‘आपण मेलोय’ याची तुम्हाला तुमच्या मृत्युनंतरही जाणीव असते… शास्त्राज्ञांचा अचाट शोध!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ज्याने जन्म घेतला त्याचा मृत्यू अटळ आहे. आपल्याला सगळ्यांनाच हे माहीत आहे. अमर आत्म्याच्या संकल्पना जरी आपण मानात असलो तरी अजून कोणीही अमर आत्मा पाहिलेला नाही. तसेच पुनर्जन्माची ‘केस’ आपल्या पाहण्यात नाही (हिंदी सिनेमांव्यतिरिक्त). मृत्यू हेच अंतिम सत्य आहे.
मृत्यूचे भय सगळ्यांनाच आहे. किंबहुना हे सत्य सगळ्यांनाच ज्ञात आहे.
जो तो मृत्यू पूर्वी आपल्याला हव्या त्या गोष्टी करू पाहतो. न जाणो काही गोष्टी राहून गेल्या तर पुन्हा करायला मिळतील की नाही, पुन्हा पाहता येतील की नाही, पुन्हा काही क्षण जगता येतील की नाही..??!!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
कोणाचा मृत्यू झाला की सगळं काही काळ थांबल्यासारखं वाटतं. काही जण शोकात बुडून जातात. तर काही जण लवकर सावरतात. परंतु
‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे…!’
या समर्थांच्या श्लोका प्रमाणे जगरहाटी चालत राहते. आपल्या पश्चात काहीही थांबत नसतं.
आपल्या माणसाचं दुःख काही काळ सगळ्यांनाच असतं. त्यासाठी आठवणीने दहाव्या तेराव्या पर्यंत एक तेलाचा दिवा कोपऱ्यात लावून ठेवतात. ह्यामागे असे कारण सांगितलेले आहे की, मृत्यू पावलेल्या माणसाचा आत्मा आजूबाजूला असतो आणि तो सगळं बघत असतो. आपल्या निधनानंतर घरच्यांवर आलेल्या दुःखाला तो अनुभवत असतो.
कोण कोण येतो आणि आपल्याबद्दल काय व्यक्त होतो तेही तो आत्मा पाहत असतो म्हणे.
या अशा गोष्टी मेल्यावर खरोखरच दिसतात की, नाही माहीत नाही पण जिवंतपणी देखील माणसांना, ‘आपल्यावर कोण प्रेम करतो आणि आपल्याविषयी कोण काय म्हणतो, आपण गेल्यावर कोणी खरंच आपल्यावरच्या प्रेमापोटी रडेल, का आपल्या इस्टेटीवर डोळा ठेवेल,’ हे जाणून घ्यायची इच्छा असतेच. असो, मृत्यू पश्चात ‘तेरावा’ केला की, तो घुटमळणारा आत्मा निघून जातो किंवा शांत होतो असे आपण मानतो.
खरं तर ‘आपण मेलोय’ किंवा ‘ह्या जगातील आपलं अस्तित्व आता संपलंय’, हे एवढं जरी आपल्याला आपल्या मृत्यू पश्चात कळत असेल तरी पुष्कळ झालं. १३ दिवसांत काय काय घडेल याचं काय घेऊन बसलोय..?? नाही का..!?
ह्यावर मात्र काही माणसं खूप निश्चयपूर्वक मोठमोठ्या बाता मारतानाही आपण ऐकल्यात. पुनर्जन्मच काय तर काहीजण मोठ्या आजारातून बरे होताना “वर” जाऊन आल्याचे पण छातीठोक पणे सांगतात. नुसते वर जाऊन आल्याचं नाही, तर खरोखर मृत्यू नंतरचं जगही काही मिनिटे अनुभवून आल्याचं पण सांगितलेलं ऐकिवात आहे.
अशक्यप्राय वाटते ना..?? पण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हे अगदीच अशक्य नाहीये. काही डॉक्टरांनी पण आपले असे अनुभव कथन केले आहेत.
