प्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक यांच्या बदनामीचे नवे षडयंत्र!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : आदित्य कोरडे
===
गेली काही म्हणजे खरेतर अनेक वर्षे २२ जून १८९७ ही तारीख तशी लोकांच्या विस्मरणात गेलेली होती. क्वचित कधीतरी दूरदर्शन वर लागणाऱ्या ‘२२ जून १८९७” ह्या नावाच्या आणि (त्या घटनेवरच्या/विषयावरच्या) एकमेव मराठी चित्रपटाखेरीज फार काही कुठे दाखवले जात नसे.
अगदी ताणून ताणून किंवा बादरायण संबंध जोडून सांगायचे म्हटले तर मध्यंतरी पुणे आकाशवाणीवर “गोंद्या आलारे…!” ही कॅच फ्रेज असलेली एक जाहिरात ऐकवत असत.
तिचा संबंध चापेकर बंधूंशी जराही नसला तरी त्या निमित्ताने काही लोकाना आठवण तरी होत असे. त्यापेक्षा अधिक काही नाही. पण कधी नव्हे ते लोकाना ह्या वर्षीच चापेकर बंधूचे स्मरण झाले आहे.
आता चापेकर बंधू हे परतंत्र भारतात एखाद्या इंग्रज अधिकाऱ्यावर हल्ला( कोणतेही खाजगी कारण नसताना) करून त्याचा जीव घेणारे अगदी पहिले वहिले क्रांतीकारक.
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हे जरी आद्य क्रांतीकारक असले तरी त्यांनी कोठल्याही इंग्रज अधिकाऱ्याला जीवे मारले नाही (अर्थात म्हणून काही त्यांच्या कार्यात, देशभक्तीत कमीपणा राहत येत नाही.)
स्वातंत्र्य वीर सावरकरांसारखी फेस वल्यु नसल्याने आजपर्यंत तरी ते अगदी विस्मृतीत गेल्यासारखे नसले तरी अदखलपात्रच झालेले होते. स्वातंत्र्य वीर सावरकरांपेक्षा त्या अर्थाने ते खरेच भाग्यवान.
पण २०१८ हे साल त्यांच्या साठी खास भाग्योदयाचा योग घेऊन आले. महाराष्ट्रात पुन्हा नव-पेशवाई अवतरल्याची आणि ती भीमा कोरगाव येथे गाडण्याची हाकाटी झाली.
तर २०० वर्षापूर्वी अठठावीस हजारांच्या खड्या मराठी सैन्याला खडे चारल्याची (आणि इंग्रजांची तळी उचलल्याची साग्रसंगीत,) वाजत गाजत आठवण काढून झाल्यावरही काही मजा येईना.
अगदी छत्रपती शिवाजीमहाराजांचे चित्र असलेले टि शर्ट घातलेल्या राहुल फटांगळेचा बदडून केलेला खुन, कपाळावर शिवगंध( हा काय प्रकार आहे?) लावलेल्या विशाल जाधव वर प्राणघातक हल्ला, “छत्रपती, भवानी, गणेश ” या आणि अशाच प्रकारची नावे असलेल्या जवळपास १३० मालमत्ताची नासधूस जाळपोळ करणे, याशिवाय गणपती , साई बाबा यांच्या मंदिराची मोडतोड करुन विटंबना करणे इत्यादी प्रकार करूनही निर्माण झालेल्या सामाजिक वितुष्टात काही मनासारखा रंग भरेना. ( हे सगळे पोलीस दफ्तरी नोंद आहे. –आभार तुषार दामगुडे )
अशात मग २२ जून आला आणि ह्या निमित्ताने लो. टिळक आणि चापेकरांचे चारित्र्य हनन करून थोडी तोंडाला चव येते का पाहूयात! ह्या उच्च भावनेने प्रेरित होऊन महारष्ट्रातील काही विचारवंत लोकांनी खालील प्रमाणे पोस्टी टाकल्या…
चाफेकर बंधुनी रैंड चा खून केला .
या खुनाला प्लेगच्या साथीची पार्श्वभूमी होती . जेव्हा पुण्यात प्लेगची साथ सुरु झाली तेव्हा माणस पटापट मरत होती . मरणाऱ्यांची संख्या काही हजारा पर्यंत पोहोचली होती .
अश्या परिस्थितीत सनातनी ब्राम्हण ही साथ देवाची अवकृपा झाली आहे म्हणून देव पाण्यात बुडवून रोगी नीट होण्याची वाट बघत होते.
