' विद्यार्थ्यांनाच नव्हे तर बॉलिवुडलाही भुरळ घालणारा हा सुपर शिक्षक प्रवास आपल्यालाही प्रेरणा देतो! – InMarathi

विद्यार्थ्यांनाच नव्हे तर बॉलिवुडलाही भुरळ घालणारा हा सुपर शिक्षक प्रवास आपल्यालाही प्रेरणा देतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आयआयटी म्हणजे अतिशय अवघड कोर्स!आयआयटीची प्रवेश परीक्षा सुद्धा अतिशय अवघड असते. ह्या परीक्षेसाठी विद्यार्थी अतिशय हुषार असावा लागतो. तसेच चिकाटी व सराव सुद्धा अतिशय आवश्यक असतो.

आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी लोक तीन तीन वर्षे आधीपासून सराव करतात. लाखो रुपये भरून कोचिंग क्लास लावतात.

पण जे विद्यार्थी गरीब असतात ते हुषार असून सुद्धा महागड्या कोचिंग क्लासची फी भरू न शकल्याने त्यांना मार्गदर्शन मिळू शकत नाही व ते स्पर्धेत मागे पडण्याची भीती असते. पण समाजातील काही लोक ह्या हुषार विद्यार्थ्यांना त्यांना शक्य असेल तितकी मदत करत असतात.

ह्यापैकीच एक आहेत सुपर थर्टी ह्या कोचिंग क्लासचे संस्थापक आनंद कुमार!

आनंद कुमार ह्यांनी खूप मेहनत आणि संघर्ष करून स्वतः तर यश मिळवलेच शिवाय आता ते हुषार परंतु गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीसाठी मार्गदर्शन करून त्यांचे आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्न साकार करण्याचे काम करीत आहेत.

आनंद कुमार ह्यांच्या सुपर थर्टी इन्स्टिट्यूटच्या ३० पैकी २६ विद्यार्थ्यांनी ह्यावर्षी आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

 

anand kumar-inmarathi
indiatoday.in

ह्या विद्यार्थ्यांपैकी दोघांचे वडील मजुरी करतात तर एकाचे वडील सेल्समन आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या ह्या यशाने आनंद कुमार अतिशय खुश झाले आहेत. म्हणूनच त्यांनी सुपर थर्टीची संख्या वाढवण्याचे ठरवले आहे. आता ह्या क्लासमध्ये ९० मुलांना आयआयटीसाठी मार्गदर्शन मिळेल.

ह्याक्लास मध्ये ऍडमिशन मिळणे इतके सोपे नाही. त्या साठी एक प्रवेश परीक्षा घेतली जाते.

आनंद कुमार हे बिहारच्या पटना ह्या शहरातील आहेत. त्यांचे वडील पोस्टात क्लार्क असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सामान्य होती म्हणूनच गावातल्या सरकारी शाळेतून त्यांनी हिंदी माध्यमातून शिक्षण घेतले. त्यांना लहानपणा पासूनच गणिताची खूप आवड होती. त्यांनी तेव्हा पासूनच नवीन फॉर्म्युले बनवण्यास सुरुवात केली.

आनंद कुमार ह्यांनी ग्रॅज्युएशनसाठी पटना युनिवर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. त्यांनी शिकता शिकता अनेक रिसर्च पेपर्स लिहिणे व ते इंटरनॅशनल जर्नल्सला पाठवणे सुरु केले. त्यांचे अनेक पेपर्स इंटरनॅशनल जर्नल्समध्ये छापले गेले.

पटना युनिवर्सिटीमध्ये त्यांना हवी ती पुस्तके उपलब्ध नसल्याने ते शनिवारी बीएचयु म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये जात असत व तिथल्या लायब्ररीमध्ये अभ्यास करत असत.

सोमवारी परत कॉलेज असल्याने पटनाला परत येत असत. हे सगळे करत असताना १९९४ साली आनंद ह्यांना इंग्लंडच्या प्रसिद्ध कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीने प्रवेश घेण्यासाठी आमंत्रित केले.

परंतु त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने ते ही ऑफर स्वीकारू शकले नाही. ह्याच काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

 

anand kumar-inmarathi02
oureducation.in

घरातल्या कर्त्या पुरुषाचाच आधार हरपल्याने आनंद ह्यांच्यावरच घराची संपूर्ण जबाबदारी आली. शिक्षण तसेच घरची जबाबदारी अश्या दुहेरी जबाबदाऱ्या पार पडताना त्यांनी रामानुजम स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स नावाचा एक क्लब सुरु केला. ह्या क्लब मध्ये आनंद त्यांच्या प्रोफेसरांच्या मदतीने विद्यार्थ्यांना गणित शिकवत असत.