त्यांच्या काही पेशंट्सनी, जे मृत्यूच्या दाढेतून कसे बसे वाचवले गेले होते त्यांनी काही विचित्र अनुभव घेतले आणि ते डॉक्टरांना सांगितले.
जसे की, बोगद्याच्या शेवटी प्रकाश दिसणे किंवा ऑपरेशन थेटरमध्ये काय चालू होते, ते शुद्धीवर नसताना ही अनुभवणे. एक ना अनेक, विश्वास बसणार नाहीत अशा कहाण्या. कित्येक माणसे जन्माला आली आणि निर्वतली. पण ‘माझा मृत्यू झालाय’ हे मृत्यू नंतर समजलेला माणूस खरंच असेल का?
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील, लँगॉन स्कुल ऑफ मेडिसिन मधले शास्त्रज्ञ, डॉक्टर सॅम पार्निया ह्या सगळ्या गोष्टींना समर्थन देतात. मृत्यू नंतर खरंच का आपला देह जाणत असतो की, आपला मृत्यू झालाय ते? आणि त्याचा संबंध मेंदूशी आहे का? ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्यांच्याकडे आहे.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, माणसाच्या हृदयाचे ठोके बंद पडले की, माणूस मेला असा सर्वसाधारण समज आहे. कारण हृदय चालू असणे ही शरीरातील चैतन्य कायम राखणारी महत्वाची प्रक्रिया आहे.
हृदय संपूर्ण शरीराला रक्ताचा पुरवठा करत असल्याने माणूस जिवंत राहतो. रक्तपुरवठ्याची प्रक्रिया जर बंद पडली तर अर्थातच शरीरातील बाकी अवयव निकामी होऊ लागतात आणि मृत्यू निश्चित होतो.
—
हे ही वाचा – मृत्यूच्या समीप असलेल्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय विचार चालू असतात ?
—
पण ह्या नंतर अजून काही प्रक्रिया शरीरात नव्याने सुरू होते हे आपणास माहीतच नसते. मेंदू मध्ये मज्जातंतू इलेक्ट्रिक फोर्स सारखे काम करत असतात आणि मज्जारज्जूनमधून इलेक्ट्रिक करंट प्रमाणे संदेशाची वाहतूक होत असते. मेंदूची पकड सगळ्या अवयवांवर देखील असते.
हृदय बंद पडल्यास, रक्त पुरवठा कमी होऊन रक्तदाब देखील कमी व्हायला लागतो. ह्यामुळे एक मोठा इलेक्ट्रिक करंट झटका लागल्यासारखा मेंदूला मिळतो. जोराने सगळी हालचाल सुरू राहते. त्यामुळे बुब्बुळं, कान, विचार करण्याची शक्ती असलेला मेंदूचा भाग काही काळ चालू राहतो.
हा प्रयोग त्या शास्त्रज्ञांनी मरायला टेकलेल्या उंदरांवर करून पाहिलेला आहे. त्याच्या मेंदूमध्ये झालेली तीव्र हालचाल त्यांनी नोंद केलेली आहे.
बंद हृदयाला परत सुरू करण्यासाठी डॉक्टर काही प्रयत्नही करतात. शॉक देणे किंवा छातीवर दाब देऊन हृदयाला परत चेतना देणे असे काही प्रयोग नुकत्याच मृत्यू पावलेल्या शरीरावर केले जातात. त्यामुळे देखील मेंदूला चेतना मिळते आणि आणखी काही सेकंद ते काही मिनिटे तो काम करत राहतो.
त्यामध्ये शरीरास काय होतंय किंवा काय झालंय ह्याची कल्पना मेंदूपर्यंत पोहचू शकते आणि त्यामुळेच आपण मेलोय ह्याची भावना काही जणांना होते.
