' अलौकिक बुध्दिमत्ता, सामर्थ्य, धैर्य आणि कौशल्य : श्रीकृष्ण एक स्मार्ट स्ट्रॅटेजिस्ट – InMarathi

अलौकिक बुध्दिमत्ता, सामर्थ्य, धैर्य आणि कौशल्य : श्रीकृष्ण एक स्मार्ट स्ट्रॅटेजिस्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक: अजित पिंपळखरे 

या लेखात श्रीकृष्णाला देव मानलेले नाही पण एक माणूस म्हणून त्याच्या कर्तुत्वाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.

एकदा देव मानले की, मग प्रत्येक आख्यायिका १००% खरी, ईश्वरी कर्तुत्व, मानवाच्या समजेच्या आणि आवाक्याच्या बाहेर, चमत्कार आदी गोष्टी येत.

तसेच तो देव मग अगदी साजूक तुपात घोळून त्याला शाहू मोडक, नितीन भारव्दाज अश्या तुपकट चेहऱ्याचा एक अतिसोज्वळ प्रकार होतो आणि मग कान पकडून नमस्कार करण्यापलीकडे त्याचे मनुष्य म्हणून कर्तुत्व जोखण्याचा प्रयत्न होतच नाही.

या लेखात मी काही गोष्टी तर्काने ताडून घातल्या आहेत आणि हा लेख स्मरणशक्तीवर अवलंबून लिहिला आहे त्यामुळे जर काही तपशिलाच्या चुका असल्या तर सांगाव्या.

देव हा प्रकार बाजूला ठेवला तर एक मनुष्य म्हणून, एक नेता म्हणून, एक extremely brilliant strategist म्हणून श्रीकृष्णाचे जे महाभारतात दर्शन होते ते फार मोहक आहे.

 

1 krishna InMarathi

 

माझा स्वतःचा अवतार या संकल्पनेवर विश्वास नाही कारण जर त्या दयाघन परमेश्वराला जर पृथ्वीवरील दुष्टांचा नाश करायचा असला, तर तो तिथे स्वर्गात बसून करू शकतो त्यासाठी “यदा यदा ही धर्मस्य” असा द्राविडी प्राणायाम करायची त्याला काहीच जरुरी नाही.

श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी काय राजकीय परिस्थिती होती हे लक्षात घेणे आवश्यक आहे. या परीस्थितीचा विचार करताना राक्षस, देव, अवतार, दुष्ट, सुष्ट, दिलेला वर असा विचार करू नये.

 

shakuni-inmarathi

 

ही सगळी माणसे होती आणि शकुनीच्या पक्षाचे लोक हे काही चांगले, काही वाईट असे सामान्य माणसासारखे होते.

मथुरेत कंसाने उग्रसेनाला राज्यावरून हाकलून मथुरा आपल्या ताब्यात घेतली होती. कंसाचा सासरा होता जरासंध. कंसाच्या लग्नाचे निमित्य करून जरासंधाने आपले सैन्य मथुरेत आणले आणि उग्रसेनाला उलथून कंसाला राज्य दिले.

श्रीकृष्णाचे आईवडील राजमहाल सोडून मथुरेला बंदिवासात होते. आधीची सात भावंडे मारली गेली होती. श्रीकृष्णाला नंदाकडे वाढावे लागले.

अश्या परिस्थितीत हा अतिशय बुद्धिवान मुलगा वयाच्या बाराव्या/तेराव्या वर्षी मथुरेला येतो. वयावर जाऊ नका असामान्य नेते हे असामान्य जन्मतः असतात.

 

bal krishna 4 InMarathi

 

शिवाजी महाराजांनी स्वराज्य संस्थापनेला जरी १६ व्या वर्षी सुरुवात केली, पण त्याधी ३/४ वर्षे ते मावळ्यांच्या गटाची बांधणी नक्कीच करत असणार.

पूर्ण बेसावध आणि कृष्णाच्या वयामुळे त्याला खिजगणतीत न घेणाऱ्या कंसाचा हा मुलगा वध करतो. आधीपासून बंड करण्यासाठी ठिकठिकाणी पेरून ठेवलेले यादव हल्ला करून बेसावध असे कंससैन्य मारतात आणि उग्रसेन राज्यावर परत येतो.

