आणि तथाकथित स्त्रीवाद्यांची स्त्रीला वस्तू समजण्याची विकृती उघडी पडलीये…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
काही दिवसांपूर्वी तनुश्री दत्ता ह्या माजी अभिनेत्रीने दिग्गज अभिनेते नाना पाटेकर ह्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करून सगळीकडे खळबळ उडवून दिली. ह्यानंतर अनेकांनी नानांना पाठिंबा दिला तर अनेकांनी तनुश्री दत्ताच्या बाजूने उभे राहणे पसंत केले.
बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी मात्र ह्या प्रकरणावर मौन बाळगणे पसंत केले आहे.
खरे काय खोटे काय हे काळाच्या ओघात प्रकाशात येईलच. ह्या प्रकरणानंतर अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.
माजी न्यायमूर्ती व तथाकथित स्त्रीवादी असलेले बी.जी.कोळसे पाटील ह्यांच्यावर एका महिलेने असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. ह्या आधी अनेकदा कोळसे पाटील ह्यांनी मीडियामध्ये सनसनाटी वक्तव्ये केली आहेत. एका विशिष्ट्य जाती संदर्भात व संघाविरुद्ध त्यांनी अतिशय आक्रमक भाषा वापरून आगपाखड केलेली सर्वांना आठवत असेलच.
हे सगळे त्यांनी ह्या “सेक्स स्कँडल” च्या विरोधात स्वतःसाठी ढाल म्हणून तर केले नसेल ना हा प्रश्न पडतो.
पत्रकार संध्या मेनन ह्यांनी ह्या पीडित महिला पत्रकाराच्या अन्यायाला वाचा फोडली आहे. अनेक महिला पत्रकारांना आलेले अनुभव त्यांनी ट्विट केले आहे. कोळसे पाटील ह्यांनी त्या महिला पत्रकाराशी कश्या प्रकारे असभ्य वर्तन केले हे ह्या ट्विटमधून समजते. ही पत्रकार महिला जेव्हा कोळसे पाटलांची मुलाखत घेण्यास त्यांच्या घरी गेली तेव्हा बाहेर खूप गर्दी होती.
त्यामुळे मुलाखत घेण्यासाठी ती त्यांच्यासह त्यांच्या घरात गेली. मुलाखत संपली तेव्हा ही महिला खुर्ची उचलून ठेवत असताना ती पाटलांना चुकून लागली.
ह्यासाठी ह्या महिलेने तात्काळ पाटलांना सॉरी म्हणून दिलगिरी व्यक्त केली आणि ती पाठमोरी वळली तेवढ्यात पाटलांनी ह्या महिलेची कॉलर खेचली व तिला विचारले की,
“तुझ्या कुर्त्याचं वरचं बटण उघडं का ठेवलं आहेस?”
त्यानंतर पाटील त्या महिलेला सॉरी म्हणाले परंतु जे घडले ते ह्या महिलेसाठी अत्यंत धक्कादायक होते. एका माजी न्यायाधिशाकडून असे वागणे अपेक्षित नव्हते.
“आपण मित्र आहोत, मित्र समजून मी असे केले.”
असे पाटलांनी तिला म्हटले व जे घडले ते बाहेर कोणालाही सांगू नको अशी विनवणी सुद्धा वारंवार केली. “इथे जे काही घडले ते तू बाहेर सांगितलेस तर मी संपून जाईन” असेही पाटलांनी तिला म्हटले. ती महिला पाटलांकडून बाहेर पडताच काही क्षणात तिला पाटलांचा फोन आला व त्यांनी तिला धमकावले की त्यांच्या विरोधात तिने कुठेही काहीही वाच्यता करू नये.
A high court judge pic.twitter.com/wiatywrHR9
— Sandhya Menon (@TheRestlessQuil) October 5, 2018
स्वतःला पुरोगामी समजणारे ,सतत हिंदू दहशतवादावर टिप्पण्या करणाऱ्या माजी “न्यायमूर्तींचा” (की अन्यायमूर्तींचा) खरा चेहेरा उघड झाला आहे अर्थात त्यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे असे असभ्य वर्तन करणे न्यायाधीश म्हणून काम केलेल्या माणसास अशोभनीय आहे.
असेच अशोभनीय वर्तन ऑल इंडिया बकचोद (AIB) च्या एका स्टॅन्ड अप कॉमेडियनने म्हणजेच उतसबी चक्रवर्तीने देखील अनेक महिलांबरोबर केल्याचे नुकतेच उजेडात आले आहे.
उत्सव चक्रवर्ती ह्या स्टॅन्ड अप कॉमेडियनने AIB च्या अनेक व्हिडीओजमध्ये काम केले आहे. त्याच्याविरुद्ध अनेक महिलांनी असभ्य वर्तनाची तक्रार केली आहे.
त्याने अनेक अल्पवयीन मुली व महिलांना त्याच्या जननेंद्रियाचे फोटो पाठविल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. तसेच त्याने अनेक मुली व महिलांना न्यूड सेल्फीज पाठवण्याची मागणी केल्याचे आरोप सुद्धा त्याच्यावर झाले आहेत. त्याने हे फक्त “जस्ट प्लेन सेक्स्टिंग” समजून केले असे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या मते न्यूड्स बघून त्याला “इन्स्टंट रश” मिळतो.
