या ‘मराठी सिंघम’ ने पटना शहरातील गुन्हेगारांची झोप उडवली होती…!! वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्या लोकांना पोलीस खात्याबद्दल जितका आदर आहे, तितकीच भीती देखील मनात आहे, आणि हो.. ती असायलाच हवी! पोलीस हा शब्द ऐकताच आपल्या डोळयांसमोर उभा राहतो दबंग मधला चुलबुल पांडे किंवा जुन्या सिनेमात पोलिसांचं पात्र साकारणारा इफ्तिकार!
मध्ये काही वर्षांपूर्वी अजय देवगणचा सिंघम पिक्चर आला आणि त्यात दाखवलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या पात्राने सगळ्यांनाच भुरळ घातली.
बलदंड शरीरयष्टीचा, गुंड आणि दुष्ट प्रवृत्तींचा कर्दनकाळ असलेला असा सिंघम देशातील प्रत्येक पोलीस ठाण्यात रुजू झाला तर गुन्हेगारी नाहीशी होण्यास किंचितसाही वेळ लागणार नाही असे सगळ्यांना वाटू लागले. असे होणे तसे दुरापास्तचं !
आपल्याकडे पोलीस खात्यात कित्येक सिंघम तुम्हाला बघायला मिळतील, आयपीएस ऑफिसर विश्वास पाटील, एनकॉउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, २६/११ च्या हल्ल्यात शाहिद झालेले विजय साळसकर असे कित्येक धडाडीचे पोलीस ऑफिसर्स आपल्या इथे आहेत!
आज याच धाडसी ऑफिसर्समुळे आपण शांत झोपू शकतो, जसे सीमेवर जवान डोळ्यात तेल घालून लक्ष देतात तसच काम हे पोलीस खात्यातले ऑफिसर्स करत असतात!
पण बिहारच्या पाटणा जिल्ह्यात एक असा सिंघम होता ज्याने तेथील गुंडांच्या नाकी अगदी दम आणला होता. त्याचे नाव ऐकताच तेथील गुंडांचे हातपाय लटपटायला लागायचे असे म्हणतात.
तुमच्यापैकी बरेचजण या सिंघम पोलीस अधिकाऱ्याबद्दल ऐकून असतील. तर बरेचसे जण असेही असतील ज्यांना या सिंघमबद्दल काही माहिती नसेल.
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी एक खास गोष्ट –
हा सिंघम अधिकारी आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र आहे आणि त्याचे नाव आहे – आयपीएस ऑफिसर शिवदीप वामन लांडे
शिवदीप यांचा जन्म २० ऑगस्ट १९७६ रोजी महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील पारस गावामध्ये झाला.
त्यांनी इलेक्ट्रॉनिक मधून बी.ई.चे शिक्षण पूर्ण केले. पण पोलीस दलाचे भारी अप्रूप असल्याकारणाने त्यांनी आपला मार्ग बदलला आणि २००६ च्या बॅचमधून आयपीएस अधिकारी होऊन ते बाहेर पडले.
आयपीएस झाल्यावर त्यांच्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी टाकण्यात आली. त्यांना बिहारची राजधानी पाटणा इथे शहराचे एसपी म्हणून धाडण्यात आले.
हे शहर आधीपासूनच गुन्हेगारीच्या नावाने बदनाम आहे, त्यामुळे तेथील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे ध्येय शिवदीप यांच्या समोर होते.
रुजू झाल्यावर लगेचच त्यांनी पाटणाच्या गुन्हेगारी जगतात स्वच्छता मोहीम सुरु केली आणि अल्पावधीतच ते जनतेमध्ये प्रसिद्ध झाले. त्यांनी आपल्या १० महिन्यांच्या सेवेत चिंधीचोरांपासून थेट माफिया डीलर्सना तुरुंगाची हवा खायला लावली.
मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणांतील वाढते प्रमाण बघून ते स्वत: रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सगळ्या टपोरी वर्गाला चांगलीच अद्दल घडवली.
ज्यामुळे काही काळातच छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आणि महिला वर्गांमध्ये त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला.
कोणतीही कारवाई करण्यापूर्वी ते अचूक प्लानिंग करायचे. कारवाई होत असताना तेथे मिडिया उपस्थित असेल याची ते विशेष खबरदारी घ्यायचे. ज्यामुळे त्यांच्या कारवाईवर कोणतेही प्रश्नचिन्ह कधीच उभे राहिले नाही.
शिवदीप लांडे हे प्रत्येक तक्रारीकडे जातीने लक्ष द्यायचे. त्यांचा स्वत:च्या तत्वांवर पूर्ण विश्वास होता.
त्यांनी कधीही आपल्या कार्याशी प्रतारणा केली असे दिसून आले नाही.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्वत:च्या पगारातील ६०% हिस्सा हा एका संस्थेला दान द्यायचे. ही संस्था गरीब मुलींची लग्न लावून द्यायची आणि विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहे उपलब्ध करून द्यायची.
जेव्हा त्यांचे पाटणावरून अरारिया येथे ट्रान्स्फर करण्यात आले तेव्हा त्यांच्या ट्रान्सफर संदर्भात उलट्या सुलट्या चर्चा लोकंमध्ये रंगू लागल्या आणि तेथील जनता त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरली.
सर्वांनी मिळून सरकारने शिवदीप यांची बदली करू नये अशी विनंती केली. शिवदीप लांडे यांना जनतेच मिळालेलं प्रेम त्यांच्या कामाची पोचपावती होती जणू !
अरारिया येथे ट्रान्स्फर झाल्यानंतरही त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवला.
सध्या शिवदीप लांडे हे मुंबई क्राईम ब्रांच नार्कोटिक्स डिपार्टमेंट येथे कार्यरत आहेत, नार्कोटिक्स डिपार्टमेंट म्हणजे ड्रग्स आणि इतर अमली पदार्थांच्या व्यापारावर निर्बंध घालणारे डिपार्टमेंट!
असे कित्येक ऑफिसर्स आहेत जे त्यांचं काम अतिशय तत्परतेने करत असतात, कोणताही गैरमार्ग न अवलंबता कित्येक पोलीस ऑफिसर्स लोकांच्याच सेवेसाठी सतत कार्यरत असतात!
आणि ह्या अशा ऑफिसर्स मुळेच पोलीस खातं आणि सिस्टीम वर लोकांचा विश्वास अजूनही टिकून आहेत! पोलिसांची भीती वाटण्यापेक्षा त्यांच्याबाबतीत आदर निर्माण होणं जास्त गरजेचं आहे!
असा हा सर्वाना हवाहवासा वाटणारा सिंघम सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.