अर्थात जेव्हा ही बातमी जरासंधापाशी पोहोचली तेव्हा तो रागाने वेडापिसा झालेला असा तो चालून आला पण मराठ्यांनी जसा प्रतिकार केला तसा करून श्रीकृष्णाने तो हल्ला परतविला.

पण शेवटी राज्य वाचविणे अशक्य झाले तेव्हा दूर दृष्टीच्या श्रीकृष्णाने तात्पुरता पराभव स्वीकारून व्दारकेला स्थलांतर केले.

जरासंधाने ज्या १७ स्वाऱ्या केल्या त्यामध्ये एकदा तर कौरव आणि पांचाल (द्रुपद) यांची सैन्ये ही जरासंधाच्या बाजूने लढत होती.

श्रीकृष्ण आणि यादव हे जरासंधासमोर मथुरा सोडून व्दारकेला पळाले होते, तरीही तेथेही जरासंध त्यांचा पिच्छा सोडत नव्हता. त्यामुळे यादव राज्याची परिस्थिती फार फार बिकट होती.

 

lord-krishna-inmarathi

 

इकडे दुसऱ्या बाजूला पांडव हे पांडूचे पुत्र नव्हते, त्याचा कुरुकुळाशी संबंध नव्हता. पांडू गेल्यावर निराधार कुंती जेव्हा हस्तिनापुराला या पाच अनाथ मुलांना घेऊन आली तेव्हा ही मुले पुढे मागे राज्यावर हक्क सांगतील असे कोणालाच वाटले नाही.

भीष्मांनी त्यांची शिक्षणाची, राहण्याची राजकुलाला शोभेल अशी व्यवस्था केली.

पण कुंतीने हळू हळू या पाच मुलांमध्ये अभेद्य अशी एकी निर्माण केली. भीष्म द्रोणाच्या सहाय्याने ही पाच आगंतुक मुले राज्यावर अधिकार सांगण्याइतकी मोठी झाली. आणि मग युवराजाच्या निवडीचा प्रश्न आला तेव्हा भीष्म, द्रोण, कृप, विदुर आणि इतर सर्व मानकऱ्यांच्या दबावाखाली जरी दुर्योधनाचा युवराज्याभिषेक होणार होता तरी त्याजागी युधिष्ठिराची निवड करण्यात आली.

राजा धृतराष्ट्राचे राज्य चालविणारे शकुनी, दुर्योधन, दुशासन त्यांचा खलनायक मित्र कर्ण यांना हा धोका दिवसेदिवस मोठा आणि उग्र होताना दिसत होता. पण भीष्म, द्रोण, विदुर अशी मंत्र्यांची फळी पांडवांच्या बाजूला असल्याने ते चडफडण्याशिवाय काही करू शकत नव्हते.

 

yudhisthir InMarathi

 

इकडे युधिष्ठिर आणि विदुर यांनी गंगेमध्ये नौकांचे दल उभे करून भीम अर्जुन जे जिंकत होते. तो पैसा त्या नौकांमध्ये साठवायला सुरुवात केली त्यामुळे पांडवाना पैशाची कमतरता नव्हती.

युधिष्ठिर युवराज झाल्यावर शकुनी आणि मंडळीना धृतराष्ट्र जिवंत असतानाच जे काही करणे ते करणे जरुरी होते कारण एकदा का युधिष्ठिर राजा झाला असता की कौरव सर्वार्थाने संपले असते.

अशा वेळेला पांडवांचा समूळ नाश करण्यासाठी त्यांनी लाक्षागृहात त्यांना जाळून मारण्याचा डाव रचला.

कुंतीने आपल्या बुध्दिसामर्थ्याने त्यांना वाचविले. पण तिला सुध्दा आधाराची सल्ल्याची आणि पाठिंब्याची जरुरी भासत होती. कारण युधिष्ठिर हा रडत-राउत होता आणि जेव्हा बाकीचे पांडव त्याचे ऐकत तेव्हा या रडत-राउताना घोड्यावर बसविणे हे कठीण काम होते.

