महाभारतातील ब्रह्मास्त्र म्हणजे अणुबॉम्ब – विज्ञान की अंधश्रद्धा?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – आदित्य कोरडे
===
मागे एकदा कुठेतरी ‘ज्ञानेश्वरी मधले विज्ञान’ किंवा असेच काहीतरी भन्नाट लिहिलेला लेख वाचला होता.
त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र ते अगदी प्रसूतिशास्त्र यांची साद्यंत माहिती कशी होती आणि त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत कसे ठायी ठायी सापडतात याचे रसभरीत वर्णन केलेले होते.
तसाच काहीसा लेख समर्थ रामदासांवर सुद्धा वाचण्यात आला. मला वाटतं पावसाळ्यात जशा रोगाच्या साथी येतात हा तसाच काहीसा हा प्रकार असावा!
एक पुण्यात राहणारे लेखक(?) जे चांगले MBBS डॉक्टर आहेत त्यांनी तर अशा विषयांवर भरपूर पुस्तकं लिहिली आहेत.
माणूस डॉक्टर आहे म्हणून आमच्या वडिलांनी ती घेतली आणि भयंकर निराशा झाली.
रामायणात जम्बो जेट काय, महाभारतात अण्वस्त्र काय, सूक्ष्मदर्शक आणि टेस्ट ट्यूब बेबी काय..! राम राम राम !!!
हे म्हणे स्वतः योग सामर्थ्याने मंगळावर गेले होते आणि त्यांची निरीक्षणं चक्क नासाने खरी मानली आहेत.
(नासाला कामधंदे नाहीत) अशा लोकांना खरतरं लिहायला/ छापायला बंदी केली पाहिजे पण लोकशाही आहे, त्यामुळे नाईलाज आहे.
माझा एक मित्र आहे. त्याची बायको भांडारकर संस्थेत जुन्या संस्कृत ग्रंथांचे भाषांतर करायचे काम करते.
माझी तिची नुकतीच चर्चा झाली की बुवा हे जे वेदकाली विमान, अंतराळ यान, ब्रह्मास्त्र म्हणजे atom bomb अशा गोष्टी होत्या असं आम्ही ऐकतो, वाचतो त्यात काही तथ्य आहे का?
यावर तिने सांगितलेली माहिती उद्बोधक ठरेल.
एक तर काय असत की जुने ग्रंथ, जुने ग्रंथ असे जे महणतात ते फार फार तर ८ व्या किंवा ९ व्या शतकातले असतात ते सुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक!
त्या आधीचे ग्रंथ असे मिळत नाहीत. शिलालेख, ताम्रपत्र मिळतात आणि ते अत्यंत महत्वाचे पण ते म्हणजे ग्रंथ नाही. त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे (NOTICE BOARD) स्वरुपाची असते.
आता यावरून प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते अशी खातरजमा करता नाही आली तरी ह्या गोष्टी निखालस खोट्या आहेत असंही काही खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे हे ग्रंथ जरी जुने असले तरी ते अस्सल असतात असे नाही, म्हणजे त्यात प्रक्षेप असतात.
उदा. महाभारताची जी चिकित्सक आवृत्ती आहे ती अनेक थोर इतिहास संशोधकांनी ( सुखटणकर, कोसंबी, मिश्र वगैरे ) अनेक वर्षांच्या अनंत परिश्रमांद्वारे सिद्ध केली आहे.
तिच्या मध्ये सुद्धा प्रक्षेप आहेत पण ते साधारणतः २ ऱ्या किंवा ३ ऱ्या शतकातले.
म्हणजे आपण असे म्हणू शकतो की महाभारताची चिकित्सक आवृत्ती आपल्याला साधारण ई. स. १५० च्या सुमारास प्रचलित असलेल्या महाभारत कथेकडे घेऊन जाते.
आता तुम्ही विचार करा, इतक्या महान इतिहास संशोधकांना इतक्या प्रचंड मेहनती नंतर जर सर्वांना माहित असलेल्या महाभारत कथेच्या त्यातल्या त्यात अस्सल प्रती पर्यंत पोहोचायला एवढा त्रास होत असेल तर,
आजकाल उठ सुट कोणीही लुंगेसुंगे प्राचीन भारतात विमाने, अंतराळ याने, अण्वस्त्रे आणि काय काय शोधून काढतात त्यांच्या विश्वासार्हते बद्दल आपण काय बोलावे.
