' दुसऱ्या महायुद्धात शौर्य गाजवलेल्या ब्रिटिश सैनिकांची विधानं वाचून धक्का बसेल! – InMarathi

दुसऱ्या महायुद्धात शौर्य गाजवलेल्या ब्रिटिश सैनिकांची विधानं वाचून धक्का बसेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : निखिल सोनजे

===

सैनिक हे देशासाठी प्राण पणाला लावून लढत असतात. त्यांच्या पुढे आपल्या मायभूमीचे रक्षण करणे हे एकच ध्येय असते.

पण देशातल्या अंतर्गत परिस्थितीकडे बघून जर त्यांना फक्त निराशा हाती लागत असेल तर विचार करा त्यांच्या मनाची अवस्था काय होत असेल! आज तशीच काहीशी अवस्था आहे इंग्लंडकडून द्वितीय विश्व युद्धात लढलेल्या सैनिकांची.

निकोलस प्रिंगल ह्या ३३ वर्षीय लेखकाने वॉर व्हेटरन्सच्या मतांचं संकलन करून एक पुस्तक प्रकाशित केलंय. त्यातल्या ह्या सैनिकांच्या व्यथा ऐकून हताश व्हायला होतं.

प्रिंगल यांनी जवळजवळ १५० सैनिकांची मतं ह्या पुस्तकात संकलित केलीयेत.

सारा रॉबिन्सन ह्या अशाच एक सैनिक. जेव्हा द्वितीय विश्व युद्धाला सुरुवात झाली तेव्हा त्या किशोरवयीन होत्या.

Luftwaffeच्या (जर्मनीच्या हवाई सैन्य दलाचं नाव) हवाई छाप्यांना तोंड देत त्या काम उरकून काळोखात सुमारे १० मैल घरापर्यंत चालत जात असत आणि तेही आजूबाजूला बॉम्बवर्षाव होत असताना.

त्यांच्यातल्या देशप्रेमामुळे त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी रॉयल नेव्ही जॉईन केली.

त्यांच्या पिढीचे हे वैशिष्ट्य इथे दिसून येते, आपल्या देशाच्या कार्याला वाहून घेणे आणि त्यासाठी वाट्टेल तो त्याग करणे. पण सारा म्हणतात कि – हा देश आनंदी आणि समृद्ध लोकांचा देश होता. लोक गात असत, नाचत असत.

हे खरोखर एक “युनाइटेड किंग्डम” होतं. आता ते स्वातंत्र्य, लोकशाही कुठे गेलीये देव जाणे!?

 

british war inmarathi

 

अशाच प्रकारची नकारात्मक उत्तरं प्रिंगल यांना मिळालीयेत.

“माझं देशप्रेम तर कधीच हरवलंय” असं एक माजी सैनिक म्हणतो.

ह्या “सैनिक पिढी”चा हा नाराजीचा सूर हेच दाखवतो की, ते देशातल्या सरकारवर खुश नाहीत. त्यांचा विश्वासघात झाल्यासारखं त्यांना सारखं वाटत असतं.

एक माजी कमांडो म्हणतात की – माझे Comrades जे परतून आले नाहीत… त्यांना ह्या परिस्थितीत जगावंसं सुद्धा वाटलं नसतं.

ही भूमी आशावाद आणि समृद्धी असणारी भूमी होती परंतु आता फक्त उद्धट आणि दारुड्या लोकांची भूमी होऊन बसलीये.

एक माजी नेव्ही अधिकारी म्हणतो की – मी माझ्या स्वाभिमानी देशाबद्दलची गर्वगीते गात नाही… तो देश कधीच हरवला!

आपल्याला साहजिकच प्रश्न पडतो की, ह्या माजी सैनिकांना असं का वाटतंय! असं काय आहे ज्यामुळे त्यांना त्यांचा “विश्वासघात” झाल्यासारखं वाटतंय!?

ह्या लिस्टमध्ये सर्वात पहिला नंबर आहे “immigration” अर्थात स्थलांतरण.

‘लोक इथे खुशाल येतात आणि त्यांना ब्रिटिश लोकांच्या आधीच सर्व मिळून जातं’ असा एकंदरीत सर्व माजी सैनिक अधिकाऱ्यांचा सूर आहे.

अनेकांची तक्रार आहे की, हे स्थलांतरित लोक ब्रिटनमध्ये घेतांना आमचं मत म्हणजेच मूळच्या ब्रिटिश लोकांचं मत का घेतलं नाही!?

त्यांच्या म्हणण्यानुसार आमचा देश परकीयांना सोपवण्यात आलेला आहे, जे देशासाठी लढले त्यांचे अधिकार काढून सर्व सुविधा-सोयी परकीयांना देण्यात येत आहेत.

सारा रॉबिन्सन म्हणतात की – इंग्लंडच्या रस्त्यांवर मुस्लिम आणि शीख लोकच जास्त दिसतात!

अनेकांना हे विधान रुचणार नाही… offensive वाटेल. भारतात रोज शिरणारे अवैध बांग्लादेशी आणि नुकताच घडलेला रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न ह्याची आठवण हे वाचून झाल्याशिवाय राहत नाही.

 

british war 1962-inmarathi05
iran-daily.com

 

आपल्या संस्कृतीचं पतन होतंय हे फक्त भारतातल्या तथाकथित “हिंदुत्ववाद्यां” नाच वाटत नाही तर इंग्लंड मधल्या ह्या माजी सैनिक – अधिकाऱ्यांनादेखील वाटतंय.

