' पाकिस्तानच्या निवडणुकांमधील पडद्यामागच्या खेळी आणि त्याचे भारतावरील संभाव्य परिणाम – InMarathi

पाकिस्तानच्या निवडणुकांमधील पडद्यामागच्या खेळी आणि त्याचे भारतावरील संभाव्य परिणाम

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

उद्या पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका आहेत. काल रात्री पंजाब मधील लाहोर मध्ये इम्रान खानची एक जंगी सभा झाली आणि तिथल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. प्रचंड मोठा जनसमुदाय त्याला आला होता. खास पंजाबी गाणे (मला तर वाटलं हा आता गुरू रंधावा लावतो की काय) मोठमोठाले नारे, घोषणा ह्यात पाकिस्तान मधील वातावरण ढवळून निघालं आहे.

इकडे भारतात अपेक्षेप्रमाणे ह्या निवडणुकांसंदर्भात फारशी चर्चा होताना दिसत नाहीय. एक दोन अपवाद असतील पण कुणीच फारसं बोलत नाहीय.

भाऊ तोरसेकरांनी एक सविस्तर लेख ह्या निवडणुकांसंदर्भात लिहिला आहे (लिंक पहिल्या कमेंट मध्ये) इच्छुकांनी तो जरूर वाचावा. भारतात चर्चा होत नाही ह्याबद्दल मला आश्चर्य वाटत नाही कारण आपली माध्यमं तितकी प्रगल्भ नाही.

अमेरिका तर सोडाच पण आयर्लंड सारख्या छोट्या युरोपियन राष्ट्रांची माध्यमं सुद्धा ह्याची बऱ्यापैकी खोलवर जाऊन चर्चा करताहेत ह्यावरून काय तो अंदाज तुम्ही बांधा. आपल्याकडच्या सामान्य लोकांना तिथल्या निवडणुकांचा अंदाज यावा आणि ह्या निवडणुकांमुळे भारतावर काय परिणाम उद्भवतात ह्याची निदान मौखिक चर्चा व्हावी म्हणुनलेख प्रपंच.

 

election-pakistan-inmarathi
urdupoint.com

काल इम्रान खाननी लाहोरच्या सभेत एक गोष्ट वारंवार बोलुन दाखविली की,

“भारतातील काही लोक म्हणतात तसं काही ह्या निवडणुका लष्कराच्या दबावात होत नाहीय, हा एक धादांत खोटा आरोप शरीफ ह्यांच्या मुस्लिम लीगने त्यांना सहनुभूती मिळावी म्हणुन केला आहे. पाकिस्तानी आवाम नी त्यांचा हा डाव उधळून टाकावा. विदेशी हातातील खेळणं असलेल्या शरीफना धडा शिकवावा.”

इम्रानचा सगळा जोर हा नवाज शरीफ कसे भ्रष्ट, ते कसे भारताच्या हातातील पपेट आहे ह्यावरच होता. नुकतंच तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ ह्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जन्मठेप आणि त्यांच्या कन्येला, मरियमला १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

पाकिस्तानच्या घटनेनुसार कलम ६२ (१) अंतर्गत पाकच्या पंतप्रधानाला पाक-साफ इमान राखणं बंधनकारक आहे, म्हणजे काय तर त्याने देशद्रोह, भ्रष्टाचार सारख्या मोठ्या गुन्ह्यात अडकू नये.

अडकल्यास आणि दोषी सिद्ध झाल्यास त्याला कधीही निवडणुक लढविता येत नाही. तरीही नवाज शरीफ पाकिस्तानात दाखल झाले. त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा अजेंडा हा केवळ नवाज शरीफ ह्यांच्यावर कसा अन्याय झाला हे सांगुन सहानुभूतीची लाट निर्माण करणं हाच आहे. ते ह्यात कितपत यशस्वी होतात ह्या एकमेव निकषांवर पाकिस्तानचं भवितव्य अवलंबुन आहे.

 

Pakistan-election-inmarathi
express.co.uk

तसं बघितलं तर हा तिरंगी सामना आहे, नवाज शरीफ ह्यांचा मुस्लिम लीग, क्रिकेटर इम्रान खानचा तहरिक-ए-इन्साफ पाकिस्तान आणि बिलावल भुट्टो ह्यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी. परंतु मुख्य लढत मात्र शरीफ आणि इम्रानच्या पक्षातच आहे. जवळजवळ २० वर्षांपूर्वी इम्रान ने पक्ष स्थापन केला, त्याचा जोर दिसला तो पहिल्यांदा खैबर पख्तुनख्वा ह्या राज्यात.