रोग हे एखाद्या जिवाणू मुळेच होतो हे फ़क्त यूरोपियन देशामध्येच माहीत होत . तेव्हा भारतामध्ये या बद्दल कमालीच अज्ञान होत .
–
हे ही वाचा – वयाच्या ८०व्या वर्षी इंग्रजांना धूळ चारणारा असाही अफाट योद्धा!
–
या रोगांना भारतात देवांचा कोप झाला असच समजत असत आणि इतर समाज ही सनातनी ब्राम्हणांचे शेपुट धरून त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालत असत .
या रोगावर काही उपाय नव्हता . फ़क्त हां संसर्गजन्य रोग आहे आणि बाधित रोग्यांना इतर चांगल्या माणसांपासून दूर ठेवले असता हां रोग नियंत्रणात येतो .. एव्हडेच कळाले होते .
त्या नुसार इंग्रजांनी उपाय सुरु केले . या कामासाठी सिव्हिल ऑफिसर रैंड याची प्लेग कमिशनर म्हणून नियुक्ति केली .
रैंड ने लोकांमध्ये जाऊन या रोगाची माहिती दिली .. या रोगाची तीव्रता सांगितली .. रोग्यांना इतर चांगल्या माणसां पासून दूर ठेवण हाच एक उपाय आहे हे सांगितले .
परंतु रोग हे अश्या काही विषाणु मुळे होतात हे मुळातच माहीत नसलेल्या सनातनी ब्राम्हण समाजाने रैंडला विरोध केला . रैंड ने त्याच्या कर्तव्याला जागुन घराघरातून प्लेग चे रोगी शोधून त्यांना इतरां पासून वेगळे ठेवले आणि प्लेग नियंत्रणात आणला .
रैंड ने या उपचार मोहिमेत लाखो भारतीयांचे प्राण वाचविले .
परंतु लाखो भारतीयांचे प्राण वाचवीणाऱ्या रैंडच्या या उपकाराचा सनातनी ब्राम्हणांना गंध ही नव्हता . सनातनी ब्राम्हणांनी या मोहिमेला संस्कृतीचा ऱ्हास असा समज करुन घेतला . हां गैरसमज समाजात टिळकांनी पसरवला .
प्लेग आटोक्यात आल्यावर टिळकांनी आपल्या संस्कृतीचा ऱ्हास इंग्रजांनी केला असा गैरसमज मोठ्या प्रमाणावर समाजात पसरवला .
टिळकांनी केसरी मध्ये अग्रलेख लिहून .. ठिकठिकाणी भाषणे देऊन इंग्रजांच्या या समाजाला आवश्यक असणाऱ्या मोहिमे विरुद्ध इतर सनातनी ब्राम्हणांना इंग्रजां विरुद्ध भडकवायला सुरुवात केली .
याच्याच परिणाम असा झाला की लाखो भारतीयांचे प्राण वाचवीणाऱ्या रैंड चा खून सनातनी विचारधारा बाळगुण असणाऱ्या चाफेकर बंधुनी 22 जून 1897 रोजी केला . रैंड बरोबर त्याचा सहाय्यक आयस्टर याचाही खून केला गेला .
रैंड आणि आयस्टर च्या खुना बद्दल चाफेकर बंधुना फाशी देण्यात आली आणि समाजात सुधारणा घडवून आणण्यात बाधा निर्माण करण्याच्या आरोपा खाली टिळकांना सक्तमजुरिची शिक्षा झाली .
महेश भोसले , पुणे
23/6/2018
—-
थोडा वेळ उपरोध आणि खवचट पणाची भाषा बाजूला ठेवून जर बोलायचे म्हटले तर ही पोस्ट नुसती तर्क दुष्ट आणि असत्यावर आधारलेली आहे असे नाही, तर अत्यंत थंड डोक्याने आणि सत्याचा सोयीस्कर अपलाप करून आणि असत्य योग्य ठिकाणी पेरून तयार केलेली आहे.
ह्यातून पुढे काही वर्षानी चापेकर स्मारक चिंचवड आणि गणेश खिंड इथे कोरेगाव भिमासारखे उत्पात घडले तर आश्चर्य वाटायला नको.
मुळात प्लेगची साथ भारतात आणली इंग्रजांनीच, ह्यापूर्वी इ.स. ५००-६०० च्या सुमारास आणि इ.स. १३००-१४०० च्या सुमारास मोठ्याप्रमाणात प्लेगच्या साथी येऊन युरोपात प्रचंड मानव हानी झालेली होती.(ब्युबोनिक प्लेग, black death अशा अनेक नावानी हा प्लेग इतिहासात प्रसिद्ध आहे.)
