' चर्चमध्ये ननवर बारा वेळा बलात्कार! “I am ashamed” म्हणणारे आता कुठे आहेत? – InMarathi

चर्चमध्ये ननवर बारा वेळा बलात्कार! “I am ashamed” म्हणणारे आता कुठे आहेत?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : अनुप कुलकर्णी 

===

आपल्या देशात ढोंगी लोकांची कमतरता नाही हे वारंवार सिद्ध होत आहे. हे लोक काही घटनांवर तोंडसुख घेताना दिसतात आणि काही घटनांवर सोयीस्कररित्या मौन पाळताना आढळून येतात. सरड्यांपेक्षा जास्त रंग बदलणारे हे काही लोक भारतीय लोकशाही साठी घातक आहेत.

आता तुम्ही विचार कराल की कोण हे लोक? तर त्यासाठी गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांचा आधी सविस्तर आढावा घेऊ या…

एका ४६ वर्षीय ख्रिश्चन ‘नन’ ने जाहीर आरोप केलाय की जालंधर स्थित ‘बिशप’ फ्रांको मुलाक्कल याने तिच्यावर एक दोन वेळा नव्हे तर तब्बल १३ वेळा बलात्कार केला आहे. (बातमी येथे वाचा.)

तिच्या काही मजबुरीचा फायदा घेऊन हे बलात्कार २०१४ ते २०१६ या कालावधीत केले गेले. लक्षात घ्या, हाच प्रकार जर हिंदू धर्मातील कुठल्या पुजाऱ्याने केली असता तर देशभरात किती वादळ उठले असते.

 

franco-mulakkal-inmarathi
thehindu.com

न्यूज चॅनेल्स, वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियाने ही बातमी कित्येक दिवस लावून धरली असती. पण या घटनेत मात्र ते होताना दिसत नाहीये. ही बातमी व्यवस्थित दाबली जात आहे आणि फारच मोजक्या व्यक्ती सोडल्या तर बाकी सर्वांनी यावर मिठाची गुळणी धरून बसणे पसंत केले आहे.

या मागचे कारण काय आहे ते कुणालाही सहज ओळखता येण्यासारखे आहे.

पोलिसांनी कोर्टात दिलेल्या निवेदनानुसार, ही घटना सत्य असून बिशप फ्रांकोने केरळ च्या या नन वर दोन वर्षे बलात्कार केले आहेत. पण हे सिद्ध होऊनही बिशप मोकाट फिरतोय ही बाब विशेष आहे. त्या बिशपच्या म्हणण्यानुसार तो निर्दोष असून त्याला अडकवण्यासाठी हा बनाव रचला गेला आहे.

बिशपने नन विरोधात ब्लॅकमेलिंगची उलट फिर्याद दाखल केली असून यामागील नेमके सत्य काय ते लवकरच उघडकीस येण्याची शक्यता आहे.

या सर्व घटनांचा विचार केला असता सहज लक्षात येते की, हिंदू धर्माला जितके ठरवून ‘टारगेट’ केले जाते तसे इतर धर्माच्या बाबतीत घडताना दिसत नाही. इथे धर्मावर ठरते की कुणाच्या विरोधात प्रदर्शने करायची आणि कुणाच्या विरोधात करायची नाहीत.

 

i-am-ashamed-inmarathi
indiaforums.com

हिंदू धर्मातील स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर रान पेटवणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांनी व्हॅटिकन सिटीच्या प्रतिनिधीला, जियामबाटिस्टा दिक्वात्रोला ननने लिहिलेले पत्र वाचले तर त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन पडण्याची शक्यता आहे. आपल्या या भावुक सात पानी पत्रात नन लिहिते,

“कॅथॉलिक चर्च फक्त बिशप आणि पादरी लोकांची काळजी घेण्यासाठी आहे काय? महिलांच्या न्यायासाठी धर्माच्या कायद्यात काही कलम आहेत की नाही हे मला जाणून घ्यायचे आहे. या प्रकरणावर चर्चने राखलेली शांतता मला अस्वस्थ करत आहे. मी एवढी वर्षे धर्माची सेवा केली त्याबदल्यात हे फळ मला मिळाले आहे. मी जे काही गमावलं आहे ते तुम्ही परत देऊ शकता का?”