पेशावर मधुन हळुहळु जोर पकडत फोफावलेल्या इम्रानला आज पंजाब खुणावतं आहे. पण त्याच्या हक्काच्या खैबर पख्तुनख्वामध्ये जिथे ४३ जागा आहेत आज त्याच्या पक्षाची हालत तितकीशी चांगली नाही.

मुत्तीहादा-मजलिस-ए-अमल नावाची ५ राजकीय पक्षांची युती कितपत नुकसान करतात ह्यावर इम्रान किती जागा जिंकतो हे निर्भर आहे.

तिकडे सिंध प्रांतात तर गेल्या १० वर्षांपासुन सत्तेवर असलेल्या बिलावलच्या पक्षाची तर अजुन बिकट अवस्था आहे, कराची मध्ये त्याच्या पक्षाचा मुख्यमंत्री उभा राहिला तरी निवडुन येईल का ह्याची खात्री नाहीय. पण सिंध हा जागांच्या दृष्टिकोनातून (७५ जागा) दुसरं सगळ्यात मोठं राज्य आहे आणि त्या राज्यात आजही बिलावलच्या पीपीपीचं नेटवर्क आहे ज्याला डावलून चालणार नाही.

बलुचिस्तान, FATA (Federally Administered Tribal Area) आणि फेडरल कॅपिटल ह्या बद्दल मी लिहित नाहीय कारण दोन्ही मिळून जागाच आहेत मुळात ३१.

बलुचिस्तान सामरिक दृष्ट्या पाकिस्तानसाठी महत्वाचं आहे कारण त्यात असणारं CPEC प्रोजेक्ट आणि ग्वादर बंदर!! काही महिन्यांपूर्वी डॉन ह्या पाकिस्तानी वृत्तपत्रात बलुच लोकांचं बंड, तिथली बिघडलेली परिस्थिती ह्याची सविस्तर कव्हर स्टोरी आली होती, विकासाच्या नावाखाली बलुच लोकांना त्यांच्या प्रांतातून कसं हाकलुन लावताहेत ह्याचं बऱ्याच विस्तृत प्रमाणात त्यांनी पुराव्यानिशी लिहिलं होतं.

पण तरीही लष्करी टाचेखाली असलेल्या १७ जागांच्या ह्या प्रांतातून फारशा अपेक्षा नक्कीच नाहीय. बलुची अवामी पार्टी लष्कराचा दबाव आला तर कुठे उभी राहील हे वेगळं सांगायला नको.

 

pak-elections-inmarathi
Inkhabar.com

सगळ्यात महत्वाचा प्रांत आहे पंजाब ज्यात एकूण ३४२ जागांपैकी तब्बल १८३ जागा येतात. पंजाब हा नवाज शरीफ ह्यांचा गड आहे. गेल्या १० वर्षांपासुन तिथे शहबाज शरीफ हे नवाज ह्यांचे धाकटे भाऊ मुख्यमंत्री म्हणून आहेत. जो पंजाब ताब्यात घेईल तो अर्थातच इस्लामाबादमध्ये बसेल हा सरळ सरळ फॉर्म्युला आहे.

शरीफ त्यांच्या पारंपरिक गडात काय प्रदर्शन करतात ह्यावर सगळं अवलंबुन असेल. आयएसआय, लष्कर ह्यांच्या समर्थनाच्या जोरावर इम्राननी पंजाबमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे, पण ती मुळ पंजाबी असणाऱ्या शरीफना हादरा द्यायला पुरेशी असेल?

इम्रान जरी पंजाब मध्ये जन्मला असला तरी तो पंजाबी नाही तो मुळचा नियाझी जातीतील पश्तुन आहे. पंजाबी आणि पश्तुनी हे सर्वश्रुत जुनं हाडवैर आहे.

इम्रानच्या सभांचा प्रतिसाद काहीही सांगत असला तरी, मला माझ्या पाकी रिसोर्सकडुन मात्र जे कळतय ते थोडं किचकट आहे.काल सहज त्याला गप्पांमध्ये विचारलं काय रे बाबा काय म्हणतं तुझं पंजाब. त्याचं उत्तरं टिपिकल पंजाबी होतं

“यार आम्ही पंजाबी ना फार मूडी असतो, डोकं फारसं लावत नाही दिल जे सांगेल ते, पंजाब दा पुत्तर आणि सहनुभूती हे समीकरण जुळलं तर लाट येईल पंजाब मध्ये शरीफ साठी. पण एक आहे की पहिल्यांदाच आमच्या समोर अवघड प्रश्न आहे खरा.”

अवघड प्रश्न म्हणजे इम्रान खान! बरं हा म्हणजे टिपिकल पंजाबी आहे, मी त्यांच्या खाण्याच्या रिकमेंडेशन वर विश्वास ठेवीन पण राजकीय नक्कीच नाही, डोकं मुळात वापरात नसल्याने ते काय करतील ह्याचा भरोसा नसतो.