 

lord-krishna-inmarathi01

 

दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण आणि यादव हे जरासंधासमोर मथुरा सोडून व्दारकेला पळाले होते, तरीही तेथेही जरासंध त्यांचा पिच्छा सोडत नव्हता. जरासंधाचे मित्र राजे फार होते आणि इतर कोणीही राजे या दोस्त राष्ट्रांमुळे यादवांना मदत करायला तयार नव्हते.

त्यामुळे यादव राज्याची परिस्थिती फार बिकट होती. यादवांचा विजय तर सोडाच पण सर्वनाश दिसू लागला होता .

जरासंध आणि शकुनीने हस्तिनापुर (कौरव), गांधार (शकुनीचा भाऊ तिथे राज्यावर होता), मगध (जरासंध), चेदी (शिशुपाल), विदर्भ (रुक्मी), अंग (कर्ण), सिंधू देश (जयद्रथ), नरकासुर (आसाम), शाल्व, पौंड्र वासुदेव, राजस्तानमध्ये जयपूरजवळ विराट राज्य (जेथे सत्ता आणि सूत्रे ही सेनापती किचकाकडे होती.) अशी अभेद्य मित्र देशांची साखळी उभी केली होती.

शकुनी स्वतः extremely brilliant strategist होता. या संघर्षात श्रीकृष्णाने त्याच्यावर strategy वापरून मात कशी केली हे बघणे महत्वाचे आहे.

युधिष्ठिर युवराज झाल्यावर काळात श्रीकृष्णाने युधिष्ठिर आणि कुंतीच्या इतर मुलांना हाताशी धरून हस्तिनापूरचे राज्य पांडवांकडे आले तर त्यांच्याशी मैत्री वाढवून ही शकुनीने निर्माण केलेली मित्र राज्यांची अभेद्य फळी तोडण्याची आणि त्याच बरोबर यादवांच्या राज्याला हा जो सततचा धोका होता तो कायमचा नष्ट करण्याची संधी बघितली.

पण पांडव लाक्षागृहात जाळल्याची बातमी आल्यावर श्रीकृष्णाने आपले गुप्तचर खाते कामाला लावले.

श्रीकृष्णाचे गुप्तचर खाते हे अतिशय सामर्थ्यवान असणार. कर्णाचा दानाचाअतिरेक, जरासंधाचा शक्तीचा अहंकार, कर्णाचा जन्म, विराटाच्या राज्यात किचकाचे वजन, दूर आसामातल्या नरकासुराच्या सिनी आणि राजवाड्याचा नकाशा आणि इतर अनेक गोष्टींची खडान्खडा माहिती श्रीकृष्णाकडे होती आणि तो ती माहिती योग्य वेळ आल्यावर वापरत गेला.

 

lord-krishna-inmarathi02

 

महाभारत सांगते की, लाक्षागृहात पांडव जळल्यावर श्रीकृष्ण आणि बलराम तडक हस्तिनापुरास गेले आणि नंतर श्रीकृष्णाने अथक प्रयत्न करून पांडवांचा पत्ता लावला. द्रौपदी स्वयंवराला श्रीकृष्ण हा एक आमंत्रित नसलेला पाहुणा होता.

हा श्रीकृष्णाचा महाभारतातील पहिला प्रवेश आहे. (कदाचित यादव हे गवळी म्हणजे खालच्या जातीचे होते आणि श्रीकृष्ण हा कर्णाप्रमाणे राजापण नव्हता त्यामुळे हे निमंत्रण नसेल.)

सगळे स्वयंवर त्याने एक शब्दही न बोलता बघितले. अर्जुन दौपदीला घेऊन घरी गेल्यावर आणि द्रौपदीला पाचात वाटून घ्या इ.इ. झाल्यावर ताबडतोब श्रीकृष्ण तेथे सोने, नाणे, वस्त्रे, उपकरणे आणि इतर भेटी घेऊन पोहोचतो.

पहिली गोष्ट म्हणजे तो कुंतीला पाचात वाटून घ्या या आज्ञेसाठी पाठींबा देतो, आपले दूरचे नाते रंगवून सांगतो आणि कुंतीचे मन जिंकतो.

युधिष्ठीर त्याला विचारतो की तुला कसे कळले की आम्ही पांडव आहोत तेव्हा तो मन जिंकणारे उत्तर देतो की वस्त्राने सूर्य थोडाच लपून राहील.