अशा हृदयाला दिलेल्या विजेच्या झटक्यांमुळे जर माणूस परत जिवंत झालाच तर त्याचे अवयव, रक्तदाब आणि मेंदू पूर्ववत होतो. त्याचे कार्य व्यवस्थित चालू होते. त्यामुळे त्या माणसाच्या ‘काही मिनिटांच्या मृत्यू’ मध्ये काय काय घडले ह्याचेही त्याला भान राहते. तसे तो सांगू ही शकतो असे डॉक्टरांचे मत आहे.
काही जणांचे असे अनुभव डॉक्टरांनीही ऐकलेत.
जसे, नुकत्याच मेलेल्या पेशंटला पुन्हा जीवित करताना, डॉक्टर आणि नर्स एकमेकांच्यात काय काय बोलत होते, त्या खोलीत काय काय घडले त्याचे इत्यंभूत कथन डॉक्टरांनी त्याच पेशंटच्या तोंडून नंतर ऐकले आहे.
ह्याचा अर्थ असा की त्या माणसाला आपण मेलोय हे तर कळलेच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त मेल्यानंतर काय काय घडले ते पण मेंदू आणि इतर अवयव कार्यरत असल्यामुळे त्या व्यक्तीला समजले असणार.
डॉक्टर पार्निया सांगतात की, त्यांचे अजूनही ह्या विषयावर संशोधन चालूच आहे. जितके असे पेशंट त्यांना मिळतील तितके नवीन शोध अजून लागतील. त्यांचे भिन्न भिन्न अनुभव ऐकून त्यावर अजून संशोधन करून काही महत्त्वाचे निष्कर्ष देखील काढता येऊ शकतील.
त्यांनी असाही दावा केला आहे की, माणूस मेल्यावर काही वेळा मेंदूदेखील २० ते ३० सेकंदात मरण पावतो. तरीही मेंदूची ‘जाणीव’ प्रक्रिया (conscious mind) पुढची अडीच तीन मिनिटे चालू राहते.
तर इतर काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, असे काही जे अनुभव सांगितले जातात पेशंट कडून ते खरे जागेपणाने अनुभवलेले अनुभव नसून ऑक्सिजन च्या अभावाने मेंदूमध्ये झालेल्या हालचालींमुळे असतात.
—
हे ही वाचा – मृत्यूनंतरही आपली नखे आणि केस वाढतच असतात का? जाणून घ्या..
—
जर मृत्यूपश्चातही तुम्ही मेला आहात हे जर तुम्हाला कळत असेल तर ‘टेक्निकली’ तुम्ही जिवंतच आहात असाही नॅशनल जिओग्राफिक चा रिपोर्ट आहे.
या सगळ्यावर डॉक्टर पार्निया म्हणतात,
‘मृत्यू नंतर मेंदू किती काळ आणि कसे काम करू शकतो किंवा त्याला जिवंत राहायला किती ऑक्सिजन चा पुरवठा लागतो हे सुद्धा शोधले जाऊ शकते. ब्रेन ट्रान्सप्लांट साठी तो अजून काही काळ जिवंत राहू शकतो का किंवा त्याला मेल्यावर परत जिवंत करता येऊ शकते का ही पण एक शक्यता पडताळली जाऊ शकते.’
थोडक्यात काय तर आपण मेलोय का नाही याचा अनुभव ज्याचा त्यांनी घ्यायचा असतो.
काळ आणि वेळ आल्यावर तो प्रत्येक जण घेऊ शकत असावा किंवा नाही सुद्धा. बाकी सध्या इतरांच्या मृत्यूपश्चात घडलेल्या कहाण्यांवर थोडा फार विश्वास ठेऊन बघण्यास हरकत नाही…!
===
हे ही वाचा – स्वत:ची संपत्ती मृत्युनंतर सत्कारणी लागावी यासाठी एक कठोर निर्णय घेणारा फिल्मस्टार!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.