बालसुधार गृहांतील मुलींचं लैंगिक शोषण आणि बलात्कार : मानवता थिजवणारी घटना
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेली. पण स्त्री मनाच्या स्वातंत्र्याचा काय? खुपश्या स्त्रिया तर आजही पारतंत्र्यात जगत आहेत, मनाने.. शरीराने.. अगदी सुरुवातीपासूनच्या इतिहासात देखील वाचले आपण हेच मुघलांच्या काळात देखील झाले, जागे तेव्हाच झालो आपण पण कृतीत अजूनही का येत नसावे?
स्त्रियांवरील अत्याचार थांबायचे काही नावच घेत नाहीत. उलट ते वेगवेगळ्या रूपात, प्रकारात समोर येत आहेत आपल्या.
दिवसेंदिवस एकीकडे लैंगिक शिक्षण, स्त्री सुरक्षितता, महिला सक्षमीकरण, स्त्रीवाद चालू असताना दुसरीकडे बलात्कार, विनयभंग, स्त्रीहत्या, स्त्रीभ्रूणहत्या, लैंगिक छळ, फसवणूक चालूच आहे.
शिक्षित समाज स्त्रियांच्या पाठीशी भक्कम उभा असताना दिसतो. पण सर्वच “सु-शिक्षित” आहेत का? बलात्कार झालेल्या मुलीला पाठिंबा दर्शविताना हातात घेतलेल्या मेणबत्त्यांची ज्योत त्यांच्या आत्म्यांना शांती देतेय कि नाही माहित नाही पण वासनेच्या आगीत त्यांचं शरीर, मन आणि भविष्य धगधगताना नक्कीच दिसतंय.
बलात्काराच्या नोंद झालेल्या घटना वेगळ्याच ज्यांची नोंद देखील झाली नाही ज्या कधी प्रकाशात आल्याच नाहीत, ज्यांना कधी प्रतिकाराची संधीच मिळाली नाही, ज्या तोंड दाबून चेहरा लपवून अजूनही अत्याचार सहन करत च आहेत त्या घटना किती असतील याचा अंदाज लावणेच कठीण..
ज्यांनी प्रतिकार केला, अन्याय विरुद्ध आवाज उठवायचा प्रयत्न केला त्यांची मुस्कटदाबी करून त्यांचं आवाज कायमचा बंद केला जातो? अशीच एक घटना घडी आहे मुजफ्फरपूर, बिहार मध्ये…आणि ती हि चक्कं “बालिका सुधार गृहात”.
“काय असते बालिका ‘सुधार’ गृह”
कायद्याने अल्पवयीन गुन्हेगार मुलींसाठी ही जागा बनवलेली असते. जिथे गुन्हा करणाऱ्या, गुन्ह्यात सामील असणाऱ्या, गुन्ह्यात अडकलेल्या अश्या बऱ्याच अल्पवयीन मुली असतात ज्यांना सुधारण्याची एक संधी कायद्याने दिलेली असते, ३ महिने ते ६ महिने किंवा जास्ती काळासाठी त्यांना इथे राहता येत.
जिथे यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीपासून त्यांना परावृत्त केलं जावं आणि त्यांच्यावर मानवतेचे संस्कार व्हावेत हा एकमेव उद्देश यामागे असतो. इथे मुलींना शिक्षण, काम, चांगल्या सवयी तसेच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठीचे मार्गदर्शन केले जाते. मुलींना शिवणकाम, बागकाम वैगेरे शिकविले जाते.
गुन्हेगारीच्या मार्गावरून वळवून त्यांना सुशिक्षित म्हणून समाजात वावरता यावे यासाठी सुधार गृहाची मदत आपणास होते.
पण “भरवश्या च्या म्हशीने टोणगा” द्यावा अश्यातला प्रकार बिहारमधील मुज्जफरपूर मधील सरकारी बालिकासुधार गृहात घडला आहे. या बालिकासुधारगृहात मुलींवर लैंगिक अत्त्याचार होत असल्याचे एका सोशल ऑडिट च्या अहवालात स्पष्ट झाले होते. ज्याची पडताळणी करून सध्या त्यावर कारवाई केली आहे.
काय होते अहवालात?
मुंबईतील “टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स” यांच्या “कोशिश” या टीम ने बिहारच्या समाज कल्याण विभागाच्या सूचनेनुसार २०१७-१८ या वर्षी बिहारमधील सर्व सुधार ग्रहांचे सोशल ऑडिट केले (ज्यात मुजफ्फरपूर येथीलही बालिकासुधारगृहाचे सोशल ऑडिट केले गेले) ज्याचा पूर्ण १०० पानी अहवाल त्यांनी १५ मार्च, २०१८ ला बिहार सरकार कडे दिला.