तेथून मग कृष्ण हा मैत्री वाढवत वाढवत पांडवाना नियंत्रित करायला सुरुवात करतो. त्यानंतर तो पांडवांबरोबर हस्तिनापूरला जातो, तेथे भीष्म, द्रोण, कृप, अश्वथामा, विदुर, व्यास या सगळ्या पांडवांच्या पाठराख्यांची मने जिंकतो आणि त्यांच्याशी खलबते करतो.

मग कृष्णाने शिकविल्याप्रमाणे पांडव एकदम सगळे राज्य मागतात. दुर्योधन, शकुनी हे काहीही देण्यास तयार नसतात. भीष्म निवाडा देतात की राज्याची फाळणी करावी आणि पांडवाना खांडववनाचा निबिड अरण्याचा प्रदेश देतात.

ते वन जाळायला म्हणून अर्जुन, द्रौपदी आणि श्रीकृष्ण, सुभद्रा जातात. (इथे अर्जुन सुभद्रेची ओळख होते.) यामध्ये यादवांनी मनुष्यबळ पुरविले असावे कारण सगळे रान फक्त दोघे जाळू शकत नाहीत. पण ते सगळे रान जाऊन तेथे इंद्रप्रस्थ उभे राहिले, त्याचे वैभव वाढत गेले.

यात श्रीकृष्णाला याद्वांमध्ये विरोध होता. व्दारकेचा सत्यजीत ज्याकडे स्मयन्तक मणी होता, पण जो श्रीकृष्णविरोधी होता त्याची मुलगी सत्यभामा हिच्याशी लग्न करून श्रीकृष्णाने तो विरोध संपविला.

 

lord-krishna-inmarathi03

 

जरासंध आपले सैन्य घेऊन विदर्भाच्या राजधानीत गेला, तेथे त्याने भीष्मक राजाला सुचविले की त्याने शिशुपालाशी रुक्मिणीचे लग्न लावावे. पण जरासंध परत गेल्यावर श्रीकृष्णाने गनिमी काव्याने रुक्मीणीला पळविले आणि रुक्मिणीशी लग्न करून विदर्भ आपल्या बाजूला आणले.

रुक्मीचा (रुक्मिणीचा भाऊ )पराभव श्रीकृष्णाने केला पण त्याला जिवंत सोडले. पुढे जाऊन रुक्मी हा श्रीकृष्णाचा चांगला मित्र झाला. महाभारत युद्धात तो आणि विदर्भ सैन्य न लढता तटस्थ राहिले.

आता श्रीकृष्णाने यादव (व्दारका आणि मथुरा), द्रुपद (पांचाल देश), पांडव (इंद्रप्रस्थ), विदर्भ देश, ऋक्ष राज्य (जम्बुवतीचे वडील जाम्बुवान), शल्य (नकुल सहदेवांचा मामा, माद्रीचा भाऊ आणि मद्र देशाचा राजा.) अशी मित्र देशांची फळी उभी करत आणली होती.

 

pandav InMarathi

 

श्रीकृष्णाला हे दिसत होते की, हे दोन एकमेकाविरोधी राज्याचे समूह होते की, जे केव्हा तरी एका अंतिम युद्धात भिडणार आहेत आणि हे युध्द सर्वनाशक होईल. तो वर्षानुवर्षे त्या दृष्टीने शांतपणे व्यूहरचना करत होता. पण अजूनही शकुनीच्या मित्रांची साखळी फारच ताकदवर होती. युद्धाला तोंड फुटण्याआधी त्याला हा दोन पक्षांमधील फरक कमी करायचा होता.

हे उद्दिष्ट घेऊन श्रीकृष्णाने पहिले लक्ष केंद्रित केले आसामच्या नरकासुरावर. गुजरातमधील व्दारकेचा श्रीकृष्ण आसामच्या नरकासुरावर अचानक हल्ला करेल अशी कल्पनासुद्धा कोणीच केली नसेल.

हे थोडेसे शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीसारखे आहे. नरकासुरावर हल्ला करून त्याला दिवाळीतल्या अमावास्येच्या दिवशी (नरक चतुर्दशी) मारले.

