भारताच्या शोधात निघालेला कोलंबस अमेरिकेत कसा पोहोचला? रंजक कथा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या
समुद्रा,डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे
ढळू दे दिशाकोन सारे..
भारत शोधायला निघालेल्या कोलंबस ची नाव जेव्हा खवळलेल्या समुद्रातील वादळात सापडते तेव्हा कोलंबसचे सहकारी घाबरतात, आता आपण ह्यातून बाहेर पडू शकणार नाही ह्या कल्पनेने निराश होतात.
“समुद्राने कितीही संकटे आणली तरीही तो आपले लक्ष्य गाठण्यापासून आपल्याला रोखू शकणार नाही.” असा संदेश कोलंबसने सहकाऱ्यांना दिला अशी कल्पना करून कुसुमाग्रजांनी “कोलंबसाचे गर्वगीत” ही कविता लिहिली.
कवितेच्या शेवटच्या कडव्यात कुसुमाग्रज लिहितात ,
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळया सागराला
”अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला”
इटलीचा प्रसिद्ध खलाशी ख्रिस्तोफर कोलंबस ह्याने अनेक वादळे व संकटे पार करून अमेरिकेचा शोध लावला असे म्हणतात. खरे तर अमेरिकेत आधीपासूनच मनुष्यवस्ती अस्तित्वात होती. कोलंबसने फक्त पाश्चिमात्य युरोपियन जगाला अमेरिकेची ओळख करून दिली.
कोलंबस अटलांटिक महासागरात चार वेळा मोहिमेस गेला. त्यातील एका मोहिमेच्या वेळी तो अमेरीकेत जाऊन पोचला. कोलंबसला खरे तर भारतात यायचे होते परंतु तो उलट दिशेने जाऊन अमेरिकेला पोचला. भारताच्या दिशेने निघालेला कोलंबस अमेरिकेस कसा पोचला असावा ह्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
३ ऑगस्ट १४९२ रोजी ख्रिस्तोफर कोलंबस भारताकडे जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी निघाला परन्तु तो अमेरिकेला पोचला. त्याने युरोपियन लोक व अमेरिकेतील स्थानिक लोकांमध्ये संपर्क वाढवला. त्याने अमेरिकेची चार वेळा वारी केली.
त्याच्या ह्या सर्व प्रवासाचा खर्च स्पेनची राणी इसाबेलाने केला. कोलंबसने हिस्पानिओला बेटावर वस्ती वसवण्याचा प्रयत्न केला आणि अश्या प्रकारे अमेरिकेत स्पॅनिश वसाहतीची सुरुवात झाली.
कोलंबसच्या काळात युरोपातील व्यापारी भारत व इतर आशियाई देशांत व्यापार करीत असत आणि परत जाताना भारतातील मसाले आपल्या देशात नेऊन विकत असत. त्या काळात युरोप व भारतादरम्यान फक्त भूमार्ग अस्तित्वात होता. युरोपातील व्यापारी तुर्कस्थान ,इराण व अफगाणिस्तानच्या मार्गे भारतात येत असत.
परंतु १४५३ साली ह्या भागात तुर्कांनी साम्राज्य स्थापित केले आणि हा मार्ग युरोपियन व्यापाऱ्यांसाठी बंद केला. ह्याचे कारण असे होते की, तुर्की लोक मुसलमान होते व युरोपियन व्यापारी ख्रिश्चन होते.आशियात जाण्याचा मार्गच बंद झाल्याने युरोपियन व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ लागले. म्हणून कोलंबसने भारतात जाण्यासाठी सागरी मार्ग शोधण्याचे ठरवले.
त्या काळात बहुसंख्य युरोपियन लोक पृथ्वी ही गोल नसून एखाद्या टेबलप्रमाणे चपटी आहे असे मानत असत. म्हणजेच समुद्राची सीमा ही पृथ्वीची सीमा आहे असा त्यांचा समज होता.परंतु कोलंबसला माहीत होते की, पृथ्वी गोल आहे आणि समुद्रातून पश्चिम दिशेला गेल्यास भारतापर्यंत पोचता येईल असे त्याला वाटले.
म्हणूनच ३ ऑगस्ट १४९२ रोजी कोलंबस त्याची सांता मारिया, नीना आणि पिंटा ही तीन जहाजे व आपल्याबरोबर ९० सहकारी घेऊन भारताच्या शोधात निघाला.
