भारतीय क्रिकेटची अंधारातली बाजू उजळवून टाकणारा “सुपरमॅन” – मोहम्मद कैफ!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : सौरभ गणपत्ये
===
काही वर्षांपूर्वी मोहम्मद कैफ निवृत्त झाला. तो ज्या टप्प्यावर होता, त्यात त्याने निवृत्त व्हावं यात काहीच आश्चर्य नव्हतं. चार ओळींची बातमी यावी यापलीकडे सध्या तो तसाही चर्चेत नव्हता.
नाही म्हणायला योगासनं करताना आपले फोटो झळकावणं वगैरे चालू असतं, त्यात काही अर्थ नाही. एकेकाळी कोयना मित्रा आणि पायल रोहतगीसुद्धा चर्चेत होत्या.
आज कोणा फरदीन खानचे अफझल खान झालेले फोटो येतात त्यावेळी एकेकाळच्या या ‘दिल की धडकन’ मंडळींचं काय भज झालं यावर हळहळण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही.
मोहम्मद कैफने तेवढाच दिलासा काय तो दिला. तो चांगल्या कारणांसाठी थोडाफार चर्चेत राहिला.
फलंदाज म्हणून मोहम्मद कैफ कधीच मोठा नव्हता. क्रिकेटर म्हणून तो फार कमाल करेल असं त्याच्या घरच्यांनाही वाटलं नाही.
जुलै २००२ ला नॅटव्हेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकर असले ऍश्ले जाईल्सच्या चेंडूवर आचरटासारखा बाद झाल्यावर मोहम्मद कैफच्या घरच्यांनी टीव्ही पाहणं सोडलं.
दिनेश मोंगियाला रॉनी इराणीने परत पाठवेपर्यंत संपूर्ण परिवार तसाही थिएटरमध्ये सेट झाला होता.
पुढे जो इतिहास घडला तो सर्वांना माहित आहे. त्या सामन्याने आपल्याला युवराज सिंग नावाचा एक सुपरस्टार मोठ्या काळासाठी मिळवून दिला. एक नाही दोन दोन विश्वचषक या अरबी घोड्याने जिंकून दिले.
मोहम्मद कैफ त्यानंतर फार चर्चेत आला नाही. कसा येणार? त्याला युवराज सिंगासारखं ना वलय, ना धडाका. गुगलवर मोहम्मद टाईप केलं की मोहम्मद अली येतो.
आणि नुसतं कैफ टाईप केलं की कतरीना.पाच वर्ष संघात खेळल्यावर त्याच्या नावावर पाच हजारही धाव नसतील तर अजून काय होणार?
तरीही मोहम्मद कैफ हा भारतीय क्रिकेटमधलं आणि क्रीडा क्षेत्रातलं क्रांतीचं पाऊल होता.
क्रिकेट हा निव्वळ फलंदाजांचा खेळ मानला जातो.
आणि भारतासारख्या गुलामगिरीचा प्रदीर्घ इतिहास असण्याऱ्या देशात बॅट घेऊन एक छोटासा दिसणारा माणूस जगभरच्या फलंदाजांना मारून काढतो तेंव्हा तो भगवंत होत असतो.
अर्थात लोकांच्या श्रद्धा कोणत्या असाव्यात हा लोकशाहीत चर्चेचा विषय असू शकतो, सक्तीचा नाही.
आपण क्रिकेटचे प्रेक्षक असतो. दर्दी जाणकार नाही. “काय खेळायचा यार कपिल” असं आज पन्नाशीत टेकलेली पिढी सांगते,
तेंव्हा त्यांना कपिलचे फॉलो ऑन टाळणारे सलग चार षटकार आठवतात, त्याच्या त्या नाबाद १७५ आठवतात. पण जाणकार मात्र त्याच्या झंझावाती चेंडूंबद्दल सांगतात.
म्हणजे सामान्य प्रेक्षक फलंदाजी बघायला येणार. जाणकार फलंदाजी आणि गोलंदाजी बघणार. मोहम्मद कैफ हा नेमका तिसऱ्या, सर्वात महत्वाच्या आणि दुर्दैवाने तेंव्हापर्यंत सर्वात दुर्लक्षित असलेल्या खात्याचा बादशाह होता.
कैफ संघात येईपर्यंत क्षेत्ररक्षण हा आपला ऑप्शनचा प्रांत होता.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका खेळताना ह्याचेच प्रश्न सर्वात जटील असत. (नव्वदच्या दशकात तिसरा नंबर झिम्बाब्वेचा लागे). क्षेत्ररक्षकाला पाहिलं ग्लॅमर जॉन्टी ऱ्होड्सने मिळवून दिलं.
तिसऱ्या अम्पायरची पहिली विकेट जॉन्टी ऱ्होड्सनेच सचिन तेंडुलकरच्या रूपात मिळवून दिली होती. मग ऑस्ट्रेलियाच्या संघानेही सूर मारत बॉल धरायला सुरवात केली.
त्यावेळी आपली अवस्था काय होती? एखादा मोहम्मद अझरुद्दीन सोडल्यास एकही क्षेत्ररक्षक चांगला नव्हता.
बॉलमागे मनापासून धावून धावून उचलून चांगला फेकणारा म्हणून सचिन तेंडुलकर चांगला होता.
(त्यादृष्टीने चेंडू दूर फेकण्यासाठी सचिन पुलअप्स काढायचा), मध्येच अजय जडेजा आला. पण त्याच्या क्षेत्ररक्षणापेक्षाही सतत हसतमुख चेहरा आणि खेळाचा आनंद लुटायची वृत्ती म्हणून जडेजा आवडून जायचा.