आपल्या संस्कृतीचं वेगाने पतन होतंय आणि त्याबद्दल आम्ही चकार शब्द काढणं देखील गुन्हा ठरतोय असं त्यांचं म्हणणं आहे.

एक ग्रुप म्हणून त्यांना कुठलीही गोष्ट बोलू दिली जात नाही आणि त्यांची मतं विचारात घेतली जात नाहीत. लोकशाहीचा प्रसार संपूर्ण विश्वात करणाऱ्या देशातच आज ही परिस्थिती आहे.

एका उद्योगी देशाचं नफेखोर देशात रूपांतर झालय असं एका माजी सैनिकाच्या विधवेचं मत आहे आणि त्यांनी मार्गारेट थॅचर यांना दोषी ठरवलंय.

१८ वर्ष झालीत त्यांच्या पतींना युद्धात वीरमरण येऊन आणि आज बर्मिंगहॅमचं रूप बघून आपण इंग्लंडमध्ये आहोत की इतर कुठल्या देशात असं त्यांना वाटू लागलंय.

३७७ हटवल्यामुळे भारतात उत्साहाचं वातावरण असतांना ह्या बाई म्हणतात की मला समलिंगी विवाह आणि समलिंगी संबंधांचं उदात्तीकरण अजिबात पटत नाही.

टेलिव्हिजनवरचे कार्यक्रमदेखील खूप बीभत्स, अश्लील आणि हिंसक असतात. Celebritiesचं होणारं पूजन देखील ह्या बाईंना खटकतं.

अशा वातावरणात मला संध्याकाळी बाहेर पडण्याचं धाडससुद्धा होत नाही असं त्या म्हणतात.

 

british war 1962-inmarathi03
tvguide.com

 

ह्याच मतांमध्ये Political Correctness, बेशिस्त वर्तन, compensation देणे, “अनियंत्रित” स्थलांतरण ह्या मुद्द्यांवर देखील अत्यंत नाराजी दिसते.

एक वृद्ध माजी सैनिक म्हणतो – एखाद्या तरुण मुलाला किंवा मुलीला ते काही चुकीचं वागत असताना दोन शब्द सांगायला गेलो तर फक्त उद्धट आणि अर्वाच्य शिव्या मिळतात!

“आमच्या वेळी सक्तीने manners आणि वयाने ज्येष्ठ असलेल्या लोकांचा आदर शिकवलं जात असे. पण आता हा देश म्हणजे “Nanny”देश झालेला आहे.

किशोरवयीन मुली आता मातृत्वाची जबाबदारी घेऊन शाळेत फिरतायेत.”

 

pregnancy in school kid inmarathi
lovin malta

सतत कर्ज घेणं सुद्धा त्यांना पटत नाही. ते म्हणतात की आमच्या वेळी पैसे नसतील तर आम्ही पैसे येण्याची वाट बघायचो! कर्जबाजारी होत नव्हतो!

ह्या १५० लोकांच्या मतांमध्ये एक वेगळं मत उठून दिसतं. ह्या माणसाच्या मते युरोपिअन युनिअनमुळे युरोपची एकरूपता टिकून राहील. त्याच्या मते ब्रिटनमधील समाजातली विविध वर्गांमधली दरी संपुष्टात आलीये.

आमच्यावेळी नसलेली श्रीमंती ब्रिटन आता भोगतोय.

पन्नासच्या दशकात शिक्षक असलेला हा इसम म्हणतो शिक्षण क्षेत्रात ब्रिटनने खूपच प्रगती केलीये कारण त्या काळात फक्त ५% मुलं उच्च शिक्षण घेत असत पण आता तो टक्का ४० टक्क्यांवर गेलाय. तो म्हणतो कि “स्त्रीमुक्ती” हा सर्वात मोठा बदल.

द्वितीय विश्व युद्धाच्या काळात शेतात काम करणारी एक लहान मुलगी आज एक परिपक्व वृद्ध स्त्री झालीये. ती म्हणते – युद्धानंतर लोकांच्या राहणीमानाचा दर्जा खूपच उंचावलाय.

पण ती हे सुद्धा नमूद करायला विसरली नाही –

“त्या काळात ड्रुग्स हे कुणालाही माहित नव्हते, कुटुंब व्यवस्था अत्यंत उत्तम होती, खूप कमी घटस्फोट होत असत आणि घरातल्या लहान मुलाबाळांना खूप सुरक्षित वाटत असे”

एकंदरीतच ह्या “ग्रुप” ला दुर्लक्षित तर केलच जातंय पण त्यांनी केलेला त्याग हा व्यर्थ गेला की काय हा प्रश्न उभा राहिलाय! फक्त “Remembrance Day” ला आठवण काढली की झालं असं चित्र ब्रिटनमध्ये दिसतंय.

 

british war 1962-inmarathi
dailymail.co.uk

 

देशातल्या सर्व स्थरांमधल्या लोकांचं मत न घेता policies ठरवणं हा त्या देशातल्या व्यवस्थेचा दोष आहे. लोकशाहीचा नाही!

जर ह्या स्वाभिमानी, शूर सैनिकांचं मत घेऊन शासन प्रशासन यंत्रणा राबवली गेली असती तर त्यांनादेखील धन्य झाल्यासारखं वाटलं असतं.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?