कदाचित त्यादिवशी प्रागज्योतिषपुरात (नरकासुराच्या राजधानीत) फारसे सैन्य नसावं. हा विजय फार महत्वाचा होता आणि श्रीकृष्णाला लाभलेले हे फार मोठे यश होते, त्यामुळे कदाचित हा दिवस नरकचतुर्दशी म्हणून साजरा केला जातो.

कौरव पक्षाचा एक महत्वाचा मित्र मारला गेला.

त्याच्या जागी राज्यावर आलेला भगदत्त हा इतका शूर नव्हता. कदाचित आसाम फार दूर असल्याने कौरव इतक्या घाईने काहीही करू शकले नाही.

 

lord-krishna-inmarathi04

 

एक थोडे विषयांतर : नरकासुराचा सेनापती होता मुर आणि श्रीकृष्णाने त्याला आधी मारले. आता मुराचा शत्रू म्हणजे “अरी” म्हणून श्रीकृष्ण हा मूर + अरी = मुरारी असे संबोधला जातो. तसेच नरकासुर हा राक्षस नसून स्वतः विष्णू आणि भूदेवीचा मुलगा होता.

त्यात मध्यंतरी अर्जुनाच्या धर्म द्रौपदीचा एकांत तोडला म्हणून जी तीर्थयात्रा केली तेव्हा श्रीकृष्णाने बलरामाचा सुभद्रेचे लग्न दुर्योधनाशी करण्याचा बेत अर्जुनाला सुभद्रेला पळवून नेण्याची चिथावणी देऊन उधळला.

त्याच तीर्थयात्रेत अर्जुनाने उलुपीशी लग्न करून नागा राज्य पांडव मित्र पक्षाला जोडले. तसेच अर्जुनाने चित्रागन्देशी लग्न करून मणिपूरचे राज्य परत मित्रपक्षाला जोडले.

त्यानंतर श्रीकृष्णाने लक्ष वळविले त्या महाकाय, महा बुद्धिवान, महासेनापती आणि म्हणूनच अजिंक्य असलेल्या अशा जरासंधाकडे. जरासंध हा त्या काळावर एक आपली प्रचंड छाप टाकून होता. शकुनीने जी फळी उभी केली होती त्यामध्ये जरासंधाचा फार मोठा भाग होता, जसे कंसाला आपली मुलगी देणे.

महाभारत सांगते की त्याने ९५ राजे बंदिवान केले होते.

जरासंधाला समोरासमोर सैन्याच्या लढाईत जिंकणे तर अशक्य होते हे श्रीकृष्ण ओळखून होता. म्हणून तो अर्जुन, भीम ब्राह्मणांचा वेश घेऊन गेले आणि त्याला मल्लयुध्दाचे आव्हान दिले. (हे काहीसे अफझलखान वधासारखे होते.)

मल्लयुध्द झाले आणि जरासंधाला कसे मारायचे हे पुन्हा श्रीकृष्णाने भीमाला सांगितले. (म्हणजेच श्रीकृष्णाची गुप्तचर यंत्रणा ही अतिशय उत्तम असली पाहिजे) जरासंध मेल्यावर हे सगळे ९५ राजे हे पांडव आणि श्रीकृष्णाचे मित्र झाले आणि श्रीकृष्ण उभी करत असलेली फळी मजबूत झाली आणि कौरव एका अर्थाने पोरके झाले.

त्यानंतर श्रीकृष्णाने पांडवाना राजसूय यज्ञ करायला सांगितले. राजसूय आणि अश्वमेध हे यज्ञ फक्त चक्रवर्ती सम्राट करू शकत.

 

rajasuya yagna InMarathi

 

पांडवानी हा यज्ञ करणे म्हणजे कौरवांच्या तोंडावर एक जोरदार थप्पड होती की, बघा आम्ही युधिष्ठीर चक्रवर्ती म्हणजेच पृथ्वीचा सम्राट झाला आहे. जरी एका कुटुंबातले म्हणून कौरवांना पांडव सेनेचा सामना करावा लागला नाही तरी एका दृष्टीने कौरव आता पांडवाचे मांडलिक झाले.

