अशक्तपणापासून अनेक विकारांस कारणीभूत असलेल्या या घटकाकडे दुर्लक्ष करणं जीवावर बेतु शकतं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
प्रामुख्याने मानवामध्ये जस्त व लोह या अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत असून त्याचा संबंध हा जमिनीतील या अन्नद्रव्यांच्या कमतरतेशी ठळकपणे दिसून येत आहे. सध्या अनेक कारणांमुळे मानवाच्या आहारात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहेत. अन्नपदार्थामधील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेने जागतिक लोकसंख्येच्या मोठ्या भागाला ग्रासले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जवळपास दोन अब्ज लोकसंख्येहून अधिक लोकांमध्ये लोह कमतरता दिसून येते.
जागतिक स्तरावर जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता ही त्या ठिकाणच्या सर्व चारा पिकांत, अन्नधान्यात पर्यायाने अनुक्रमे जनावरांत व माणसांमध्ये दिसून येत आहे.
मानवाच्या शारीरिक व बौद्धिक विकासाकरिता लोह अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे.
लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य प्रत्येक सजीव पेशीमध्ये आढळून येते. मानवाच्या शरीरात फुफ्फुसांपासून सर्व शरीरात प्राणवायूचे वहन करणे, विविध विकारांचा घटक म्हणून ऊर्जा निर्मितीचे कार्य करणे, अपायकारक विषाणू, जीवाणूंपासून होणाऱ्या रोगांचा अटकाव होण्यासाठी प्रतिकारक क्षमता तयार करणे, ही लोह अन्नद्रव्यांची प्रमुख कार्य आहेत.
आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण शरीराच्या वजनाच्या प्रमाणात ३ ते ५ ग्रॅम असते. अॅनिमिया झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण सुद्धा कमी होते.
जेव्हा शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते तेव्हा नसांमधून ऑक्सिजनदेखील कमी प्रमाणात वाहून नेला जातो.
जेव्हा हे प्रमाण कमी होते तेव्हा रक्त निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जेचा पुरवठा होत नाही. त्यामुळे या रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
शरीरामध्ये दोन-तृतीयांश लोह हे प्रामुख्याने हिमोग्लोिबिन व लाल रक्त पेशीमध्ये आढळून येते. शरीरातील लोहाची कमतरता रक्तामधून आढळून येते. रक्तक्षयाचे प्रमुख कारण हे लोहाची कमतरता हेच आहे.
अॅनिमिया हा रक्ताशी निगडित आजार आहे. भारतात साधारण ६०% लोकं अॅनिमियाने ग्रस्त आहेत आणि यांत महिलांचे प्रमाण जास्त आहे.याचे मुख्य कारण म्हणजे मासिक पाळीतील अतिरिक्त रक्तस्राव. विशेषतः लोह कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमतेवर अनिष्ट परिणाम होतो.
पंडुरोग (अॅनिमिया) म्हणजे नक्की काय?
शास्त्रीयदृष्ट्या, जेव्हा शरीरात लाल पेशींच्या संख्येत कमतरता निर्माण होते किंवा त्याचे आकारमान कमी होते किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते तेव्हा रक्तातील व शरीरातील पेशींच्या ऑक्सिजन व कार्बन-डाय-ऑक्साइडच्या देवाण-घेवाणीत मर्यादा येतात व शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.
अॅनिमियाची लक्षणे:
• अॅनिमियामध्ये त्या व्यक्तीला थोड्या कामाने सुद्धा थकवा जाणवतो. लोह लाल रक्त पेशीमध्ये हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. याच्या कमतरतेमुळे शरीरात तंदुरुस्त पेशीची कमतरता होते.
ज्यामुळे थकवा येतो. कोमेजलेला चेहरा तुमच्या रक्त प्रवाहातील कमी आणि शरीरात लाल पेशीची कमतरता असल्याचे स्पष्ट करतो.
• अनेकदा उठता बसता चक्कर येते.
• त्वचा आणि डोळ्यांत पंडुरोगाप्रमाणे पिवळेपणा जाणवतो.
• श्वास घेताना त्रास होऊ शकतो.
• आहारातील लोह कमतरतेमुळे रक्तक्षय होतो.
• या व्यक्तींची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते.