सीमारेषेवर अजित आगरकर हा आपला सर्वोत्कृष्ट फिल्डर होता. पण बाकी अनिल कुंबळे, श्रीनाथ किंवा वेंकटेश प्रसाद हे आनंदीआनंद होते.
आपल्या कामचुकार आणि कारणं पुढे करणाऱ्या टिपिकल बाबूगिरी व्यवस्थेत क्षेत्ररक्षणावरही सबबी तयार होत्या.
“आपले क्षेत्ररक्षक सूर मारत नाहीत कारण आपल्या मैदानांवर हिरवळ नसते”, “का नसते?” तर म्हणे “ऊन इतकं असतं की ते शक्य होत नाही”
(आयपीएलने आपल्या मैदानांवर हिरवळ सोडा, हिरवळीचे वेगवेगळे पट्टे आणले. सगळा पैशाचा खेळ, बाकी काही नाही). कैफने आपली क्रिकेटच्या जडणघडणीची वर्षे या काळात काढली.
तरीही तो जागतिक दर्जाचा क्षेत्ररक्षक झाला. २००२-०३ हा काळ असा होता की एकाचवेळी जागतिक दर्जाचे ऱ्होड्स, हर्शेल गिब्स, युवराज सिंग, रिकी पॉन्टिंग, उपुल चंदना, मोहम्मद कैफ असे क्षेत्ररक्षक मैदानात दादागिरी गाजवत होते.
पाकिस्तानशी झालेल्या एका सामन्यात हेमांग बदानी आणि तो चांगलेच आपटणार होते.
बदानी समोरून येऊन कैफच्या पायाखालून पुढे सरकला, त्याच्यावरून उडी मारत कैफने चेंडूवर कब्जा केला. सामना १८० कोनात फिरला.
सामना चालू असताना फार थोड्या काळासाठी निव्वळ क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला जातो. गोलंदाज धावायला लागला की मोहम्मद कैफ हळू हळू १५ यार्डच्या रेषेवरून फलंदाजाच्या दिशेने जायचा.
ते सौंदर्य, तो रुबाब, ती तयारी आणि वृत्ती दाबा धरून पुढे येणाऱ्या चित्त्यापेक्षा अजिबात कमी नव्हती. पण चेहऱ्यावर कायम एक निरागस हसू असायचं.
युवराज आणि कैफ़ पहिल्यांदा गोलंदाजाला झेड प्लस सुरक्षाकवच देऊन गेले. एखादा वाईट बॉलही पटकन स्केवर कट किंवा कव्हर्समधून मारणं सोपं नाही राहिलं.
सामना कायम गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकच काढून देत असतात. ते घाण करत असतील तर सर्वोत्कृष्ट फलंदाजही काही करू शकत नसतो.
सौरभ गांगुलीने भारतीय क्रिकेटची दिशा आणि दशा बदलून टाकली. त्यात अजित आगरकर, युवराज, झहीर, नेहरा, कैफ यांच्या जवानीच्या जल्लोषाचा फार मोठा वाटा होता.
यात मोहम्मद कैफचा फिटनेस सर्वात चांगला होता. त्याला बघूनच किंबहुना गल्ली गल्लीतल्या डांबरी रस्त्यांवरही सूर मारत, लोळण घेत मुलं चेंडू धरायला लागली.
पुढच्या पिढ्या फिटनेसकडे लक्ष द्यायला लागल्या. २००५ पासून म्हणजे द्रविड कप्तान झाल्यापासून महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना हे खेळाडू येऊन मिळाले.
आजही पस्तिशीनंतर हे योयो टेस्ट देऊन स्वतःला टिकवून आहेत.
काळ सरकला, ऑस्ट्रेलियाच्या मायकल बेव्हनला जसे पर्याय आले तसा सहाव्या सातव्या नंबरवर येऊन बॉलरला फेकून देणारे फलंदाज आल्यावर त्यांच्या मर्सिडीझ समोर मोहम्मद कैफ रिक्षा वाटायला लागला.
२० -२० नंतर तर त्याला भविष्यच राहिलं नाही. तसाही नॅटव्हेस्ट ट्रॉफीनंतर लाहोरला द्रविडबरोबर उभं राहून केलेली खेळी वगळली तर “कैफ काय मस्त खेळला यार!”
असं म्हणायची संधी त्याने कधी दिली नाही. उत्तर प्रदेशला रणजी कप जिंकून देणं ही त्याची भारतातली सर्वात मोठी कामगिरी.
आज संघात रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, अगदी यजुवेंद्र चहल हे एक से एक फिल्डर्स आहेत.
एके काळची आपली कमजोरी आता बलस्थान झाली आहे. मोहम्मद शमीसारखा अस्सल वेगवान गोलंदाज केवळ फिटनेस नाही म्हणून बाहेर आहे.
पूर्वी जे करणं परवडत नव्हतं तो आता नियम झाला आहे. हा गेल्या १५ वर्षांतलं नवा भारत आहे. जागृत, शारीरिक दृष्ट्या सुदृढ, सधन आणि काही प्रमाणात आनंदी.
इतरही खेळांत परिस्थिती पालटू लागली आहे.
हे करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य अर्पण केलं त्यांना त्याच श्रेय मापात पाप नं ठेवता द्यायला हवं. म्हणूनच मोहम्मद कैफला लक्षात ठेवायला हवं.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.