अहवालाच्या ५१व्या पानावर असे नमूद केले होते की मुजफ्फरपूर येथील सुधारगृहात म्हणजेच बालिका गृह सेवा संकल्प आणि विकास समिती मधील मुलींवर लैंगिक अत्याचार होत असून यावर तपासणी व चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी अशी विनंती देखील केली होती.
ज्याची एक प्रत मुजफ्फरपूर जिल्हा प्रशासनाला देखील २६ मे la दिली होती ज्यात सर्व चौकशीअंती जिल्हा प्रशासनाने “कोशिश” टीम ने केलेल्या आरोपांना दुजोरा दिला.
यानंतर ३१ मे,२०१८ ला बालिका गृह सेवा संकल्प आणि विकास समिती चे संचालक ब्रिजेश ठाकूर आणि विनीत व संस्थेच्या कर्मचाऱ्यांविरोधात लैंगिक शोषण, गुन्हेगारी कट रचणे आणि POCSO ऍक्ट च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला. या सर्व चौकशीची जबाबदारी महिला पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती कुमारी यांनी घेतली.
या संस्थेचे या आधी एकदाही ऑडिट झाले नसून रवी रोशन नामक व्यक्ती याला जबाबदार आहे जी स्वतः देखील फंडाचे पैसे लुबाडत होती आणि ऑडिट करणाऱ्यांना देखील लाच देत असे. गुन्हा दाखल होण्या आधीच ८७ पैकी ४४ मुलींचे मधुबनी, मोकाम आणि पाटणा मध्ये स्थलांतरण केले गेले. जून,२०१८ ला बालिकागृहास टाळे लागले.
“काय होत होते बालिकागृहात?”
येथे मुलींचे लैंगिक शोषण तर होत च होते पण चौकशी आणि मुलींच्या वैद्यकीय तपासणीमध्ये, येथील २९ मुलींवर बलात्कार झाले असून त्यातून ३ अल्पवयीन मुली गर्भवती असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले. ह्या त्याच मुली होत्या ज्यांचे मधुबनी, मोकाम आणि पाटणा मध्ये स्थलांतरण केले गेले होते.
२५ जून,२०१८ ला कलाम १६४ नुसार, मुलींनी कोर्टात दिलेल्या जबाबात समजले कि यांना पॉर्न दाखवले जात असे, त्यानंतर तेथील एक कर्मचारी बाई (मावशी) त्यांना नशेचे इंजेक्शन देत असे व नंतर तेथिल गार्डन मध्ये त्यांना घेऊन जात असत जिथे त्यांचे लैंगिक शोषण केले जाई.
इतकेच नाही तर येथे काम करणाऱ्या महिला कर्मचारी देखील त्यांचे लैंगिक शोषण करत असत. मुलींनी हे देखील सांगितले कि दर मंगळवारी समुपदेशनासाठी त्यांना बालिकागृहाबाहेर नेले जायचे जिथे त्यांचा गैरवापर केला जात असे. या बलात्कार झालेल्यांमध्ये एकीचे वय तर फक्त ७ वर्षे होते.
माणुसकीचा दुर्दैवी बळी
यांचे लैंगिक शोषण होत असताना एका मुलीने जेंव्हा याचा विरोध केला त्यावेळी तिला बेदमपणे मारहाण करण्यात आली ज्यात तिचा जीव गेला आणि या नराधमांनी तिला तिथेच सुधारगृहाच्या उद्यानात पुरून टाकले, याची भीती त्या निष्पाप मुलींच्या मनात असल्याने त्यांनी पुन्हा विरोध केला नसावा, या घटनेची माहिती बाकी मुलींकडून मिळाल्यावर घटनास्थळी खोदकाम केल्यावर तिचा मृतदेह सापडला.
क्रूरकर्म्यांनी केलेल्या या वासनेच्या यज्ञात एकीचा जीव तर गेलाच पण यांनी सर्वानुमते हा निर्णय घेऊन माणुसकीचा शुद्ध बळी दिला.
नुसते ऐकताना आपल्या आतड्याला पीळ पडते, अश्या सुधारगृहात विश्वासाने पाठवण्यात येणाऱ्या त्या मुलींच्या मनावर यांचे काय परिणाम होत असतील, विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.