व्यापार उदीमाच्या निमित्ताने जगभर फिरणारी जहाजे त्याच्यावर ह्या रोगाचे प्रमुख वाहक जे उंदीर ते घेऊन ही फिरत. ह्या उंदरांच्या अंगावर असलेल्या पिसवा ह्या रोगाच्या विषाणूने ग्रस्त होत. त्याना काही होत नसे पण उंदीर मात्र आजारी पडून मरत.
उष्ण रक्ताच्या प्राण्यांच्या कडे आकर्षित होत असल्यामुळे ह्या पिसवा जर माणसाच्या जवळ आल्या तर त्या माणसांच्या अंगावर चढून माणसाना देखील ह्या रोगाची लागण करत.
हा रोग अत्यंत संसर्गजन्य असल्याने पुढे ह्या माणसाच्या संपर्कात येणाऱ्या इतर माणसानाही हा रोग होत असे. ह्या प्लेगची भारतात १८९६साली पहिली साथ आली ती मुंबईत.
आता इंग्रजांना जो एकदम भारतीयांचा कळवळा आल्याचे ह्या पोस्टीत लिहिलेय तसे ते नसून भारतात प्लेग (त्याला गोळी ताप किंवा ग्रांथिक सन्नीपात म्हणत) आल्यावर युरोपातील त्याचा व्यापारावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून वाटेल ते उपाय करून प्लेगची साथ काबूत आणायचे स्पष्ट आदेश भारत सरकारला होते आणि त्याप्रमाणे हिंदी सैनिकांचे पथक कामाला लावून मुंबईत प्लेगची साथ आटोक्यात आणली गेली.
त्यानंतर ४ फेब्रु १८९७ रोजी साथीच्या रोगाचा कायदा( The Epidemic Diseases Act) मध्यवर्ती विधीमंडळात संमत झाला. जो प्लेगचा निर्बंध म्हणूनही ओळखला जातो. ह्या कायद्याने इंग्रज अधिकाऱ्यांना अमर्याद अधिकार दिले गेले त्यांच्या गैर वापराविरुद्ध न्यायालयात दाद मागायचीही सोय नव्हती.
ही साथ पुण्यात आली तेव्हा ती आटोक्यात आणण्यासाठी प्लेग कमिटी नेमून वॉल्टर चार्ल्स रँड हा आय सी एस अधिकारी तिच्यावर नेमण्यात आला आणि त्याच्या हाताखाली गोऱ्या सोजीरांची तुकडी देण्यात आली.
हा रँड आधी साताऱ्याला जिल्हाधिकारी म्हणून होता. त्याची विकृत किंवा दुष्ट वृत्ती सांगायची तर तेव्हा काशीयात्रेवरून आलेल्या माणसांची मिरवणूक काढून वाजत गाजत गावात घेऊन यायची पद्धत असे त्याला द्वारं काढणे म्हणत.
ह्या रँडने त्यावर बंदी घातली म्हणजे वाजत गाजत मिरवणूक काढण्यावर बंदी घातली आणि तरी ही एकाने अशी मिरवणूक काढली तर त्या मिरवणुकीतल्या ११ जणांना पकडून त्याना १ महिना ते ३ महिने सश्रम कारावासाच्या शिक्षा तर ठोठावल्याच पण त्याना रणरणत्या उन्हात मुद्दाम गावातून २२ मैल अनवाणी चालवत गावाबाहेरच्या तुरुंगापर्यंत नेले.
तर असा हा रँड आपल्या बरोबर कर्नल फिलिप्स आणि कॅप्टन बीव्हरीज आणि इतर शेकडो गोरे सोजीर घेऊन प्लेगचा बंदोबस्त करण्यासाठी पुण्यात आला होता. ह्या पैकी कॅप्टन बीव्हरीज हा डॉक्टर होता आणि त्याला पूर्वी होंगकोंग मध्ये प्लेग च्या साथीत काम करण्याचा अनुभव होता. हो तिथेही इंग्रजच ही प्लेगची भेट घेऊन गेले होते.
ह्या कॅप्टन बीव्हरीज च्या मताप्रमाणे, एतद्देशीय शिपायाकरवी रोगी लोकाना वेगळे करणे तितक्या निष्ठुरपणे होत नाही म्हणून ह्या कामी फक्त गोरे सोजीरच घेतले पाहिजेत असे होते.आणि त्याला अर्थातच रँड साहेबाची मान्यता आणि पूर्ण सक्रीय पाठींबा होता.( मुंबईत हीच साथ हिंदी सैनिकांनी कशी काबूत आणली ते विचारायचे नाही.) धन्य ते इंग्रज आणि धन्य तो पुण्यात्मा रँड!