• शारीरिक विकास मंदावणे व उत्पादकता कमी होणे हे अपायही संभवतात.
• ज्या लोकांमध्ये लोहाची कमतरता असते त्यांना न्युरोट्रान्समीटर सिंथेसिसची समस्या येते. यामुळे तुम्ही एखाद्या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊ शकत नाही.
• महिलांच्या मासिकपाळीत अनियमितता येते.
• कोरडी निस्तेज त्वचा आणि केस गळणे, नखे तुटणे.
• जिभेला सूज येणे व सतत तोंड येणे, अन्न गिळताना त्रास होणे.
अॅनिमियाची कारणे:
• अॅनिमियाचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरात लोहाची कमतरता असणे.
• जर तुमच्या खाण्यात कॅल्शियम खूप अधिक प्रमाणात असेल तर हे सुद्धा अॅनिमियाचे कारण ठरू शकते.
• कधीकधी शरीरातून प्रमाणाबाहेर रक्त वाहून गेल्यास सुद्धा अॅनिमियाची शक्यता असते.
• वाढत्या वयाच्या मुलांमध्ये, गरोदरपणात व स्तनपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये लोहाची गरज नेहमीपेक्षा अनेक पटींनी वाढते आणि जर तेव्हा लोहाचा पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास अॅनिमियाची लक्षणे दिसू लागतात.
• शरीरांतर्गत रक्तस्राव होणे.
• मासिक पाळीच्या वेळी होणारा अतिरिक्त रक्तस्राव, मूळव्याधीच्या त्रासामुळे रक्त जाणे.
• अपघात अथवा अन्य कारणांनी जखम होऊन त्यातून रक्त वाहणे, कॅन्सरसारख्या आजारामुळे होणारा रक्तस्राव, कृमिविकार.
या सगळ्या कारणांमुळे शरीराला लोहाची गरज अधिक भासते.
प्रतिबंध आणि उपाय:
– रक्तक्षय ही विकसनशील राष्ट्राची प्रमुख समस्या आहे. विकसित राष्ट्रामध्ये मका व गहू पीठ, मीठ, साखर आणि दूध यासारख्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये लोहयुक्त पदार्थांचा समावेश केला जातो. तसा सर्वत्र केला जायला हवा.
– शरीरातील लोहाची गरज पूर्ण करण्यासाठी खाण्यात सफरचंद, गाजर, टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करावा.
– लिव्हर, किडनी, बीफ, अंडय़ाचा बलक, सुका मेवा, वाळवलेली कडधान्यं, हिरव्या पालेभाज्या, टरफलासकट तृणधान्य, फळभाज्यांचा पाला इत्यादी अन्नपदार्थांतून शरीराला लोह अधिक प्रमाणात मिळते.
– शक्य असल्यास मासे, चिकन व मटण यांचा आहारात समावेश करा.
– घरी भाज्या बनविताना त्या लोखंडाच्या कढईत बनवा. यामुळे जेवणातून अधिक प्रमाणात लोह मिळू शकते.
– चणे आणि गूळ खात जा. शक्यतोवर सेंद्रिय किंवा काळा गूळ जेवणात वापरण्याची सवय लावून घ्या. हा हिमोग्लोबिन बनविण्यात सहाय्यक ठरतो.
– अधिक कॅल्शियम आहारात घेतल्याने तो लोहाच्या शरीरातील पचनास अडथळा निर्माण करू शकतो. त्यामुळे कॅल्शियम कमी प्रमाणात घ्या. जर कॅल्शियमची शरीरात कमतरता असेल तर काय करावे याबद्दल डॉक्टरांशी बोलून ठरवा.
– शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास तुम्ही वैद्यकीय सल्ल्याने आयर्न टॅबलेट सुद्धा घेऊ शकता.
– रक्तात लोहाचे शोषण होण्यासाठी सी जीवनसत्त्वाची गरज असते. त्यामुळे लोहयुक्त आहार घेताना सी जीवनसत्त्वाचे आहारातील प्रमाण देखील योग्य राखायला हवे. अन्यथा लोहयुक्त आहाराचा शरीराला फायदा होणार नाही.
वास्तविक पाहता शरीरात रक्ताची कमी असणे म्हणजेच अॅनिमिया. त्यामुळे आहारात काही बदल करून यावर मात करता येऊ शकते.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.