ते समुद्रात प्रवास करत असताना अचानक एक भयंकर वादळ सुरू झाले. त्यांचे दिशादर्शक यंत्र चुकीची दिशा दाखवू लागले. असे झाल्याने सर्व नाविक घाबरले. त्या सर्वांनी कोलंबसला माघारी फिरण्याची विनंती केली. परंतु कोलंबसने तीन दिवस प्रवास सुरु ठेवण्याचा निश्चय केला.
९ ऑक्टोबर १४९२ ला कोलंबसला आकाशात पक्षी दिसले व त्याने जहाज पक्ष्यांच्या दिशेला फिरवण्यास सांगितले. त्या दिशेला गेल्यावर त्यांना अनेक वृक्ष व रंगेबेरंगी फुलं दिसली ह्याचा अर्थ असा की पुढे नक्कीच जमीन आहे.
–
- ह्या १० महान शास्त्रज्ञांचे जगभर गाजलेले प्रसिद्ध शोध खरंतर दुसऱ्यांनीच लावले होते…!
- जगातला पहिला नकाशा कुणी व कसा बनवला? हे नकाशे बनवतात कसे? रंजक माहिती!
–
१२ ऑक्टोबर १४९२ रोजी कोलंबसने जमिनीवर पाउल ठेवले तेव्हा त्याला वाटले की तो भारतात पोचला आहे. परंतु खरे तर तो एका कॅरेबियन बेटावर पोचला होता. त्यानंतर त्याने आजूबाजूला अनेक बेटे शोधली व त्यांना तो भूभाग भारत आहे असे वाटल्याने त्यांनी ह्या भागाचे नाव इंडिज असे ठेवले.
ह्याच घटनेमुळे अमेरिकेतले लोक १९३७ सालापासून १० ऑक्टोबर रोजी “कोलंबस डे” साजरा करतात.
परंतु कोलंबसच्या आधी सुद्धा अमेरिकेत लोक वास्तव्यास होते. सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा आशियातून सायबेरिया व अलास्काच्या मार्गे भटके लोक अन्नाच्या शोधात अमेरिकेत आले असे तज्ज्ञ म्हणतात.
अभ्यासकांच्या मते पंधरा हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आतापेक्षा कमी होती व अमेरिका व रशियाच्या भूभागाला जोडणारा एक मोठा जमिनीचा तुकडा अस्तित्वात होता. ह्याच मार्गावरून आशियातून लोक अमेरिकेत पोचले.
अमेरिकेतील पहिले रहिवासी हे क्लोविस लोक आहेत असे मानले जाते. हे क्लोविस लोक आजच्या ८० टक्के अमेरिकन लोकांचे पूर्वज आहेत असे DNA analysis मध्ये सिद्ध झाले आहे. ह्या क्लोविस लोकांच्या आधी सुद्धा काही लोक अमेरिकेत पूर्वीपासून म्हणजे वीस हजार वर्षांपूर्वी वास्तव्याला होते असेही तज्ज्ञ म्हणतात.
तसेच कोलंबसच्या ५०० वर्ष आधी वायकिंग्स हे युरोपियन लोक आता जिथे कॅनडा आहे तेथे पोचले होते. ज्या ठिकाणी हे वायकिंग्स गेले होते ती जागा युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित केली आहे.
आज ही जागा वाळवंट झाली आहे परंतु हजार वर्षांपूर्वी ह्या ठिकाणी जंगल होते व वायकिंग्स लोक येथे थांबून आपली जहाजे दुरुस्त करत असत आणि वातावरण खराब असताना येथे आश्रय घेत असत.
ह्याचा अर्थ असा की कोलंबसच्या हजारो वर्षे आधीपासून अमेरिकेत लोक राहत होते. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला नाही तर त्याने अमेरिकेची युरोपियन लोकांना फक्त ओळख करून दिली.
–
- सर्व खंडांची टक्कर होऊन भविष्यात उदयाला येणार एक नवा खंड: शास्त्रज्ञांचे अविश्वसनीय भाकीत!
- जगप्रसिद्ध पेनिसिलीनच्या शोधाची कहाणी-करायला गेले गणपती, झाला मारुती!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.