' पाकिस्तानची ऑफर असूनही भारतीयत्व पत्करणारे पहिले मुस्लिम एअर चीफ मार्शल! – InMarathi

पाकिस्तानची ऑफर असूनही भारतीयत्व पत्करणारे पहिले मुस्लिम एअर चीफ मार्शल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तो एक स्वतंत्र वृत्तीचा तरुण. तडफदार आणि देशासाठी काहीतरी करण्याचा ध्यास घेवून जगणारा. वयाच्या १८ व्या वर्षी तो ‘रॉयल इंडियन वायुसेना’ मध्ये भरती झाला.

१९४१-१९४२ मध्ये त्याने आपलं प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं आणि कराची येथे फ्लाईट लेफ्टनंट म्हणून आपला पदभार देखील स्वीकारला.

त्याला तटरक्षा दलात भरती केलं गेलं होतं. तिथे त्याने अनेक लढाऊ विमाने चालविण्याचा अनुभव घेतला.

 

coast-guard-inmarathi
dnaindia.com

 

१९४४ ला भारतात अर्थात इंग्रजांचे राज्य होते. १९४१ ते १९४५ चा काळ म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा काळ.

युद्ध जरी युरोप खंडात चालू होते, तरी त्यांची झळ भारताला देखील बसत होतीच. भारतीय सैन्यात त्यावेळी मोठ्या प्रमाणावर लष्कर भरती देखील इंग्रजांनी सुरु केलेली होती.

याच कार्यक्रमाचा भाग म्हणून १९४४ ला काही भरतीत वैमानिकांना इंग्लंडला प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे ठरवले. त्याच्यामध्ये या तरुण वैमानिकाचा देखील सामावेश केला गेला.

तिथे त्याला ‘तूफान स्पीटफायटर’ अशा लढाऊ विमानाचा अनुभव मिळाला. परत आल्यानंतर त्याला रॉयल इंडियन वायुसेनेचा लढावू पायलट म्हणून ब्रह्मदेशातील बर्मा अभियानात सामील करण्यात आले.

तेथे त्याला असगर खान आणि नूर खान नावाचे दोन पायलट भेटले. त्यांची जिगरी दोस्ती देखील झाली.

 

Asghar-Khan and nur khan- inmarathi

 

१९४७ साल उजाडलं आणि स्वातंत्र्याबरोबर फाळणीचं दु:ख पदरात टाकून गेलं.

असगर खान आणि नूर खान यांनी नवनिर्वाचित पाकिस्तानात जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे ते दोघे ही नंतरच्या काळात पाकिस्तानच्या वायुसेनेचे मुख्य कर्मचारी देखील बनले.

तिसरा जो तरुण पायलट होता त्याने मात्र या दोघांच्या अनेक वेळा केलेल्या मनधरणीला दाद दिली नाही.

त्याच्यासाठी देश आणि धर्म हे दोन्ही वेगळे कधीच नव्हते, त्यामुळे त्याने भारतात कायम राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे तो तरुण भारतात राहिला.

भारतीय वायुसेनेत त्याने त्याची सेवा बजावली. इतकेच नव्हे तर तो भारताच्या वायुसेनेचा प्रमुख म्हणजेच इंडियन एअर चीफ मार्शल बनला. तो तरुण होता एअर चीफ मार्शल इद्रीस हसन लतीफ.

 

idris-hasan-latif-inmarathi
thewire.com

 

भारतासारख्या देशाचे एअर चीफ मार्शलपद भूषवणे ही अभिमानाची गोष्ट असते.

स्वातंत्र्योत्तर काळात हे पद इद्रीस हसन लतीफ सारख्या मुस्लिम व्यक्तीने भूषविले होते आणि त्या पदाला साजेशी त्यांनी कामगिरी देखील करून दाखवली होती.

इद्रीस हसन लतीफ यांना ३१ ऑगस्ट १९७८ ला एअर चीफ मार्शल ‘एच मुळगावकर’ यांच्या सेवानिवृत्तीनंतर नियुक्त करण्यात आले होते.

भारत जेव्हा १९५० साली एक स्वतंत्र गणराज्य बनला, त्यावेळी दिल्लीमध्ये पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनादिवशी विमान उडवण्याचा मान देखील त्यांनाच मिळालेला होता.

 

Idris-Latif-inmarathi
youandi.com

 

इद्रीस हसन लतीफ यांनी भारतातर्फे अनेक देशात आपली कामगिरी बजावली आहे. १९६१ साली त्यांना अमेरिकेमध्ये भारताचा Air attache म्हणून पाठविले होते.

Air attache म्हणजे भारतीय वायुसेनेचा असा अधिकारी, जो इतर देशातील परराष्ट्र व्यवहार ठरविण्याच्या मिशनचा भाग असतो.

तिथे त्याला आपले युद्ध कौशल्य आणि युद्धाचा अनुभव वापरावा लागतोच, पण diplomacy field मध्ये इतर राष्ट्रांचा कल पाहून देशाच्या सुरक्षेविषयी आपल्या सरकारला सल्ला देखील द्यावा लागतो.

इद्रीस हसन लतीफ यांनी अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशात ही कामगिरी पार पाडली. त्याचे इतके कौतुक झाले, की साधारणपणे या पदाचा कार्यकाल तीन वर्षे असा असताना ही इद्रीस यांनी ६ वर्षे ही कामगिरी पार पडली.

 

idris hasan latif inmarathi

 

१९६६ ला परत आल्यावर त्यांनी पुण्यात लोहगाव इथे स्टेशन कमांडर एअरबेस म्हणून पदभार हाती घेतला. १९७१ साली बांगलादेश स्वातंत्र्य युद्धात इद्रीस लतीफ यांनी पुन्हा एकदा फ्रंट स्क्वाड्रन लीडर म्हणून युद्धाची जबाबदारी स्वीकारली आणि उत्तम रीतीने निभावली सुद्धा.

१९७४ ला इद्रीस लतीफ यांना एअर मार्शल बनवले गेले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय वायुसेनेतील अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण काळात प्रतिदिवस २० पेक्षा जास्त उड्डाणे घेण्याचा सराव केलेला होता. १९७८ ला इद्रीस लतीफ हे भारताचे एअर चीफ मार्शल बनले.

 

idris latif 1 inmarathi

 

इद्रीस लतीफ यांनी आपल्या कार्यकाळात भारतीय वायुसेनेच्या नूतनीकरणाच्या अनेक योजना राबवल्या. त्यांनी सरकारचा जॅग्वार स्ट्राईक एअरक्राफ्ट खरेदी करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, ज्याचा प्रस्ताव ८ वर्षापासून धूळ खात पडला होता.

रशियाबरोबर यशस्वी पणे बोलणी करून मिग-२३ आणि मिग–२५ भारतीय वायुसेनेत सामील करण्याच्या मागे त्यांच्या मुत्सदेगिरीचा मोठा हात होता.

इद्रीस लतीफ हे १९८० साली सेवानिवृत्त झाले. त्याच्या नंतर ही त्यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि फ्रांस मधील भारताचे राजदूत अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या.

१९८८ त्यांनी पूर्णवेळ सरकारी कामकाज सोडले आणि आपल्या जन्मगावी म्हणजे हैद्राबादला प्रस्थान केले. इद्रीस लतीफ यांचे ३० एप्रिल २०१८ ला वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.

 

idris hasan latif inmarathi. 2

 

देशभक्तीची आस असणारा एक सच्चा देशप्रेमी सैनिक म्हणून त्यांचे नाव भारतीय वायुसेनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?