कथा भारताच्या विश्वविजयाची आणि शॅम्पेन ‘उधार’ घेऊन केलेल्या सेलिब्रेशनची!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
२५ जून १९८३. भारतीय क्रिकेटसाठीचा सगळ्यात मोठा दिवस म्हणता येईल.
तारीख नसेल माहिती पण १९८३ म्हणल्या नंतर आपल्या डोळ्यासमोर येतो तो लॉर्डस् च्या गॅलरीतून चषक उंचावणार कपिल देव. आज त्या घटनेला ३५ वर्षे पूर्ण होत आहेत.
त्या आधी कपिल देव च्या नेतृत्वाखालील ही टीम असा काही पराक्रम करेल हे कुणाच्या गावीही नव्हते.
परंतु पहिल्याच सामन्यात त्यावेळच्या विश्वविजेत्या विंडीज संघाचा पराभव करून धक्कादायक निकाल नोंदवला आणि क्रिकेट पंडितांची बोटे घशात गेली पण सर्वच नाही.
हा एक अपघात होता अस म्हणून भारतीय संघाची संभावना पण करण्यात आली. परंतु एक एक सामना जिंकत भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहचला.
आता ऐतिहासिक अशा लॉर्डस मैदानावर फायनलची तयारी सुरु झाली. विंडीज सहज सामना तर जिंकेलच परंतु पहिल्या साखळी सामन्यातील वचपा देखील काढेल असा अपेक्षित निकाल सगळ्यांकडून वर्तविला जात होता.
अशातच टॉस जिंकून विंडीज संघाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
विंडीज संघामध्ये अॅंडी रॉबर्टस्, जोएल गार्नर, माल्कम मार्शल, माईकल होल्डिंग्स सारखे गोलंदाज असताना भारतीय फलंदाजी फार काळ टिकाव धरणार नाही हे सांगायला तज्ञ असायची गरज नव्हती.
भारतीय संघ १८३ धावांत सर्वबाद झाला. सामना एकतर्फी होईल असा अंदाज मात्र साफ खोटा ठरवला तो भारतीय गोलंदाजांनी.
जेंव्हा भारतीय संघ मैदानावर आला तेंव्हा भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या कपिलदेवची पत्नीही आपल्या हॉटेलला परत गेली होती.
भारतीय संघाकडून असलेल्या अपेक्षा यातून आपल्या लक्षात येतील. खुद्द कर्णधाराची पत्नीदेखील मैदानातून निघून जावी. त्यादिवशी भारतीय संघाने जो खेळ दाखवला तो अद्भुत होता.
क्लाइव लॉयड, विवियन रिचर्ड डेसमंड हेन्स सारख्या फलंदाजांनी भरलेल्या विंडीज संघाचे सात खेळाडू दोन अंकी धाव संख्याही गाठू शकले नाही.
यातच भारतीय गोलंदाजांच्या त्या दिवशीच्या खेळाचा दर्जा लक्षात येतो.
१४० धावांत विंडीज संघ सर्वबाद झाला. आणि भारत विश्वविजेता झाला. त्या विजयानंतर भारतीय संघाने केलेल्या जल्लोषाला काही सीमा असेल का?
पण त्या दिवशी भारतीय संघाकडे एक शाम्पेन सुद्धा नव्हती, भारतीय संघाने उधारीच्या शाम्पेनवर विश्व विजयाचा आनंद साजरा केला यावर कुणाचा विश्वास बसेल? पण जे घडले ते असेच होते.
त्याचे झाले असे की सामना जिंकल्यावर विंडीज संघाचे अभिनंदन करण्यासाठी भारतीय संघ त्यांच्या ड्रेसिंग रूम मध्ये गेला तर तिथे अगदी शुकशुकाट होता.
प्रत्येक खेळाडू आपापल्या दुखात बसलेला होता. भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करण्यात ही त्यांना विशेष रस नव्हता. तिथून निघताना भारतीय खेळाडूंची नजर पडली ती शाम्पेनच्या बाटल्यांच्या ढिगावर.
१८४ धावांचे लक्ष्य सहज पार करू या विचाराने सामन्या नंतरच्या जल्लोशासाठी शाम्पेन आधीच मागवून ठेवल्या होत्या. आता त्यांचा काहीच उपयोग नव्हता.
शेवटी कपिल देव पुढे झाला आणि त्याने क्लाइव लॉइड ला विचारले की आम्ही एकही शाम्पेन मागवली नाही, यातल्या काही मी घेऊ शकतो का? क्लाइव ने फक्त मान डोलावली आणि तो कोपऱ्यात जाऊन बसला.
मोहिंदर अमरनाथ आणि कपिल ने त्यातल्या काही बॉटल्स घेऊन भारतीय ड्रेसिंग रूम मध्ये परत गेले आणि याच शाम्पेननी त्यांनी विश्वविजय साजरा केला.
कशी गंमत असते पहा…विजयाच्या अपेक्षेने आलेल्या संघाने केलेल्या जल्लोषाच्या तयारीने, त्यांच्याच प्रतिस्पर्ध्याच्या विजयाचं सेलिब्रेशन करण्यास मदत केली!
नियती म्हणावी की योगायोग?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.