या पत्रात पुढे तिच्यावर किती वेळा आणि कसे अत्याचार झाले याचे सविस्तर वर्णन आहे. (संपूर्ण पत्र येथे वाचा)

हे प्रकरण दडपण्यासाठी तिला आणि तिच्या कुटुंबियांना कसे धमकावले गेले आणि पैश्यांची लालूच कश्या पद्धतीने दिली गेली याचेही वर्णन केले गेले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, तिने स्पष्ट असा आरोप केलाय की या अत्याचाराची शिकार ती एकटीच नसून, आणखीही काही स्त्रिया आहेत.

 

Kerala_nuns-inmarathi
indiatoday.com

परंतु त्या बदनामीच्या भीतीने आणि धर्माच्या ठेकेदारांच्या दबावामुळे तोंड उघडण्यास तयार नाहीत. या ननच्या आणि तिच्या परिवाराच्या समर्थनार्थ ‘जॉईंट ख्रिश्चन कौन्सिल’ समोर आली असून त्यांनी बिशप फ्रांकोच्या तात्काळ अटकेसाठी आंदोलन सुरू केले आहे.

या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना एक प्रश्न पडणे साहजिक आहे की, सगळे पुरावे समोर असताना ही केस मीडियामध्ये चर्चेत का आणली जात नाही? ज्या प्रमाणे कठुवा प्रकरणी वादळ उठवले गेले होते तसे या ठिकाणी का होत नाही? याचे कारण काय असेल याचा प्रत्येकाने आपल्या मनात शोध घ्यायला हवा.

दुसरीकडे, या प्रकरणी केरळचे मंत्री महोदय पीसी जॉर्ज यांची संतापजनक प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणतात की,

“ती नन ही एक धंदेवाली वेश्या आहे याबाबत काहीही शंका नाही. तिला बारा वेळेस मजा वाटली आणि तेराव्या वेळी तो बलात्कार कसा वाटला? तिने पहिल्यांदाच तक्रार का दाखल केली नाही?”

 

kerla-mla-inmarathi
thequint.com

हे अकलेचे तारे समजा एखाद्या उजव्या विचारसरणीच्या नेत्याने तोडले असते तर त्यावर काय आणि किती गदारोळ झाला असता याची कल्पना करून बघा.

“प्रत्येक साध्वी ही शरीर विक्रय करणारी असते…”

अस एखाद्या हिंदूने म्हटलं असतं तर एव्हाना सो कॉल्ड डाव्यांनी, विवेकवाद्यांनी आकाश पाताळ एक केलं असतं… आणि स्त्रीवाद्यांनी तर यावर अभिनव कल्पना लढवून आंदोलने साजरी केली असती. सर्वांनी एकत्र येऊन असा गदारोळ माजवला असता की त्या मंत्र्याचे मंत्रिपद आतापर्यंत जाऊन तो पदउतार होऊन जाहीर माफी मागण्याचा आणि नाक घासण्याच्या स्थितीत असता.

पण नाही! असं काहीही होणार नाही कारण तो मंत्री कुणी उजव्या विचारसरणीचा जनार्दन नसून केरळमधील डाव्या विचारसरणीचा ‘जॉर्ज’ आहे.

त्यामुळे त्याचे हे विधान कितीही अपमानास्पद आणि स्त्री विरोधी असले तरी ते माध्यमांकडून दुर्लक्षित होणे अगदी स्वाभाविकच म्हणावे लागेल.

या सर्व घटनांवरून दिसून येते की आपल्या माध्यमांचा सोयीस्कर खोटारडेपणा कसा उघडा पडतोय.

तथाकथित ‘अवॉर्ड वापसी गँग’ आता मूग गिळून का गप्प आहे याचेही उत्तर मिळतेय आणि ‘आय एम अशेमड इंडियन’ असा बोर्ड घेऊन फिरणाऱ्या अर्धवस्त्रांकित सेलेब्रिटी ललनांचे बुरखे कसे टराटरा फाटत आहेत हे सुद्धा स्पष्टपणे दिसत आहे.

भारतातील कुठल्याच स्त्री वर, मग ती कोणत्याही धर्माची असो, अन्याय अत्याचार होणे हे दुर्दैवीच आहे.

मात्र काही घटनांचा फायदा करून घेण्याची नीच वृत्ती काही लोकांकडे आहे हे प्रत्येकाने समजून घेण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनीच त्या ननला न्याय मिळेल अशी अपेक्षा करू या आणि अश्या घटना ‘धर्मनिरपेक्ष’ (?) भारतात घडू नये अशी प्रार्थना करू या.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?