या यज्ञात कौरवांना घरचे कार्य आहे म्हणून अपमानास्पद कामे सांगण्यात आली, कामे सांगणारे अर्थातच भीष्म पितामह होते. प्रेमाचा आणि सौजन्याचा बुरखा पांघरून जितके वाईट वागविता येईल तितके वागविले, कारण त्यांना चिडविणे पण उघड कुरापत न काढणे हे उद्दिष्ट होते. द्रौपदीने त्यात. दुर्योधनाचा फार अपमान केला.

राजसूय यज्ञ म्हणजे पांडवांच्या वैभवाचे अफाट प्रदर्शन होते. या यज्ञाचे वर्णन मुळातून वाचण्यासारखे आहे. त्यातून कौरव आणखी चिडले आणि अपमानित झाले.

या यज्ञात शिशुपालाला मुद्दाम बोलविले.

शिशुपालाला श्रीकृष्णाबद्दल अतिशय कमालीचा संताप होता, कंस, जरासंध, कालयवन, नरकासुर, हंस, डीम्बक अशा शिशुपाल मित्रांचा नाश हा श्रीकृष्णाने घडवून आणला होता. रुक्मिणीशी त्याचे लग्न ठरलेले असताना श्रीकृष्णाने तिला पळविले आणि शिशुपालाचा युद्धात पराभव केला.

त्यामुळे श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान दिला की, शिशुपालाची प्रतिक्रिया काय होईल ते श्रीकृष्णाला अचूक माहित होते. आणि म्हणून हा ठराव त्याने बाह्यत: तटस्थ असलेल्या पण आतून पांडवांचे असलेल्या भिष्माचार्याकडून मांडविण्याची व्यवस्था केली.

जे श्रीकृष्णाने एक Extremely Brilliant Strategist म्हणून भाकीत केले होते तेच झाले. शिशुपालाचा अनेक वर्षे खदखदत असलेला संताप उफाळून आला आणि तो तोल सुटून बोलू लागला.

 

krishna and shishupal InMarthi

हे ही वाचा – आजही श्रीकृष्ण इथे करतो रासलीला… वृंदावनातील एका अद्भुत जागेचं रहस्य!

यज्ञात वैयक्तिक भांडणे ही बाजूला ठेवली जात. त्यामुळे सगळे स्तब्ध झाले. श्रीकृष्णाला हवी असलेली संधी मिळाली, कारण यज्ञात राजे आपले सैन्य आणि शस्त्रास्त्रे मांडवाबाहेर ठेवत.

त्यामुळे त्याने राग आल्याचे दाखवून शिशुपालाला मारले. यज्ञमंडपात लढणे, शत्रूला मारणे वर्ज्य होते, तरीही श्रीकृष्णाने शिशुपालाला मारले म्हणून कदाचित १०० अपराध इ.इ. आख्यायिका रचण्यात आल्या असाव्यात.

 

lord-krishna-inmarathi06

 

श्रीकृष्णाने शिशुपालाला मारले आणि शकुनीच्या तयार केलेल्या अभेद्य फळीचा आणखीन एक आधारस्तंभ कोसळला.

आता श्रीकृष्ण तयार होता कौरव आणि त्यांच्या मित्र पक्षाशी अखेरचे आणि निर्णायक युध्द घडवून आणायला. पण Extremely Brilliant Strategist सुध्दा कुठे तरी चूक करतोच.

श्रीकृष्णाने कुंती, अर्जुन, भीम आणि द्रोपदीशी अतिशय जवळचे स्नेहसंबंध निर्माण केले होते की, ते काहीही श्रीकृष्णाला विचारल्याशिवाय करत नसत.

पण युधीष्ठीराशी जरी संबध जवळचे होते तरी ते तितके जवळचे नव्हते. युधिष्ठिराला ओळखण्यात श्रीकृष्णाने फार मोठी चूक केली.

या मूर्ख युधिष्ठीराने श्रीकृष्ण परगावी गेला असताना आपली अक्कल वापरून सगळा विचका केला आणि श्रीकृष्णाचा उभा केलेला इतका मोठा आराखडा जमीनदोस्त केला. तो आघात होता द्यूत आणि पांडवांचे वैभवशाली राज्य जाणे.

या ठिकाणी मात्र शकुनीने strategy मध्ये आणि मनुष्य स्वभाव ओळखण्यात श्रीकृष्णावर मात केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?