' हिंदूहित’वाद’: नव्या बाटलीत जुनीच दारू – InMarathi

हिंदूहित’वाद’: नव्या बाटलीत जुनीच दारू

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

“कट्टर हिंदुत्वावरील उपाय संविधानवाद कि हिंदू-हित-वाद?” : ह्या लेखावरील प्रतिवाद. (मूळ लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)

कोणतीही चांगली गोष्ट करण्याचा वाईट मार्ग अस्तित्वात असत नाही:

“भारतात हिंदुंवर अन्याय होतो” हि भावना योग्य कि अयोग्य, अयोग्य असल्यास अपप्रचारास जबाबदार कोण, योग्य असल्यास जबाबदार कोण हे मुद्दे टाळून पुढं जायचं झाल्यास सगळं तर्कशास्त्र गुंडाळून बाजूला ठेवून तथाकथित हिंदूहितवादी लोकांचं प्रत्येक मत ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ म्हणून अंतिम सत्य मानावं लागेल. तरीही सदर मुद्दे काहीसे बाजूला ठेवले तरीही “हिंदुंवर अन्याय होतो” हि भावना अनेक हिंदूंच्या मनात ‘रुजली’ नव्हे तर ‘जाणीवपूर्वक रुजवली गेली आहे’ हे सत्य नाकारता येत नाही.

आजच्या भारतीय नागरिकांमध्ये स्वतःची धार्मिक ओळख हिंदू सांगणारे लोकच बहुसंख्यांक आहेत. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला आणि समस्यांना विशिष्ट सामाजिक घटक जबाबदार ठरवून स्वतःला असुरक्षित समजणं हि कोणत्याही समूहाच्या अधःपतनाची पहिली पायरी असते. या भावनेला बहुदा बहुसंख्यांकच बळी पडतात. त्रुटींमुळे अकार्यक्षम झालेल्या रचनेत हा प्रचार सहज पचतो. समस्या मुळातून सोडवण्याचा हेतू कधीच नसतो तर सरळ सरळ समर्थक मतांचा हिशेब असतो. यातून कोणता न कोणता लोकभावनेला साद घालणारा ‘वाद’ जन्मतो.

 

hindu violence marathipizza

 

व्यवस्थेतल्या त्रुटींमुळे बहुसंख्यांकांच्या मनात अन्यायग्रस्त झाल्याची भावना निर्माण होऊन त्या अन्यायाला अल्पसंख्याकांना जबाबदार ठरविणे कोणत्याही तर्काच्या कसोटीवर अयोग्यच आहे. व्यवस्थेतल्या त्रुटींमुळे आणि व्यवस्था राबविणाऱ्या शासन-प्रशासनाच्या गैरवर्तनामुळे हि अन्यायग्रस्तांची भावना निर्माण झाल्यावर व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करणे आणि शासन-प्रशासनात सुधारणा करणे हा उपाय योजायला हवा. संविधान संकल्पनेविषयक गैरसमजांना दूर करण्याऐवजी लोकानुनय म्हणून लोकांच्या मनातील गैरसमजांना कुरवाळण्यात केवळ राजकीय स्वार्थ साधले जातात, समाजाचे व्यापकहित बाजूला राहते.

त्यामुळे हे तथाकथित हिंदूहित’वादी’ हिंदूंचे सोडाच कोणत्याही समाजघटकाचे हित साधू शकत नाहीत, उलट आणखीन गर्तेत लोटण्यास हातभार लावतील. पक्षी यांना हिंदू-’अ’हित’वादी’ असे म्हणावं लागेल, कारण हिंदुत्ववादाकडे वळणाऱ्या हिंदूंचे अहित होते आहे हे स्पष्टपणे जाणवूनही राजकीय स्वार्थासाठी हिंदूंच्या व्यापक हिताचा सर्रास बळी दिला जातो आहे.

अन्यायग्रस्ततेच्या भावनेपोटी कट्टर हिंदुत्ववादाकडे वळणाऱ्या हिंदूंना रोखायला हवे पण त्यासाठी भारतीय परंपरेतून आलेल्या तत्वचिंतनापैकी कालसुसंगत भाग घेऊन स्वातंत्र्य-समता-बंधुता-धर्मनिरपेक्षता इत्यादी आधुनिक संविधानिक लोकशाही मुल्ये कशी रुजवता येतील याकडे लक्ष द्यायला हवं. ‘घटना सर्वोतपरी’ हे थेट सांगण्याचा आग्रह बिलकुल नाही, मात्र याबाबत तथाकथित हिंदूहितवादी लोकांवर विसंबून राहण्याची गरजच काय?

हे हिंदूहितवादी सोंग पुरोगामित्व-प्रतिगामित्व यांच्यातील फरक स्पष्टपणे न कळलेल्या पण नैसर्गिक मुक्ततेच्या प्रेरणेने पुरोगामी मूल्यांकडे झुकू पाहणाऱ्या व्यक्तींना भुलवून हिंदुत्ववाद्यांच्या कच्छपी लावण्यासाठीच आहे.

एकाबाजूला मुस्लीम जमातवादाकडे स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या लोकांनी अंशतः दुर्लक्ष करून, थेट टीका टाळून, धर्मभावनांची खिल्ली उडविण्याऐवजी सार्वत्रिक शिक्षणासारख्या सौम्य मार्गाने प्रबोधन करण्याचा, मुख्य आधुनिक मूल्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला मात्र लांगुलचालन म्हणायचं आणि दुसऱ्याबाजूला हिंदूंच्या बाबतीत तेच धोरण राबविण्याचा आग्रह धरायचा हा तथाकथित हिंदूहितवाद्यांचा दुटप्पीपणा आहे.

