आपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर! ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
एखादी व्यक्ती जन्माला येते तेव्हापासूनच क्रूर किंवा विकृत असते का? त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही घटना घडल्याने किंवा काही विपरीत परिस्थिती उद्भवल्यामुळे त्या व्यक्तीच्या मनावर विपरीत परिणाम होऊन किंवा इतर काही कारणांमुळे ती व्यक्ती मानसिक रुग्ण बनते? कधी कधी असे मानसिक रुग्ण विकृत व क्रूर सुद्धा असतात. ते दुसऱ्याचा जीव घेण्याचे अमानुष कृत्य करतात.
पण एखादी व्यक्ती सिरीयल किलर कशी बनते? एखाद्या सामान्य व्यक्तीचा सिरीयल किलर बनेपर्यंतचा प्रवास कसा होतो हे आज जाणून घेऊया.
जेव्हा आपल्या आसपासच्या, आपल्या चांगल्या ओळखीच्या व्यक्तीने खून केलाय हे आपल्याला कळते तेव्हा आपल्याला प्रथम त्यावर विश्वास बसत नाही. एखादी सामान्य दिसणारी, वागणारी व्यक्ती असे कसे काय करून शकते हा विचार आपल्या डोक्यात येतो.
अनेक सिरीयल किलर्स कुणालाही संशय येऊ नये म्हणून सामान्य व्यक्तींप्रमाणेच वागतात, सामान्य व्यवहार करतात. एखादी व्यक्ती सिरीयल किलर आहे किंवा सराईत गुन्हेगार आहे हे ओळखण्याची काहीही ठराविक लक्षणे नाहीत.
पण व्यक्तीच्या वागण्याचे, बोलण्याचे नीट निरीक्षण केले तर एखादी व्यक्ती खुनासारखा गंभीर गुन्हा करू शकेल अशी लक्षणे दिसू शकतात.
टोकाचे अँटीसोशल वर्तन हे मानसिक आजार असल्याचे किंवा व्यक्तीला काही समस्या असल्याचे लक्षण असू शकते. परंतु ह्यावरून सुद्धा आपण अंदाज लावू शकत नाही की अँटीसोशल असलेली व्यक्ती पुढे जाऊन सिरीयल किलर किंवा अपराधी होऊ शकते.
अँटीसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा एक पर्सनॅलिटी डिसऑर्डरचाच एक प्रकार आहे हे डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसॉर्डर्सच्या चवथ्या एडिशनमध्ये प्रसिद्ध झाले आहे. अँटीसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डरने ग्रस्त असलेली व्यक्ती कधीही पश्चाताप किंवा खेद व्यक्त करत नाही.
तसेच ह्या आजाराची आणखी काही लक्षणे म्हणजे खोटे बोलणे (ह्यात पॅटर्न्स असू शकतात), आक्रमक किंवा तापट स्वभाव, बेजबाबदार वर्तन, सामाजिक नियमांचे पालन न करणे ही आहेत.
तसेच तरुणपणी जर दुसऱ्याला दु:ख किंवा त्रास होताना बघून जे एखाद्याला आनंद किंवा मज्जा वाटत असेल तर ती व्यक्ती पुढे जाऊन मानसिक रुग्ण होण्याची शक्यता असते. सिरीयल किलर्सना दुसऱ्यावर संपूर्ण ताबा मिळवण्यात आनंद मिळतो.
तसेच एखाद्याला त्याच्या नकळत खाजगी गोष्टी करताना बघणे ह्यातून अनेक मानसिक रुग्णांना वर्चस्व गाजवल्याची भावना मिळते. ही लक्षणे अनेक सिरीयल किलर्समध्ये लहान वयापासून बघायला मिळतात.
एखाद्या सिरीयल किलर किंवा मानसिक रुग्णाला आग लावण्यात आनंद मिळतो. आग लावून एखादी गोष्ट नष्ट करणं हे मानसिक रुग्णांना आनंद देतं. जर एखाद्या व्यक्तीला आग लावून गोष्टी नष्ट करण्यात मजा येत असेल तर ती व्यक्ती पुढे जाऊन गंभीर गुन्हा करू शकते.