पुण्यात संगमाजवळ तात्पुरते प्लेग इस्पितळ उभारले आणि स्वारगेट जवळ त्या रुग्णाच्या नातेवाईकाना वेगळे करून ठेवले जात असे.(seperation camps) समजून घ्या. हे ऐच्छिक नसे तर जबरदस्ती असे. आजारी माणूस जाऊ द्या पण त्याच्या घरात राहणारा हरेक माणूस केवळ संशयावरून तिथे जाऊन खितपत पडत असे.
प्लेगचा रोग झालेला माणूस बहुतेक वेळा मरतच असे, पण त्याचे अंतिम दर्शन सोडा त्याच्या प्रेतावर अंतिम संस्कारदेखिल करू देत नसत. आणि मुख्य म्हणजे मरणारे रोगी फक्त ब्राह्मण नसत.
त्याहून भयानक गोष्ट म्हणजे तपासणी पथक. सुरुवातीला हे पथक कदाचित समजुतीने वागले असेल ही, पण लवकरच घरात घुसून आत अगदी खाजगीच्या खोलीत जाणे, सामानची नासधूस करणे पै पैका, चीज वस्तू लुबाडणे, केवळ संशय जरी आला तरी घरातले सगळे समान बाहेर काढून त्याला आग लावून टाकणे असे प्रकार सर्रास चालत.
संशयित रोगी प्लेग इस्पितळात पाठवला जात असे, घरात थकलेले, अंथरूण धरलेले वृद्ध देखिल रोगी समजून प्लेगच्या इस्पितळात पाठवत त्याला रोग झालेला नसला तरी तिथे लागण होईच, असे कितीजण हकनाक मेले असतील त्याची गणतीच नाही.
तिथे सुश्रुषा, स्वच्छता, खाणे पिण्याची व्यवस्था औषधे ह्यांचीही कमतरता असे.
तपासणी करता गेलेले सोजीर घरातल्या सगळ्याना घराबाहेर काढून त्यांचे कपडे उतरवून तपासणी करत .काही समजतंय का? उघड्यावर दिवसाढवळ्या कपडे उतरवून तपासणी. आणि ह्या रोगाची गाठ काखेत तसेच जांघेत येई म्हणजे मांडी जिथे कमरेला चिकटते तिथे जननेन्द्रीयाच्या बाजूला.
तेव्हाचा काळ सोडा आजही हे कुणी चालवून घेईल का? प्लेगचा रोग झाल्याचा संशय आला म्हणून एखाद्या इंग्रजाला त्यांच्या देशात किंवा भारतात अशी वागणूक मिळाली असती का? ह्याबाबत तक्रार केल्यावर घरात अंधार असल्याने नीट बघता येत नाही म्हणून उघड्यावर अशी तपासणी करावी लागते असली निर्लज्ज उत्तरे दिली जात.
गोऱ्या सोजीरांची पलटण धाड टाकायला येतेय हे कळल्यावर लोक जमेल तेवढे समान पैसा अडका घेऊन पलायन करत. म्हणून मग पुढे अख्या पेठेलाच गराडा घालुन सगळ्यांची उघड तपासणी होई.
–
हे ही वाचा – कोरेगाव भीमा लढाई – इंग्रजांचा जातिवाद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर…
–
घर समान सुमान आणि माणसाना बाहेर काढून रिकामे करत आत जंतुनाशक पावडरी आणि फिनेल टाकून निर्जंतुक करत आणि त्याला सील ठोकून लाल फुली मारत. अक्खी पेठ म्हणजे त्यात फक्त ब्राह्मण नसत. सगळ्याच जातीचे लोक असत त्यात त्यांची ससे होलपट होई.
त्याना तसेच गुराढोरासारखे हाकलत हाकलत स्वारगेटला घेऊन जात. त्यावेळी गोपाळ कृष्ण गोखले इंग्लंडला होते पण अनेक सुधारकांनी त्याना ह्या अत्याचाराची हकीकत पत्र-तार करून कळवल्यावरून त्यानी मँचेस्टर गार्डियन मध्ये मुलाखत देऊन संताप व्यक्त केला होता ( ११ मार्च १८९७ )
आता वर विनोद दिवे ह्यांच्या विखारी पोस्ट मध्ये त्यानी जे “महार आमच्या ब्राह्मण स्त्रियाना उलथापालथ करून बगला तपासतात, गणेशाचे वाहन उंदराला मारून टाकतात …सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?” असे लिहिले आहे.