परंतु त्याच्या ह्या कृत्याने मात्र अनेक महिलांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. महिलांनी उत्सव चक्रवर्तीकडून आलेले हे घाणेरडे अनुभव एका ट्विटर थ्रेड वर शेअर केले आहेत.
ह्यासंदर्भात AIB च्या तन्मय भटला सुद्धा माहिती होती असे तन्मय भटने मान्य केले आहे. उत्सव चक्रवर्ती संदर्भात सोशल मीडियावर वादळ उठल्याने AIB ने त्याचे सर्व व्हिडीओज काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्सव चक्रवर्तीने ह्या प्रकरणात मनस्ताप झाल्याने माफी मागितली आहे. परंतु नुसते माफी मागून केलेले कृत्य पुसून टाकता येत नाही.
ह्या सर्व गोंधळात नेहेमी स्त्रियांच्या बाजूने लिहिणारा, स्त्रियांना सतत सल्ले देणारा तरुणाईचा आवडता प्रसिद्ध लेखक चेतन भगत सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याचे एका तरुणीबरोबरचा व्हॉट्सऍप वरील वादग्रस्त संवाद उघडकीला आला आहे.
एका ट्विटर युझरने ह्या संवादाचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर अपलोड केले.
ह्यानंतर चेतन भगतने ह्या तरुणीची फेसबुकवरून माफी मागितली आहे. ह्या फेसबुक पोस्टमध्ये चेतन भगतने हे मान्य केले आहे की हे स्क्रीनशॉट्स त्याच्याच संवादाचे आहेत.
हा संवाद काही वर्षांपूर्वी अनुशा ही तरुणी व चेतन भगत ह्यांच्यात झाला होता. चेतन भगतने ह्या तरुणीची माफी मागितली आहे. तो म्हणतो की “मी विवाहित असून देखील तुझ्याबरोबर फ्लर्ट केले ह्यामुळे तुला मनस्ताप झाला असेल तर तुझी मी माफी मागतो.”
चेतन भगतने हे स्पष्ट केले की हा संवाद काही वर्षांपूर्वीचा आहे. तो म्हणतो की,
“मी ह्या व्यक्तीला एक दोन वेळा भेटलो देखील आहे. भेट झाल्यानंतर आमची चांगली मैत्री झाली आणि मला तिच्याशी काहीतरी स्ट्रॉंग कनेक्शन असल्यासारखे वाटले. ती मला अतिशय चांगली व्यक्ती वाटली.ती स्वीट ,क्युट आणि फनी आहे. पण मी विवाहित असल्याने माझा तिच्याशी संवाद साधण्यामागे काही दुसरा हेतू नव्हता.”
–
“मला फक्त एक कनेक्शन जाणवले. कदाचित ही माझी एक फेज असू शकेल. मला असे वाटले की तिलाही हे कनेक्शन जाणवले असावे. परंतु मी मूर्ख आहे कारण असे जाणवणे आणि ते तिच्याशी शेअर करणे सुद्धा चुकीचे आहे. मी ह्या बाबतीत अनुशाशी बोललो आहे.तिची माफी देखील मागितली आहे. मला अंदाज यायला हवा होता पण माझी चूक झाली. मी मैत्रीचा चुकीचा अर्थ घेतला.”
चेतनजी यु टू ? तुमच्यासारखीच अनेक पुरुषांची हीच चूक होते. मुलगी मैत्री म्हणून मोकळेपणाने बोलत असेल तर अनेक पुरुषांचा असाच गैरसमज होतो की मुलगी मोकळेपणाने बोलतेय म्हणजे ती आपल्या प्रेमात पडली आहे किंवा आपण तिला “पटवण्यात” यशस्वी झालो आहोत. भल्याभल्यांचा असा गैरसमज होतो तर सामान्यांची काय कथा?
न्यायमूर्ती असो की कॉमीडियन, लेखक असो की फोटोग्राफर, नेता असो की गायक किंवा अगदी सामान्य व्यक्ती… ह्या सर्वांनी महिलांना गृहीत धरून त्यांच्याशी असभ्य वर्तन केले आहे.
ह्या लैंगिक गैरवर्तनाचा महिलांना किती मनस्ताप होतो हे ह्या लोकांना कळणारच नाही बहुतेक! तथाकथित स्त्रीवाद्यांची स्त्रीला वस्तू समजण्याची ही विकृती जगासमोर आली आहे. कोळसे पाटील तर आरोप फेटाळून लावत आहेत.
इतर दोघांनी नुसती माफी मागून त्या महिलांचा झालेला अपमान, त्यांना झालेला मनस्ताप कमी होणार आहे का?
नंतर माफी मागण्यापेक्षा आधीच विचार करून वागणे सोपे नाही का? भावनेच्या भरात किंवा जाणूनबुजून असे गैरवर्तन करणाऱ्यांना भानावर आणण्यासाठी काहीतरी रामबाण उपाय मिळाला पाहिजे हे नक्की.
तोवर मात्र अजून किती महिलांना हा घाणेरडा अनुभव सहन करावा लागणार आहे ह्याची देवालाच काळजी!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.