सिरीयल किलर व्यक्ती ओळखण्याचे आणखी एक लक्षण म्हणजे ह्या व्यक्तींना प्राण्यांना मारून टाकण्यात आनंद मिळतो. ह्या व्यक्ती काहीही कारण नसताना प्राण्यांना ठार मारतात. ते कुत्री, मांजरी व इतर प्राण्यांचा शारीरिक छळ करतात, त्यांना विविध प्रकारे टॉर्चर करतात.
प्राण्यांना त्रास होताना बघून, त्यांना दु:खाने विव्हळताना बघून ह्या लोकांना आपल्या कृत्याचा कुठल्याही प्रकारचा खेद किंवा पश्चाताप होत नाही. उलट आनंद होतो. सिरीयल किलर्स लहानपणापासूनच प्राण्यांना त्रास देणे, त्यांना मारणे अशी कृत्ये करतात.
म्हणूनच लहानपणी ही माणसे लहान लहान प्राण्यांना टार्गेट करीत असतात. कारण लहान वयात अश्या व्यक्ती केवळ प्राण्यांवरच आपले वर्चस्व स्थापित करू शकतात. पौगंडावस्थेत जर एखाद्या मुलात किंवा मुलीमध्ये ही लक्षणे आढळून आली तर मोठी होऊन ह्या व्यक्ती अनेक गंभीर अपराध करू शकतात किंवा सिरीयल किलर सुद्धा बनू शकतात.
टेड बंडी हा एक प्रसिद्ध अमेरिकन सिरीयल किलर होता. तो म्हणतो की,
“मला कळत नाही लोकांना मैत्री करायला का आवडते? मला समजत नाही लोकांना एकमेकांविषयी आकर्षण कसे वाटू शकते? मला कळत नाही लोक समाजात कसे काय एकत्र राहू शकतात?
मला कुठल्याही कृत्याचा पश्चाताप होत नाही. ज्या लोकांना आपल्या कृत्याचा पश्चाताप होतो, त्या लोकांची मला कीव येते. मी जगातील सर्वात रुक्ष माणूस आहे. मला कोणाविषयीही काहीही वाटत नाही.” ही सर्व लक्षणे एखाद्या मानसिक रुग्णाची, विकृत माणसाची तसेच सिरीयल किलरची आहेत.
म्हणजेच ह्या लोकांना अत्याचार करण्यात आनंद मिळतो. हे लोक वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. हे लोक भावनाशून्य असतात. आक्रमक व तापट स्वभावाचे असतात आणि ह्यांना कुठल्याच कृत्याचा पश्चाताप होत नाही.
लोक असे का वागतात किंवा ते मानसिक रुग्ण का बनतात हे मात्र अजून कोडेच आहे. हे नैसर्गिक आहे म्हणजे काही लोकांच्या जीन्समध्येच किंवा मेंदूतच दोष असतो का किंवा ह्या लोकांच्या लहानपणापासूनच्या जडणघडणीत काही दोष असतो त्यामुळे हे लोक असे वागतात हे अजून न उलगडलेले कोडे आहे.
ह्या विषयावर मीनेसोटा ट्वीन स्टडी करणारे मीनेसोटा प्रोफेसर ऑफ सायकोलॉजी थॉमस जोसेफ बुचर्ड ज्युनिअर ह्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, सायकोपॅथी ही साठ टक्के अनुवांशिक आहे. म्हणजेच अश्या मानसिक रोगाचे गुणधर्म हे माणसाच्या डीएनए मध्येच असतात.
तसेच नुकत्याच झालेल्या जुळ्यांच्या जेनेटिक्स संदर्भात झालेल्या रिसर्चमध्ये असा निष्कर्ष निघाला आहे की आयडेंटिकल जुळ्या मुलांचे जीन्स सुद्धा एकसारखे नसतात. मूल गर्भात असताना काही म्युटेशन्स होतात आणि काळाच्या ओघात ते वाढत जातात. जुळ्या मुलांमध्ये जेनेटिक फरक तयार होतो. ह्यातून शास्त्रज्ञ असा निष्कर्ष काढतात की सायकोपॅथिक ट्रेट्स हे अनुवांशिक असतात.
पण जर असे असेल तर मग अश्या मानसिक रुग्णाच्या मेंदूमध्ये काहीतरी ऍबनॉर्मलिटी असायला हवी. ह्यावर युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन , मॅडिसन येथे रिसर्च करण्यात आला. ह्यात एका मानसिक रुग्णाचा, विकृती असणाऱ्या व्यक्तीचा मेंदू स्कॅन करण्यात आला.