वास्तविक पाहता हिंदूंसह सर्वच नागरिकांच्या प्रबोधनासाठी हा सौम्य मार्ग संविधानाने आखून दिलेल्या व्यवस्थेने राबविला आहे, त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचं मत रेटण्यासाठीच हि हिंदुहितवादाची मांडणी हेतुपुरस्सर आहे.

विवेकवाद आणि पुरोगामित्वाची अपरिहार्यता:

नायलाजास्तव आणि लोकलज्जेखातर आमचेही विचार-कृती-भूमिका आणि अंतिम ध्येय वैज्ञानिक दृष्टीकोन असलेलं आहे, आमचीही मुल्ये संविधानिक व पुरोगामी आहेत असं सांगण्यात आणि सिद्ध करण्याच्या धडपडीमागे तथाकथित हिंदूहितवाद्यांची आगतिकता दिसून येते हेच पुरोगामित्वाचे फार मोठे यश आहे.

टोकाची टीका, उडवलेली खिल्ली, द्वेषपूर्ण मांडणी याने लोकं दुरावतात त्यामुळे सौम्य भाषेत हळुवारपणे सुधारक विचारांची पेरणी करावी, लोकांना थेट मूर्ख ठरवण्याऐवजी आपुलकीने कानउघडणी करावी इत्यादी मांडणी हि विवेकवादी (अर्थात पुरोगामी) विचारधारेची आहे. या मांडणीला अब्राहम कवूर, बसवप्रेमानंद, जेम्स रंडी, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी या सर्व आणि इतर अनेक विवेकवादी पुरोगामी व्यक्तींच्या जीवनकार्याचा आधार आहे. तर “अस्मिता मोठी कि स्वहित?” या प्रश्नाचं उत्तर देताना स्वहित महत्वाचे हे सांगणे हा व्यक्तीस्वातंत्र्यवाद (हे हि पुन्हा एकदा पुरोगामी मूल्य) आहे. या मांडणीला हिंदूहितवाद(?) या नावावर खपवणे म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे.

राजकीय-सामजिक-आर्थिक-धार्मिक विचारसरणीचा परिप्रेक्ष समजून न घेता आल्यानेच हिंदूहितवाद्यांचा हा गोंधळ उडालेला दिसतो आहे. भारतीय लोकशाहीवादी साम्यवादी, समाजवादी, आंबेडकरवादी, अंनिस, सम्यक विद्रोही, लोकायत यांसारख्या पुरोगामी विचारधारांचे आणि त्यातून उभारलेल्या कार्याचे नीट आकलन नसल्यानेच तथाकथित हिंदूहितवाद्यांना पुरोगामी वर्णपट जोखता येत नाही. कोणतीही विचारधारा केवळ धड-मेंदू या दोनच अंगांवर उभी असते असं समजणे हे अयोग्य आहे, कारण वेगवेगळ्या स्तरांवर-आघाड्यांवर कार्यरत असणारी असंख्य अकल्पित अंगे यांचं दोनच वर्गात केलेलं सरसकटीकरण मर्यादित असेल.

कोणताही राजकीय-सामजिक-व्यक्तिगत स्वार्थ नसतानाही एखाद्या विचारांवर ठाम विश्वास असल्याने विशिष्ट ध्येयाने प्रेरित असणारं नेतृत्व या आकलनाने समजून घेता येत नाही. तसेच व्यक्तिगत प्रेरणांना समूहाच्या प्रेरणेसमोर दुर्लक्षले जाते.

यास्तव पुरोगामी आणि संविधानिक मुल्यांचा आग्रह धरणारे लोक हे आक्रस्ताळेच असतात, हे लोक मुस्लीम वा हिंदूइतरधर्मियांच्या समस्यांवर ठाम भूमिका घेत नाहीत; म्हणूनच त्यांच्या विचारांनी हिंदूंचे हित साधता येणार नाही किंवा हिंदूंना हिंदुत्ववादी बनण्यापासून रोखता येणार नाही हा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन असणे हे तथाकथित हिंदूहितवाद्यांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावं लागेल.

आमचेच मत बहुसंख्यांकांचे प्रतिनिधित्व करते असे समजून आम्ही सुचवू तोच मार्ग सर्वोग्य असेच गृहीत धरून चालणाऱ्या या तथाकथित हिंदूहितवाद्यांसमोर सर्व युक्तिवाद अरण्यरुदन ठरतात. संविधानरुपी आदर्शाला अवनत करून स्वतःच्या सोयीचा करण्याऐवजी आपले जीवनच उन्नत करून आदर्शवत बनवणे हे कोणत्याही सुधारणावादी मोहिमेचे ध्येय असायला हवे.

वास्तविक पाहता संविधानाची निर्मिती होत असताना आज आपण ज्या तात्विक मुद्द्यांवर तावातावाने आम्हीच पहिले या अविर्भावात चर्चा करत असतो ते जवळजवळ सर्व विषय संविधान निर्मितीच्या चर्चेत तज्ञांकडून चर्चिले गेले आहेत. या सर्व चर्चा http://cadindia.clpr.org.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, जिज्ञासूंनी त्या जरूर वाचाव्यात.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?