त्यात महार सोडा, ब्राह्मणही सोडा, इतर कुठल्याही जातीत-स्वजातीय परक्या पुरुषाना सर्रास घरात घुसून स्त्रियांच्या काखा बगलात हात घालून तपासायची मुभा होती का? त्याना तसे म्हणायचे आहे का? तसेच हा जो सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? म्हणून अतिप्रसिद्ध असलेल्या अग्रलेखाचा उल्लेख आहे तोच मुळी रँडच्या खुनानंतर पुण्यात त्यानिमित्ताने इंग्रजांनी जी दडपशाही चालवली होती तसेच प्लेग बाबत अजूनच कठोर वर्तन सुरु झाले होते त्यावेळचा आहे. ह्यालाच सत्याचा सोयीस्कर अपलाप आणि दिशाभूल असे म्हणतात. कळले?
टिळकांची भूमिका
एकंदर ह्या पोस्टचा वापर टिळकाना बदनाम करण्यासाठी केलेला असल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल सविस्तर लिहिणे भाग आहे.
प्लेग सारख्या भयानक संसर्गजन्य आणि जीवघेण्या रोगावर प्रभावी उपचार नाही आणि रोगी माणसाना वेगळे काढणे हाच त्याचा फैलाव रोखण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय आहे.
तसेच रुग्णांच्या नातेवाईकाना वेगळ्या संसर्गवर्जक तळावर ठेवणेही भाग आहे हे जाणून टिळकांनी त्याप्रमाणे सुरुवातीला जनतेला सरकारला ह्या कामी सहकार्य करावे असेच आवाहन केलेले आढळते. तसेच एवढे पुरेसे नसून ह्या संसर्गवर्जक तळावरील लोकांची आबाळ होऊ नये म्हणून त्याचे व्यवस्थापन पालिकेकडे असावे म्हणून मुंबई राज्याचे गवर्नर लॉर्ड सँडहर्स्ट ह्याना अर्ज दिला होता.
तो अर्थात मान्य झाला नाही म्हणून मग पुण्यातील डॉक्टर आणि इतर प्रतिष्ठीत लोकांना एकत्र करून लोकांना सरकारच्या उपाय योजनेबद्दल आणि त्याच्या आवश्यकते बद्दल समजावणे, अवगत करणे, पैसे व इतर सामान वर्गणी स्वरूपात गोळाकरून त्यातून रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची सोय करणे असे उपक्रम सुरु केले.
लोक रोगाच्या भयाने गाव सोडून पळत पण त्याने रोग इतरत्र फैलावतो म्हणून गाव सोडून न जाता पुण्याबाहेर म्हणजे फर्ग्युसन कॉलेज च्या जवळच्या टेकडी आणि आसपास तंबू ठोकून राहण्याची कल्पना त्यानी मांडली व स्वत: अंमलात आणली.
स्वत:ला किंवा त्यांच्या कुटुंबियाना रोगाची लागण होऊ शकते हे माहिती असून ते गाव सोडून पळून गेले नाहीत. त्यांचा थोरला मुलगा देखील प्लेग होऊनच वारला. ह्या त्यांच्या जनते विषयीच्या बांधिलकीने, कळवळ्यानेच ते खरेखुरे लोकमान्य लोकनेते होते हे सिद्ध होते.
देहभान विसरून प्लेगच्या साथीत रुग्णसेवेचे काम करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांना ह्या रोगाची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला हे ही इथे आवर्जून नमूद केले पाहिजे.
(इथे सावित्री बाईंचा, त्यांच्या प्लेग मधील कार्याचा आणि त्यातच झालेल्या त्यांच्या अंताचा ओझरता उल्लेख केल्यावर “सावित्रीबाई ना प्लेगची लागण झाली याचा अर्थ कुणीही त्यांना जबरदस्तीने चेक केलं नव्हतं” असली निर्लज्ज, विकृत प्रतिक्रिया करणारे मानवरूपी सुकर देखील सापडले…असो
पुढे रँड आणि त्याच्या पलटणीचे अत्याचार वाढू लागले आणि रोगाचा फैलावही वाढून जनतेची हलाखी अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटात अधिकच वाढली.
सरकारचे हे उपाय(!)देखिल कमी पडू लागले तसे पुण्यातील व पुण्या बाहेरील डॉक्टर लोकांची मदत मिळवून लो टिळकानी हिंदू प्लेग रुग्णालय स्थापन केले. त्याला अर्थात पुण्यश्लोक रँडने विरोध करत परवानगी नाकारली तर लॉर्ड सँडहर्स्ट कडून अनुमती मिळवून टिळकांनी रँडचा विरोध मोडून काढला. पुढे २० वर्षानी चिरोल केस संदर्भात साक्ष देताना लॉर्ड सँडहर्स्टने ह्या त्यांच्या कार्याचा गौरव पूर्वक उल्लेख केलेला आहे.