ह्या स्कॅनमध्ये असे आढळले की गुन्हेगार व्यक्तीच्या किंवा सिरीयल किलरच्या मेंदूमध्ये amygdala म्हणजे मेंदूतील एक सबकॉर्टिकल भाग व वेन्ट्रोमीडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा मेंदूच्या पुढच्या भागातील एक कॉर्टिकल भाग ह्यांच्यातली कनेक्टिव्हीटी कमी असलेली आढळली.
amygdala हा भाग निगेटिव्ह स्टिम्यूलाई म्हणजेच नकारात्मक उत्तेजना प्रोसेस करतो व वेन्ट्रोमीडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (vmPFC ) हा भाग amygdala ह्या भागातील रिस्पॉन्स इंटरप्रीट करतो.
जेव्हा ह्या दोन भागांतील कनेक्टिव्हिटी कमी असते तेव्हा amygdala मधील निगेटिव्ह स्टिम्यूलसचे प्रोसेसिंग एखाद्या तीव्र नकारात्मक भावनेत होऊ शकत नाही. म्हणजेच सायकोपॅथ लोक भावनाशून्य का असतात किंवा त्यांना एखाद्या कृत्याचा पश्चाताप का होत नाही हे ह्यामुळे स्पष्ट होते.
काही वाईट कृत्य करताना पकडल्यास त्यांना लाज वाटत नाही किंवा ते घाबरत सुद्धा नाहीत. त्यांच्या समोर कुणाला त्रास होत असल्यास किंवा दु:ख होत असल्यास त्यांना त्याचे वाईटसुद्धा वाटत नाही. त्यांना शारीरिक त्रास किंवा दु:ख जाणवते पण मानसिक दु:ख त्यांना कळत नाही.
ही विंकॉन्सिन, मॅडिसन स्टडी क्रिमिनल सायकोलॉजी व मेंदूतील ऍबनॉर्मलिटी ह्यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करते. अनेक सायकोपॅथिक गुन्हेगारांमध्ये त्यांच्या मेंदूतील ऍबनॉर्मलिटी ही अशीच अचानकपणे तयार झालेली नाही.
म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की हा त्या गुन्हेगारांच्या डीएनए मधील दोष आहे. अर्थात हा अभ्यास पूर्णपणे योग्य आहे असे म्हणता येणार नाही कारण ह्या रिसर्च मध्ये क्रिमिनल सायकोपॅथ लोकांवर रिसर्च करण्यास आला आहे.
परंतु सगळेच सायकोपॅथ लोक काही गुन्हेगार नसतात. बरेचसे सायकोपॅथ लोक हे आक्रमक, मॅनिप्युलेटिव्ह व इम्पल्सिव्ह असतात. परंतु ते सर्वच लोक काही गुन्हे करत नाहीत.
गुन्हेगार नसलेल्या मानसिक रुग्णांमध्ये सुद्धा गुन्हेगार सायकोपॅथ लोकांप्रमाणेच amygdala व वेन्ट्रोमीडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ह्यांच्यातली कनेक्टिव्हीटी कमी असते का हे स्पष्ट व्हायला हवे.
तसेच हा रिसर्च ही मेंदूतील कमी झालेली कनेक्टिव्हीटी म्हणजे ऍबनॉर्मलिटीच सायकोपॅथीसाठी जबाबदार आहे का हे स्पष्ट करत नाही. पण आधी हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे की पॅरानॉईड सिझोफ्रेनिया व एक्स्ट्रीम सेक्शुअल फेटीशेस ह्या मानसिक रोगांमुळे अनेक गंभीर गुन्हे घडतात.
इमोशनल सिस्टीम मधील कनेक्टिव्हीटी कमी होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कदाचित हे न्यूरोट्रान्समीटर्समध्ये दोष निर्माण झाल्याने होत असावे. उदाहरणार्थ मेन एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर ग्ल्यूटामेट मध्ये दोष निर्माण झाल्यास असे होऊ शकते. किंवा एखाद्या डीजनरेटिव्ह रोगामुळे मेंदूच्या व्हाईट मॅटरवर परिणाम होतो.