सुरुवातीला ते विद्यार्थ्यांकडून पैसे घेत नसत व त्यांना मोफत शिकवणी देत असत. घराचा खर्च भागवण्यासाठी त्यांच्या आई जयंती देवी ह्यांनी पापड बनवणे सुरु केले व आनंद ह्या घरगुती पापडांची विक्री करून घर चालवत असत.

आनंद ह्यांनी हळू हळू रामानुजम स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स मध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन देणे सुरु केले. सुरुवातीला कमी असणारी विद्यार्थ्यांची संख्या हळू हळू ५०० पर्यंत जाऊन पोचली.

एक दिवस अभिषेक नावाचा एक गरीब विद्यार्थी आनंद ह्यांना म्हणाला की सर आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे फी भरायला पैसे नाहीत मग आम्ही देशातील चांगल्या कॉलेजेस मध्ये कसे शिकू शकणार?

 

anand kumar-inmarathi01
hindi.timesnownews.com

अभिषेकचे हे बोलणे ऐकून आनंदसरांना दु:ख झाले. त्यांना स्वतःवर आलेली वेळ आठवली. केम्ब्रिजसारख्या उत्तम युनिव्हर्सिटीने स्वत: आमंत्रण पाठवून सुद्धा ते केवळ पैसे नसल्याने ह्या उत्तम संधीचा फायदा ते घेऊ शकले नाहीत.

आपल्याप्रमाणे इतर हुषार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांची हुषारी वाया जाऊ नये म्हणून त्यांनी २००२ साली सुपर थर्टीची स्थापना केली.

ह्या सुपर थर्टी इंस्टीट्युट मध्ये दर वर्षी एक प्रवेश परीक्षा घेऊन त्याद्वारे ३० विद्यार्थ्यांना निवडले जात असे व त्यांना मोफत जेवण, निवास व पुस्तकांची सुविधा दिली जात असे. ह्या विद्यार्थ्यांना आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जात असे.

२००२ पासून ते आतापर्यंत १६ वर्षात ह्या सुपर थर्टीच्या ४५० पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी आयआयटी मध्ये प्रवेश मिळवला आहे.

हुषार विद्यार्थांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना ही सुविधा देणाऱ्या आनंद सरांनी अनेक हुषार विद्यार्थ्यांचे आयुष्यच मार्गी लावले आहे.

आपल्या ह्या कार्यामुळे आनंद कुमार फक्त भारतच नव्हे तर अनेक देशांत प्रसिद्ध आहेत. डिस्कव्हरी चॅनेलने आनंद कुमार ह्यांच्या सुपर थर्टी इंस्टीट्युटवर एक तासाचा शो दाखवला होता.

तसेच कोलंबिया, हार्वर्ड व स्टॅनफोर्ड सारख्या मोठ्या युनिवर्सिटीजने आनंद कुमार ह्यांना स्पेशल लेक्चर्स घेण्यासाठी अनेकदा बोलावले आहे.

 

anand kumar-inmarathi03
outlookindia.com

तेथील हुषार विद्यार्थ्यांनाही आनंद सरांनी आपले मार्गदर्शन दिले आहे. आनंद कुमार ह्यांच्या ह्या कार्यावर अनेक डॉक्यूमेंट्रीज सुद्धा तयार झाल्या आहेत. तसेच नजीकच्या काळात त्यांच्या आयुष्यावर एक चित्रपट सुद्धा तयार होत आहे.

बिजू मॅथ्यू ह्या कॅनडा मध्ये प्रॅक्टिस करत असलेल्या सायकायट्रिस्टने आनंद कुमार ह्यांच्यावर Super 30: Changing the World 30 Students at a Time Anand Kumar हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक लिहायला मॅथ्युंना ३ वर्ष लागली.

आनंद कुमार ह्यांनी जे कार्य सुरु केले आहे त्याने अनेक गुणी हुषार विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होत आहे तसेच देशाला अनेक हुषार इंजिनियर्स मिळत आहेत. गरीब विद्यार्थांसाठी आशेचा किरण निर्माण करणाऱ्या आनंद कुमार ह्यांच्या ह्या बहुमुल्य योगदानासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

आज समाजाला अश्याच अनेक आनंद कुमारांची गरज आहे जे गरीब परंतु हुषार विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करतील. आनंद कुमार ह्यांना मानाचा मुजरा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?