टिळक तर जहाल म्हणून प्रसिद्ध पण पुण्यातील मवाळ पक्षीयानी देखील लॉर्ड सँडहर्स्टकडे तक्रार अर्ज दाखल केले तसेच आपल्या वृत्तपत्रातून रँडच्या अत्याचाराचा प्रखर भाषेत विरोध केलेला आढळतो.त्यानीच पुण्यातून २० सहस्त्र सह्या असलेले अर्जपत्र लॉर्ड सँडहर्स्टकडे पाठवून रँडच्या अत्याचाराला आळा घालण्याची विनवणी केली होती.
सुधारक च्या १२ एप्रिल १८९७ च्या अंकात संपादक म्हणतात “…इतके दिवस चोरीवरच भागत होते, पण आता बायकाच्या अब्रूवर हात टाकेपर्यंत ह्यांची मजल गेली आहे आणि तरी आमचे लोक शांतच. अरे तुम्ही इतके नि:सत्व कशाने झाला आहात? पृथ्वीच्या पाठीवर आमच्या सारखे नामर्द लोक सापडणार नाहीत.
आडदांडास कायदा शिकवा…” तर १० मे १८९७ रोजी सुधारक म्हणतो “…इतके सगळे झाले तरी आमच्याने प्रतिकार करवत नाही. हे कशाचे लक्षण! सर्व जगातील रानटी पासून ते सभ्य समाजातील लोक ज्या एका बाबतीत संवेदनशील असतात त्या तुमच्या स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे काढून जाहीर विटंबना केल तरी तुम्ही स्वस्थ ते स्वस्थच. धिक्कार असो तुमचा.
अरे जनावरानाही इतका सोशिकपण शक्य नाही.” आता सांगा, तसे म्हटले तर हे मवाळाचे विचार काय कमी चिथावणीखोर आहेत पण खरोखर इतके भयंकर अत्याचार तेव्हा होत होते.हे सगळे लोक केवळ ब्राह्मण होते म्हणाल तर अंजुमन-ए- इस्लाम असोसिएशन ह्या संस्थेचे अध्यक्ष नवाब अब्दुल फिरोज खान ह्यांनी देखील सरकारकडे ह्याची तक्रार करणारा अर्ज शेकडो सह्या गोळ्या करून धाडलेला होता.
ह्या अत्याचारातून कुणीच देशी माणूस सुटत नसे. पंडिता रमबाई ह्यांच्या शारदाश्रामावर ही त्यांच्या धाडी पडल्या आणि त्यात दोन स्त्रीयावर बलात्कार देखील केले गेले आणि त्यातली एक तर नंतर गायबच झाली. ह्यासंबंधी रमाबाईन्नी ज्ञानप्रकाश मध्ये पत्र प्रसिद्ध केलेच पण कलकत्त्याहून निघणाऱ्या अमृत बझार पत्रिका आणि मुंबईच्या Bombay Guardian मध्ये ही वृत्तांत छापून आणला.
त्यात त्या म्हणतात “…अशा किती सत्शील मुली ह्या प्रमाणे नाश पावल्या आहेत आणि नाहीशा झाल्यात ते एका ईश्वराला ठाऊक…” Bombay Guardian १६ मे १८९७. सदाशिव पेठेत अशीच तपासणी चालू असताना सोजीरानी काही स्त्रियांची भर रस्त्यात तपासणी केली. तेव्हा त्या स्त्रियांनी आकांत करत शनीच्या पारावर डोके आपटून कपाळ मोक्ष करून घेतला.
स्वत:च्या घाणेरड्या मनसुब्यान्साठी चापेकर आणि टिळकांची बदनामी करणारे कुलांगार ह्या स्त्रियांचे पणतू खापर पणतू नसले म्हणजे मिळवले नाहीतर त्या माउल्याना जिवंत असताना भोगाव्या लागल्या तशाच यातना मृत्युपश्चात भोगाव्या लागायच्या.
हे सगळे पाहत लोक विशेषत: तरुण अगदीच शांत होते असे नव्हे,रास्तापेठेत त्यानी सोजीराना तुफान मारहाण केली होती. इतकी कि त्यातला एक नंतर मरण पावला तर कॅप्टन ओवेन लुईस ह्या संसर्ग वर्जक तळाच्या अधिकार्याच्या घोडागाडीवर दगड फेक केली गेली. पण ह्या फुटकळ घटना झाल्या.