आता रामायणात येणारा पुष्पक विमानाचा उल्लेख घ्या. एक तर हा एक प्रक्षेप आहे.
तो नंतर कुणीतरी घुसडला आहे, पण चला घटकाभर पुष्पक विमान होते असे गृहीत धरले तर ते कोणत्या इंधनावर चालायचे? ते इंधन कुठून मिळायचे ? ते शुद्ध कुठे आणि कसे करायचे ?
जिथे बनवले तिथून विमानापर्यंत कसे आणायचे? रथातून की गाढवावर लादून? की आजच्या सारख्या रेल्वे गाड्या, मोटारी डांबरी सडका होत्या तेव्हा? असतील तर त्याचे उल्लेख कसे कुठे नाहीत?
कसे असतील कुणा शहाण्या माणसाने आपल्या गोष्टीवेल्हाळ स्वभावाला अनुसरुन एक छान गोष्ट रचून दिले, घुसडून झाले, अन काय? आणि एकच विमान बनवले विमानांचा ताफा नाही? कमाल आहे बुवा..!
तीच गोष्ट अण्वस्त्रांची! अण्वस्त्र म्हणजे काय दिवाळीचे आपट बार आहेत का? ती अण्वस्त्र काय घोडागाडी(रथ) किंवा बैल गाडीतून तीर कामठ्याने हात दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायचे?
एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा टाकायचा, तर काही क्षेपणास्त्र वगैरे नाही ? कमाल आहे? अण्वस्त्र बनवायला लागणारे तंत्रज्ञान होते, मग क्षेपणास्त्र बनवायचे नव्हते ते सोडा सध्या तोफा सुद्धा नव्हत्या तेव्हा?
आता मूळ मुद्दा- त्याचं असं आहे की कोणी ऋषी मुनी तप:सामर्थ्याच्या जोरावर एखादे विमान किंवा तत्सम गोष्ट बनवू शकत नाही (तसच ते बनवत असतील असं कुणाच म्हणण असेल तर मग प्रश्नच मिटला)
विमान सोडा एक साधा विजेचा दिवा बनवायचा म्हटला तर काय गोष्टी लागतात बघा-
१) विजेचा शोध, उत्पादन आणि खात्रीशीर असा पुरवठा / वितरण करणारी यंत्रणा(नुसता दिवा पेटवायला नव्हे तर बनवायला सुद्धा)
२) अत्यंत पातळ आणि स्वच्छ पारदर्शक काच बनवण्याची परिष्कृत पद्धती.
३) Tungston सारख्या धातूंचा शोध उत्पादन तसेच त्यांच्या गुणधर्माची छाननी करणारी सुसज्ज प्रयोग शाळा आणि metallurgy सारख्या शास्त्राचा पुरेसा विकास.शिवाय त्याचे अत्यंत पातळ तंतू (फिलामेंट) बनवण्याची पद्धत.
ते सोडा, दिवा बनवण्याच्या निरनिराळ्या विभागात द्यायला drawings च्या असंख्य प्रती काढण्यासाठी छपाईचे तंत्र. ते लागेल की नाही?
वेदामध्ये काचेचा उल्लेख नाही तसाच लोखंडाचा देखील नाही, ते सोडा कोळशाचा सुद्धा उल्लेख नाही.
वेदाइतक्याच जुन्या आणि कदाचित त्यांची जन्मभूमी असलेल्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषात काच, लोखंड, कोळसे सापडत नाहीत. आपल्या पुराणांमध्ये विमानाचे विविध अस्त्रांचे उल्लेख आहेत.
पण तुम्ही अनेक आधुनिक विज्ञानकथाकारांच्या गोष्टी वाचल्या तर तुम्हाला त्या सुद्धा तशाच खऱ्या वाटतील.
पण त्या माणसाच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत, खऱ्याखुऱ्या नाही आणि या सगळ्या पेक्षा ममहत्त्वाच म्हणजे प्रयोजन आणि बाजारपेठ!
जर साधे तेलाचे दिवे पेटत असतील तर विजेच्या दिव्याच्या सहाय्याने उजेड पाडायचा कशाला? एवढे उपद्व्याप करून विजेचे दिवे बनवून घ्यायला जर खात्रीची बाजारपेठ नसेल तर कोण हा धंदा करेल?
