विमानाने, पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना जास्त तास का लागतात? समजून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
जगात सर्वत्र दळणवळणाची ४ प्रमुख साधनं आहेत. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, समुद्री वाहतूक आणि विमान वाहतूक.. प्रत्येक साधन त्याच्या परीने खूप महत्वाचे आहे..
ह्या साधनांच्या वाहतुकी मागे शास्त्र म्हणजे सोप्या भाषेत विशेष सायन्स आहे, इंजिनीरिंग म्हणा हवं तर..!
गणिती आकडेमोड, वेग, इंधन, लागणारी यंत्र सामग्री आणि कुशल वाहक वापरून ह्या वाहतुकीतील वाहने बनवली जातात आणि हाकली जातात हे सर्वज्ञात आहेच.
दळणवळणाचे महत्वाचे काम काय तर वस्तू आणि समान एका स्थळावरून दुसऱ्या स्थळी पोहचवणे..
बरं.. बस किंवा कुठल्याही रस्ते वाहतुकीच्या साधनाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण नेहमीच जात असू तर आपल्याला दर वेळी पोहोचायला साधारण समानच वेळ लागत असतो..
पण कधी खूप ट्राफिक लागल्यास काही मिनिटे पुढे मागे नक्कीच होणार..
रेल्वेचं पण तसंच आहे.. वातावरण खराब नसेल आणि रेल्वे वेळेत असेल तर जायला आणि यायला समसमान वेळ लागतो.. पण मात्र भौतिक अडीअडचणी आल्यातर तोच प्रवास खूप लांबू शकतो.
समुद्री वाहतुकीच्या आपल्या वेगळ्या अडीअडचणी असतात. त्यामुळे त्यांचा काहीच ठाव ठिकाणा सांगता येत नाही.. किंवा अमुक एक वेळ सांगता येत नाही.
पण विमान वाहतूकीमध्ये ना ट्रॅफिक असते, ना पाण्याच्या लाटा, ना रूळ वाहून जातात, ना रस्ते कारण वाहतूक तर वर आकाशातून होते.
पण गम्मत अशी, की पश्चिमेकडून आपण पूर्वेकडील एखाद्या देशात गेलो तर वेळ कमी लागतो आणि त्याच देशातून परतीच्या देशात पश्चिमेकडे उडताना मात्र वेळेमध्ये वाढ होते. हे कसं काय बुवा..?
खरं तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणजे बघायला गेलं तर विमानातून पश्चिम दिशेला उडताना आपलं गंतव्य स्थळ म्हणजेच डेस्टिनेशन आपल्याच दिशेने वेगाने येत असतं.
अशावेळी आपण चटकन पोचलो पाहिजे नाही..?
आणि ह्या उलट पूर्वेकडे उडताना वेळ लागला पाहिजे कारण पृथ्वीही आपल्यापुढे पळत असते, नाही का? पण ह्याच उत्तर ‘नाही’ असंच मिळेल..!
ह्या गमतीशीर कुतूहलामागचं कारण आहे पृथ्वीचे परिभ्रमण आणि पृथ्वीच्या वर वातावरणाच्या थरांमध्ये वाहणारे वारे ज्याला ‘जेट स्ट्रीम्स’ असेही म्हणतात.
म्हणजेच ध्रुवीय वारे, उप-विषुववृत्तीय वारे, आणि विषुववृत्तीय वारे.
पृथ्वी पश्चिमेकडून पूर्व दिशेला फिरते आणि त्याच दिशेने खूप जोराने हे वारे ही वाहतात. कधी कधी ह्या वाऱ्यांचा प्रवाह उत्तरेला किंवा दक्षिणेला वळून पुढे जात राहतो.
ह्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळेच पृथ्वीवरील तापमानाचे नियमन होत असते. त्या वाऱ्यांचा वेग अंदाजे ३२१ किलोमीटर प्रति तास पर्यंत असू शकतो.
ह्या प्रवाहासोबत जर विमान उडत असेल तर विमान उडवायला वैमानिकाला जास्ती त्रास होत नाही.
वाऱ्याबरोबर विमान पुढे ढकलले जाते त्याचा वायूवेग आपसूकच वाढतो. ह्या प्रवाहाचा ‘टनेल’ सारखा छान उपयोग करून वैमानिक पूर्वेकडील गंतव्य स्थानावर लवकर पोचू शकतो.
अशात वेळेसोबत इंधनाचीही बचत होते.
पण बऱ्यापैकी ताकदवान असलेल्या ह्या वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेने प्रवास करणे अवघड ठरू शकतं. ह्या वाऱ्यांच्या उच्च दाबामुळे विमानाला हवी तशी गती पकडणेही सोपे नसते.
कधी कधी तर विमान भरकटण्यामागेही ह्याच वाऱ्यांचा हात असतो.
ज्या वाऱ्यांचा परिणाम पृथ्वीवरील तापमान नियांत्रणावर आणि ग्लोबल वॉर्मिंग मुळे तर हल्ली वातावरण बिघडण्यामध्ये होतो, त्या वाऱ्यांच्या विरोधात प्रवास करताना विमानाला त्याचा वेग सांभाळून उडावे लागते.
त्यामुळे त्याच मार्गावरून परतीच्या प्रवासाला किंबहुना डेस्टिनेशन ला पोहचायला अंमळ जास्तीच वेळ लागतो.
त्यामुळे जर अमेरिकेतून तुम्ही युरोप मध्ये ज्या वेळेत पोचलात त्याच वेळेत तुम्हाला परतीच्या प्रवासाला, पूर्वे कडून पश्चिमेकडे परतायला निश्चितच जरा वेळ लागणार.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.