चापेकर बंधूना टिळकांनी चिथावले असे म्हणणे हा तर बेशरम पणाचा कळस आहे. असले अत्याचार इंग्रज करत असताना टिळकांनी वेगळे आणखी चीथवायची गरज काय होती! ह्याच चापेकरांनी प्लेगची साथ मुंबईत चालू असतना, मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेचा मांडव जाळला होता(३१ ऑक्टोबर १८९६) का? तर प्लेगची साथ जोरावर असल्याने सरकारने ही परीक्षा पुढे ढकलावी असे निवेदन गंगाधर देशपांडे नावाच्या विद्यार्थ्याने केले होते पण सरकारने ती विनंती मान्य केली नाही.
विचार करा परीक्षेच्या निमित्ताने बाहेरगावाहुन येणारी परीक्षार्थी मुलं हा रोग घेऊन आपल्या गावी नसती का गेली? हा सरकारचा जनतेविषयी कळवळा आणि प्लेग संबंधी काळजी! चापेकरांनी त्याआधीच विक्टोरिया राणीचा मुंबईत जो एस्प्लनेड रोड वरचा पुतळा होता त्याची डांबर टाकून आणि खेटरांची माळ घालून विटंबना केली होती.(११ ऑक्टोबर १८९६) कारण होते १८९७ हे वर्ष राणीच्या राज्यारोहणाचे ५० वे वर्ष होते.
थोडक्यात चापेकर हे आधीपासून इंग्रज विरोधक होते आणि त्याचे कारण त्यानीच लिहून ठेवले आहे ते म्हणजे त्याना इंग्रजी सैन्यात नोकरी करायची होती पण ब्राह्मण विशेषत: चित्पावन ब्राह्मण असल्याने त्याना सैन्यात घेतले गेले नाही. त्याचा राग त्यानी मनात धरला होता.
आता ते विचारवंत, सुधारक किंवा फार गुणी संघटक होते असे नाही. तसे ते उचापतखोरच होते. अनेक ख्रिस्ती धर्मांतरीत हिंदुना चोप देणे हे त्यांचे आवडते काम होते.त्यानी पुण्यात गोफण क्लब स्थापन करून इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची योजनाही आखली होती, इतके त्यांचे एकंदर परिस्थितीचे आणि त्यावरच्या उपायांचे आकलन तोकडे होते. ते कर्मठ, सनातनी होते पण तो त्यांचा गुणविशेष नाहीच.
जेव्हा सर्व जाती धर्मातले पुढारी विचारवंत, धुरीण( काही सन्माननीय अपवाद सोडून) पुण्यात चाललेल्या अत्याचाराकडे षंढ बनून पहात बसले होते तेव्हा ह्या अतिसामान्य कुवतीच्या तरुणांनी शांत न बसता प्रतिकार करायचे ठरवले. परिणामांची तमा न बाळगता. त्यांच्या ह्या कृत्याने खुद्द इंग्लंड पर्यंत धक्का छोटा का होईना पण बसला.
अजून सगळीच राख झाली नाही, काही निखारे अजूनही धुमसत आहेत ह्याची जाणिव ह्या निमित्ताने सगळ्यांनाच झाली. ह्या कृत्यानंतर पुण्यात प्लेगच्या साथी पुढंही आल्या पण असे अत्याचार करण्याची हिम्मत किंवा दुर्बुद्धी म्हणा इंग्रज सरकारला पुन्हा झाली नाही.
एका अधिकाऱ्याच्या खुनात इंग्रज सरकार उलथून पडणार नव्हते की स्वातंत्र्य मिळणार नव्हते पण तरीही उपलब्धी काय कमी होती! ह्या बलिदानाने चापेकरांचा निर्वंशच झाला, त्यांच्या घरात कुणाला प्लेग झाला नव्हता तरी त्यानी स्वत:च्या मर्जीने हे बलिदान केले. त्याची आपण आज काहीतरी लाज बाळगली पाहिजे कि नको? टिळकांनी चिथावणी दिल्यामुळे त्यानी हे कृत्य केले असे जरी म्हटले तरी तो सत्याचा अपलाप आणि चापेकरावरती अन्याय होईल आणि न केलेल्या कृत्याचे श्रेय टिळकांना मिळेल अन्यथा ह्यात लाजिरवाणे असे काही नाही. पण इंग्रज अधिकाऱ्यांच्या जुलमाचा प्रतिशोध घेण्यामुळे मनस्वी दु:ख होणाऱ्या अधमाधम कुलांगार अवलादिना त्याचे काय होय! द्रविड बंधू जसे इंग्रजाना फितूर झाले तसल्याच ह्या अवलादी…
आता विजय दिवे ह्यांनी जाणून बुजून जो महार लोकांचा, त्या सैनिकांनी घरात घुसून ब्राह्मण बायकांच्या काखा बगला तपासण्याचा गलिच्छ उल्लेख केला आहे त्याबद्दल थोडे .