रामायण महाभारत या चांगल्या, मनोरंजक कथा आहेत असंच नाही तर तो आपला इतिहास सुद्धा आहे हे खर.
पण इतिहास इतिहास म्हणून शिवाजी महाराजांना भवानी माता खरोखर प्रसन्न झाली आणि भवानी तलवार दिली यावर विश्वास ठेवणे वेडेपणाच नाही का?
(खरंच भवानी प्रसन्न झाली असती तर तिला महाराजांना एखादी AK47 द्यायला काय हरकत होती? भवानी मातेला काय अशक्य आहे?)
एक नीट समजून घ्या, तंत्रज्ञानाचा विकास आणि समाजात सर्वदूर त्याचा प्रसार सरंजामशाही कधीच करत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांना गुलाम करण्यासाठी त्यांना अज्ञानात आणि मागास ठेवण भाग असतं.
भांडवलशाही जरी सरंजामशाहीशी हातमिळवणी करून मजूर गुलाम वर्गाला सुरुवातीला वेठीला धरते.
त्यांचे शोषण करते असे दिसले तरी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी तरी त्यांना एका मर्यादेनंतर लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी/ त्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अनिर्बंध शोषणाला आळा घालावा लागतो.
लोकांची क्रयशक्ती अचानक घटली तर कसा हाहाकार उडतो ते मी काय वेगळ सांगायला हवं का ? समजा एक शाम्पू विकत घ्यायची लोकांची ऐपत नसेल तर कुणी धंदा करावा कसा?
आणि खायची प्यायची भ्रांत असलेला गरीब गुलाम माणूस शाम्पू का विकत घेईल?
त्याची, त्याच्या बायकोची चार लोकांमध्ये उठ बस आणि किमान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असेल तर तो हा खर्च करून स्वतःला/ स्वतःच्या बायकोला सुंदर दाखवायचा प्रयत्न करेल.
त्याची दोन वेळची खायची प्यायची सोय झाली तर तो पुढे काही जास्त खरेदी करू लागेल आणि उद्योगधंद्या शिवाय हे शक्य आहे का?
सरंजामशाहीत मोठ मोठे शोध लागून त्याची उपयुक्तता पटल्यावर सरंजामशाही सरकार त्यांना स्वीकारते. आधी संशोधकांना पदरमोड करून शोध लावावे लागतात.
भांडवलशाहीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादन करण्यासाठी संशोधकांना उद्योग प्रोत्साहन देतात.
आपले वेद, रामायण, महाभारत, हे सरंजामशाही समाजव्यवस्था दाखवतातच, पण तेव्हा उद्योग आणि औद्योगीकरण हा प्रकारच नव्हता.
तो काळ एकवेळ सोडा.
आपल्या पेशवाईच्या शेवटी शेवटी म्हणजे १९ व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा आपल्याकडे छापील नकाशे बनवायचे तंत्र, होकायंत्र, दुर्बिणी नव्हत्या आपण त्या इंग्रज, पोर्तुगीजांकडून विकत घ्यायचो.
साधे शेतातले नांगराचे फाळ लोखंडी करायला २० वे शतक उजाडावे लागले. अन सुरुवातीला लोकांनी आगगाडी मध्ये बसावे म्हणून ब्रिटीश सरकार पैसे देत असे.
आपल्याकडे औद्योगीकरण सुरु झालं तेच मुळी १९ व्या शतकाच्या शेवटी आणि ते सुद्धा जुजबी.
तेव्हा आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान असावा, पण असं उगाच कुणी सुबुद्ध माणूस टर उडवेल असे काही करू नये. त्याने या वारशाचा अपमान होतो. असं नाही वाटत तुम्हाला??
हा प्रश्न नास्तिक, आस्तिक, पुरोगामी, मूलतत्ववादी असा नाही, तर साधा बुद्धी आणि तर्काचा आहे!!
—
- महाभारतातील चक्रव्यूह नेमके काय होते? थक्क करून टाकणारी अभ्यासपूर्ण माहिती!
- महाभारतातील दोन क्रूर कौरव – दुर्योधन आणि दु:शासन ह्यांच्या नावांमागच्या ‘कथा’!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.