रावळपिंडी आणि लाहोर ह्या शहरी भागात मात्र अजुनही शरीफचा जोर आहे, गेल्या काही दिवसात लाहोर आणि पिंडीत झालेल्या सैन्य आणि आयएसआय विरोधी घोषणा, लोकांनी रस्त्यावर सैन्याविरुद्ध केलेली निदर्शने बरीच बोलकी आहेत.

 

imraan-khan-inmarathi
express.co.uk

पण ह्या सगळ्याचा भारतावर काय परिणाम होईल? इम्रान जिंकला तर, ज्याविषयी अनेक पश्चिमी वाहिन्यांनी तर्क लावले आहेत तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि जम्मू आणि काश्मिर भागात उपद्व्याप वाढण्याची शक्यता आहे.

छोटे मोठे हल्ले देखील होऊ शकतात. ज्या पद्धतीने मोदींनी पाकिस्तान हा विषय शरीफना घेऊन हाताळला होता. त्यावर लष्कर आणि आयएसआयच्या हातातील बाहुला असलेला आततायी इम्रान पूर्ण पाणी फेरू शकतो.

या विषयाची विस्तृत भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या

“पाकला अराजकातून बाहेर काढू शकणाऱ्या नेत्याचा कडेलोट पाक लष्करच करतंय: भाऊ तोरसेकर”

या लेखात केली आहे.

ही सगळी पार्श्वभुमी अधिक गडद होते जेंव्हा मोदी सरकारने गेल्याच महिन्यात जम्मू काश्मिरात राष्ट्रपती राजवट लागू केली त्यामुळे. कनेक्टिंग डॉट्स इथे असु शकतात कारण खात्रीशीर माहिती असल्याशिवाय मोदी किंवा डोवल ह्यांनी इतक्या तडकाफडकी जम्मू काश्मिर मध्ये टॉप नॉच अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या नसत्या.

अंतर्गत बाबींवर वचक ठेवतांनाच सोबत एक दृष्टी सीमेपलीकडे देखील त्यांनी ठेवली होती. ह्या सगळ्याचा निष्कर्ष कदाचित असा असु शकतो की मोदी सरकार preparing for the worst च्या पवित्र्यात आहे?

जर उत्तर हो असेल तर इतिहासाची पुनरावृत्ती होतेय का?? परत १९७१ ची स्थिती येणार का?? आणि ती आलीच तर १९७१ ला बांगलादेशचा तुकडा पडला होता हे विसरू नका. मध्यपूर्वेत आणि इतर इस्लामिक राष्ट्रात ज्या वेगाने घडामोडी घडल्या तितक्या वेगाने शेजारी घडतील का

परिस्थिती झपाट्याने बदलते आहे, फक्त लोकांनी सजगपणे ह्या घटनांकडे बघावं. पश्चिम किनारपट्टी, गुजरात, राजस्थान आणि मुंबई.

डोळसपणे बघितलं तर कळेलही अर्थात ह्या सगळ्या शक्यता आहेत ज्या काही गृहितकांवर अवलंबुन आहेत त्या कदाचित बदलतीलही पण निदान बदलणाऱ्या परिस्थितीची जाणीव ठेवायला काय हरकत आहे. मला आठवतं त्या प्रमाणे Swati ताईंनी एक लेख लिहिला होता ह्यावर मिळाला तो मला मिळाला तर पोस्ट करतो नक्की वाचा अजुन जास्त माहिती मिळू शकेल.

 

pakistan-ele-inmarathi
newsx.com

गेल्या ७० वर्षांचा इतिहास बघितला तर कळेल पाकिस्तानची लोकशाही ही तितकीच सच्ची आहे जितकी विजय मल्ल्याची भारतीय बँकांचे पैसे परत करण्याची आश्वासनं!

जर खंडित जनादेश मिळाला आणि इम्रानचा तहरिक हा सगळ्यात मोठा पक्ष बनला तर मात्र आसिफ अली जरदारी ह्यांच्या विरुद्धची भ्रष्टाचाराची प्रकरणं सर्वोच्च न्यायालयापुढे येऊ शकतात आता स्वतःला वाचवायला ते लष्कराला शरण जात इम्रान सोबत जातात की समदुखी शरीफ आणि बिलावल-जरदारी वेगळीच खेळी करतात हे बघण औत्सुक्याचा विषय आहे.

तुर्तास विराम, शेजाऱ्यांच्या घरात वाकुन बघण्याची भारतीय लोकांची सवय जरा शेजारी राष्ट्रात काय सुरुय हे बघायला वापरली तरी बरीच लोक आंबा, पेरू, चिकू ह्याच्या बाहेर जाऊन विचार करू लागतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?