हे समजायला फार अक्कल लागणार नाही कि हा महार सैनिकांचा उल्लेख यंदाच झालेल्या भीमा कोरेगाव , महार बटालियन , २०० वर्षापूर्वीच्या युद्धाच्या जयाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या भावना भडकावण्यासाठी मुद्दाम केला आहे पण…
ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने बॉम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री मध्ये सामील असलेल्या लोकातून महार जातीचे लोक वेगळे काढून पुढे महार रेजिमेंट स्थापन केली. इंग्रज-मराठा युद्धात महार रेजिमेंट ने असामान्य पराक्रम शौर्य आणि स्वामी निष्ठा दाखवत इंग्रजाना अनेक जय मिळवून दिले हे खरेच पण त्यानी १८५७ च्या बंडाच्या बंदोबस्तात उत्तम कामगिरी करत महाराष्ट्रात तरी बंडाचा वणवा न भडकू देण्यात मोलाचा वाटा उचलला.( ह्यात जात म्हणून महारांची बदनामी करण्याचा हेतू नाही. इतर अनेक भारतीय सैनिकांच्या पलटणी स्वामिनिष्ठ होत्याच पण संस्थानिकही इंग्रजानप्रती स्वामी निष्ठच होते.
–
हे ही वाचा – भारतावर २०० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना कर्ज देणाऱ्या “मराठा” राजाची अद्भुत कथा
–
भारताप्रती निष्ठा दाखवायला भारत एक देश म्हणून अगदी संकल्पना म्हणून तेव्हा लोकाना माहिती नव्हता.) पण इंग्रजानी ह्याची परत फेड कशी केली तर १८५७ च्या नंतर इंग्रज अधिकाऱ्यांनीच मांडलेल्या The Martial Races theoryप्रमाणे महार हे लढवय्ये जमातीत येत नसल्याने त्यांची सैन्यातली भरती तर कमी केलीच पण १८९२ मध्ये ती महार रेजिमेंट खालसाच केली.
अगदी १९१४च्य प्रथम विश्व युद्धात देखील त्याना घेतले गेले नाही. भारतातून तेव्हा जवळपास १० लाख लोक भरती केले गेले पण ते सगळे ह्या The Martial Races theory प्रमाणेमराठा पंजाबी, पठाण, शीख गुरखा वगैरे…ह्या महारांच्या केलेल्या विश्वासघाताबद्दल गोपाळ बाबा वाळन्गकर,शिवराम जानबा कांबळे अशा तत्कालीन महार पुढार्यानी नाराजी व्यक्त करत हा अन्याय दूर करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न केले. त्याना गोपाळ कृष्ण गोखले ह्यांनी ही साथ दिली पण इंग्रज बधले नाहीत.
पुढे दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर हे Defense Advisory Committee of the Viceroy’s Executive Councilचे सदस्य म्हणून निवडून घेतले गेले तेव्हा त्यानी अथक प्रयत्न करून हा अन्याय दूर केला आणि १९४१ साली परत महार रेजिमेंट स्थापन केली, जी आजतागायत चालु आहे.
तर मुद्दा असा की जर १८९२ पासून महार रेजीमेंटच नव्हती तर १८९७ साली पुण्यात स्त्रियांच्या काखा बगला तपासायला, अब्रूवर घाले घालायला महार सैनिक येणार कुठून? आणि अशा अबला स्त्रियांच्या विटंबना करण्यात काय पौरुष ? पण जातीय विखर पेटवायचा म्हटल्यावर अक्कल अशीच गहाण टाकून इतिहास असाच दावणीला बांधला जातो.
संदर्भ
- कंठस्नान आणि बलिदान – वि श्री जोशी
- पुणेरी – श्री ज जोशी
- जोशीपुराण – श्री ज जोशी
- लो. टिळकांचे केसरीतील लेख
अधिक माहिती हवी असल्यास संदर्भ( ह्या लेखात खालील माहितीचा आधार घेण्यात आलेला नाही)
http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/149799/11/09_chapter%204.pdf
https://api.parliament.uk/historic-hansard/commons/1922/feb/14/india-1
https://api.parliament.uk/historic-hansard/commons/1931/may/13/india-office
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.