास्केटबॉल खेळणे सुद्धा सुरु केले.
हे सर्व ऐकूनच थक्क व्हायला होते. सामान्य धडधाकट माणसे सुद्धा इतके करू शकत नाहीत किंवा स्वतःमध्ये क्षमता असून सुद्धा नकारात्मक विचारांच्या आहारी जाऊन स्वतःचा आत्मविश्वास कमी करवून घेतात आणि स्वतःला पुश करत नाहीत. मात्र जावेदने मात्र इच्छाशक्तीच्या जोरावर अमाप कष्ट करून हे सर्व साध्य केले.
खरे तर ही दुर्घटना घडण्याआधी त्याला चेअर बास्केटबॉल ह्या खेळाचे नाव सुद्धा माहित नव्हते. परंतु आता मात्र त्याने ह्या खेळात इतके प्राविण्य प्राप्त केले आहे की ह्या खेळात आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करणार आहे.
गेली दोन वर्ष तो दिल्ली टीमचा कॅप्टन होता. ह्यावर्षी तो महाराष्ट्राकडून खेळला.
सुरुवातीला त्याने ह्या खेळाचा कॅम्प अटेंड केल्यानंतर त्याला दिल्ली, पंजाब, हरियाणा व महाराष्ट्र अश्या चार संघांकडून खेळण्याची ऑफर मिळाली होती. त्याने दिल्ली संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला कारण त्याला खेळाबरोबरच सिव्हिल सर्व्हिस करायची होती आणि दिल्लीत राहून ते करणे त्याला सोपे जाणार होते. नंतर आता तो महाराष्ट्र संघाकडून खेळतो आहे.
नुकत्याच झालेल्या नॅशनल लेव्हल टूर्नामेंटमध्ये त्याने अतिशय चमकदार कामगिरी केली व तो त्या टुर्नामेंटचा “मॅन ऑफ द सिरीज” ठरला.
त्याच्याकडे स्वतःची व्हीलचेअर सुद्धा नाही. स्पोर्ट्सची व्हीलचेअर खूप महाग असते. त्यासाठी तो सध्या एखाद्या स्पॉन्सरच्या शोधात आहे. आजच्या घडीला तो देशातला सर्वात चांगला खेळाडू आहे. जर त्याला हवी असलेली व्हीलचेअर मिळाली तर जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनण्याचे त्याचे स्वप्न आहे.
खरं तर जयपूर फूट मुळे तो परत सामान्य आयुष्य जगू शकेल परंतु त्याला त्याची परिस्थिती माहित आहे. त्याला जाणीव आहे की त्याचे वडील अतिशय सामान्य परिस्थिती असून देखील त्याचा राहण्याचा, मेसचा तसेच लायब्ररीचा खर्च करीत आहेत.
हे आर्टिफिशियल लिम्ब अतिशय महाग असतात. आपल्या वडिलांना अधिक खर्चात टाकण्याची त्याची मुळीच इच्छा नाही.
म्हणूनच तो ह्याचा विचार देखील करत नाही कारण त्याला त्याच्या वडिलांवर अधिक भार टाकण्याची इच्छा नाही. मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून , महागडी गाडी घेऊन दिली नाही म्हणून निराश होऊन आयुष्य संपवण्याचा अतिरेकी व आततायी निर्णय घेणाऱ्या बालिश तरुणांनी जावेदचे उदाहरण समोर ठेवायला हवे.
अश्या भयावह दुर्घटनेला सामोरे गेल्यानंतर किंवा एखादे अपयश आल्यानंतर आपल्यासारख्या सामान्य व्यक्ती काय करतील? आपण नशिबापुढे हार मानू. आपली जगण्याची इच्छाच संपेल व आयुष्यभर केवळ मरणाची वाट बघत आपण एक एक दिवस नाईलाजाने ढकलू.
परंतु जावेद मात्र असा विचार करत नाही हाच त्याच्यातील व आपल्यातील फरक आहे.
आपण लहान सहान गोष्टींनी निराश होऊन नशिबाला दोष देऊन प्रयत्न करणेच सोडून देतो. परंतु जावेद मात्र असामान्य तरुण आहे. तो असा विचार करतो की ती दुर्घटना म्हणजे त्याच्या आयुष्यातील दुर्दैवी घटना नसून एक महत्वपूर्ण घटना आहे. जावेद म्हणतो की,
“जर तुम्हाला आयुष्य संपल्यानंतर सुद्धा सर्वांच्या आठवणींत कायम स्थान मिळवायचे असेल तर त्यासाठी कठीण परिश्रम आवश्यकच आहेत.”
कठीण परिश्रम करणे हाच जावेदच्या आयुष्यातील मंत्र आहे.
जावेदने मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यामागे सुद्धा एक रंजक कथा आहे. मॅरेथॉनच्या आयोजकांनी जावेदला संपर्क करून ह्या मॅरेथॉनची माहिती दिली. चेअर बास्केटबॉलच्या सरावामुळे मॅरेथॉनसाठी पळण्याचा सराव करणे त्याला शक्य झाले नाही. एक दिवस सुद्धा त्याला पळण्याचा सराव करता आला नाही.
तरीही त्याने ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या ह्या मॅरेथॉनमध्ये १० किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले.
ह्या हाफ मॅरेथॉनचा तो अँबॅसिडर होता. मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतरचा आता त्याचा हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक त्याला भेटण्यास उत्सुक आहेत.
गेली तीन वर्षे जावेदने आपल्या आयुष्यात दुर्घटनेला सामोरे जाऊन सुद्धा अनेक सकारात्मक बदल केले आहेत.
खेळाबरोबरच तो एमपीएससी व यूपीएससीची तयारीदेखील करतो आहे. हे बदल बघून जावेद म्हणतो की
“आपल्याला एकदाच मनुष्य जन्म मिळतो ,म्हणूनच जो जन्म मिळाला आहे त्यातच आपण अधिकाधिक चांगले अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”
नियतीने केलेल्या अन्यायातून मार्ग काढून अनेकांसाठी प्रेरणादायी आयुष्य जगणाऱ्या जावेदला खरंच हॅट्स ऑफ!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.