' नेपाळचे असूनही गौतम बुद्ध हे भारतीयांना “आपले” वाटतात – त्यामागे ही आहेत कारणं! – InMarathi

नेपाळचे असूनही गौतम बुद्ध हे भारतीयांना “आपले” वाटतात – त्यामागे ही आहेत कारणं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

संपूर्ण जगाला अहिंसा व सत्याची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध हे महान भारतीय तत्वज्ञ होते. त्यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली.

शाक्य गणराज्याचे राजे शुद्धोधन व महाराणी महामाया किंवा मायादेवी ह्यांच्या पोटी गौतम बुद्ध ह्यांचा जन्म झाला. त्यांच्या मातापित्यांनी त्यांचे नाव “सिद्धार्थ” असे ठेवले.

परंतु त्यांच्या जन्मानंतर काहीच दिवसात त्यांच्या मातेचे निधन झाले व त्यांचा सांभाळ त्यांच्या मावशीने म्हणजेच महाप्रजापती गौतमी ह्यांनी केला.

त्यांच्याच नावावरून गौतम बुद्ध ह्यांना “गौतम” असे नाव मिळाले.

गौतम बुद्ध ह्यांचा सांभाळ करणारी त्यांची दुसरी आई म्हणजेच मावशी महाप्रजापती गौतमी ह्या अर्हत पद प्राप्त झालेल्या महान भिक्खुणी होत्या. त्यांना जगातील पहिल्या भिक्खुणी मानले जाते.

 

budhha-inmarathi
thelifeofbuddha.myreadyweb.com

 

पुढे गौतम बुद्ध ह्यांचा यशोधरा ह्या राजकन्येशी विवाह झाला आणि त्यांना राहुल हा पुत्र झाला.

महाज्ञानी गौतम बुद्ध ह्यांना जगातील दु:ख बघून संसारातून विरक्ती आली व त्यांनी सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून बोधिवृक्षाखाली तपश्चर्या केली.

अविरत तपस्येनंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि त्यांनी बौद्धधर्माची शिकवण देऊन जगाला जीवनाचा खरा मार्ग व उद्देश दाखवला.

अनेक लोक असा प्रश्न उपस्थित करतात की, तथागत बुद्ध ह्यांचा जन्म नेपाळमध्ये झाला असूनही सर्व भारतीय त्यांना “आपले” का म्हणवतात?

तर ह्याचे उत्तर असे आहे की, खरं तर हे महापुरुष कुठल्या एका देशाचे नसतात. सर्व जग त्यांचे व ते सर्व जगाचे असतात. भारतीयांसाठी तर तथागत बुद्ध हे दैवतच आहेत.

कारण त्यांचा जन्म जरी नेपाळमध्ये झाला असला, तरीही त्यांच्या आयुष्यातील सर्व महत्वाच्या गोष्टी ह्या भारतात घडल्या.

 

goutam buddha-inmarathi
punjabkesari.in

 

गौतम बुद्ध ह्यांचा जन्म इसवी सन पूर्ण ५६३ साली नेपाळ मधील “लुंबिनी” ह्या ठिकाणी झाला असला तरीही,

त्यांनी ज्या ठिकाणी ध्यान व तप करून ज्ञान प्राप्त केले व ते “राजपुत्र सिद्धार्थ गौतम” चे “महाज्ञानी गौतम बुद्ध” झाले ती जागा म्हणजे भारतातील बोधगया होय.

बोधगया बिहार ह्या राज्यात आहे हे तर सर्वांना माहित असेलच. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणूनच हा दिवस आपण “बुद्ध पौर्णिमा” म्हणून साजरा करतो.

ज्ञानप्राप्तीनंतर महाज्ञानी बुद्धांनी पाच पंडितांना उपदेश केला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्कपवत्तन’ किंवा ‘धम्मचक्रप्रवर्तन’ असे म्हणतात.

ह्या प्रवचनात गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची मुलतत्वे सांगितली.

त्यांनी ज्या ठिकाणी हे प्रवचन केले ती जागा म्हणजे सारनाथ होय. सारनाथ हे उत्तर प्रदेश येथे आहे.

तसेच गौतम बुद्धांनी ज्या नालंदा विश्वविद्यालयात ज्ञानदान केले ते नालंदा विश्वविद्यालय सुद्धा बिहारमध्ये म्हणजेच भारतातच आहे.

अनेकांना बौद्ध धर्माची शिकवण दिल्यानंतर त्याचा आणखी प्रसार करण्यासाठी गौतम बुद्ध ह्यांनी मगध राज्य व महाजनपदांत प्रवास करून हजारो लोकांना बौद्ध धर्माची शिकवण दिली.

हे सर्व कार्य त्यांनी भारतातच केले. इसवी सन पूर्व ४८३ मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले.

 

goutam buddha-inmarathi01
yubapost.com

 

कुशीनगर हे शहर देखील उत्तर प्रदेशातच म्हणजे भारतातच आहे. गौतम बुद्धांनी त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ भारतातच व्यतीत केला.