मेंदूचे व्हाईट मॅटर हळूहळू नष्ट होत जाते. हे व्हाईट मॅटर मेंदूतील न्यूरॉन्सच्या कनेक्टिव्हीटीचे काम करते. हे व्हाईट मॅटर कमी झाल्यास मेंदूतील कनेक्टिव्हीटी कमी होते. ह्यामुळे लोक मानसिक रुग्ण बनत असावेत असाही ह्यातून निष्कर्ष निघतो.
मेंदूच्या इमोशनल सिस्टीममधील कनेक्टिव्हीटी नेमकी कशाने कमी होते ह्याचे नेमके कारण सापडल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होतील. तसेच ह्या लोकांच्या वागण्याची अनेक उत्तरे सापडतील. हे लोक असे जेनेटिक दोषामुळे असे वागतात , मेंदूतील दोषामुळे असे वागतात की परिस्थितीवश त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाल्याने असे वागतात हे स्पष्ट होईल.
परिस्थितीवश मनात कोडगेपणा निर्माण झाल्याने किंवा लहानपणी अत्यंत वाईट परिस्थितीत वाढल्याने हे लोक सराईतपणे खून करतात असे म्हटले तर मग जे लोक चांगल्या परिस्थितीतून, चांगल्या प्रेमळ कुटुंबातून आले असूनही सिरीयल किलर बनतात त्यांचे काय हा प्रश्न उभा राहतोच!
अनेक गंभीर गुन्हे करणारे लोक हे सायकोपॅथिक नसून सायकॉटिक लोक आहेत. सायकॉसिस आणि सायकोपॅथी ह्या दोन वेगळ्या प्रकारचे मानसिक रोग आहेत. सायकोपॅथी हा पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा एक प्रकार आहे तर सायकॉसिस म्हणजे व्यक्तीचा रिऍलिटीचा सेन्स म्हणजेच वास्तविकतेची भावना संपूर्णपणे नष्ट झालेली असते.
सायकॉटिक रोग हे बरे होऊ शकतात परंतु पर्सनालिटी डिसॉर्डर्स संपूर्णपणे बऱ्या होणे अवघड असते. दोन्ही प्रकारच्या रुग्णांना भावना समजून घेणे कठीण जाते.
सायकोपॅथ लोक हे मॅनिप्युलेटिव्ह व असतात, ते परिस्थितीचा अंदाज घेऊन वागतात. त्यांना भास होत नाहीत. त्यांना अस्तित्वात नसलेल्या लोकांचे आवाज ऐकू येत नाहीत आणि त्यांच्या जगाविषयी काही भ्रामक कल्पना नसतात.
परंतु अनेक मानसिक रुग्ण असलेले खुनी लोक खून करण्याची वेगवेगळी विचित्र कारणे देतात की त्यांना कुणाच्या डोळ्यात सैतान दिसला, किंवा कुणी सैतानाचा अवतार आहे म्हणून त्यांनी त्या व्यक्तीचा खून केला.
एका खुन्याने तर पीडित स्त्रीचे अवयव कापले कारण त्याला ते अवयव स्वतःच्या शरीराला जोडून घेऊन स्त्री व्हायचे होते किंवा स्वतःच्या मृत आईचे शरीर परत तयार करायचे होते.एक गुन्हेगार व्यक्ती पीडितांचे रक्त पीत असे व त्या रक्ताची अंघोळ रीत असे कारण त्याला असे वाटत असे की असे केल्याने नाझी लोक त्याच्यावर विषप्रयोग करून त्याच्या रक्ताची पावडर तयार करू शकणार नाहीत.
अशी काहीही अविश्वसनीय कारणे ही सायकॉटिक लोक देतात. कारण त्यांना भ्रम होतात. सिझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर ह्या रोगांमध्ये ग्ल्यूटामेट सिस्टीममध्ये दोष निर्माण होतो.
ही सिस्टीम जास्त स्टिम्युलेट झाली तर लोक वेडे होतात, त्यांना भ्रम व भास होतात. तसेच स्टिम्युलेशन कमी झाले तर भावना प्रोसेस होत नाहीत. असे लोक गंभीर गुन्हे करण्याची शक्यता जास्त असते.
मानसिक रुग्णांची हीच लक्षणे वेळीच ओळखली तर अनेक गंभीर गुन्हे वेळीच रोखता येतील व अनेक जीव वाचू शकतील.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.