त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शरीराचे ७ अवशेष भारतातच. ठेवण्यात आले व एक अवशेष शाक्य पंथीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली बौद्ध परिषद बिहार येथील राजगृह येथे झाली होती. अजातशत्रू राजा व साधू महाकश्यप ह्यांनी ही परिषद आयोजीत केली होती.

ह्या परिषदेचे उद्दिष्ट्य भगवान बुद्धांच्या विनय व सुत्तांचे जतन करणे हे होते.

ह्याचप्रकारे दुसरी बौद्ध परिषद वैशाली येथे, तिसरी पाटलीपुत्र येथे तर चौथी बौद्ध परिषद कुंडलवन म्हणजेच काश्मीर येथे झाली होती. ह्या परिषदांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करण्याविषयी चर्चा झाली होती.

आता ऐतिहासिक दृष्ट्या बघायचे झाले तर इसवी सन पूर्व २०० -३०० मध्ये नेपाळ ह्या देशाचे अस्तित्व सुद्धा नव्हते.

भारतीय उपखंडात मौर्यांचे राज्य होते व मौर्यांची राजधानी ही पाटलीपुत्र होती. पाटलीपुत्र म्हणजेच बिहारची राजधानी पटना शहर होय. मौर्यांचे साम्राज्य हे जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक होते.

गौतम बुद्ध ह्यांचा व बौद्धधर्माचा सर्वात मोठा अनुयायी म्हणजे मौर्य वंशीय सम्राट अशोक ! हा सम्राट अशोक एक भारतीय राजा होता.

ह्यानेच आशिया खंडात बौद्धधर्माचा प्रसार केला. सम्राट अशोकाने सर्वत्र बौद्ध धर्माचा प्रसार केल्यामुळे जग हे भारताला गौतम बुद्धांची भूमी म्हणून ओळखते.

जगभरातून लाखो लोक बोधगया, सारनाथ व कुशीनगर येथे दर्शनासाठी येतात. जितके लोक भारतात येतात तितके नेपाळला दर्शनासाठी जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

 

 

म्हणजेच फक्त भारतीयच नव्हे तर अख्खं जगच भारताला गौतम बुद्धांची भूमी म्हणून ओळखतं!

भारतात बौद्धधर्माची अनेक पवित्र स्थाने आहेत. पटना, राजगिर, नालंदा, श्रावस्ती, वैशाली, सांची येथे दर वर्षी अनेक बौध्दधर्मीय जाऊन दर्शन घेतात. येथील विहारांमध्ये ध्यान करतात.

बौद्ध धर्माचे मूळ भारतातच आहे.

इतकेच कशाला, बौद्धधर्मातील महत्वाची स्थाने व विहारांवरूनच ह्या राज्याला “बिहार” हे नाव पडले असे म्हणतात.

भगवान गौतम बुद्धांच्या काळात नेपाळ नावाचा वेगळा देश नव्हता.

जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडावर मौर्यांचे राज्य होते.

नेपाळचाही अर्ध्यापेक्षा अधिक भाग भारतात होता. व उरलेल्या भागात म्हणजेच आज जिथे चीन आहे तो भाग प्रोटो तिबेटी राज्यात होता. भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी ह्या शहरात झाला.

हे शहर कपिलवास्तू ह्या राज्यात होते.

भगवान बुद्धांचे वडील महाराज शुद्धोधन हे शाक्य साम्राज्याचे म्हणजेच कपिलवास्तूचे प्रमुख होते. हे कपिलवास्तू राज्य भारतातल्या १६ महाजनपदांपैकी एक होते.

म्हणजेच टेक्निकली तेव्हा हे राज्य म्हणजे भारताचाच एक भाग होता.

त्यानंतर सुद्धा लिच्छवींच्या काळात हा प्रदेश लिच्छवी अधिराज्यात वृज्जी महाजनपदांच्या अखत्यारीत येत होता.

 

goutam buddha-inmarathi02

 

ह्या साम्राज्याची राजधानी वैशाली होती. त्यानंतर ह्या प्रदेशावर अजातशत्रू ह्या राजाचे राज्य आले. त्या काळात सुद्धा हा प्रदेश भारतीय भूमी म्हणूनच ओळखला जात असे.

इसवी सन २०० ते ५०० दरम्यान गुप्त व हुणांच्या काळात नेपाळचा जन्म झाला.त्या आधी हा प्रदेश भारतभूमिचाच भाग होता. म्हणूनच भगवान बुद्धांचा जन्म सुद्धा भारताच्याच भूमितला आहे.

म्हणूनच भारतीय भगवान बुद्धांना आपले म्हणतात व जग सुद्धा भारताला “भगवान बुद्धांची भूमी” असे समजते.

खरे तर भगवान बुद्ध कोणाचे हा वादाचा मुद्दा होऊच नये.

ज्या महापुरुषाने सर्व जगाला आपले मानून सत्य व अहिंसेची शिकवण दिली ते भगवान बुद्ध साऱ्या जगाचे आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?